# 🧢 STORIES OF STORY TELLER @ 👒
——— Rajashri ————
‘सहिष्णु’ आज खूप खूष होती. आणि का नाही असणार, आज तिला तिच्या आत्ये बहिणीचा फोन आला होता. तिच्या आत्ये बहिणीला नातू झाला होता. त्याच्या बारशाचे आमंत्रण देण्यासाठी तिने सहिष्णु ला फोन केला होता.
सहिष्णु ने Love marriage केले होते म्हणून तिच्याशी सर्वांनी संबंध तोडले होते. आणि तरीही तिला आज तिच्या माहेराहून कुणी तरी आमंत्रण देण्यासाठी फोन केला होता याच कारणामुळे ती खूप खूष होती.
नवरा येताच, थोडं घाबरतच, तिने त्याला आमंत्रण आल्याचे सांगितले. तीला वाटत होते की नवरा रागावेल. तीला पाठवणार नाही, परंतु झालं मात्र उलटचं. तो फार आनंदाने आणि उत्साहाने तिला म्हणाला की जा ना. कधी निघते आहेस तू जायला. तीला आधी आश्चर्य वाटलं, पण नंतर तिला धोक्याची जाणीव झाली. ही वादळापूर्वीची शांतता आहे हे ती समजून चुकली होती.
सहिष्णु तशी शिकलेली, चांगल्या घरची मुलगी होती, पण प्रेमात पडली आणि सगळ होत्याचं नव्हतं झालं. आता तिचं आयुष्य फक्त रांधा वाढा उष्टी काढा इतकंच मर्यादित राहिलं होतं. झालंच तर नवऱ्याच्या शिव्या खा, मार खा. तिचे सासु-सासरे पण तिच्या बाजूने नव्हते. तिच्या नवऱ्याचे बाहेर दुसऱ्या बाईशी संबंध होते. त्याच्या आईवडिलांना पण ते मान्य होत. परंतु सहिष्णु त्याला डिव्होर्स देत नव्हती आणि घरातून बाहेर कुठे जात नव्हती. म्हणून त्याला काही कायदेशीर कारवाई करता येत नव्हती. म्हणून तर नवऱ्याने तिला लगेचच जायची परवानगी दिली होती.
जायला अजून आठ दिवसांचा अवधी होता. आता तिच्याशी घरात कोणी भांडत नव्हते. ती स्वतःची कामे संपवून निवांत बसून राही. विचार करत राही. नवऱ्याने तिला दोन साड्या आणून दिल्या. बाळा साठी छोटा झोपाळा आणून दिला. खर्चाला थोडे पैसे दिले. घरात आता बरीचशी खलबतं सुरू होती. नक्की काय चाललं आहे हे तिला नीटसं कळतं नव्हतं. पण तिला अंदाज आला होता की खूप मोठं काही तरी होणार आहे.
जायचा दिवस उजाडला. तिने भरभर सर्व आवरलं. ती जायला निघाली, नवरा म्हणाला की मी तुला सोडायला येतो. ती दोघं छत्रपती शिवाजी टर्मिनल पर्यंत ट्रेन ने आले. तो तिच्याशी नीट बोलत होता. तिथून पुढे ते दोघे टॅक्सीने गेटवेला आले. एक क्षण तिला वाटल की तो तिच्या सोबत येत आहे, परंतु त्याने लॉन्च चे एक तिकीट काढून तिच्या हातात दिलं. ती सगळा लवाजमा सांभाळत लॉन्च मध्ये चढली. बसायला जागा मिळाली तशी ती मागे वळून नवऱ्याला शोधू लागली. तीला bye करायला तो थांबलाच नव्हता. तीला गेट मधून बाहेर पडणारी त्याची पुसटशी आकृती दिसली.
थोड्याच वेळात लॉन्च सुटली. तिच्या फोनची बेल वाजत होती. तिने फोन उचलला. नवऱ्याचा फोन होता. तो तिला म्हणाला की, तू चालली आहेस ती कायमची. पुन्हा घरी येण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्यासाठी ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद करण्यात आले आहेत. आज माझं लग्न आहे. मी आता हॉल वरच चाललो आहे.
फोन कट झाला होता तरी ती त्या फोन कडेच पहात बसली होती. लॉन्च भर समुद्राच्या मध्यात येऊन पोहोचली होती. आता ती हेलकावे खात होती. त्या हेलकाव्यांनी सहिष्णु भानावर आली. आता तिच्या समोर सर्व चित्र अगदी स्पष्ट झाले होते. घरात का सगळे तिच्याशी चांगल वागत होते. कसली खलबतं सुरू होती हे ही तिला समजले होते.
थोडा वेळ ती शांत बसली. विचार केला आधी बहिणीच्या घरी जाऊ. बारसे झाल्यावर मग बघू काय करायचं ते. तिने रुमाल ओला केला आणि त्याने चेहरा स्वच्छ पुसून काढला.
चेहरा पुसत असतांनाच तिच्या असं लक्षात आलं की, एक खुर्ची सोडून पलीकडच्या खुर्चीत बसलेला माणूस आपल्याला न्याहाळत आहे. कदाचित तो बोटीत चढल्या पासून तिला पहात असावा पण ती तिच्याच विचारांत मग्न असल्याने ह्या गोष्टीकडे तिने दुर्लक्ष केले असावे. ह्याला कुठेतरी पूर्वी पाहिले आहे असेही तीला एकदा वाटले. पण ते तर शक्य नाही. कारण ती बऱ्याच वर्षांत कुठे गेलीच नव्हती. जाऊ दे. तिने पर्स मधून मोबाईल काढला आणि ती गेम खेळायचा प्रयत्न करत होती, पण हेलकाव्यानं मुळे ते शक्य होत नव्हते. तिने मोबाईल बंद केला. तरीही तो तिलाच पहात होता. अगदी समोरून नसला पहात तरी आडून आडून पहातच राहिला होता.
लॉन्च चा प्रवास संपला. ती कशी बशी सगळा लवाजमा सांभाळत उतरत होती. तिने पाहिले की, समान वाहून नेणाऱ्या गाडीवर बसून तो निघून गेला होता. हुश्श!! म्हणजे हा आपल्याला न्याहाळत नव्हता तर, मला उगाचच वाटले असावे असे. ती हळू हळू चालत ST स्टँड पर्यन्त पोहोचली. तिने पाहिलं की, तो एका काळ्या रंगाच्या लांबलचक गाडीला टेकून सिगारेट ओढत उभा आहे आणि तिलाच पहात आहे.
ST सुटली होती, ती ST च्या दिशेने पळतचं सुटली, कारण की ही ST गेली तर दोन तास तरी पुढे ST नव्हती. ST वाल्याने तिला पळत येताना पाहिले, त्याने ST थांबवली. पण सहिष्णु धाडकन जमिनीवर पडली. कोणाला काय झाले ते समजल नाही. पोलिस बुत मधील दोन लेडीज कॉन्स्टेबल धावत आल्या, आजूबाजूच्या तीन बायका ही मदतीला आल्या. लेडीज कॉन्स्टेबल ने तिला उचलून एका बाकावर बसवले, तीला बसताही येईना. ज्या इतर तिघी जणी होत्या त्यांनी सहिष्णुचे समान गोळा करून तिच्या जवळ आणून ठेवले आणि त्या ST च्या दिशेने रवाना झाल्या. ST गेली.
तो त्या लेडीज कॉन्स्टेबल जवळ गेला आणि त्यांना म्हणाला की, “मी हिला आणि हिच्या घरातील सर्वांना ओळखतो. ती तिच्या आत्ये बहिणीच्या घरी बारशाला आली आहे. मी तिला घरी नेऊन सोडतो.”
आता तो तिच्या जवळ आला. तिच्या आजूबाजूला ठेवलेले तिचे समान गाडीच्या डिकीत नेऊन ठेवले. त्याने तिची चप्पल उचलली तर चप्पल तुटली होती, अच्छा! म्हणून ही पडली तर. ती थोडी तंद्रीतच होती. तो पोलिसांशी काही तरी बोलला हे तिने पाहिलं, तो समान उचलून गाडीत ठेवतो आहे हे पण समजत होत, पण विचार केला की डोकं गरगरत होत. आता तो तिला म्हणाला, “चल तुला घरी सोडतो.” तिने उभ रहायचा प्रयत्न केला, परंतु ती पुन्हा पडायला लागली. त्याने तिला उचलून घेतली आणि गाडीत नेऊन बसवली तीला बसता येत नव्हते, “अरे! हीचा तर एक पाय फॅक्चर आहे.”, तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने पलीकडे जाऊन गाडीचा दुसरा दरवाजा उघडला. तिकडून उशी आणली आणि तिच्या माने खाली घातली. तीला म्हणाला, “बस तू. मी आलोच.” तो टपरी वर गेला एक स्पेशल चहा बनवून घेतला आणि घेऊन आला. “चहा घे थोडा. तुला बर वाटेल.” तीने कसा बसा चहा संपवला. ती अर्धवट गुंगीत होती.
तो गाडीच्या बोनेटला टेकून उभा होता. सिगारेट त्याने सुलगावली होती. त्याचे लहान लहान झुरके मारत तो कसल्याशा गहन विचारात गढला आहे असं तिला वाटलं. बहुतेक त्याचा निर्णय झाला असावा, त्याने एक जोरात क्रश ओढला, उरलेली सिगारेट जमिनीवर चिरडली. त्याने चहावाल्या पोराला हाक मारली. तिच्या जवळ येऊन चहावाल्या बंटीच्या मदतीने तिला अलगद मागच्या सीटवर झोपवले. बंटीच्या खिशात त्याने 50 ची नोट कोंबली. मागची दोन्ही दार नीट बंद केली आहेत ह्याची खात्री करून तो ड्रायव्हिंग सीट वर येऊन बसला. आता तिला फक्त गाडी सुरू झाली हे जाणवत होतं. गाडीच्या काचेतून पाळणारी झाडं दिसत होती. त्याने कुणाला तरी फोन लावला होता. तो कुणाला तरी पटापट सूचना करत होता. कशाची तरी तयारी करायला सांगत होता. तिची शुध्द हळूहळू हरपत चालली होती.
गाडी वेगाने सुसाट पळत सुटली होती. त्याच्या डोक्यात विचार सुरू होते. कशी होती ही आणि काय अवस्था झाली आहे हीची अशी. काय काय भोगलं असेल हिने. अचानक एक दिवस बातमी आली की हिने लग्न केलं. कुठे राहते, नवरा काय करतो, पुढे काहीच कळलं नाही. आणि आज अशी समोर आली. त्याच्या विचारात कधी बंगला आला हे समजलं नाही. गाडी एका आलिशान बंगल्याच्या आवारात घुसली. भरभर दोन बॉय स्ट्रेचर घेऊन आले. तीला स्ट्रेचर वरून वरती नेण्यात आले. आत सर्व सुविधा करण्यात आल्या होत्या. भरभर एक्सरे काढण्यात आले. तिचा पायाला प्लास्टर करण्यात आलं. तीला बंगल्यातील एका रूम मध्ये ठेवलं होतं. दिमतीला एक नर्स होती. तरीही तो तिच्या बाजूला बसून होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती.
दोन दिवस होऊन गेले होते तरीही ती अजून शुद्धीत आली नव्हती. खूपचं अशक्तपणा आला होता त्यामुळे वेळ लागत असावा. तो मध्ये मध्ये तीच्या बहिणीच्या घरी जाऊन येत होता. तिकडे सर्व बारशाच्या तयारीत मग्न होते. आपण सहिष्णुला बारशाचे आमंत्रण दिले होते आणि सहिष्णु यायला पण निघाली होती मग अजून का नाही आली असा प्रश्न तिच्या बहिणीला पडत नव्हता. आणि जोपर्यंत कुणी चौकशी करत नाही तोपर्यंत आपणही कुणाला काही सांगायचे नाही असेच त्याने ठरवले होते. तो दररोज दोनवेळा बहिणीकडे जाऊन येत होता, हेतू इतकाच की सहिष्णुच्या नवऱ्याचा जर का फोन आला बहिणीला की सहिष्णु पोहोचली की नाही हे विचारायला तर गोंधळ नको व्हायला. परंतु असे काही घडताना त्याला दिसत नव्हते. दोन दिवसांत का नसेल केला हिच्या नवऱ्याने फोन ? आपली बायको व्यवस्थित पोहोचली किंवा नाही याची साधी चौकशी सुध्दा माणसाने करू नये? बरं सहिष्णूच्या मोबाईलवर पण फोन आला नव्हता कारण तिचा फोन तर हा सतत जवळ बाळगून होता, न जाणो कधी हिच्या नवऱ्याचा फोन आला तर मिस नको व्हायला. हा सगळा प्रकार त्याच्या चिंतेत भरचं टाकत होता.
आत्ता सहिष्णूला शुध्द आली. तिने अलगद डोळे कीलकीले केले आणि इकडे तिकडे पाहू लागली. त्याचा जीव भांड्यात पडला. तिने त्या आलिशान खोली वरून नजर फिरवली. तीला समोर उभी असलेली नर्स दिसली. जी इंजक्शन टोचायची तयारी करत होती. आणि शेजारी बसलेला तो दिसला. तिच्या चेहऱ्यावर भल मोठ प्रश्न चिन्ह निर्माण झाले. तो म्हणाला, तू काळजी नको करुस, तू बरी आहेस. नर्स ने इंजक्शन टोचले. तो नर्सला सांगून बाहेर पडला. थोड्या वेळानं तिला पूर्ण जाग आली. ती नर्सला विचारत होती. मी कुठे आहे? मला काय झालं आहे? हे कोणाचं घर आहे? इतक्यात तो आत येत तिला म्हणाला की, हे माझं घर आहे. तुझी शुध्द हरपली होती आणि म्हणून मी तुला इकडे घेऊन आलो आहे. दोन दिवसां नंतर तू आज शुद्धीत आली आहेस. बाईसाहेब तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तर कृपया नाश्ता करून घ्या. त्याच्या हातात ट्रे होता. तिने उठायचा प्रयत्न केला तेव्हा तिला जाणवले की तिचा एक पाय जड लागतोय. तो झटकन पुढे झाला. अहंहं ! उठायचं नाही हं! ह्या नर्स करतील सर्व. त्याने नर्सला इशारा केला तसा नर्स ने बेड एका बाजूने वर केला ट्रे तिच्या पुढ्यात ठेवला. नाश्ता झाला तशी तीला थोडी तरतरी आली. तो तिला म्हणाला की तुला काही हवं असेल तर नर्स ला सांग . मी बाहेर जाऊन येतो. तो बाहेर पडला. त्याला तिच्या बहिणीच्या घरी जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यायचा होता.
इकडे ही नर्सला काही प्रश्न विचारत होती. ज्याची उत्तरं नर्स कडे पण नव्हती. फक्त तिला एवढेच समजले होते की हा माणूस इंजिनियर आहे. त्याचा मोठा भाऊ डॉक्टर आहे. त्या भावाचे हॉस्पिटल आहे. ही बेशुद्ध होती तेव्हा तिला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले तिथे प्लास्टर करण्यात आले. मग हॉस्पिटल मध्ये ठेवलं तर उगाच सगळी कडे कसली तरी चर्चा होईल सगळ्यांना काहीतरी समजेल, असे ते छोटे दादा म्हणाले आणि त्यांनी तुम्हाला इथे त्यांच्या घरी आणले. मला नर्स म्हणून इथे तुमच्या देखभालीसाठी ठेवले आहे. दोन दिवस छोटे दादा सतत तुमच्या जवळ बसून होते. त्यांनी तुमची खूप सेवा केली.
‘प्रमोद’ तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तीला एका सेकंदात सगळा भूतकाळ आठवला. सहिष्णु मुंबईत रहायला होती. आणि कधीतरी गावी जायची. प्रमोद हा तिच्याच गावातील मुलगा. तो गावीच असायचा. पण खूप हुशार. ही इकडे मुंबईत वाढत होती तर तो तिकडे गावात. पण जेव्हा सहिष्णु गावाला जायची तेव्हा दोघे एकत्र खेळायचे. हळूहळू दोघे मोठे झाले. बालपणाचं मैत्रीत रूपांतर झाले. गावी गेल्यावर त्यांची प्रत्येक संध्याकाळ समुद्रकिनाऱ्यावर जाऊ लागली. गप्पांच्या मैफली रंगू लागल्या. मुंबईतील गमती जमती, गावातील गमती एकमेकांना सांगू लागले. कधी पिक्चर, तर कधी पिकनिक होऊ लागल्या. बघता बघता मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रमोद सहिष्णु वर मनापासून प्रेम करू लागला. सहिष्णु मात्र मुंबईत वाढलेली थोडीशी अवखळ होती. तिलाही प्रमोद आवडत होता पण मैत्री पलीकडे ती विचार करत नव्हती. त्यांच्या घरातल्यांनाही, हे प्रेम आणि मैत्री वालं कॉम्बिनेशन आवडलं होतं त्याचं रूपांतर भविष्यात लग्नात करावं असं मोठ्यांना वाटत होतं. सहिष्णुचे व प्रमोदचे वडील हे दोघे चांगले मित्र होते. सहिष्णु ही लाडात वाढलेली थोडीशी अवखळ अल्लड मुलगी होती. गोरी पान, नाजूक शरीरयष्टी , उंच, देखणी. कोणीही पहाताच क्षणी प्रेमात पडावं अशी होती. आणि प्रमोद ही उंच, गोरा, देखणा, रुबाबदार, पिळदार शरीरयष्टी चा होता. त्या दोघांना एकत्र फिरताना पाहून लोकं म्हणायचे, “तो पहा लक्ष्मी-नारायणाचा जोडा चालला आहे.”
प्रमोद इंजिनियर झाला आणि सहिष्णु ने कॉमर्स पूर्ण केले. प्रमोदला परदेशात नोकरी मिळाली. तो परदेशात गेला. सहिष्णु मुंबईत एका ऑफिस मध्ये क्लार्क ची नोकरी करू लागली. आणि दोघांचे वडील, ह्या दोघांचे चार हात कधी करायचे याचे मुहूर्त शोधू लागले.
पण म्हणताना की कर्माची गती निराळीच असते ती एका क्षणात राजा रंक आणि रंकाचा राजा ही बनवते. सहिष्णु च्या ऑफिस मध्ये एक क्लाएंट आला. त्याच्याशी तिची ओळख झाली. किंवा त्याने तिच्याशी मुद्दाम ओळख करून घेतली असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. सहिष्णु ला त्याचा कपटीपणा समजला नाही. तो आता दररोज सहिष्णुच्या ऑफिस बाहेर येऊन थांबे. गप्पा मारी. कॉफी प्यायला घेऊन जाई. हळूहळू घरा पर्यंत सोडायला येऊ लागला. सहिष्णु गुरफटत गेली. आणि एक दिवस त्याच्याशी कोर्ट मॅरेज करून आई वडिलांच्या दरात येऊन उभी राहिली. वडिलांनी तिथेच तिच्याशी संबंध तोडले. नव्या नवलाईचे दिवस संपले. सहिष्णु चे हाल आता कुत्रं देखील खाईना असे झाले. परतीची वाट बंद झालेली. बिचारी नशिबाला दोष देत दिवस ढकलत राहिली.
इकडे प्रमोद परदेशातून भारतात आला. सहिष्णुशी लग्न करून तीला सोबत नेण्यासाठी. पण इकडे येऊन एकतो तर काय, भलतंच काहीतरी घडून गेलेलं. कुणीही धड काही सांगेना. बिचारा पूर्णपणे कोलमडून पडला. सगळ्या स्वप्ननांचा चुराडा झालेला. तो वेडापिसा झाला. सगळ्यांनी खूप समजावलं पण काहीच उपयोग नाही. तासनतास एकटा बसून राही. याला आता वेड लागेल अशीच चिन्ह दिसू लागली. त्याचं लग्न करून टाकावं असं घरच्यांना वाटू लागलं. पण प्रमोद ने नकार दिला. तो म्हणाला की जर सहिष्णु सारखी मुलगी असं वागू शकत असेल तर जगातील इतर कोणत्याही मुलीवर मी कधीचं विश्वास ठेऊ शकणार नाही. आणि जर विश्वास नसेल तर लग्न करून तरी काय उपयोग. मी आजन्म ब्रह्मचारी राहीन. मग त्याने लग्नच केले नाही. तो पुन्हा परदेशात निघून गेला.
कधीतरी भारतात येई. भावाला भेटायला. आला की संध्याकाळी समुद्र किनारी जाऊन बसत असे. तासनतास आठवणीत डुंबत असे. याच समुद्र किनारी त्याची चहावाल्या बंटीशी गट्टी जमली. त्याने बंटीला सगळी स्टोरी सांगितली.
आज ही तो असाच त्याची काळी गाडी घेऊन किनाऱ्यावर आला होता . कितीतरी वेळ बसला होता. त्याला काय वाटले कुणास ठावूक. लॉन्च ने गेटवे ला गेला होता. फेरफटका मारण्यासाठी. आणि परत येताना, बोटीत त्याला ही दिसली होती. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासचं बसत नव्हता. विचारू का हिला, बोलू का तिच्याशी ? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात उमटले आणि विरघळून गेले. तो तिला फक्त न्याहाळत होता.
जेव्हा तो गाडीला टेकून सिगारेट पीत तिची वाट पहात उभा होता तेव्हाच बंटीला त्याच्या हालचाली नेहमी पेक्षा वेगळ्या जाणवल्या होत्या. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीची उदासीनता नव्हती. आणि जेव्हा ती खाली पडली होती, तेव्हा ज्या शिताफीने प्रमोद पळाला होता, तेव्हाच बंटी समजला होता की ही तीच आहे, की जिच्या साठी साहेब येडापिसा झाला होता.
***
तो बाहेरून तिच्या खोलीत प्रवेश करत म्हणाला, ” काय बाईसाहेब कसं वाटतंय आता तुम्हाला?”
ती त्याच्या कडे बघून गोड हसली. त्याची खात्री पटली की हिने आपल्याला ओळखले आहे. तो पण हसतच पुढे आला.
” काय मग ‘सहि’ All is well. ओळख आहे म्हणायची.”
” पम्या” एवढंच म्हणून ती हसली.
त्याने नर्सला जायला सांगितले. “आता तुम्ही उद्या सकाळी या.” नर्स निघून गेली.
त्याने खिशातून तीचा मोबाईल काढला आणि तिच्या हातात दिला. म्हणाला, ” कुणाचा फोन येईल म्हणून मी माझ्या जवळ ठेवला होता, परंतु कोणाचा फोन नाही आला. तू फोन करून सांग तुझ्या घरी, तू इथे आहेस ते. म्हणजे तुझे Mr. येऊन तुला घेऊन जातील. काळजीत असतील सगळे. मी तुझ्या बहिणीच्या घरी देखील जाऊन आलो, पण त्यांना तुझी काही पर्वा आहे असं मला वाटलं नाही, किंबहुना त्यांना कोणाला तुझी काही पडलेली नाही. मग मी पण त्यांना तू इथे आहेस हे सांगितलं नाही अजून. तुझी तिकडे जायची इच्छा असेल तर मी सोडतो तुला तिकडे.”
तिने शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घेतलं. त्याने पुढे केलेला मोबाईल घेतला आणि बाजूला ठेऊन दिला.
“अगं फोन करतेस ना ?”
” नाही” ती म्हणाली.
मग तिने सर्व त्याला सांगायला सुरुवात केली. ……. त्याने तिच्या तोंडावर एक हात ठेवला आणि दुसऱ्या हातात तिचा हात घेतला.
” बस् सहि! बस्! ह्याच्या पुढे एक शब्दही बोलू नकोस. मला नाही ऐकवत हे सारं. ”
ती शांत बसली. शेवटी हळू आवाजात स्वतःशीच पुटपुटली, ‘लॉन्च मध्ये आला तो त्याचा शेवटचा फोन होता. एव्हाना त्याचं लग्नही झालं असेल. त्याच्या साठी मी मेली आहे.’ तिच्या डोळ्यांतून अश्रू वहात होते.
***
त्याचे मोठे बंधू खोलीत आले. त्यांनी ‘सहि’ ला तपासले.
ते म्हणाले, ” आता ही एकदम ok आहे. फक्त दोन महिने तरी प्लास्टर काढता येणार नाही.” ” काय मग सहि ओळख पटली का? कोणाच्या घरात आहेस ते?
सही हसली, “काय दादा तुम्ही पण चेष्टा करता माझी.”
दादा म्हणाले, ” आता पूर्ण बरं वाटे पर्यंत इथेच रहायचं. संकोच करायचा नाही. काही लागलं तर नर्सला सांगायचं.” असे बोलून दादा निघून गेले.
आता सहिष्णु रिलॅक्स झाली होती. दिवस सरत होते. तिच्यातील अशक्तपणा दूर झाला होता. प्रमोद दिवसभर त्याच्या कामात असे. पण संध्याकाळ झाली की ‘सहि’ जवळ येऊन बसे. दोघांच्या खूप गप्पा रंगत. आता तिचे प्लास्टर काढण्यात आले होते. ती wheel chair वर बसू लागली होती. प्रमोद तिला खाली आवारात घेऊन जाई. त्याच्या मदतीने ती एक एक पाऊल चालू लागली होती.
चालता चालता ती प्रमोदला म्हणाली, ” प्रमोद! माझ्यासाठी एखादी नोकरी बघशील का? म्हणजे मी स्वतःच्या पायावर उभी राहीन. मला दुसऱ्यावर अवलंबून रहायला नाही आवडणार.”
प्रमोद हसून म्हणाला, ” आत्ता लगेच आज पासून कामाला जाणार का तू ? पण सही मॅडम, तुम्हाला आवडो किंवा न आवडो, सध्या तरी चालण्यासाठी तुम्ही ह्या ‘ पम्यावर’ अवलंबून आहात .”
दोघेही खळखळून हसले.
तो म्हणाला, ” तू नको काळजी करुस. मी सर्व काही नीट करीन. माझ्यावर विश्वास ठेव.”
सहीला त्याने सांगितले की तो दोन दिवस बाहेर जाणार आहे, कामानिमित्त.
***
आणि तो थेट मुंबईला आला. तिच्या वडिलांना भेटला. त्यांना सर्व परिस्थितीची जाणीव करून दिली.
“तुम्ही तिच्या पाठीशी ठाम उभे रहा” असे त्यांना सांगितले.
त्याचा प्लॅन काय आहे ते ही त्यांना नीट समजावून सांगितले. वडील तयार झाले.
तो म्हणाला, ” तुम्ही परवा येऊन तिला घेऊन जा.”
***
दोन दिवसांनी तो घरी आला. तिने पाहिले की आज तो हसण्याच्या किंवा मस्करी करण्याच्या मुड मध्ये नाही. केव्हा पासून तो गॅलरीत उभा राहून सिगारेट ओढत होता. बहुतेक ह्याला कोणताही गहन विचार करताना किंवा निर्णय घेताना सिगारेट ओढण्याची सवय असावी. कदाचित ह्याला आपल्याशी काही बोलायचे असावे. पण कसं बोलावं म्हणून विचार करत असावा. ती हळूहळू चालत त्याच्या जवळ गेली.
ती :– “कसला विचार करत आहेस.”
तो :–“काही नाही.”
ती म्हणाली, “मला काही सांगायचे आहे का?”
तो :– ” हो.”
ती :– “काय?”
तो :– “उद्या तुझे वडील तुला न्यायला येतील, तेव्हा तू त्यांच्या बरोबर तुझ्या घरी जा.”
ती फक्त त्याच्या चेहऱ्या कडे बघत राहिली. तो तिला घेऊन खोलीत आला. तीला खुर्चीत बसवले.
तो :– “सही! खरं सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे?”
ती :– “असं का विचारतोस?”
तो :– “आहे किंवा नाही हे सांग?”
ती :– ” हो आहे.”
तो :– “मी जो निर्णय घेईन तो तुझ्या भल्या साठी असेल, याची तुला खात्री आहे? ”
ती :– ” होय! ”
“माझ्यासाठी नोकरी शोधली आहेस तू?”
तो :– “हो ”
ती :– “कसली नोकरी आहे?”
तो :– “माझ्या बायकोची, करशील?”
ती नुसती त्याच्या कडे पहातच राहिली.
तो :– “लग्न करायला आवडेल तुला माझ्याशी? होशील माझी पत्नी?”
तिने स्वतःचे दोन्हीही ओठ एकमेकांवर घट्ट दाबले, एक दीर्घ श्वास घेतला आणि पापण्या मिटून घेतल्या. तिचा होकार त्याला समजला होता.
***
तो जेव्हा तिच्या वडिलांना भेटला होता तेव्हाच त्याने त्याचा प्लॅन काय आहे हे त्यांना सांगितले होते. तो म्हणाला होता, मी उद्या गावी जाईन तेव्हा ‘सहि’ शी बोलून घेईन, तीच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीन, तुम्ही उद्या हिच्या नवऱ्याची भेट घ्या. त्याच्या पुढे डीवोर्स चा प्रस्ताव ठेवा. त्याने दुसरं लग्न केलेलं आहे त्यामुळे तो आढे-वेढे घेणार नाही. त्यानंतर तुम्ही येऊन सहिला घेऊन या इकडे मुंबईला. कोर्टाच्या सर्व कारवाया पूर्ण झाल्यानंतर आपण एक मुहूर्त काढू. सगळ्या गावाला आमंत्रण देऊ आणि आमचं लग्न उरकून टाकू. त्यानंतर मी हिला घेऊन परदेशात निघून जाईन.
ठरल्या प्रमाणे सहिष्णु चा डीवोर्स झाला. प्रमोद आणि सहि या दोघांचं लग्न झालं. आज ती प्रमोद सोबत परदेशात जायला निघाली होती. तिच्या बंगल्यावर निरोप द्यायला खूप गर्दी एकवटली होती. सगळे नातेवाईक जमले होते. सहिष्णु ची विचारपूस करत होते. निघायची वेळ झाली. दोघे गाडीत बसले. सगळे टाटा बाय बाय करत होते. पुन्हा लवकर या म्हणत होते. सहिष्णू वडिलांच्या गळ्यात पडून रडली होती. आज खऱ्या अर्थाने तिची पाठवणी होत होती.
ती प्रमोद सोबत विमानात बसली होती. तिने त्याच्या खांद्यावर मान टेकवली होती. विचार करत होती, ” आज खऱ्या अर्थाने तिच्या जीवनाचे विमान सुखाच्या दिशेने झेपावले होते.” ❤️
🙏🙏🙏
शेअर करा..
खुप छान