गळाभेट 01 – चित्रपटगृहातला चित्रपट आणि आपण

सन २०१८ च्या डिसेंबर महिन्यात मी आपल्याशी हा संवाद साधतोय. आज रोजी भारतीय चित्रपटाचा व्यवसाय हा जगातला सर्वात मोठा तसेच सर्वात अधिक चित्रपट बनवणारा मानला जातो. मूक-पट ते बोलपट, कृष्ण-धवल ते आज मल्टी-कलर, 2 डी ते आज चक्क 4 डी, पूर्वी वापरली जाणारी अनालॉग यंत्र-सामुग्री ची जागा आता डिजिटल तंत्रज्ञानाने घेतली, उत्कृष्ट VFX तंत्रज्ञान, पूर्वी ऑप्टिक स्टेरिओ आता डॉल्बी डिजिटल ATMOS मध्ये ऐकू येऊ लागलाय, सांगायचे तात्पर्य हे की आपण – चित्रपट निर्मिती, त्याचे उत्तम सादरीकरण यात चांगलीच प्रगती केली आहे. पण, एक प्रश्न मनात येतो – खरच आपण या सर्व गोष्टींचा आनंद चित्रपट / सिनेमा पहाताना घेतो का? किंबहुना – आपण सिनेमा हॉल अथवा सिनेमा थिएटर मध्ये आपण आज एक नवा अनुभव घेणार आहोत या भावनेने जातो का?

काहीजण नव्हे, बरेच जण म्हटतील “अहो चार घटका करमणूक करण्यासाठी जातो आम्ही – अभ्यास करण्यासाठी नाही” १००% मान्य! आता असे पाहू, की आपल्याला पोहायला आवडते पण पोहता येत नाही तर आपण काय कराल? आपण ते शिकाल..आपल्याला कार चालवायची आहे आणि तिच्यात बसून लॉंग ड्राइव्ह वर जायचे आहे! पण, ड्रायव्हिंग येत नाही, आपण काय कराल? उत्तर आपल्याला ठाऊक आहेच. “चित्रपट कसा पहाताना काय करावे?” हे ही असेच आहे, हे माझे मत होय.

“चित्रपट हा समाजाचा आरसा आहे” हे आपण खूपदा ऐकले असेल., जे खरे ही आहे. समाज हा चित्रपटाचा अविभाज्य घटक आहे व राहील कारण – चित्रपटातील पात्रे, घटना, प्रसंग, ठिकाणे जरी काल्पनिक असली तरी त्या मागचा विचार हा कुठे ना कुठे तरी जिवंत व्यक्ती, ठिकाणे आणि डोळ्यासमोर घडणाऱ्या प्रसंगातूनच येत असतात हे विसरून चालणार नाही. बरेचदा, एका ठराविक कालावधी बाबतीत जाणून घ्यायचे असेल, काही संदर्भ तपासून पहायचे असतील, त्याकाळचे राहणीमान, भाषा, वेषभूषा, खानपान, राजकारण, समाजमन इत्यादी साठी त्याकाळचे चित्रपटही अभ्यासले जातात.

आता विषय असा उभा राहतो, या सगळ्याचा आत्ताच उहापोह करायची काय गरज? गरज आहे – कारण आपण चित्रपट पहायला जायचे तर एका ठराविक पठडीतूनच त्याचा विचार करतो, त्यातून मनोरंजन मिळवणे हे जरी असेल तरी आपण ज्या चित्रपटगृहात जात आहोत ती एक सार्वजनिक वास्तू आहे हे आपण सपशेल विसरतो..लक्षात येत नाही ना, नक्की काय..जरा याची फोड करून सांगतो..

“ मी तिकिटाचे पैसे दिले आहेत- अर्थात माझ्या तिर्थरूपांचे थिएटर आहे”

काही लोक ज्यांना सोशल मीडियावर सध्या “लोक्स” म्हणूनही संबोधले जाते. तर हे सो कॉल्ड लोक्स चित्रपटगृहात प्रवेश केल्यापासूनच मोठ्या आवाजात एकमेकांना हाका मारतात..जर त्याच खुर्ची वर बसायचे आहे ज्याचे तिकीट काढले आहे, तर नक्की विषय काय आहे? बर एखादा कार्यकर्ता मागे राहिला तर त्याला एखादी हाक देणे इतपत ठीक पण एकदा सर्व बसले तरी का ओरडावे लागते हे कुणास कळावे?

“ माझ्या कडे सर्वात महागडा स्मार्ट फोन आहे, ज्यात व्हाट्सअप, फेसबुक आहे आणि माझ्या फोनचा टॉर्च सूर्यप्रकाशच ”

चित्रपटाची वेळ टळून गेली तरी उशिराने येणारे संत-महात्मे अनेकच असतात. (त्या विषयी खाली सविस्तर बोलूच) पण आपल्या स्मार्टफोनची पावर दाखवायची आजकाल आपण एकही संधी सोडत नाही हो, अगदी चित्रपट पहायला आलो तरी!! आपल्या फोन मध्ये असणारा टॉर्च हा सूर्यप्रकाशच जणू अन जर आपल्या बाजूने आत शिरलेली व्यक्ती ही तसेच करत असेल तर, आपण हात वर रोखून अधिक वेळ तो पूर्ण चित्रपट गृहास उंचावून दाखवतो..वास्तविक आपला सीट नंबर समजला, दुसऱ्याच्या पायावर पाय न देता आपण सुखरूप खुर्चीत बसलो तर तात्काळ तो बंद व्हावा – इतर लोकही आपल्या चित्रपट पहात आहेत वगैरे आपल्या मनातही येत नाही. बर हे कमी की काय आपण आता कोणाचा मेसेज आला आहे का? स्टेटस कुणी काय ठेवले आहे? वगेरे पाहण्यात आपण दंग असतो! कारण आता “चेक इन” स्टेटस वगैरे आपल्यालाही टाकायचा असतो ना!

सेल्फी नाही काढला तर पिच्चर काय पाहिला?

सेल्फी हा प्रकार मला ही आवडतो हो, पण कसा? कुठे? हे पण पहायला हवे ना. चित्रपट चालू होताना आपल्याला याची मौज घ्यायची असते, बर त्या सोबत आजकाल स्मार्टफोन मूनलाईट (सेल्फी साठी खास मोठा प्रकाश देणारा स्मार्टफोन मधलाच एक लाईट) सोबत येतात, म्हणजेच रात्री रस्त्यावर गाडी चालवताना जसा समोरचा उगाच मोठाला अप्पर लाईट मारतो, ज्या मुळे काहीवेळ आपल्याला डोळ्यासमोर चांदण्या दिसत राहतात आणि आपण त्याला शिव्या हासडतो तोच हा प्रकार! त्यात अपलोड ची घाई आणि तो जो पर्यंत होत नाही तो पर्यंत चुळबुळ, गप्पा, धावपळ, शिव्या, आरडाओरडा..

१२ ते ३, ३ ते ६, ६ ते ९ व ९ ते 12

९ ते १२ हा सकाळचा शो, १२ ते ३ हा दुपारचा खेळ व नंतर ३, ६, ९ हे रेग्युलर शोज अशा साधारण चित्रपट पहायच्या वेळा आपल्याला ठाऊक आहेत. मात्र, मल्टीप्लेक्स आल्यापासून दुपारी २, संध्याकाळी ५, रात्री ८ तर कधी अगदी “लेट नाईट’ ११.३० चा खेळ आता पाहायला मिळतात.
पण आपण एक गोष्ट नीट पहा, की आपण जर दुपारी २ चे तिकीट काढले असेल तर काही महाभाग हे ३ वाजता ही येतात, जर रात्री ८ चे काढले असेल तर ९ पर्यंत ही महात्मे आपली पायधूळ झाडतात! याचा अर्थ आपण अजून या वेळा लक्षात घेतल्या नाहीत किंवा आपण अजून ऍडजस्ट झालेलो नाही! आपण उशिरा आलो तर इतर प्रेक्षकांना तसदी होते हे आपण मानतच नाही! “सुरवातीच्या पाट्या काय बघायच्या?” “आधी जाहिरातीचा लावतात” (आता या मध्ये चित्रपट गृहे ही तितकीच जबाबदार आहेत, पुण्यातले सांगतो औंध च्या सिनेपलीस चित्रपट गृहात तर सुरुवातीस टीव्ही वर चित्रपट पाहतो की काय इतक्या जाहिराती दाखवतात, अगदी अर्धा तास! तसेच पुन्हा इंटर्व्हेल ला – पुन्हा २० मिनिटे!) तर अशी आपली एकूण धारणा आहे!

फोन कॉल्स आणि मेसेज टोन्स

आपण नक्की चित्रपट पहायला आलो आहोत की मिटिंग यामध्ये बरेचदा आपली कदाचित गल्लत होत असणार, कारण त्या मुळेच आपण आपल्या ऑफिस, कामाचे कॉल चित्रपट चालू असतानाही सर्रास उचलतो! बर एखादा महत्वाचा असूही शकतो, पण त्यासाठी फोन रिंगर वर का ठेवायचा? आणि फोन ठेवताना पुन्हा “ नंतर बोलू “ हे वाक्य १० मिनिटे बोलण्याआधी बोलले गेले तर इतर रसिक प्रेक्षकांवर कृपा नाही का होणार? पण समजून कोण आणि कशाला घेणार? या सोबतच सतत वाजणारे मेसेज टोन्स अक्षरशः कधीही वाजतात, जे चित्रपटातल्या ऐन क्षणीच वाजतात ज्यामुळे एकतर तो संवाद ऐकू येत नाही, नाही तर लक्ष विचलित होते!

अश्लील कमेंट्स, विनोद आणि विक्षिप्त आवाज

हिरोगीरी, धटिंग, शायनिंग आणि झुंडशाही गाजवायची उत्तम जागा म्हणजे चित्रपटगृह असे अनेक जण मानतात. अंधाराचा फायदा घेत अश्लील कमेंट पास करणे, पात्रांच्या मागे जोर जोरात संवाद बोलून वारंवार इतरांना विचलित करणे, मोठमोठ्याने हिडीस विनोद सांगणे, विक्षिप्त आवाज काढणे सारखे भ्याड प्रकार हे अस्थिर मन-स्वास्थ्याचे लक्षण आहे. हल्लीच एका ठिकाणी पोलीस निरीक्षक स्वतः चित्रपट गृहात येऊन असे वर्तन हे गुन्ह्यास पात्र असल्याचा व्हिडीओ आपण सर्वांनीच पहिला असेल.

पिक्चर संपला, खुर्ची खाली करा पटकन!

काही चित्रपट हे संपताना एक वेगळा अनुभव देतात, त्यामुळे कधी कधी चित्रपटात अचानक “फेड इन” अथवा अंधार होतो. तर कधी सर्व पात्रांचे आवाज म्युट (अबोल) होतात तर कधी मधेच फिल्म कट होते..हे सर्व अनुभव प्रेक्षकांना मिळणे अपेक्षित असते. पण खुद्द चित्रपट गृहात घडते वेगळेच..तिकीट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना (तिकीट चेकर) चित्रपट संपायची वेळ झाली की दारावरचा पडदा सारणे हे ठाऊक असते पण ते पडद्यावर नक्की कोणता प्रसंग चाललाय हे पाहतात का? (विचार करा ‘सैराट च्या शेवटाला जेव्हा अर्चिच्या मुलाला शेजारीण घरात सोडते, अगदी त्याच वेळी जर पडदा सारला गेला तर, तुम्हाला काय मजा येईल? पुढचा काटा आणणारा शॉट समजणार का?) आता हा प्रसंग चालू असताना “आवाज, आवाज” ओरडणारे लोकही असतात, अन नको तेव्हा पडदा ओढणारे, मध्येच “ओडियन्स” चा लाईट देणारे आणि वरातीत लग्न लागले की पंगतीत घुसणाऱ्यां सारखे अनेक महामानव ही असतात!

असे अनेक किस्से, प्रसंग, गोष्टी आपण स्वतः ही अनुभवल्या असतीलच पण त्या आपण लक्षात ठेवत नाही, कारण पुढच्या वेळी पुन्हा आपल्याला असाच अनुभव येणार आहे हे आपल्याला ठाऊक असते. आज आपण याचा थोडा सामोपचाराने विचार करावा. चित्रपट पहाताना त्याचा आस्वाद घ्यावाच व तो इतरांनाही त्यांना त्यांचा कसा मिळेल हे पहावे. प्रत्येक वेळी आपण काही केलेच पाहिजे म्हणजे आपले अस्तित्व राखले जाईल असे नाही, बरेचदा काही न करताही आपली भूमिका आपण मांडू शकतो.

आपली संस्कृती ही बाजारबुणगी नसून, ती संपन्नतेचा वारसा सांगते..हजारो वर्षांपासून आपण नाट्य, कला, विज्ञान, शास्त्र यांत मोठे कार्य केले, नवे उपक्रम केले, शोध लाभले, नवे पायंडे रचले – ते अशी चेष्टा, दुर्लक्ष, डोळेझाक करून नव्हे हे समजून घेऊ.

© ओमकार उपाध्ये – २०१९

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments