मी उभा विटेवरी..

देवा कुठे हरवलं मन
का झाला स्वैरभैर
कुणी चोरले तुमचे
चित्त आणि तन !

नाही रुचत भोजन
नाही निद्रा फलाहार
नको वाटे हारतुरे
नयनी वाहतसे निर !

का एवढे उदास
माझी हाक न ये कानी
कुठे लागले लोचन
सांगा कोण वसे मनी !

ऐसे रुक्मिणीचे बोल
तीस सांगे श्री हरी
चाल चालुन येई माझा
भोळा भक्त वारकरी !

त्यासी नसे तहान भूक
पार विसरती घर दार
नाच नाचून थकताती
माझे सारे वैष्णव जन !

ऊन पाऊसाचा मारा
नाही क्षणीक विश्रांती
सर्व सोसून येतसे माझे
सखे मित्र सवंगडी !

माझा ज्ञाना, तुका, चोखा
जनी, सोपान, मुक्ताई
संगे घेऊन येताती
प्रति वर्षी वारकरी !

कधी एकदा भेटेन
घट्ट कवटाळीन त्यांसी
माझ्या उरात भरीन
त्यांची शुद्ध भाव भक्ती !

सखे ऐक माझी खूण
मी नसे कुठे राउळी
त्यांच्या काळजीने बघ
माझी काया झाली काळी !

मी नसे देव बिव
त्यांची करितो चाकरी
एका हाके साठी मी
उभा विटेवरी, मी उभा विटेवरी !

-: सौ. संध्या पुंड

शेअर करा..

guest
4 Comments
Inline Feedbacks
View all comments
Omkar Upadhye

अप्रतिम!!! अगदी सहज पण परिणामकारक.. अध्यात्म आणि रोजचे जीवन याचा मेळ साधला आहे..राम कृष्ण हरी!

धनश्री धनंजय बर्वे

विठु माऊली प्रत्यक्ष भेटली।
अशी मुर्तीमंत कविता झाली।।

मनीषा प्रभुदेसाई

खूप छान भावपूर्ण वर्णन केले आहे

महेश हरिदास

सुंदर आणि उत्तम विवेचन… राम कृष्ण हरी