योग दिन

योग दिन

 

आज आंतरराष्ट्रीय योग दिन….
दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो.
का ???तर
हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे आणि योग देखील व्यक्तीला दीर्घ करते. व या दिवसांत रोगराई साथीचे आजार पसरतात शरीरातील शक्ती कमकुवत होते.म्हणून त्याला टक्कर देण्यासाठी शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग करायला पाहिजे. 21 जून 2015 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला, .
तन आणि मन यांची एकत्र क्रिया ..व्यायाम..म्हणजे योग
योग हा व्यायामाचा एक असा प्रभावशाली प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील संतुलन राखले जाते. योगाभ्यासामुळे शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक विकारांवर सुद्धा विजय मिळवता येऊ शकतो.योगाभ्यासात शारीरिक कृती आणि योग्य पद्धतीने श्वास घेणे यांचा अभ्यास केला जातो. शरीर, मन आणि आत्मा हे शरीराचे तीन मुख्य घटक; यांच्यातील परस्पर संबंधांचे नियमितीकरण असणे आवश्यक असते.
योग हा सर्व वयोगटांना करता येण्या सारखा प्रकार आहे .त्यात लटके-झटके नाही आहेत त्याच्यामुळे आपल्या शरीराला कसलाही त्रास होत नाही उलट संथ आणि शांत पद्धतीने योग केल्यास खूपच आराम मिळतो.
पण योग हा प्रकार एका दिवशी करण्याचा असा नाहीये तर तो नियमितपणे रोज ठराविक वेळेला केला तर त्याचा उपयोग होतो.
आपले खाणे झोपणे व प्रतिर्विधी यांच्यासोबतच योग हा आपल्या शरीराला नियम घालून रोज अगदी रोजच केला पाहिजे
दर दिवशी नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होऊन आपल्याला अंतर्बाह्य आराम मिळतो. योगातील विविध आसनांमधून मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते. यातून चांगुलपणाची भावना निर्माण होते.
योगाभ्यासातून बौद्धिक पातळी सुधारते आणि आपण आपल्या भावना स्थिर ठेवून एकाग्र होऊ शकतो. योगाभ्यासातून स्व-अनुशासन साधले जाते.
योग ही भारताच्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे.
आपले ऋषी मुनी संत-महंत आणि वैदिक काळापासून हे सर्वजण आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योग करत असत. योग हे मेंदू आणि शरीराच्या एकतेचं प्रतीक आहे. मनुष्य आणि प्रकृती यांच्यात सामंजस्य आहे; योग हा विचार, संयम आणि पूर्णत्व प्रदान करणारा आहे त्याचप्रमाणे प्रकृतीस्वास्थ्यासाठी आणि निरोगी प्रजेसाठी विश्वाच्या भल्यासाठी एक समग्र दृष्टिकोण प्रदान करणारा आहे.
योगाभ्यासाचा आग्रह हा फक्त व्यायामापुरता नाही तर स्वतःच्या आत एक एकात्मतेची भावना जागवण्यासाठी आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये योग हा चेतना बनून, आपल्या परिस्थितीतील बदलाशी जुळवून घ्यायला संयमी वृत्ती देतो. एकदा शिकले तर घरात बसून आपण हा योग करू शकतो पण त्याच्यासाठी एकदा मात्र त्याचं प्रशिक्षण घ्यावं म्हणजे त्यात चुका होणार नाहीत कारण चुकीच्या पद्धतीने केलेला योग हा आपले शरीर स्वास्थ्य बिघडवू शकतो
चला तर, आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनी आपण सर्वांनीच योग करून आपली प्रकृती स्वस्थ व मस्त ठेवण्याची प्रतिज्ञा करू या.
योग या शब्दाची उत्पत्ती युज या संस्कृत शब्दापासून झाली आहे. याचा अर्थ आत्म्याचा परमात्म्याशी संयोग किंवा आत्म्याचा चराचरात व्यापून उरलेल्या चेतनेशी संयोग. योग पद्धती जवळपास दहा हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून आचरणात आणला जाते आहे.
दररोज योगा केल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर मानला जातो. योग केल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. पचनक्रिया सुधारते स्नायूंची ताकद वाढते. तसेच यामुळे तुमची श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते. तणावमुक्त लवचिकता एकाग्रता प्राप्त होते
योगा हे एकमेव असे साधन तसेच माध्यम आहे जे आपणास सदैव शारीरिक आणि मानसिक दृष्टया निरोगी राहण्यास मदत करते आजारांशी लढण्यासाठी आपल्या शरीरात शक्ती निर्माण करते.
.
प्रतिभा बोर्डे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments