झाडाश्रू

आज सकाळीच त्या झाडाच्या काही फांद्यांनी ठरवलं ..सुकलेली… सुकण्याच्या वाटेवर असलेली पानं आज टाकून द्यायची..हाकलून द्यायची…कधी काळी त्यांची शोभा वाढवणारी पानं त्यांना आता भार होत आहे अशी कुजबुज गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात चालू होती..ऋतुमाना नुसार काही दिवसांनी पानांना जायचं होतंच की..पण फांद्यांना वाटत होत की त्यांची सुंदरता…त्यांचा हिरवा रंग या तपकीरी हिरवट पानांच्या मुळे झाकोळला जात आहे…म्हणूनच झाडाला विश्वासात न घेता त्यांनी सगळं करायचं असं ठरवलं होत…. आपण काहीच केलं नाही अस दाखवण्यासाठी वाऱ्याला सोबत घेतलं…दुसऱ्याचं घर फोडण्यासाठी सर्व ताकद वापरणारे काही कमी नसतात… वारा त्यापैकी एक …

पानांचं काय …त्यांचा एकमेव आधार .. देठ…त्यावरच घाव घालण्याचा कट शिजला गेला होता..आणि त्याची करती करवती कोण …फांदी !

जिच्यासाठी पानांनी उन सोसलं, पाऊस झेलला, थंडी मध्ये पानं फांदीची चादर झाली… पानांचं होत का काही आयुष्य…फांदीसाठी करता करता कधी त्यांचा हिरवा रंग सरला त्यांना कळेलच नाही…. उमलने ते सुकने हा सारा प्रवास करताना मध्यंतरी एक बहरण्याचा काळ येऊन गेला… तो पण पानांनी फांदीच्याच नावावर केला..

फांदीमुळे त्यांनी जिच्या पोटातून म्हणजे जमिनीतून आपण वर आलो त्याच जमिनीकडे ही पाठ फिरवली… फांदी आपल्याला आकाशाकडे घेऊन जाईल अशी स्वप्ने बघत त्यांनी जमिनीवरचे पाय केव्हाच उचलून घेतले होते….

सकाळ झाली… वाऱ्याने त्या झाडाचे दार ठोठावायला सुरुवात केली…. ठरल्याप्रमाणे बंडखोर फांद्यांनी दार उघडले… झाडाचे डोळे अजून उघडायचे होते… वारा त्या फांद्यांमध्ये घुसला…. सळसळीच्या आवाजाने झाडाने डोळे उघडले… सुरुवातीला त्याला वाटलं वारा सुटला असावा…. आळस देत आणि आजूबाजूला पाहिलं… आजूबाजूची झाडं शांत आणि निश्चल होती… काही तर अजून झोपेत होती….. झाडांना स्वतःच्या सगळ्या फांद्यांकडे पाहिलं… बंडखोर फांद्या सोडून बाकीच्या फांद्या भीतीनं थरथरत होत्या… झाडाला कळून चुकलं … वारा सुटला नाही.. वारा घुसला आहे…त्याच्या घरात….त्याने सगळी ताकद पणाला लावून कुटुंब वाचवण्याचा प्रयत्न केला….. पण कुटुंबामधील कोणाची साथ जर कुटुंब उध्वस्त करणाऱ्याला असेल तर कुटुंबप्रमुख हताश होण्यापलीकडे काही करू शकत नाही.. वाऱ्याने डाव साधला होता… क्षणिक सुंदरतेच्या मोहा पायी फांद्यांनी त्याला साथ दिली होती…. आपलं संपूर्ण जीवन त्या फांद्यांना समर्पित करणारी ती चुकू लागलेली हिरवट तपकिरी रंगाची पाने… खाली कोसळू लागली होती… त्यांचा आक्रोशामध्ये अविश्वास, धोका असल्यामुळे आक्रोशाच्या वेदनेने त्यांचं नाजूक जाळीच हृदय फाटत होतं…..

ही सळसळ…. हा वारा… नेहमीचा नव्हता… जमिनीला कळलं होतं…तिच्या एका लेकराशी धोका झाला आहे…! माय ती मायच… कोसळणाऱ्या तिच्या लेकरांना… त्या पानांना तिने अलगद झेललं…! फांदीकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं… नवीन उमलू लागलेल्या पानांना सावरत फांदीने एक कुत्सित हास्य केलं …! झाड आगतिक नजरेने जमिनीकडे पाहत होतं…! कुटुंबामध्ये झालेल्या बंडामुळे झाडं मनातून तुटलं होतं…!

दुसऱ्या दिवशीची सकाळ…. बंडखोर फांद्या झोपेत असतानाच… त्यांचे सर्व अवयव कडकड मोडण्याचा आवाज झाला… प्रत्येक क्षणागणिक वेदनेचा कैक पटीने गुणाकार होत गेला… काही बोध होण्याच्या आत… धप्पकन आवाज झाला….! वाऱ्यानेच केले होते हे …! त्याच वाऱ्याने जो काल फांद्यांच्या सोबत होता…आणि आज त्या झाडासोबत…! फांद्यांनी प्रश्नार्थक नजरेने झाडाकडे पाहिलं…. झाडावर काही नवीन फांद्या उमलत होत्या… झाडाचं कुटुंब वाढत होतं..! झाडाच्या डोळ्यात पाणी होतं…. त्याने बोलायला तोंड उघडलं.. पण तोपर्यंत बंडखोर फांद्यांचे डोळे मिटले होते….. कुटुंब वाचविण्यासाठी झाडाला तुटावं लागलं…!

 

रत्नदिप जोगदंड

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Sanjay Dongare

खूप सुंदर, रत्नदीप.
Please contact me.