संघर्षाचा वास्तवपट ‘तारेवरच्या कसरती’

संघर्षाचा वास्तवपट ‘तारेवरच्या कसरती’

प्रसाद सावंत 

विलास गावडेंच्या कथा या ओघवत्या शैलीतून उत्स्फूर्तपणे कामगारांच्या रोजच्या जीवनमानातील अंतर्मनातील तसेच अवतीभवतीचे वास्तव सहजपणे कथन करीत उलगडत जातात. त्यात कुठेही भाषिक सौंदर्याचा अनाठायी अभिनिवेश दाखवण्याचा अट्टहास नाही किंवा उगीचच ओढून ताणून आणलेल्या सुखदु:खाच्या संघर्षाचा बडेजाव नाही. या ओघवते पणामुळेच व्यक्तिरेखा आपापले अस्सल रंग दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. खरे तर या कथासंग्रहाचे शीर्षकच कामगारांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी कामगारांमधला अंतर्गत तसेच कामगार आणि अधिकारी वर्ग यांच्या संघर्षातील ताणतणावाचे गुंतलेले धागे सोडवणे व त्यांच्यातल्या सामंजस्यासाठी प्रयत्न करणे कसे जिकीरीचे आहे हेच दर्शवते. गावडे हे कायद्याचे अभ्यासक असल्याने त्यांनी हा एखादा गुंता व त्यातून निर्माण झालेला तणाव अलगद पण कुठेही बोजड न करता किंवा त्रासरहित तसेच वेदनारहित समतोल राखत उलगडत नेला आहे. त्यांच्या ‘अद्दल’या कथेतल्या बोरवणकराना सुद्धा दाभाडे अलगद पण शालजोडीतील पण जिव्हारी लागणारी ‘अद्दल’ घडवताना दिसतात . गावडेंचा पिंड बर्‍याचदा आक्रमक व बेदरकार वृत्तीचा असल्याने ही छटा जशी काही वेळा त्यांच्या काव्य रचनेत आढळते तशी ती त्यांच्या कार्यक्षेत्रात व त्या योगे घडलेल्या कथांच्या सहज अनुभूतीत जाणवत नाही. उलटपक्षी त्यावेळी ती सामंजस्याची,संयमी व संतुलन राखणारी जाणवते. हा कदाचित त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबधित असलेल्या जाणीवपूर्वक आणि अंगिकारलेल्या संयमाचा भाग असेलही आणि त्यामुळेच त्यांनी ही तारेवरची कसरत शब्दबद्ध केली असण्याची शक्यता आहे. यासाठीच या कथासंग्रहाचे मुखपृष्ठही फारच बोलके आहे.

या कथांमधल्या कामगारांच्या व्यक्तीरेखेतून समाजातील निरनिराळ्या मानसिक वृत्तींचा परामर्श अचूकपणे वेधला आहे. यात एकच फक्त प्रामुख्याने लक्षात येते ते हे की, गावडे यांनी राजकीय प्रश्नांना जाणीवपूर्वक कथासूत्राच्या मूल प्रवाहापासून बाजूला ठेवून कामगारांच्या व व्यवस्थापनाच्या सामाजिक आणि व्यक्तीगत वृत्ती प्रवृत्तीतून निर्माण झालेल्या प्रश्नांकडे वाचकाला वळवून ठेवण्याकडे भर दिला आहे. अर्थातच तोच या कथांचा व त्यांच्या कार्यक्षेत्राचा मूळ स्त्रोत आहे हे नक्की.

त्यामुळेच कथन शैलीत येणारा पाल्हाळीकपणा कुठेही डोकावताना दिसत नाही. त्यांच्या ‘महावस्ताद’या कथेद्वारे त्यांनी याची चुणूक दाखवून मालकवर्गाच्या काही डावपेचांचे यथार्थ वर्णन रेखाटले आहे. तसेच कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावरील ‘टाळूवरचे लोणी’ या कथेमधून केलेला त्यांच्यातील संघर्षाचा उहापोहही खरोखरच तारेवरची कसरत आहे.

विलास गावडे हे मुलत: गिरणगावच्या मातीतले जीवन अनुभवलेले,शिवाय कायद्याचा अभ्यास त्यामुळे त्यांना कामगारांच्या प्रश्नांबरोबरच व्यवस्थापन क्षेत्रातल्या तांत्रिक तडजोडीचाही चांगला अनुभव असल्याने त्यांनी ‘तारेवरची कसरत’ समर्थपणे पेलली आहे.

तारेवरच्या कसरती

लेखक :विलास गावडे

प्रकाशक : संवेदना प्रकाशन

पृष्ठे :१७२                 

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments