ज्याला आय नाय… त्याला काय नाय

मला आई नाहीये कळल्यापासून सवयच जडली प्रत्येक आई वाचायची

तिची हर एक कृती हृदयात साठवून आपली माय आठवायची

मी आठवतो तिला…

बाळाचं नाक हळुवार फुलवीत माझा सोनू कला म्हणतांना

आणि बाळाच्या नानूशी गमतीने खेळत लब्बाड नागूला म्हणतांना.

मी आठवतो तिला…

फसवली गेल्याने  बाळाला उकिरड्यावर सोडतांना

आणि मागे वळून हतबलपणे ओक्सााबोक्षी रडतांना

मी आठवतो तिला…

दुर्गुणी नवऱ्यास परमेश्वर समजून पुजताना

आणि असहाय परिस्थितीतही आपलं शील जपतांना

मी आठवतो तिला…

शिळा तुकडा मायेत भिजवून सोनीयाचा घास करतांना

आणि कृतघ्न लेकाघरचं पंचपक्वान्न एरंडा सारखं गिळतांना.

मी आठवतो तिला…

हातापाया मधील भेगात आपलं दुःख लपवतांना

आणि सटवाईच्या रेघात सतत चिंतेनं झुरतांना

आज असंख्य आठवणींची दाटली साय

पण त्यात माझी माय कुठेच नाय

खरंय दादा तुमचं म्हणणं

ज्याला आय नाय त्याला काय नाय

कवी

सुरेश शांताराम पवार , कल्याण

 

सुरेश शांताराम पवार

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments