तुझं बहुतेक माझ्यासारखं झालंय!

दाटून बरंच आलेलं असतं,
फक्त बरसण्याची धास्ती असते.
साऱ्यांसाठी आपण असतो पण
आपल्यासाठी आपणच सस्ते!

जाणून असतात इतरही,
दिसत असतं भरून आलेलं.
त्यांनी मांडलेल्या व्यथांच्या पसाऱ्यात,
गिळावंच मग ओठी आलेलं.

मग साठवून साठवून सारं
एकांतात तर कसं लपवावं?
तिथंही साऱ्या नजरा असाव्यात!
दाटलेलं इतकं कोणावर सोपवावं?

आपण थोडंस गडगडलं
तर रोषानंच नजरा उचलतात.
बरसू मात्र नकोस बाबा
अशी दटावणीपुर्वक पावती देतात.

मग स्वतःच स्वतःचे दाटलेले ढग पुढे सारायचे,
एक ही थेंब न गाळता,
दुसऱ्याला इजा न करता
मन पुन्हा निरभ्र करायचे.

पण तेही

पुन्हा दाटून येऊन पुन्हा स्वतःच निरभ्र होण्यासाठी!

-हरिप्रिया जोशी

Haripriya Joshi

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments