शरीरक्रिया विज्ञान

ज्या विषयाच्या अभ्यासाने संपूर्ण सजीव शरीर आणि त्याचे सगळे अवयव यांच्यामध्ये होणा-या नैसर्गिक क्रियांचे आणि या क्रियांना कारणीभूत असलेल्या द्रव्यांचे निरुपण केले जाते त्याला शरीरक्रिया विज्ञान असे म्हणतात.
सजीव शरीरात दोष, धातू, आणि मल अशी तीन द्रव्ये असतात. शरीराची नैसर्गिक अवस्था समजण्यासाठी दोष, धातू आणि मल यांचे नैसर्गिक स्वरुप आणि कार्य याची माहिती असणे आवश्यक आहे.

*शरीराचे मुख्य आधार*
1. त्रिदोष – वात, पित्त, कफ
2. सप्त धातू – रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र
3. तीन मल – पुरीष, मूत्र आणि स्वेद

चेतना धातू, मन, बुध्दी, अहंकार, चित्त, पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेद्रिय यांचे मानवी शरीर पृथ्वी, पाणी, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. त्यामुळे या सगळ्यांचा संबंध मानवाच्या आरोग्याशी आहे. त्यामुळे याची माहिती असणे आवश्यकच मानले जाते.
*जीवात्मा -* मन, इंद्रिय आणि भौतिक शरीर यामध्ये जीवात्मा हा प्रमुख घटक आहे. या तिन्ही गोष्टी जीवात्म्याचे साधन आहेत. जीवात्मा जेव्हा शरीरातून वेगळा होतो तेव्हा काहीच शिल्लक रहात नाही. म्हणून जीवात्म्याला प्रधान कर्ता असे म्हटले आहे.

*त्रिदोष -* वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष सर्व शरीर व्यापी आहेत. वाताचे कार्य ज्ञानकर्म, संवेदनात्मक आहे. पित्ताच्या कार्यात रासायनिक, अग्नि, पचन यासह अनेक कार्यांचा समावेश आहे. तर कफाचे कार्य संश्लेषणात्मक आहे. याबाबत आपण सविस्तर माहिती पुढे घेणारच आहोत.

शुक्र आणि शोणितांच्या (पुरुषबीज आणि स्त्रीबीज) संयोगातून शरीराची निर्मिती होते. तेव्हापासूनच हे त्रिदोष कार्यरत असतात. गर्भावस्थेत पहिल्या सहा महिन्यात गर्भ अंगप्रत्यंगाने वाढत असताना हे त्रिदोषही परिपुष्ट होत असतात. गर्भावस्थेत वायूकडून गर्भाचे दोष, धातू, मल, अंगप्रत्यंग यांचे विभजन होते. अग्निकडून पचन होते. पाण्याकडून क्लेदन आणि संश्लेषण होते तर पृथ्वीकडून मूर्तरुप देण्याचे कार्य होते. बाळ जन्माला येवून जेव्हा श्वासोच्छवास करायला लागते तेव्हा त्याच्या शरीरात पूर्वीपासून असलेले हे त्रिदोष सक्रिय होतात.

*धातू -* हे शरीराचे धारण आणि पोषण करतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे सात धातू आहेत. याशिवाय जे शरीराचे धारण करतात पण पोषण करीत नाहीत त्यांना उपधातू असे म्हणतात. त्रिदोष धातूंच्या आश्रयानेच राहतात आणि सप्तधातूंचे पोषण त्रिदोषांपासूनच होते.

*मल-* स्वेद, मूत्र आणि पुरीष हे तीन मल आहेत. सप्तधातूंचेही उपमल असतात. ही मलद्रव्ये किट्ट पाकापासून होतात. काही मर्यादेपर्यंतच मल शरीराला उपयुक्त असतात. नंतर त्यापासून शरीराला अपाय संभवतो म्हणूनच त्यांना बाहेर टाकण्याची क्रिया शरीर करीत असते.

*देहधारक तत्वे -*
1. शरीर तत्वे – वात, पित्त आणि कफ
2. मानस तत्वे – सत्व, रज, तम

*त्रिदोष हेच शक्तिशाली देहोत्पादक मूळ कारण द्रव्य आहे. त्रिदोष हेच सर्व शरीरक्रियांचे नियमन आणि संचलन करीत असतात. त्यामुळे स्वस्थ किंवा निरोगी दोषांच्या अवस्थेवर शरीर स्वास्थ्य टिकवून ठेवता येते.
– आनंद कुलकर्णी
निसर्गोपचार, योगा, आहार तज्ज्ञ
जयसिंगपूर 416101
मोबाईल – 7744964550

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments