लेपाक्षी मंदिर

लेपाक्षी मंदिर हे आंध्रप्रदेश मध्ये असून, बंगळूरू पासून उत्तरेला सुमारे १०० किमी अंतरावर हिंदुपूर गावाजवळ स्थित आहे. या मंदिराला वीरभद्र मंदिर असेही म्हणतात.

स्कंद पुराणामध्ये ह्या मंदिराचा उल्लेख १०८ शिव क्षेत्रा पैकी एक असा आढळतो. हे तेच ठिकाण आहे, जिथे रामायणात सीता हरणाच्या प्रसंगी जटायू पक्षी रावणाशी लढता लढता खाली पडला व याच ठिकाणी श्रीरामांनी जटायूला मोक्ष मिळवून दिला. म्हणूनच या ठिकाणाला लेपाक्षी मंदिर हे नाव पडले.

 लेपाक्षी मंदिर हे नागलिंग आणि भव्य नंदी मूर्ती साठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण आहे. या मंदिरातील नंदी हा एकाच अखंड दगडातून निर्माण केला असून, याची उंची १५ फूट आहे व लांबी २७ फूट आहे, भारतातील हा सर्वात मोठा एकाश्म नंदी आहे. ह्या मंदिराचा संबंध अगत्स्य मुनींशी जोडला जातो, पण मंदिरामध्ये आढळलेल्या कोरीव लेखानुसार लेपाक्षी मंदिर, विजयनगर साम्राज्याचे राज्यपाल विरुपन्न नायक आणि विरान्न ह्या दोन भावांनी १५३० साली बांधले. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, या मंदिरात असलेले अंधातरी खांब होय. या खांबाखालून तुम्ही सहजपणे साडीसारखे पातळ वस्त्र घालू शकता. लेपाक्षी मंदिरामध्ये अनेक प्रकारची रंगीत चित्रे आपल्याला आढळून येतात. ह्या मंदिराच्या गर्भगृहात वीरभद्राची (भगवान शंकराचे रूप) मूर्ती स्थित आहे. या मंदिरात आपल्याला त्रिपूरांतक, अर्धनारीनटेश्वर, दक्षिणामूर्ती, गणेश मूर्ती अश्या अनेक मुर्त्या आढळून येतात.

या मंदिराला भेट देण्यासाठी हिंदुपूर रेल्वे स्थानक हे सर्वात जवळचे स्टेशन आहे. इथून मंदिर साधारण १२ किलोमीटर आहे. हिंदुपूर पासून सार्वजनिक वाहनाने किंवा खाजगी गाडीने लेपाक्षी मंदिरापर्यंत पोहोचता येते, या ठिकाणाला भेट देण्यासाठी हिवाळा ऋतू उत्तम आहे, तसेच या मंदिरात कुठलेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. हे मंदिर सकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत भाविकांसाठी खुले असते. या मंदिरा जवळच खरेदी साठी काही दुकाने उपलब्ध आहेत. या दुकानांमध्ये हाताने बनवलेल्या काही वस्तूंची विक्री होते.

 

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Rajiv Pujari

छान माहिती