अजिंठा लेणी

दिनांक २८ एप्रिल १८१९.

जॉन स्मिथ नावाचा एक ब्रिटीश सैनिक, शिकारी साठी जंगलात आला आणि तेव्हा त्याला जे दिसलं, त्याने तो आश्चर्यचकित झाला. दाट जंगलामध्ये असलेला एक अमुल्य ठेवा त्याला दिसला होता. हाच अमूल्य ठेवा आता जगभरातील अभ्यासकांना, पर्यटकांना आकर्षित करणार होता. ह्या सांसृतिक ठेव्याचे नाव म्हणजे अजिंठा लेणी. अंदाजे १,५०० वर्ष ही लेणी अज्ञात होती.  

भारतातल्या सुमारे १२०० लेण्यांपैकी जवळ जवळ ८० टक्के लेण्या ह्या महाराष्ट्रात आहेत, त्यांपैकीच एक महत्वपूर्ण लेणी म्हणजे अजिंठा लेणी होय.

बुद्ध धर्मियांनी ही लेणी सुमारे इसवीसनपूर्व २०० साली बांधावयास सुरुवात केली, पैठणच्या सातवाहन राजसत्तेने ह्या लेण्या खोदण्यास आर्थिक सहाय्य केले. अजिंठा लेणी समुहात एकूण ३० लहान मोठ्या लेण्या आहेत. ह्या सर्व लेण्या, बौद्ध धर्मातील हीनयान आणि महायान पंथाच्या आहेत.

लेणी कुठे खोदायची, याची एक विशिष्ठ पद्धत होती. साधारण त्यावेळेसच्या व्यापारी मार्गावर लेणी बांधली जायची. लेणी खोदण्यासाठी आवश्यक असणारा दगड मुबलक प्रमाणात आहे का, पाणी मुबलक आहे का, या सर्व गोष्टींचा विचार करूनच लेणी खोदली जायची. या सर्व गोष्टींचा विचार करूनच अजिंठा लेणी निर्माण केली गेली. या लेण्यांच्या निर्मिती मध्ये सातवाहन, गुप्त, वाकाटक, चालुक्य राजवटीचा ही सहभाग होता. ह्या लेणीच्या निर्मिती साठी साधारण ३० पिढ्या खर्ची पडल्या असाव्यात असा अंदाज बांधला जातो. या लेण्यांमध्ये आपल्याला आजही रंगीत चित्रे, स्तूप, विहार, चैत्यगृह, बौद्ध देव -देवतांच्या मुर्त्या बघायला मिळतात. त्याकाळातील लोकांचे पोशाख, जीवन शैली आपल्याला चित्रातून स्पष्ट होते. यातील काही चित्रे मात्र काळाच्या ओघात नष्ट होण्यास सुरुवात झाली आहे.

अजिंठा लेण्यांमध्ये अनेक प्रकारचे पाली भाषेतील लेख आपल्याला बघायला मिळतात. हे सगळे लेख ब्राह्मी लिपीत कोरले आहेत. या लेखांमधूनही आपल्याला अनेक प्रकारची प्राचीन माहिती मिळते. या लेण्यांमध्ये जातक कथा आपल्याला बघायला मिळतात. भगवान बुद्धांचे जीवन चरित्र यातून आपल्याला कळू शकते.

कालांतराने बुद्ध धर्माचा प्रभाव कमी होत गेला, आणि ह्या लेण्या ओस पडायला सुरुवात झाली.

ह्या लेणीचा शोध लागल्यानंतर काही काळाने, म्हणजेच १८४४ साली रोबर्ट गिल ह्या ब्रिटीश सैन्य अधिकार्याची अजिंठा येथे नियुक्ती झाली. हा रॉबर्ट गिल सैनिक असला, तरी हाडाचा चित्रकार होता. त्याने ह्या सगळ्या लेण्या स्वच्छ करून चित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. या रॉबर्ट गिल ची आणि पारू ची प्रेमकथा सर्वश्रुत आहे. त्यांची ही प्रेमकथा याच अजिंठ्याच्या परिसरात फुलली. गिल याने अजिंठा लेणीची अनेक चित्रे रेखाटली, या चित्रांचे प्रदर्शनही इंग्लंड मध्ये भरवले, मात्र प्रदर्शन सुरु होण्या आधीच, संग्रहालयाला लागलेल्या आगीत अनेक चित्रे भस्मसात झाली.

अश्या ह्या लेणीला १९८३ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. अजिंठा लेणी वर काही सिनेमे सुद्धा प्रदर्शित झाले आहेत.

अजिंठा लेणी औरंगाबाद – जळगांव या मार्गावर, औरंगाबाद पासून १०० किमी अंतरावर स्थित आहे. ह्या लेण्यांना भेट देण्यास ४ किलोमीटर पासून बस व्यवस्था केली असून इतर गाड्यांनी होणारे प्रदूषण टाळले जाते. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्यटक निवास ,शासकीय विश्रामगृह व लॉज आहेत. ही लेणी आठवड्यातून एकदा म्हणजेच सोमवारी बंद असते, या लेणीला भेट देण्याचा कालावधी  सकाळी ९.०० ते ५.३० असा आहे. अजिंठा लेणी ला भेट देण्यासाठी प्रती व्यक्ती ५० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. ही लेणी पाहण्यासाठी १ दिवसाचा पूर्ण वेळ राखून ठेवावा लागतो.

 

शेअर करा..

guest
2 Comments
Inline Feedbacks
View all comments
Omkar

अतिशय उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद…

Rajiv Pujari

छान माहिती