मौनाचा आक्रोश

कथा
*आज माणूस संपला इथं!**

चाळ आज निशब्द शांत पडली होती. रात्र शांतपणे उसासे घेत होती आणि तिच्यासोबत दिवसभर काबाडकष्ट करून आलेली असंख्य मानवी सांगाडे निवांत विश्रांती घेत होते. अधून मधून आगगाडीचा कर्णकर्कश आवाज घुमत होता आणि थोड्या वेळासाठी पूर्ण चाळ त्या आवाजानं नकळत हालत होती. अधून मधून कीटकांचा तसेच बेडकांचा डरावना आवाज कानी येत होता. मात्र सुमतीला आज झोप येत नव्हती तिचे डोळे छताकडे लावून ती वेगळ्याच विचारात पडली होती. सुमती…. ही पाच वर्षाची एक मुकी पोर…. आपल्या आजीबरोबर चाळीत राहायला आलेली सुंदर गोंडस, गुबगुबीत गालाची,घाऱ्या डोळ्यांची गुलाबी ओठांची, सुंदर पोर…. पण नियतीच्या फेऱ्यापुढे थोडाच माणूस गेलाय?तिचं कुटुंब सुंदर, आनंदी समाधानी होतं.आई वडील दोघेही सरकारी नोकरदार.घरात अमाप संपत्ती आणि सुख.
पण कोणाची नजर लागली देवजाने? एके दिवशी गावाकडून शहराकडे जात असताना त्यांचा खूप मोठा भयंकर अपघात झाला मोटरसायकलवर सुमती मध्ये पुढे वडील व मागे आई बसलेली होती. त्यांच्या गाडीला खूप मोठा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की त्यात आई व वडील दोघे जागीच ठार झाले. पण सुमती वाचली म्हणतात ना ‘देव तारी त्याला कोण मारी.. सुमती वाचली खरी पण तिच्यापुढे स्वतःचेच आई-वडील मरून पडलेले पाहून तिला धक्काच बसला ती वेडीपिशी झाली. घडलेला प्रसंग पाहून तिला रडता येईना,ओरडता येईना दुःख सहन झालं नाही परिणामी तिची वाचा गेली.सांभाळायला कुणी दुसरे नव्हते तिच्या आजीने तिला सोबत घेऊन त्या मुंबईसारख्या महानगरात आली. फक्त पोट भरण्यासाठी…..
ती फक्त छताकडे पाहत बसलेली होती. तिला तीच्या आई वडिलांची खूप आठवण येत होती. त्यांच्या सोबत घातलेले सुखाचे दिवस जसे जसे आठवत तसे तसे अश्रू त्या कोमल गालावरून घरंगळत गळ्यावरून अंथरुणात जागा घेत होते. अंथरूण अश्रूने ओले झाले होते. छताचा पंखा भयंकर आवाज करत फिरत होता.जनू त्यालाही सुमतीचे दुःख जाणवत होते. तो ही फिरत होता आणि तिचं नशीब सुद्धा… दोन दिवसापूर्वीच आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य याचा ताळमेळ ती आपल्या नाजूक बुद्धीने साधत होती पण ते काही तिला जमत नव्हतं.मात्र आठवणीत आसवांनी गळ्यापर्यंत उंबरठा कधीच गाठलेला होता.
सकाळ झाली. आज होळीचा सण होता.सुमती मात्र रात्रभर जागल्यामुळे ती अंथरूणातच पडली होती.आजी लवकर उठून कामाला लागलेली होती. तिला सर्व सावरून भाजीपाला विकण्यासाठी जवळच्या भाजी मंडईत जायचं होतं. तिने सुमतीला आवाज दिला
“सुमती बाळा…चल लवकर.आंघोळ करून घे पोरी… येणारेस का नाहीस माझ्यासंग.?
तशी सुमती उठली व अंथरुणाच्या घड्या आपल्या छोट्या हाताने करत होती. अग.राहू दे त्या अंथरूणाच्या घड्या… मी करते की…..आणि सुमती बाळा…आज होळी आहे ग.म्या काय म्हणते तू घरीच रहा कुठे येतेस माझ्यासंग? उगाच पाय तोडत.”
सुमतीने इशाऱ्यान सोबत येण्याचे सांगितलं
“अगं! माझ्या लेकराला बोलता येईना हे विसरलेच म्या. देवा तू एवढा कसा दगडाच्या काळजाचा रं तू.. काय वाटोळं केलं होतं रं तुझं एवढ्या लेकरांनं? म्हणून त्याची वाचा घेतलास … आजीने दोन-चार शिव्या देवाला हसडल्या.आणि पदर डोळ्याला लावला आणि सुमतीला गळ्याला लावलं.सुमतीचे अश्रूचे दोन थेंब तिच्या गळ्यावर पडले.

आजीबरोबर सुमती धपाधप पावलं टाकत बाजाराकडे निघाली आज भाजी मंडईत खूप गर्दी होती.कारण आज बाजाराचा दिवस होता.आजीने भाजीपाला विकत घेतला व तिची दररोजची जी धरलेली विशिष्ट जागा होती त्या जागी ती जाऊन बसली सुमती पण तिच्या बाजूला बसलेली होती. येणाऱ्या जाणाऱ्या गिर्‍हाईकांना तिने न्याहाळत होती. काही गिर्‍हाईक आज तोंडाला मास्क लावून आलेली होती. तिला तिची कुठलीही कल्पना नव्हती. देशात कोरोना नावाचा महाप्रलयी रोग आलेला होता.जो देशात विशेषत: महाराष्ट्रात मृत्यूचे थैमान घालत होता. त्याला आवरण सरकारलाही अवघड होऊन गेलेलं होतं.सुमतीने दिवसभर आजीला भाजी विकण्यासाठी आपल्या लहान हाताने मदत केली. आणि दिवसभराचे सर्व आटपून त्या दोघी घरी परतल्या. आज सणाचा दिवस असतानाही त्या राब राबल्या होत्या. आजीने सुमती साठी सुंदर असा हिरव्या रंगाचा ड्रेस आणला होता.तो तिला रात्री घालण्यासाठी दिला. तिला नवीन ड्रेस घालण्याची इच्छा नव्हती परंतु आजीची मन राखण्यासाठी तिने तो घातला. त्यात सुमती खूपच सुंदर दिसत होती.एखादी लावण्यवती दिसावी त्याप्रमाणे तिचं रुपडं होतं. आजीला काही क्षण तिची नजरच काढावी असे वाटले आणि तिने काढली सुद्धा.. काळे सुंदर मुलायम केस,घारे डोळे,अनुकुचीदार नाक, त्यात छोटीशी नथ, नाकाला शोभावी अशी, सुंदर गुलाबी लाल ओठ आणि सर्वात सुंदर व तिचं काळजाला हात घालणार ते सुंदर स्मित हास्य…. हे सगळं पाहून आजीच्या डोळ्यात पाणी आलं आणि हसू सुद्धा.आनंदाने…
सुमतीने गुळ खोबरे घेऊन चाळीतल्या प्रत्येक घरात जाऊन दिले. मोठ्या आदराने थोडा मोठ्यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले.प्रत्येकाच्या घरातल्या देवांना नमस्कार करत तिने तो सण आनंदात पार पाडला.सर्व चाळीला या नवीन पाहुनीचं कुतूहल वाटलं. सर्वांना ती भाळली.आता तिचा प्रत्येक दिवस आनंदात जात होता. सुमती आपल्या प्रेमाने लाडेवाळपणे सर्व चाळीला जिंकत होती. प्रत्येकाचे सांगेल ते काम आदरपूर्वक ती करत होती. तिच्या छोट्या हाताने सर्व चाळीतील सर्व घरांसाठी कार्य केलेलं होतं.म्हणून ती सगळ्यांची आवडती बनलेली होती.

पण त्या छोट्या पाखराला आपल्या आई-वडिलांची आठवण तर येणारच ना! नियती किती वाईट याच जणू दर्शनच ती घेत होती जीवनाच्या संघर्षाच्या समुद्रात तिची नौका जीव घेणा प्रवास करत होती. पुढे नौका कसा प्रवास करेल याचा तिला तीळ मात्र गंध नव्हता.आजचा दिवस मात्र ती हसऱ्या दुःखानी आजीसोबत पुढे ढकलत होती. आज आजीने सकाळी उठून लवकर काम आटपली आणि सुमतीजवळ ती आली. तर सुमती आणखी झोपलेलीचं होती.काल सुमतीने आजीला कामात खूप मदत करू लागली होती. सणाचा दिवस असल्यामुळे खूप घरी फिरल्यामुळे लेकराचे पाय दुखत असतील म्हणून सुमतीला न उठवताच ती बाजाराच्या दिशेने निघाली.व्यापाऱ्याकडून भाजीपाला घेण्यासाठी बाजारात विक्रेत्याची झुंबड उडाली होती. आजीने कसातरी प्रयत्न करून एक दोन व्यापाऱ्याकडून भाजीपाला खरेदी केला व आपल्या दररोजच्या बसण्याच्या ठिकाणी ती आली.तितक्याच तिला आजूबाजूच्या लोकांत लॉकडाऊन संबंधित चर्चा ऐकण्यात आल्या. लॉकडाऊन याचा नीटसा अर्थ तीला कळालाच नाही. तिने हा शब्द आयुष्यात पहिल्यांदाच ऐकला होता पण एका दोघाला विचारले असता कळाले की,उद्यापासून सर्व व्यवसाय कामे बंद.सरकारने कोरोणा या महामारीवर निर्बंध घालण्यासाठी सर्व जनतेला घरातच बसण्याचे आवाहन केले होते. उद्यापासून सर्व व्यवसाय, उद्योगधंदे, ऑफिसेस, शाळा सर्व काही बंद…फक्त जीवनावश्यक सेवा तेवढ्यात चालू राहणार. असे जाहीर केले होते.ही बातमी ऐकून आजीच्या काळजात धस्स केलं,कारण तिचं पोट सर्व कामावरच अवलंबून होतं. ‘काम नाही तर खायला नाही’त्यात आता सुमतीचे भरणपोषण करणं हे देखील तिचं कर्तव्य होतं.काम नाही तर अन्न नाही ही परिस्थिती तिच्यावर होती.उद्याचं काय?हा यक्षप्रश्न तिच्या पुढे उभा होता.काही ना काही पर्याय निघेलच.सरकार काय आपल्याला उपाशी मरू देणार हाय का ?काही दिवस लॉकडाऊन राहील नंतर सुटेलच कि… हे मनाला सांगून आजीने तो भाजीपाला त्या विचारातच विकला.मिळालेले पैसे बटव्यात टाकून ती घरी आली.सुमती अंघोळ वगैरे करून ती पलंगावर बसलेली होती व टीव्ही पाहत होती. घरी आल्यानंतर आजीने सुमती कडून टीव्हीचा रिमोट घेऊन बातम्या लावल्या, तर सर्व न्यूज चैनल वर कोरोनाच्या रुग्णवाढीसंबंधीच्या बातम्या होत्या.करोनाने देशात विशेषतः महाराष्ट्रात थैमान घातलेले होते.आजीने सुमतीला विचारले,”सुमती बाळा. जेवण केलीस का? मी तुझ्यासाठी भात आणि वरण केलेलं होतं.” सुमतीने मानेनेच ‘हो’चा इशारा केला. आजीने सुमतीला सांगितले,” बघ बाळा सुमती…उद्यापासून सर्व व्यवसाय, भाजीपाला ईकायला जानं हे सगळं बंद केलंय म्हण.करूणा नावाचा कोणता तरी रोग आलाय म्हन…अन त्यच्यातून माणसं लय मरालेत म्हण बरं का…. तो रोग कशामुळे व्हतो माहित हाय का तुला? तर एकमेकाला शिवल्यामुळे तो रोग व्हतो असं म्हणून आज पासून तुबी कुणाच्या घरी जाऊ नगस बरं….” आजीने सर्व एका दमात सांगून टाकलं. सुमतीने मानेनच हो सांगितलं. त्याच दिवशी त्यांच्या चाळीत एक कोरोनाचा पेशंट सापडला. त्याला घेण्यासाठी बाहेर ॲम्बुलन्स आली होती. चाळीतील सर्व लोक त्याला चाळीतूनच आपल्या घरातूनच पाहत होते. ॲम्बुलन्स मध्ये दोन-चार व्यक्तींनी त्या व्यक्तीला बसवलं.त्या सर्व लोकांनी ही पीपीई किट मध्ये घातलेली होती.त्या पेशंट व्यक्तीला बसून ती ॲम्बुलन्स निघून गेली वाऱ्यागत. पण महानगरपालिकेने ती चाळ ‘सीलबंद’ केली,ती म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून….

घरात साठवलेले धान्य व साहित्यावर काही दिवस गुजरान झाली परंतु आता धान्य संपत आलेले होते काहीही करून बाहेर जाऊन काम करणे व अन्नधान्य व रेशन आणणे याशिवाय पर्याय नव्हता. आज घरातले सर्व धान्य संपलेले होते.

आजीने दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर पडण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ट केली.तिला घराबाहेर पडणे गरजेचे होतं. त्यात सुमती आजीच्या समोर येऊन उभे राहिली. तिला बोलता येत नव्हतं पण भूक लागण्याची ती खून करत होती. आजीच्या काळजात चरर झालं.एवढीशी पोर माझ्याकडे आणलीय मायबापइना पोरं आणि मी तिला चार घास घालू शकत नाही. तिची तिलाच स्वतःची घृणा वाटली. तिने सुमतीला घरातच बसण्याची खून केली व टीव्ही लावून दिला. पण त्या सुमातीला खूप भूक लागली होती.तिच्या डोळ्यात पाणी आलं. कालपासून ते उपाशी होती. आजीने सुमतीला घरातच बसून ती घराच्या बाहेर पडली तर, बाहेर रस्त्यावर दोन-चार पोलीस तेवढी तोंडाला मास्क लावून गस्त घालताना तिला दिसले. ती बाहेर पडताना त्या पोलिसांनी तिला पाहिले, तसा एक दगड आजीकडे भिरकावून एक पोलीस ओरडला, “ये म्हातारे!का निघालीस बाहेर? मरायचे का ?का आम्हा सगळ्यांना मारायचे?”तशी आजी म्हणाली, “जाऊ द्या हो साहेब..दोन दिवसापासून माझ्या नातीनं काहीच खायला नाही.घरात शिळा तुकडा पण नाय. काय तर मागून आणते. कुणाकडून तर…साहेब लय उपकार होतील जाऊ द्या हो.”तसा एक पोलीस म्हणाला,”हे म्हातारे!लांब हो पहिलं.लवकर घरात जा नाहीतर काठी बसेल पाठीत. उगीच म्हाताऱ्या बाईला मार नको.घरात जा.” तशी आजी मागे फिरली. केस विस्कटलेले होते.तिला कसलीच तमा नव्हती. काही सुचत नव्हतं एकीकडे जीवघेणा हा रोग… भयाण शांतता निर्मनुष्य रस्ते आणि एकीकडे निरागस पाखरू… सुमती. आजीच्या डोळ्यात अश्रूचा सागर एकवटला होता.काय करावं? कळत नव्हतं.तिला काहीही करून सुमतीसाठी भाकर मिळवायची होती,नाहीतर ती स्वतःला माफ करू शकणार नव्हती. थोडासा भिंतीचा आधार घेऊन ती त्याच ठिकाणी थांबली. पोलीस थोडा वेळ गस्त घालण्याची थांबूऊन जेवणासाठी थोड बाजूला जातच तिने आपला मोर्चा बाजाराच्या दिशेने वळवला.ती जोरात रस्त्याने धावतच बाजारातील एका हॉटेल पाशी गेली. हॉटेल बंद होतं. पाठीमागच्या दिशेने कोणीतरी बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. त्याच दिशेने ती गेली असता तिथे एक माणूस बसलेला दिसून आला. तिने कळवळीने विचारले,”भाऊ काय खाईला मिळेल का? लय भूक लागलीय आणि माझी नात पण दोन दिवसापासून उपाशी हाय.” तसा तो व्यक्ती उठून उभा राहिला.
” आजी लॉकडाऊन आहे आता. आज हॉटेल बंद आहे काय नाही मिळायचं.”
” दादा काय व्हईल तर बघ की.माझी नात उपाशी हाय म्या पडेल ते तुझं काम करेल. पण थोडं तरी मला कायतरी भाकर तुकडा दे बाबा.”
” नाही बाबा इथे काही काम नाही ते तिकडे बघ बक्ष्याचं हॉटेल आहे तिथे. बघ काय मिळालं तर सकाळी त्यांन चालू केलं होतं चोरून थोडा वेळ. लवकर जा,नाहीतर त्याच्याकडे पण मिळायचं नाही. लवकर जा तशी आजी उठली आणि त्या हॉटेलच्या दिशेने धावत निघाली. बक्षाचे हॉटेल बंद होतं.काय कराव तिला काहीच समजत नव्हतं.ती प्रत्येक हॉटेल घर पाहत सुटली होती. दिसेल त्यांना हात जोडत होती.पण कोणीच तिची मदत करत नव्हतं. एकीकडे ही परिस्थिती आणि एकीकडे डोळ्यापुढे भुकेली निरागस सुमती… ती रडत होती.तिच्या हाती काहीच लागत नव्हतं.” ना काम अन्नाचा तुकडा’ जड पावलाने तिने घराचा रस्ता धरला होता. घराच्या जवळ आली,तेव्हा अंधार पडलेला होता. तिच्यात प्राण उरलेला नव्हता. शक्तीहीन पावले घराच्या पायऱ्या चढत होती.तिला प्रश्न पडलेला होता की सुमती ला काय उत्तर देऊ ?तिला जेवणाला काय देऊ? ती जड पावलांनी ती घरात शिरली तर पलंगावर सुमती पडली होती. आजीच्या पावलांच्या आवाजाने ती लगेच जागी झाली भुकेमुळे तिला झोप लागत नव्हती.आजी आल्याची तिच्या लक्षात येताचं ती उठून लगेच पळत आजीकडे आली.आजीकडे तोंड करून तिने हात पोटाकडे नेला आणि भूक लागल्याची खूण केली आणि हात तोंडाकडे नेला आणि “तू जेवलीस का ?”असं तिला विचारायचं होतं.आजीच्या काळजात दुःखाचा आगडोंब उसळला.डोळ्यात अश्रूंच्या गंगा वाहू लागल्या. तिने सुमतीला उराशी धरलं आणि मोठ्या मोठ्याने ढसाढसा रडू लागली.अश्रूला वाट मोकळी करून दिली आणि तिने देवाकडे पाहिलं आणि रडत म्हणलं,” देवा कोणतं पाप केलयं हे दिवस मला का दाखवायलास? हे कोवळ्या जीवाला म्या अन्नाचा घास देऊ शकत नाय. म्या काय करू?…म्या काय करू?… म्या काय करू?
तशी सुमती आपल्या फ्रॉकणे आजीचे डोळे पुसद इशारा केला,”काही काळजी करू नको. सगळं बर होईल. मला भूकच नाही आजी……!” आणि गोड स्मित हास्य केलं.
आजीच्या काळजात दुःखाचा आगडोंब उसळला.आजीने तिला उराशी कवटाळलं आजी व नात दोघी त्या रात्री खूप रडल्या.

दुसरा दिवस उजाडला.आजी उठली. तिच्यातही काही शक्ती उरलेली नव्हती पण हलकासा खोकला चालू झालेला होता. खोकलतच ती उठली. अंगात ताप भरलेला होता. पण तिने ते दुर्लक्ष केलं.काल खूप फिरल्यामुळे शीन आलेला असावा असा विचार करून ती बाहेर काम बघण्यासाठी बाहेर निघावं असा विचार करून ती निघाली. सुमती अंथरुणात झोपलेली होती. खोकला वाढतच चाललेला होता. घरात जेवणासाठी काहीच नव्हतं. तिने हात पाय धुवून ती बाहेर जाण्यासाठी निघाली.तेव्हाच कळालं की चाळीतील एक कोरोनाचा पेशंट मृत्यू पावलेला आहे. खाली चाळीच्या तोंडाला चा अंबुलन्स उभा राहिलेली होती व ती बॉडी घेऊन महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी ॲम्बुलन्स चालवली होती. ती भयंकर दृश्य पाहून आजीला जबरदस्त धक्का बसला होता.चाळीतले लोक एकमेकांना पाहायला देखील तयार नव्हते.मदत तर करणे दूरच. आजीने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी तिला अडवले व घरात जाण्याचे सांगितले ती मागे फिरली.चाळीच्या मध्यभागी येऊन जोराने विनवणी करायला सुरुवात केली
“तीन दिवसापासून काहीच खाल्ला नाही हो…कोणीतरी जेवायला द्या…काहीतरी अन्न द्या… माझी सुमती…. तीन दिवसापासून जेवली नाही हो. लेकरू अन्नाईना तडफडतय… कुणाला तर दया येऊ द्या….काहीतरी द्या लेकराकड तर कोणी बघा…हा रोग निघून जाईल.राहणार नाही.पण तुमच्यात माणुसकी हाय का नाय. शिळा असेल कसा मी राहू द्या पण अन्नाचा तुकडा द्या माझ्या पिल्ल्याला…”
पण कोणीच प्रतिसाद दिला नाही मधून आजी खोकत होती. प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे बाहेरचे लोक त्या भागाकडे यायला टाळत होते. तशीच आजी पुन्हा घरात आली.सुमतीने पाणी पीत होती. सुमतीच्या डोळ्यात पाणी होतं आणि आजीच्याही…. दोघींचीही नजरा नजर झाली घरात आल्या आल्या सुमतीकडे आजीनं पाहिलं. तिला कमालीचा शीन आलेला होता. ती घरात येऊन जागीच कोसळली. खोकला जोरात वाढला होता.श्वासोच्छ्वास घेण्यासाठी आजीला त्रास होत होता. तिचे हृदय जोरात जोरात उडत होते. लहानशी सुमतीने ते दृश्य पाहून लगेच पलंगावरून आजीकडे धाव घेतली.तिला बोलता येत नव्हतं पण जोरात ओरडू लागली. रडू लागली.पाण्याचा ग्लास भरून घेतला आजीच्या तोंडात पाणी टाकू लागली. आजी तडफडत होती.जमिनीवर हात आपटत होती. पुन्हा छातीवर हात आपटत होती.सुमती तशीच गॅलरीत जाऊन ओरडू लागली.जोरजोरात रडत होती. सर्वांना हातवारे करू लागली.
” या…या… कुणीतरी या…. माझ्या आजीला वाचवा…” अशी खुणेने ती सर्वांना सांगत होती,पण तिचं कुणीच ऐकत नव्हतं. तिचं बोलणं कुणालाच कळतही नव्हतं. पुन्हा ती आजीकडे यायच. रडायची.आजीची तडफड पायाची फडफड ती उभ्या डोळ्यान पहात होती. घरातल्या देवाऱ्याकडे पळत जाऊन देवाला हात जोडत होती.पुन्हा येऊन आजीला पाणी पाजत होती.पुन्हा गॅलरीकडे पळत येऊन मदतीची विनवणी ते लेकरू करत होतं पण तिची विनवणी कुणालाच कळत नव्हती.गॅलरीकडे येऊन ओरडून रडत सर्वांना सुमती हात जोडत होती.रडत होती. अंधार पडत चाललेला होता. रात्र होणार होती. सुमतीने प्रयत्नाची पराकाष्टा केली.पण त्या चिमुकलीच्या मदतीला कोणीच धाऊन आलं नाही. ग्लासातलं पाणी पाजून पाजून पाणी संपलं होतं….आणि आजीही….. चार तासानंतर तडफडत तडफडत आजीने शांतपणे जमिनीचा कायमचा आसरा घेतला होता… आणि चिमुकली सुमतीने सतत तीन दिवस गॅलरीत येऊन सर्वांना हात जोडत आजी झोपलीय माझी….. कुणीतरी उठवायला या….ते माझ्याशी बोलत नाहीय…. या…. या…… कुणीतरी या….फक्त आन फक्त हातवारे करत होती.डोळ्यात पाणी आणून …. ज्यांना इतका जीव लावला त्यांनीही चाळीचा दरवाजा उघडला नाही आणि तिच्या तोंडाला फेस येऊन तीही जमिनीवर पडली. हात पाय हलवत तीन दिवसांनी सर्वांची वाट पाहून तेही चिमुकलं सुंदर फुल सुमती गॅलरीत अन्नावाचून,मदतीवाचून “पा…..पा….” अर्थात “पाणी पाणी ” म्हणत तडफडून तडफडून कायमचं गळून पडलं. डोळ्यात असंख्य आसवांचा ताटवा साठवून… तो गोड आवाज नाहीसा झाला कायमसाठी…..!
आणि चौथ्या दिवशी मृतदेहाचा वास येतोय म्हणून महानगरपालिकेची ॲम्बुलन्स चाळीत आली तेव्हा कळालं की आजीची बॉडी सडलेली होती आणि एवढीशी कळी पण…..
सर्वांच्या मनात तसेच घरात घर केलेलं ते फुल सर्व चाळीच्या देखत महानगरपालिकेतील लोक ऍम्ब्युलन्स मध्ये टाकून घेऊन जात होते. सुमतीचे डोळे झाकले गेलेले नव्हते.जगासाठी संपलेले ते डोळे सर्वांकड पाहत होते.ते चिमुकलं फुल मात्र सर्वांकडे निर्देशक बोट करून सांगत होतं…….. “आज *माणूस* संपला इथे……..!”
ॲम्बुलन्स धुरोळा उडवत वेगाने स्मशानभूमीकडे निघून गेली.चाळीतल्या लोकांतला “माणूस” जागा होऊन चाळीबाहेर निघेपर्यंत सुमतीच्या सरणाच्या ज्वालांनी असमंत कवेत घेतलं होतं. अस्वस्थ धुराने ढगावर पांघरून घातले.सुमतीने आता माणसापेक्षा निस्वार्थ ढगांशी घट्ट मैत्री केली होती. कायमसाठी………! आज पावसाचही काळीज चिरत गेलं.त्यालाही रडू कोसळलं तोही बरसत राहिला ऊर फुटल्यागत…. रात्रभर……..!

*लेखक : सोमनाथ विश्वनाथ गायकवाड*
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तोरंगण तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक
मो नंबर 9404588909/8830064625

सोमनाथ विश्वनाथ गायकवाड

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments