वारकरी

ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाच्या पाण्याच्या एका थेंबासाठी आभाळाकडे डोळे लावून बसतो अगदी त्याच प्रमाणे आषाढी वारीसाठी पंढरपूरला डोळे लावून बसणारा हा वारकरी म्हणजेच वैष्णव… स्वतःचा मी पणा माऊलींच्या चरणाशी अर्पण करून स्वतः माऊली होऊन जातो तो हा वारकरी. आपल्या भक्तीला अश्रूंच्या वाटे वाट मोकळी करून देणारा हा वारकरी. स्वतःच्या अस्तित्वाकडे पाठ फिरवून हरिपाठात तल्लीन होऊन जाणारा हा आपला वारकरी. अश्या ह्या आपल्या वारकऱ्यांचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. निस्सीम भक्ती + पराकोटीची श्रद्धा = वारकरी असे जणू समीकरणच आहे. फक्त पायी आषाढी वारी करणारा वारकरी असे नसून वारकरी म्हणजे तो प्रत्येक माणूस जो ह्या भक्तीच्या सागरात ओला चिंब होऊन जातो.

गळ्यात तुळशी माळा घालून, हातातली भगवी पताका फडकवत, डोक्यावर तुळशी वृंदावन किंवा विठुरायाची मूर्ती घेऊन, हातातल्या टाळ अथवा मृदुंगाच्या साथीने हरिपाठ म्हणत, डोळ्यात विठुरायाच्या भेटण्याची आस ठेवत नाचणारा हा वारकरी विश्वेश्वराच्या आज्ञेने आळंदीहून पंढरपूरला माऊलींच्या आणि इतर संतांच्या बरोबर पायी जायला निघतो. हा प्रवास केवळ आळंदी ते पंढरपूर असा नसून हा स्व ला स्व मध्ये विलीन करण्याचा असतो. सोबत असणाऱ्या, आपली काळजी घेणाऱ्या संतांच्या मुळे हा प्रवास अगदी सोपा होऊन जातो. दुसऱ्या वरकऱ्यांमध्ये माऊली पाहून प्रत्येकाला माऊलींची उपमा देताना त्यांच्या पायाला आपसूकच स्पर्श होतो.

अध्यात्मिक वाटचालीत वयाचे कोणतेही बंधन नसते हे दाखवून देत लहानांपासून ते जेष्ठांपर्यंत पुरुष असो वा महिला असे अनेक जण विठ्ठलाच्या ओढीने वारी करत असतात. चेहऱ्यावरील असणाऱ्या भक्ति भावाने जेष्ठांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही आपसूकच पुसल्या जातात. राम कृष्ण हरी चा गजर करत किंवा हरिपाठ म्हणत टाळ, पखवाजाच्या साथीने नाचणारे वारकरी, नुसते वारी पहायला आलेल्यांना सुद्धा सर्व काही विसरायला लावत त्यांच्या मनात आपणही पुढील वर्षी वारी करायची अशी भावना रुजवून जातात. आपल्या बरोबरच्या चालून चालून थकलेल्या वारकऱ्यांना मानसिक बळ देत सर्वजण पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतात.

वैष्णवांच्या ह्या मेळ्यामध्ये रिंगण हा महत्वाचा असा टप्पा असतो. अश्वाला पाहताच डोळ्यांतून सतत वाहणारे अश्रू आणि अश्वारूढ झालेल्या माऊलींच्या पायाखालची माती कपाळी लावत माऊलींच्या पायाला स्पर्श केल्याचा अनुभव हे वारकरी घेत असतात. आई जशी मायेने आपल्या लेकराला घास भरवत असते अगदी तशीच भावना मनामध्ये ठेवून प्रत्येक वारकरी हा प्रसादाचे सेवन करत असतो. एकाचढ एक आवाज असणारे वारकरी अतिशय तालात सुरात संतांचे अभंग म्हणत असतात. महिला वारकरी फुगड्या आणि विविध प्रकारचे नृत्य करत भगवंतांमध्ये एकरूप होऊन जातात.

जसे जसे पंढरपूर जवळ येते तस तसे ह्या वरकऱ्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारतो. विठुरायाला भेटण्याची तगमग सुरू होते. पांडुरंग भेटायला येणार या भावनेने अश्रूंचा बांध फुटतो. ज्या प्रमाणे एखादे लहान मूल आईला पाहून तिच्या कडे झेपावते अगदी तसेच त्या विश्वाच्या अद्वितीय शक्तीला, आपल्या माऊलीला भेटण्यासाठी त्याच्या मुख दर्शनासाठी, त्याच्या पायरीवर डोके ठेवण्यासाठी “पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय” हा जयघोष करत सर्व वारकरी विठुरायची लेकरं पंढरपूरच्या दिशेने झेपावतात..

|| राम कृष्ण हरी ||

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments