शल्य भारत मातेचे

शल्य भारत मातेचे 

उदास का ग भारतमाते का डोळा पाणी? | लेक तुझी मी असे लाडकी, सांग ना कानी ||

स्वातंत्र्याचा सोन्याचा हा मुकुट तुझ्या भाळी | त्याजसवे का आठी दिसतसे माते तव भाळी? ||

केला आम्ही ‘सुवर्णउत्सव’ अती आनंदाने | स्वीकार केला का तू त्याचा म्लान वदनाने? ||

नसे सौख्य का खरंच माते, तुज स्वातंत्र्याचे? | फल असे जे समर्पणाच्या तव सुपुत्रांचे ||

धन्यता का न तुलाच वाटे तुझ्याच बाळांची? | केली आहे प्रगती ज्यांनी हर एक क्षेत्राची ||

हरित क्रांति ही केली, तशी ही वाहे दुधगंगा | तंत्रज्ञाची उडी थेट ती जाय आकाशांगा ||

विज्ञान, कला, उद्योगापरि, तंत्रज्ञानानी | आले समीप जग हे सगळे बोले जनवाणी ||

ठेऊनी ममतेचा कर अपुला माझ्या पाठीवरी | सांगु  लागली माझ्या कानी गदगदुनी अंतरी ||

आहे सार्थ अभिमान मलाही जग समीप आणले | मूळ तत्वपरि ‘माणुसकी’ जी, सर्व त्यास मुकले ||

माणुसकीच्या आत असे जे ‘प्रेम’ तोच पाया | पायावीण इमारत ‘प्रगती’ जणू जाय वाया ||

कोणे काळी जगी मानती ‘नीती’ मम संस्कृति | शल्य आज, ती कुठे न दिसते ही नावापुरती ||

ऐकुनी शल्य तिचे ते, दिधला धीर, जरी मी सान | सुखदु:खांकित जीवन, फिरुनी मिळवू आम्ही ती शान ||

न करी चिंता पुण्यभूमी तू, अशीच आहे तव पुण्याई | अक्षय खरेच राहील, कारण ‘ईशच’ अवतार इथे घेई ||

मालक तो, अन् जग हे त्याचे, त्याची काय त्यास न चिंता? | राखिल नाव अवतार भुमीचे तोच असे ना ‘जगन्नीयंता’ ||

सौ. छाया भास्कर नाखरे

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments