तो कुणाचा गुलाम नाही!
“मुझे बर्बाद करने निकले हैं, और किसे बर्बाद करोगे?
भूल न जाना आज के दिन को, एक दिन मुझे याद करोगे॥”
तो कुणाच्या अधीन नाही. त्याला कशाचीच पर्वा नाही — ना कोणी त्याला रोखू शकतं, ना दम देऊ शकतं.
तो पूर्णपणे निर्धास्त आहे. त्याच्यावर कुणाची हुकूमत नाही. निर्विकार, निःधर्मी, अस्थिर — या त्याच्या मुलभूत गरजा. त्याच्यासाठी संप होत नाही, उपोषण होत नाही. कधी त्याचं समर्थन करत दगडफेक होत नाही. टायर जाळले जात नाहीत, बसच्या काचा फोडल्या जात नाहीत. रस्ते अडवले जात नाहीत. सरकारी किंवा खाजगी कार्यालयांतील फर्निचर फोडलं जात नाही. ना त्याच्याविरुद्ध तलवारी नाचवल्या जातात, ना बंदुका निघतात. दुकाने बंद होणार नाहीत, ना बाजारपेठा. फटाक्यांची आतषबाजी होत नाही, ना आनंदोत्सव साजरे होतात. जाळपोळ, चेंगराचेंगरी — काहीच नाही. त्याच्या चांगुलपणासाठी ना विशिष्ट रंगाचे ध्वज लागतात, ना विषमतेचा तोरा. बॉम्बस्फोट नाहीत, गोळीबार नाही. पोलिसांना ना लाठीमार करावा लागतो, ना अश्रुधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागतात. कुणाला अटक होत नाही, चौकशीची गजर लागत नाही. त्याच्या कृतींसाठी चौकशी समिती नेमण्याची गरज नसते. अहवालांची प्रतीक्षा नाही. त्याच्यावर कोणाची मालकी नाही, म्हणूनच त्याला दुजाभाव कधीच मान्य नाही. त्याच्या दरबारात वादी आणि प्रतिवादी दोघांना न्याय मिळतो — पुराव्यानिशी.
तो सर्वांसाठी समान आहे. उसने अवसामन आणायची त्याला खोड नाही. कुणाचा वैरी नाही.
सल्लागार नाहीत त्याच्याकडे. या झपाटलेल्या जगातही तो बईमानी करू शकत नाही. त्याला भ्रष्टाचार, अत्याचार, निंदा-नालस्ती, वशिलेबाजी — यांचा तिटकारा आहे. तो निष्कलंक आहे, म्हणून त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. कोर्ट-कचेर्यांपासून तो अलिप्त आहे. त्याला ना हुजरेगिरी करावी लागते, ना स्वतःची बढाई मारावी लागते, ना कोणावर टीका-टिप्पणी करावी लागते. त्याच्या रक्तातच प्रामाणिकपणा आहे.
यामुळेच त्याला कधीच शिक्षा झालेली नाही. आजवर त्याने इमाने-इतबारे अवनी सांभाळली आहे. त्याच्यात अत्याचारांशी सामना करण्याचं धाडस आहे. स्वतःच्या विचारांवर ठाम आहे. कोणाचाही सल्ला नाही, तरीही तो योग्य निर्णय घेतो. तो सार्वकालिक आहे, सार्वत्रिक आहे. कोणाच्या मालकीचा नाही. ना सरकारचा, ना खासगी संस्थेचा. तो सर्वांसाठी निःशुल्क, मुक्त आहे. कधीच कुणाच्या भावना दुखावल्या नाहीत. कुणाचाही अपमान केला नाही, कोणत्याही धर्माचे अपकीर्तन केले नाही. त्याचं प्रतिनिधित्व कुठल्याही धर्मप्रार्थनेतून होत नाही. त्याला प्रतीक नाही, दिशा नाही, मर्यादा नाही. त्याचं मोजमाप नाही. त्याची ख्याती अमाप आहे. कुणाकडून तो छदाम घेत नाही, लाच घेत नाही. त्यामुळे प्रत्येक सजीवाला तो श्वास घेण्याचा हक्क देतो.
कोरोनाच्या लाटांत त्याने कित्येक जीव वाचवले… आज मात्र त्याचाच श्वास गुदमरतो आहे. जगण्यासाठी श्वास हवा — नि त्यासाठी प्राणवायू हवा. हा नैसर्गिक प्राणवायू — मुक्त, प्रदूषणमुक्त, जीवनदायी — आज संकटात आहे. माणसाच्या अतिभोगाने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. पृथ्वी प्रदूषणाच्या लपेटात सापडली आहे. जंगले नष्ट केली, निसर्गावर घाला घातला… आणि वन्यजीव मानवी वस्त्यांमध्ये शिरले.
वृक्षतोड झाली आणि निसर्गाचा समतोल ढासळला. आपण विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अतिरेकी गर्जनेत रमून गेलो.
त्या धबडग्यात प्राणवायूची निर्मितीच धोक्यात आली आहे. चॅटजीपीटी, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स या उंचीवर पोहोचलेली मानवजातीला आजही प्राणवायूच्या रक्षणासाठी पुढे यायचं वाटत नाही, ही खरी शोकांतिका आहे. हे चित्र पालटावं लागेल. नाहीतर उद्या प्राणवायूसाठी युद्धं होतील, ऑक्सिजनच्या बाटल्यांसाठी प्रांत निर्माण होतील, सीमा आखल्या जातील. घराबाहेरचा शुद्ध प्राणवायू विकत घ्यावा लागेल. जसं आज पाण्याची बाटली विकत घेतो, तसं उद्या ऑक्सिजनचे फुगे आणि सिलिंडर बाजारात खरेदीला लागतील. त्याचेही गैरव्यवहार, तस्करी, काळाबाजार सुरु होतील. शासन यावर कायदे करेल, आणि तेच आपल्या आयुष्याचं नियमन करतील. याला आपणच थांबवलं पाहिजे. निसर्गावरचा अन्याय थांबवला पाहिजे. पर्यावरणप्रेमी, निसर्गमित्र एकत्र आले पाहिजेत. “झाडे लावा, झाडे जगवा” ही चळवळ खरी आचरणात आणली पाहिजे. वृक्षतोड थांबवली पाहिजे. वृक्षसंवर्धनात प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. प्राणवायू वाचवायचा असेल, तर निसर्ग वाचवाच लागेल. पर्यावरणसंवर्धन ही केवळ जबाबदारी नाही, तर अस्तित्वासाठीची गरज आहे. प्रत्येकाने पुढाकार घेतला, तर आपण प्रदूषित आणि दम्याळलेल्या प्राणवायूला वाचवू शकतो. आजची कृतीच भविष्यातील सुस्वास्थ्य ठरू शकते.
– नरेश रावताला
[email protected]
***
शेअर करा..