सुंदर साजिरा श्रावण आला…

  1.   कित्येक कवी—कवयित्रींना भुरळ घालणारा. लेकीबाळींची मने प्रफुल्लीत करणारा . चराचर सृष्टीवर आनंदाची,हर्षाची पखरण करणारा .विविध सणावारांनी नटलेला .सुंदर साजिरा श्रावण येतोय.
  2. अगदी लहानपणापासूनचं आईला सर्व सणवार अगदी मनापासून आणि सर्व जय्यत तयारीनिशी साजरे करताना पाहत आले आहे.श्रावण सुरु व्हायच्या आधीपासुनचं तीची लगबग सुरु असते.घर,देव्हारा झाडून साफसूफ करणे,मेतकूट करुन ठेवणे,फुलवाती करणे. त्या तूपात भीजवून ठेवणे,गोडा मसाला ,शेंगदाण्याचं कूट करुन ठेवणे अशी अगदी न संपणारी यादी.
    या सगळ्यातून आम्हा मुलांनाही हळूहळू या सणांनी भरलेल्या श्रावणाची ओळख होत गेली.आमच्या लहानपणी नागपंचमीला शाळेत पाटीपूजन असायचं .आदलेदीवशी पाटी कोळशाने घासून काळी कुळकुळीत करायची आणि स्वच्छ पुसून ठेवायची.रात्री बाबा घरी आले की आम्हा तीघांच्याही पाटीवर सुरेख असं नागोबाचं आणि सरस्वतीचं चीत्र काढून द्यायचे.सकाळी लवकर उठून आंघोळ आटोपेपर्यंत आई पाटीपूजनाची जय्यत तयारी करुन द्यायची.हळद कुंकू,फुले,गुळखोबरं,उदबत्ती,कापूर,वीडा,दक्षिणा ,लाह्या ,दूध अशी अगदी भरगच्च तयारी. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी सवाष्ण जेवायला वाढणे, जीवतीची पूजा,पुरणा वरणाचा नैवेद्य .आम्हा मुलांना पुरणाच्या आरतीने औक्षण .दर शनिवारी मुंज्या मुलगा जेवायला वाढणे. सगळं सगळं अगदी यथासांग करते आई.
    श्रावणी सोमवारी सकाळची शाळा असायची. आई आम्हाला आवर्जून उपवास करायला लावायची.’भाजकं खाऊन करा चालेल पण उपवास करा’ हा तीचा आग्रह संध्याकाळी सहा—साडेसहाला उपास सोडायचा. आवडीचा काहीतरी गोड पदार्थ असायचाचं.तीसर्‍या श्रावण सोमवारी न चुकता गव्हाची खीर असणारचं. राखीपौर्णिमेला नारळीभात तर अगदी ठरलेला….
    कदाचित लहानपणापासुनचं श्रावणमासासोबत एक आगळं वैगळं धार्मिक,भावनीक नातं निर्माण झालं.
    पुढे लग्नानंतर नीरनीराळी व्रत वैकल्ये ,दर सोमवारी शीवामुठ घालणं ,दर मंगळवारी श्री मंगळागौरीची पूजा ,मंगळागौर जागवणे या सर्वांमधून श्रावण अधिकाधीक जवळचा वाटू लागला. जीवलगचं जणू. आईकडून शीकत शीकत आम्ही दोघी बहिणीही सर्व तयारीनीशी श्रावणाचं स्वागत करायला सज्ज असतो…
    आपल्या मुलांवरही व्हायला हवेत हे संस्कार म्हणून …
    श्रावणमासाच्या आगमनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
सौ.रेणू दयानंद सातोस्कर

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments