शिवजयंती विशेष

त्रिवार मुजरा राजे तुम्हास,
आमुच्या प्रत्येक क्षणांत…!

ज्वलंत आजचा दिवस जणू,
तेज लख्ख तिमिरात !
दैवत्वाचे स्वरूप मानवी,
जन्मते सह्याद्रीच्या उदरात!
उत्साह आम्हास आभाळाएवढा,
नाही अन्य कोणत्या सणात!
गौरव त्यांचा ज्यांनी वेचले,
आयुष्य धर्मरक्षणात !
आणि, त्रिवार मुजरा राजे तुम्हास,
आमुच्या प्रत्येक क्षणांत…! ।१।

पाऊले मार्गदर्शक सोन्याची,
नसे कशाची भीती!
चरित्र निरभ्र तयांचे,
पाच शाह्या झुकविती!
शूरवीर असंख्य दरबारी,
अहोरात्र स्वामिनिष्ठ शरणात!
गर्व समजती थोर किती तो,
स्वराज्यापायी आलेल्या मरणात!
आणि, त्रिवार मुजरा राजे तुम्हास,
आमुच्या प्रत्येक क्षणांत…!।२।

ध्यानी, मनी आणि चिंतनी,
तेच गुरू, कल्पतरू!
काळजाच्या छत्रपतींना मजच्या,
पुनःपुन्हा वाटते मज स्मरू !
देवळातली भव्यदिव्य मूर्ति,
बनवली जाते पाषाणात!
प्रभू आमचे शिवबा मात्र,
बसतात आमच्या मनामनात !
आणि, त्रिवार मुजरा राजे तुम्हास,
आमुच्या प्रत्येक क्षणांत…! ।३।

आहो भगवा ईमान भडक,
भगवी आमची जात!
नेत्र पाणावती गहिवरुन,
नजर शोधते नभात!
आठवण जयांची कंप आणते,
आसवांच्या धरणात!
रक्त देखील खुशाल वाहू,
जर असेल तयांच्या चरणात!
आणि, त्रिवार मुजरा राजे तुम्हास,
आमुच्या प्रत्येक क्षणांत…! ।४।

रूप तुमचे, प्रताप तुमचा,
राजेशाही चालणे व सलगीचे बोलणे!
भूमंडळी तयांचा सांगण्या साक्षेप,
रामदासांसमक्ष काय आमचे लिहिणे !
मी कवी एकटा भावनाविवश,
निशब्द आता या लिखाणात!
काय करावे अन् कीती लिहावे,
शिवरायांप्रतीच्या माझ्या या वेडेपणात !
आणि, त्रिवार मुजरा राजे तुम्हास,
आमुच्या प्रत्येक क्षणांत…! ।५।
– पंकज खेबूडकर.

पंकज अभंग खेबूडकर

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments