रात्रीचे दीड वाजले होते.
रस्त्यावर शांततेचा असा अडथळा बसला होता की, कानालाही स्वतःचा आवाज ऐकू येत नव्हता.
ना एखादं वाहन, ना एखादी मानवी हालचाल, फक्त दूरवर कुठेतरी…. एखाद्या कुत्र्याचा अस्पष्ट भुंकण्याचा प्रतिध्वनी, आणि थंड हवेने उडवलेली धुळीची पातळ झुळूक, जणू शांततेला हलका आवाज देत होती.”
काळा डांबरी रस्ता इतका रिकामा होता की, तो स्वतःचं अस्तित्व विसरून बसला असावा.
दिवसभराचा सर्व गोंधळ, हॉर्न्स, आणि मानवी श्वास ……सर्व काही जणू या रात्रीने गिळून टाकलं होतं.
“त्या काळ्या पोकळीतून, धुसर धुक्यातून एक कार हळूहळू पुढे येत होती.
हेडलाइट्सनी काळोखाच्या छातीवर दोन रेषा आखल्या होत्या …..जणू वेळेने स्वतःलाच दोन भागांत विभाजित केलं होतं.
”कारच्या आत, सौमिल… एकटाच.
त्याच्या चेहऱ्यावर शांत विचारांची एक हलकी सावली होती …
ती शांतता जी थकव्याने येत नाही,
तर दिवसभराच्या शब्दांच्या ओझ्याने येते.
वय सुमारे तीस.
एका मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर.
थोडं आधीच ऑफिसमधली उशिराची मीटिंग संपवून….
तो घरी जाण्यासाठी निघाला होता … सौमिल ने बाजूच्या सीटेकडे पाहिलं ……
त्याच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं.
जसं आपण गप्पा मारून नुकतंच शांत होतो,
तसं, काही क्षणांसाठी त्याचा चेहरा सैल झाला.
किंवा कदाचित त्यालाच आठवलं असेल ……
काही वर्षांपूर्वीचं काहीतरी.
एखाद्या आवाजाचा प्रतिध्वनी,
जो अजूनही त्याच्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात जिवंत असावा.
त्याने डाव्या हाताने गिअर बदलला,
आणि उजव्या हाताने स्टीयरिंग घट्ट पकडलं …
जणू काळोखावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता तो.
त्याच्या हातांखाली स्टीयरिंग थंड आणि ओलसर वाटत होतं.
डॅशबोर्डवरील डिजिटल घड्याळावरचे निळे आकडे … 01:47 AM … एक विचित्र स्थिरतेने चमकत होते.
त्याच्या नजरेत काहीतरी दडलेलं होतं… थकवा नव्हता तो, तर एखादी ओळखीची भीती होती, जिचं नाव काळाने अजून दिलं नव्हतं.
इंजिनचा हलका नाद
आणि रस्त्यावरून फिरणाऱ्या टायरचा स्थिर गूंज…..
हेच त्या रात्रीचे एकमेव ध्वनी होते.
सामोरच्या काचेत त्याचा चेहरा धूसर दिसत होता,
हेडलाइट्सच्या प्रकाशात विरघळलेला,
विचारांच्या धुक्यात हरवलेला.
तो हळूहळू श्वास घेत होता.
काळजी किंवा भीती नव्हती,
पण त्या शांततेच्या मध्यभागी त्याचं मन काहीतरी विचार करत होतं हे नक्कीच…
त्या विचाराच्या लहरीत त्याने पुन्हा गिअर बदलला,
आणि कार पुढे सरकली ……काळोख फोडत.
बाहेर फक्त रस्ता आणि वेळ होती…..
दोघेही समांतर, पण एकमेकांपासून सुटू न शकणारे.
त्याने डोकं थोडं हलवलं, जणू विचार झटकायचा प्रयत्न केला.
डोळे पुन्हा रस्त्याकडे वळवले…
क्षणभर त्याने कारची हेडलाइट्स upper light केल्या
पांढरा प्रकाश अचानक दुपटीने तेज झाला,
आणि काळोखाच्या छातीवर जाऊन आदळला.
तेवढ्यात ….
रस्त्याच्या कडेला काहीतरी हललं.
एक आकृती. स्थिर, पण जिवंत.
पांढऱ्या सावलीसारखी ती प्रकाशाच्या कडेला उभी होती.
सौमिलने एकटक पाहिलं.
पहिल्यांदा वाटलं, प्रकाशाचा फसवा खेळ असेल…..पण नाही, आकृती आता स्पष्ट होत चालली होती.
“एक तरुण मुलगी.
तिच्या हालचालींमध्ये थोडी घाई होती, पण उभं राहण्यात एक विचित्र स्थिरता.
ती हात वर करून लिफ्ट मागत होती.
सौमिलची नजर त्या आकृतीकडे स्थिरावली.
“क्षणभर त्याला वाटलं ती थोडी सरकली… पण तो नक्की सांगू शकत नव्हता …..
कारण प्रकाश आणि अंधार दोघेही एकमेकात मिसळत होते.
त्याने ब्रेक हलकासा दाबला.
कार थोडी Slow झाली आणि मग थांबली ….
रस्त्याच्या मध्यभागी नाही, थोडी बाजूला.
इंजिन अजूनही हलकंसं गुरगुरत होतं.
ती मुलगी मागून पटापट चालत आली.
रस्त्याच्या प्रकाशात तिचं रुप हळूहळू स्पष्ट होत गेलं.
तीने हलक्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता,
कपड्यांवर रात्रीच्या धुळीचा थर असला तरी,
त्या कापडातून एक शांत तेज झिरपत होतं,
जणू प्रकाशालाच तिच्या त्वचेनं ओढलं होतं.
चेहऱ्यावर थकवा नव्हता, फक्त एक विचित्र उजळपणा ……
तो तेज जो काही वेळा चंद्रप्रकाशातून येतो,
आणि काही वेळा स्मृतीतून.
ती कारच्या विंडोजवळ आली आणि थोडा श्वास सावरत म्हणाली …..
… “माफ करा… माझी बस आत्ताच चुकली आहे.
जर तुम्ही मला लिफ्ट दिलीत, तर आपण ती बस पकडू शकतो.
मी पुण्याला जाते आहे…
कृपया मदत करू शकता का?”
सौमिल काही क्षण तिच्याकडे बघत राहिला.
त्याला तिच्या आवाजातली ओळख जाणवली,
जणू हे वाक्य, ही वेळ, आणि हा प्रकाश
सगळं काही घडून गेलं होतं… कुठेतरी.
त्याने हलक्या हाताने गिअर neutral मध्ये टाकला.
इंजिन अजूनही गूंजत होतं,
जणू वेळेला थांबावं की पुन्हा पुढे सरकावं, याचा निर्णयच होत नव्हता.
सौमिलने हलकिशी मान डोलावली.
त्याच्या चेहऱ्यावर ना संमती, ना नकार …..फक्त एक शांत होकार.
ती मुलगी एक क्षण त्याच्याकडे पाहत उभी राहिली,
मग सावकाश कारचा दरवाजा उघडला.
लोखंडी हँडलचा किर्र आवाज रात्रीच्या शांततेत वेदनेइतका स्पष्ट ऐकू आला.
ती सीटवर बसली,
कपड्यांचा हलका खसखसाट आणि परफ्यूमचा मंद गंध
गाडीत हळूहळू पसरला …
जणू कोणी अंधारात दिवा पेटवला असावा.
सौमिलने गिअर बदलला,
आणि कार हळूहळू पुढे सरकली …
जशी वाऱ्याने पान हलकंसं ढकलावं,
तशी… कोणत्याही घाईशिवाय.
डॅशबोर्डवरील घड्याळाने 02:01 AM दाखवलं.
त्या क्षणी रस्ता, वेळ आणि गाडी … तिन्ही एका सुरात चालू लागले.
गाडी चालू होताच … मागच्या नंबर प्लेटवर थरथरता, मंद, जुना बल्ब जसा लुकलुकतो तसा प्रकाश पडला,
जणू अंधाराने त्या प्रसंगाचा अर्थ सांगायचा प्रयत्न केला असावा.
MÖB–∞314E खाली लहानशा अक्षरात लिहिलं होतं … “Think Scientifically.”
“त्या क्षणी वेळ थांबली की मन … दोन्ही एकच वाटू लागलं.
कुठूनतरी एक आवाज आला, शांत पण ठाम…
… ‘आता पुढचं वाचा, भावनांनी नाही… विचारांनी. कारण इथून पुढे वास्तव आणि सिद्धांत … एकमेकांच्या प्रतिबिंबात ओघळतील.
गाडी पुढे निघाली,
पण मागे कुठेतरी,
त्या प्लेटचा पिवळसर प्रकाश अजूनही हवेत तरंगत राहिला …..अपूर्ण समीकरणासारखा, ज्याचं उत्तर अजून सापडायचं होतं.
गाडीचा मंद आवाज आणि तिच्या अत्तराचा सुगंध …. दोन्हीही गाडीत दरवळत होते.
थोडा वेळ…. दोघेही शांत होते.
सौमिल मात्र गाडी चालवण्यात आणि स्वतःच्या विचारात इतका हरवला होता, की तीने ते पहिल्याच पाच मिनिटांत ओळखलं.
तीने हळूच आपली पर्स सावरली,
आणि नजरा डॅशबोर्डवर स्थिरावल्या.
डॅशबोर्डच्या खाली Stephen Hawking यांचं “A Brief History of Time” हे पुस्तक
तिच्या नजरेस पडलं.
ती त्या पुस्तकाकडे एकटक पाहत होती….. प्रकाशाच्या निळसर प्रतिबिंबात तिच्या डोळ्यांत क्षणभर एखादं दूरचं जग हलल्यासारखं वाटलं.
सौमिलने त्या थांबलेल्या नजरेकडे पाहिलं …
क्षणभर त्याच्या मनात एक हलकी हालचाल झाली,
जणू मनातल्या संशयाला स्वर मिळाला.
तो थोडं दचकला;
त्याचा श्वास क्षणभर विस्कटला,
आणि मग हळू आवाजात तो म्हणाला…
… “तुमची बस……. आणि इतक्या रात्री?”
अचानक आलेल्या प्रश्नाने ती थोडी गोंधळली.
डोळ्यांत क्षणभर असमंजसतेचा एक चमकता ठिपका उमटला,
पण तीने स्वतःला सावरलं …… आवाज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत ती सावकाश म्हणाली,
… “हो… माझी बस चुकली… पुण्याच्या IUCAA मधून निघालेली होती … कॅम्पसाठी.”
ती क्षणभर थांबली,
मग थोडं बाहेर पाहत हळू आवाजात बोलली……
… इथेच, खडकवासलाजवळ.”
सौमिलचे ओठ थोडे उघडले …..
जणू विचार आणि शब्द यांच्यामधली रेषाच घसरली.
क्षणभर तो स्वतःच्याच विचाराने दचकला,
डोळ्यांत हलकं विस्मय होतं,
आणि मग जवळजवळ अनाहूतपणे त्याच्या तोंडून निघालं …
… “कॅम्प…?”
त्या प्रश्नात भीती नव्हती,
पण एक विचित्र उत्सुकता होती …..जणू काही ओळख पुसटशी उगवत होती.
तीने हलकंसं हसत मान डोलावली,
… “हो… कॅम्पसाठी.”
एक दीर्घ श्वास घेत ती लगेच बोलली …..
… “By the way… माझं नाव तारा मोहिते.
मी रिसर्चर आहे IUCAA मध्ये.”
क्षणभर तिच्या आवाजातला तो आत्मविश्वास आणि शांत सूर हवेत मिसळला.
सौमिलच्या चेहऱ्यावर हलकं आश्चर्य उमटलं….
… “ओह्ह… अच्छा…” तो म्हणाला,
जणू मनात काहीतरी सैल झालं.
त्याचा आवाज आता थोडा मवाळ झाला होता.
थोड्या शांततेनंतर, हलकंसं हसत तो म्हणाला
… “मी सौमिल सरदेसाई.”
तीने सौमिलकडे हलकंसं हसून पाहिलं ….
तो क्षण, क्षणभर तिच्या नजरेत हरवला. मग तीने हात पुढे केला, डॅशबोर्डखालचं पुस्तक हातात घेतलं.
A Brief History of Time.
कव्हरवरची निळसर चमक तिच्या बोटांवर उमटली. तीने त्या अक्षरांवरून हलकं बोट फिरवलं …… जणू ती वेळेच्याच पृष्ठभागावर स्पर्श करत होती. तिच्या नजरेत एक शांत गुंतवणूक होती, आणि मग, कोमलतेने स्वतःशीच पुटपुटली ……
… “वेळ कधी पुढे जात नाही … प्रतिबिंब दाखवण्यासाठी.”
सौमिलने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला,
थोडं हसला… आणि म्हणाला,
… “Stephen Hawking…”
ती हलकं हसली,
… “हो… रहस्यमय आहे हे पुस्तक.
विश्व समजावतानाच ते जणू स्वतःलाच विसरतं, वेळ आपल्याकडे नाही, आपणच वेळेकडे पाहतोय की काय… असं काहीसं.”
तीचं वाक्य हवेत थोडं वेळ थांबलं,
आणि सौमिल लगेच म्हणाला …
… “तुम्हाला वाचनाची खूप आवड आहे, हे लगेच समजतंय.”
ती हलकं मान डोलावते,
… “हो… विशेषतः विज्ञानकथा.
कारण त्या खऱ्या असतात,
…प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी,
किंवा कधी फक्त नवे प्रश्न विचारण्यासाठी.”
क्षणभर तिच्या डोळ्यांत तारकांचा थरथरता प्रकाश उमटला, जणू काही दूरवरचं विश्व तिच्या आत हलत होतं.
… “आणि मला कोणत्याही परिस्थितीत पोचायलाच हवं होतं,”
ती म्हणाली, “थोडा विराम घेत.
… “कारण आज रात्री…… वेळ नेहमीच्या मार्गाने जाणार नाही … ती स्वतःकडेच परत वळणार आहे.”
सौमिल आश्चर्यचकित झाला, पण त्या आश्चर्यात एक विचित्र उत्सुकताही होती.
तो तिच्याकडे पाहत हळूच म्हणाला,
… “अशी कोणती घटना होणार आहे… ज्यासाठी तुम्ही इतक्या रात्री बाहेर पडलात?”
… “Temporal Lensing Event” तीने श्वास आत खेचत शांतपणे म्हणाली,
…आज रात्री अशी एक खगोलीय रचना निर्माण होत आहे, जी मानवजातीने कधी पाहिलेली नाही.
पहिल्यांदाच … प्रकाश आणि वेळ एकाच बिंदूत वाकणार आहेत.”
तिच्या आवाजात थरथर होती, पण ती भीतीची नव्हती, ती शोधाची होती.
… “या क्षणाला नाव दिलं आहे … Temporal Lensing Event.
… त्याचं स्वरूप फक्त गणित आणि सापेक्षतेच्या सिद्धांतांवरूनच मोजलं गेलं आहे…
पण तो प्रत्यक्षात कसा दिसेल … हे कोणीही सांगू शकत नाही.”
… “म्हणजे हा ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल…”
सौमिलचा आवाज कुजबुजल्यासारखा झाला.
ती हसली … त्या हसण्यात ताराच हलकं थरथरणं होतं.
… “हो ना… म्हणजे ही घटना पुन्हा कधी घडेल, हे कोणालाच सांगता येत नाही.”
… “Interesting…” सौमिल पुटपुटला
… “Time आणि Illusion… ही आइन्स्टाईनची कल्पना हॉकिंगने इतक्या हुशारीने जोडली आहे,
जणू वेळ स्वतःलाच समजावण्याचा प्रयत्न करत आहे.”
त्या क्षणानंतर शब्द कमी, आणि विचार अधिक झाले.
आता ख-या अर्थाने वेळेवर भाष्य करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली होती…
तीच्या समजावण्याच्या पद्धतीत एक विचित्र शांतता होती …
जणू ती उत्तरं देत नव्हती, तर प्रश्नांनाच अर्थ देत होती.
आणि त्या अर्थाच्या सुगंधात सौमिलची उत्सुकता हळूहळू विरघळत होती.
वेळ, विचार, आणि त्यांच्या मधली न बोललेली धडधड …
हाच त्यांचा प्रवास बनत होता.
त्यांचा संवाद विश्वाच्या गूढतेत हरवला होता. गप्पा अजूनही चालू होत्या, कधी हॉकिंगचं विश्व, कधी वेळेचे चमत्कार, कधी हसू.
पण त्या सहजतेच्या दरम्यानच, हवा आता स्थिर झाली होती , जणू संवादानंतरही शब्द हवेत तरंगत होते. डॅशबोर्डवरील घड्याळाचा मंद टिक-टिक आवाज आता अधिक स्पष्ट ऐकू येऊ लागला होता.
आणि अचानक, सौमिलचा सूर बदलला.
तो हळूच, एका अनाकलनीय शांततेत म्हणाला…
… “हॉकिंग यांचे…. मृत्यूबाबत काही विचार आहेत का?”
त्या प्रश्नाने जणू हवा थोडी जड झाली.
ताराच्या चेहऱ्यावर क्षणभर आश्चर्याची हलकी झळक चमकली.
ती थोडी गोंधळली … हा मधेच मृत्यूबाबत का विचारतोय…?
तिच्या नजरा काही क्षण रिकाम्या रस्त्याकडे स्थिर राहिल्या,
मग ती थोडं सावरून शांतपणे म्हणाली …
… “मृत्यू ही एक शाश्वत सत्यता आहे…
पण ती जरी शाश्वत असली, तरी तिची जाणीव , ती मात्र मृत्यूपूर्वीच सुरू होते.”
ती थोडा श्वास घेत थांबली,
आणि मग जवळजवळ कुजबुजत पुढे म्हणाली….
… “हॉकिंग यांचं लेखन वाचलंत तर समजतं… ते मृत्यूबद्दल बोलतात, पण जणू तो शेवट नाही,
तर आणखी एका आरंभाचा हिशेब आहे.”
ती काही क्षण गप्प राहिली.
गाडीचा मंद आवाज आता जणू दूरवरून येत होता … जसा एखादा काळ ओघळतो तसा.
बाहेर तारकांचा प्रकाश काचांवर हलका थरथरत होता, आणि आत … एक अदृश्य प्रश्न आकार घेत होता.
तीने हळूच विचारलं …
… “तुम्ही… मृत्यूला विज्ञानात कसं पाहता?”
सौमिलने गाडीचा गिअर बदलला. त्या क्षणी इंजिनचा आवाज थोडा खोल झाला …
जणू गाडी नव्हे, तर अवकाशातलं काहीतरी हलत होतं.
क्षणभर सौमिल काहीच बोलला नाही.
त्याच्या चेहऱ्यावर प्रकाश आणि अंधार यांचं एक विचित्र मिश्रण दिसत होतं.
डॅशबोर्डवरील “A Brief History of Time” च्या पानांवर वाऱ्याने हळूच हालचाल केली …
जणू उत्तर तिथूनच बाहेर यायचं होतं.
सौमिलने नजरा पुढे स्थिरावल्या, आणि हळू आवाजात म्हणाला…..
… ‘No Boundary’ universe…”
क्षणभर त्याने शब्द…. हवेतच लटकू दिले,
आणि मग शांतपणे पुढे म्हणाला
… “हॉकिंग स्वतः म्हणतात ….. मृत्यू म्हणजे शेवट नाही. त्याच्या पलीकडेही काहीतरी आहे…
जिथे वेळ थांबत नाही, पण अर्थ बदलतो.”
त्याचा आवाज आता आणखी मंद झाला ….
“तो भाग… जिथे वेळ आणि भावना वेगळे होत नाहीत. जिथे अनुभव फक्त जाणिवेत राहतो,
आणि ती जाणीव…… मृत्यूनंतरच समजते.”
ती त्याच्याकडे पाहत राहिली …
डोळ्यांत थोडा संभ्रम, थोडं आकर्षण.
बाहेरचं विश्व आता जणू अधिक जवळ आलं होतं,
आणि गाडीच्या आत …..
एक अशब्द, न समजणारा थिजलेला श्वास हवेत थांबला होता.”
तीने नजर बाहेरून पळणाऱ्या झाडांवर टाकली आणि खिडकीच्या काचांवर हलकंसं डोकं टेकवलं. थोडा श्वास स्थिरावला… मन जणू शांत होत गेलं.
ती हळू स्वरात म्हणाली,
… “मृत्यू आणि वेळ… दोघांमध्ये काही नातं असेल का?”
तिचा आवाज हवेत विरघळला, प्रश्नासारखा नव्हे, तर जाणिवेसारखा…..
… “मृत्यू थांबवतो शरीराला,” ती पुढे म्हणाली, “पण वेळ… ती थांबत नाही.
म्हणूनच कदाचित, मृत्यू म्हणजे वेळेचं प्रतिबिंब असावं ……जिथे सर्व काही दिसतं… पण काहीच हलत नाही.”
सौमिल तिच्या त्या गूढ प्रश्नाकडे क्षणभर फक्त पाहत राहिला.
डोळ्यांनी नाही , पण मनाने मात्र तो तिच्याकडेच पाहत होता.
गाडीच्या आत हवेत अजूनही तिच्या शब्दांचा एक हलका, गूढ श्वास होता…
वेळ जणू त्या क्षणातच निश्चल झाली होती.
त्याने गाडीचा गिअर बदलला … हलकासा आवाज हवेत विरघळला,
आणि त्याचं मन त्या मुलभूत प्रश्नावर घसरलं.
…मृत्यूनंतरचं तत्त्वज्ञान…
नेहमीच वेदनादायक असतं, अस्वस्थ करणारं.
कारण त्या वेळी माणसासोबत खरंच कोणी नसतं …फक्त वेळ असते…
नात्यांच्या पलिकडे, भावनांच्या स्पंदनात…
एक शांत, अदृश्य सोबत म्हणून.
तो थोडा थांबला. गाडीचा आवाज आता जणू अंतराळात विरघळला होता.
ती हळूच म्हणाली…..
… “या अवकाशात… एक अशी पोकळी आहे, जिथे अजूनही एक पृथ्वी श्वास घेत असेल.
कदाचित आपल्यासारखंच कुणीतरी तिथे वेळ समजून घेण्याचा प्रयत्न करत असेल…”
त्या क्षणी, खिडकीच्या काचांवरून परावर्तित झालेला तिचा चेहरा,
गाडीच्या आतल्या अंधारात आणि बाहेरच्या तारकांमध्ये मिसळून गेला होता.
आणि सौमिलला वाटलं …
कदाचित मृत्यू म्हणजेच अशीच एक पोकळी असेल,
जिथे वेळ अजूनही… कुणाचातरी श्वास ऐकत असेल.
आता रात्रही गडद झाली होती…
डॅशबोर्डवरचं डिजिटल घड्याळ निळसर प्रकाशात थबकत होतं …
02:40 AM जणू वेळ स्वतःच्या श्वासावर थांबली होती,
आणि त्या आकड्यांमधून अंधार, आपलं गुपित फुसफुसत होता.
थोडा वेळ दोघेही शांत राहिले.
गाडीच्या बाहेर रात्र अजून गडद होत गेली होती… आणि गाडीचा वेगही….
थोडं मन स्थिरावल्यावर तिने खिडकीबाहेर पाहिलं, ओठांवरचा श्वास सावरला……..आणि अलगद विचारलं ,
… “तुम्हाला Möbius Equation बद्दल माहिती आहे का?”
सौमिलने तिच्याकडे नजर फिरवली,
त्या नजरेत एक हलकी, गूढ उत्सुकता होती.
त्याने शांतपणे नकारार्थी मान हलवली.
ती पुढे म्हणाली,
… “Möbius Equation खरं तर एक Möbius Strip आहे…
एक असा पृष्ठभाग ….. ज्याला फक्त एकच बाजू आणि एकच सीमा असते.
जर तुम्ही कागदाचा पट्टा घेऊन त्याला अर्धा वळवून
दोन्ही टोकं जोडलात,
तर जो पट्टा तयार होईल, तोच Möbius strip.”
ती थोडी थांबली, बोटांनी हवेत एखादा वळण रेखाटल्यासारखी हालचाल केली.
… “त्यावरून तुम्ही चालायला सुरुवात केली, तर तुम्ही पुन्हा तिथेच याल……
पण बाजू न बदलता.
म्हणजे हा एक अनंत वर्तुळाचा भास आहे…
एक असं चक्र, जे कधीच संपत नाही.”
आणि हा प्रवास…
कदाचित त्याच्याच एखाद्या अदृश्य अंशाचा विस्तार असावा …
सौमिलच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं.
इंजिनचा नाद जणू वेळेचा ठोका झाला होता,
आणि रस्त्यावरून फिरणाऱ्या टायरांचा गूंज …
जणू त्या ठोक्याचा प्रतिध्वनी,
जो विश्वाच्या शांततेत हरवत नव्हता… फक्त परत येत होता.
त्या विचाराच्या लहरीत त्याने गिअर हलकासा बदलला.
मशीनचा आवाज मंद झाला … जणू श्वासाचाच एक भाग.
कार पुढे सरकत राहिली,
अंधारातून वाट काढत, पण कुठे पोहोचायचंय हे न ठरवता.
बाहेर फक्त रस्ता होता… आणि वेळ.
दोघेही शांत,
एकमेकांच्या समांतर वाहत,
जणू एकमेकांच्या अस्तित्वाची साक्ष देत.
त्याने डोकं किंचित हलवलं …..
विचार झटकण्यासाठी नाही,
तर त्यांना हळूच स्थिर होऊ द्यायला.
डोळे पुन्हा रस्त्याकडे वळले.
क्षणभर त्याने हेडलाइट्स upper केल्या.
पांढरा प्रकाश पुढे पसरला …
काळोखाला न फाडता, फक्त स्पर्श करत,
जणू वेळेच्या अंधारात स्वतःची शांत छाया शोधत होता.
तेवढ्यात …
रस्त्याच्या कडेला काहीतरी हललं.
एक सावली, नक्की सांगता न येणारी.
सौमिलने डोळे किंचित आकसले.
प्रकाश आणि अंधाराच्या दरम्यान ती गोष्ट आकार घेत होती …
कोणी माणूस……नाही… ती एक मुलगी होती…
ती स्थिर उभी होती, पण तिच्या डोळ्यांत हलका कंपन होता.
एक हात वर … लिफ्ट मागण्याच्या इशाऱ्यासारखा,
पण तिच्या हालचालीत कुठेतरी वेळ थांबलेली जाणवत होती.
सौमिलने ब्रेक दाबला.
कार बाजूला सरकली, आणि अंधार थोडा मागे हटला.
इंजिनचा आवाज त्या शांततेत विरघळला …
जणू यंत्रही काहीतरी पाहतंय, ऐकतंय.
ती जवळ येऊ लागली.
हळूहळू, प्रत्येक पावलासोबत जग जड होत गेलं.
तिचा ड्रेस धुळीने भरलेला, पण त्या धुळीतूनच काहीतरी उजळत होतं …
एक मंद, पण ठाम तेज.
ती खिडकीजवळ आली.
…“माफ करा… माझी बस चुकली आहे,” ती म्हणाली,
आवाज थोडा थरथरता, पण सरावलेला.
“जर तुम्ही लिफ्ट दिलीत तर मी ती पकडू शकेन. मी पुण्याला जाते आहे…”
सौमिल काहीच बोलला नाही.
फक्त तिच्याकडे पाहत राहिला …
त्याने मान डोलावली.
दरवाज्याचा किर्र आवाज रात्रीच्या शांततेत चिरला.
ती आत बसली.
हवेत परफ्यूमचा मंद गंध पसरला,
आणि थोडासा ओळखीचा एकांत.
कार पुढे निघाली.
डॅशबोर्डवर वेळ … 02:01 AM.
बाहेर रस्ता. आत वेळ.
दोघेही न बोलता पुढे सरकत होते.
मागे, नंबर प्लेटवरचा मंद प्रकाश हलला.
जणू अंधाराने स्वतःला पुन्हा एकदा वाचलं …
MÖB–∞314E
खाली, थंड अक्षरांत लिहिलं होतं … “Think Scientifically.”
शेअर करा..