मला समजलेली गीता अध्याय ९

9 वा अध्याय
राजविद्याराजगुह्य योग असे ह्या अध्यायाचे नाव असून त्यात 34 श्लोक आहेत.
श्री भगवानुवाच
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्।।9.1।।
श्रीभगवानुवाच – अनसूयवे ते इदम्‌ गुह्यतमम्‌ विज्ञान-सहितम्‌ ज्ञानम्‌ तु प्रवक्ष्यामि यत्‌ ज्ञात्वा अशुभात्‌ मोक्ष्यसे।

श्रीभगवानुवाच –
अनसूयवे
अनसूय ईर्ष्या नसलेला
सूर्क्ष्यति सूर्क्ष्य धातू ईर्ष्या करणे
ते तुला
इदम्‌ हे
गुह्यतमम्‌ गूढ असे
गुह धातू लपवणे
विज्ञान-सहितम्‌
वि +ज्ञान विशेष ज्ञान
ज्ञानम्‌
तु नक्कीच
प्रवक्ष्यामि सांगत आहे
प्र +वच् धातू बोलणे
यत्‌ जे
ज्ञात्वा माहिती असणे
अशुभात्‌
शुभ् धातू शोभणे
मोक्ष्यसे। मुक्ति मिळेल
मुच् धातू मुक्त करणे

ह्या अध्यायाचे नाव राजविद्याराजगुह्य म्हणजे सर्व प्रकारच्या रहस्यांमधील सर्वश्रेष्ठ असे रहस्य. कोणतेही रहस्य ज्या व्यक्‍तीसमोर प्रकट करायचे असते, त्याची तशी पात्रताही असावी लागते.

नवव्या अध्यायाच्या पहिल्याच श्‍लोकात ही पात्रता भगवंतांनी स्पष्ट केलेली आहे. जो असुयारहित, दोषदृष्टीरहित आहे, त्याला ही राजविद्या आणि राजगुह्य सांगितले जाते.

खरे तर संपूर्ण गीतेमध्येच राजविद्या म्हणजेच ब्रह्मविद्या सांगितलेली असली तरी या अध्यायात भगवंतांनी स्वतःच ‘मी राजविद्या सांगतो’ असे म्हटलेले असल्याने त्याला एक वेगळे महत्त्व आहे!
महाभारतात श्रीकृष्ण आणि अर्जुनाचे अनेक प्रकारचे नाते आहे जसे आतेमामे भावंड, अर्जुनाचे सुभद्रेशी लग्न, श्रीकृष्ण अर्जुनाचा सखा, सारथी आणि गुरू. इतक्या विविध प्रकारच्या नात्यांच्या पार्श्वभूमीवर श्रीभगवानकृष्ण अर्जुनाला असे म्हणत आहेत की तुला माझ्या प्रती अजिबात इर्षेची भावना नाही. इथे अनसूयवे हा शब्द फारच महत्वाचा ठरतो.
‘श्रद्धावान लभते ज्ञानम्’ आणि ‘संशयात्मा विनश्यति’ हे तर सर्वश्रुत आहेच.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
तुला माझ्या बद्दल असूया नसल्याने,
मी तुला गूढ असे विशेष ज्ञान सांगतो जे जाणून घेतल्यानंतर तुला अशुभ अशा (पापी, दुःखाने भरलेल्या) संसारातून मुक्ति मिळेल.
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम्।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्।।9.2।।
इदम्‌ राज-विद्या, राज-गुह्यम्‌, पवित्रम्‌, उत्तमम्‌, प्रत्यक्ष-अवगमम्‌, धर्म्यम्‌, कर्तुम्‌ सुसुखम्‌ अव्ययम्‌।

इदम्‌ ह्या
राज-विद्या,
राज-गुह्यम्‌,
गुह्य गूढ
पवित्रम्‌,
उत्तमम्‌,
प्रत्यक्ष-अवगमम्‌,
प्रति अक्ष प्रत्यक्ष डोळ्यांनी (ज्ञान चक्षू)
अव +गम् समजणे
धर्म्यम्‌, नैतिक
धर्म यत् प्रत्यय धर्म्य
कर्तुम्‌
कृ धातू करणे
सुसुखम्‌ सुलभ
अव्ययम्‌। व्यय न होणारे
पहिला श्लोक वाचल्यानंतर सहाजिकच असा प्रश्न पडतो की राजविद्या आणि राजगुह्य (गूढ) नक्की आहे तरी काय? राज ह्या शब्दाचा अर्थच सर्वोच्च पातळी दर्शवतो.
दोन प्रकारच्या विद्यांचा उल्लेख मुण्डकोपनिषद् मधे सापडतो. परा आणि अपरा

द्वे विद्ये वेदितव्ये इति ह स्म यद्ब्रह्मविदो वदन्ति परा चैवापरा च ॥ १।१।४ ॥

तत्रापरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथर्ववेदः शिक्षा कल्पो व्याकरणं निरुक्तं छन्दो ज्योतिषमिति । अथ परा यया तदक्षरमधिगम्यते ॥ १।१।५ ॥
आपले 4 वेद आणि 6 वेदांग शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, नक्षत्र, वास्तु, आयुर्वेद, कर्मकांड ह्या सर्व अपरा विद्या.
गीतेमध्ये पृथ्वी, जल, अग्नि, वायु, आकाश, मन, बुद्धि आणि अहंकार ह्यांना अपरा शक्ति म्हटले आहे.
श्री शंकराचार्य जीं नी प्रश्नोपनिषद् मधे अपरा विद्ये बददल असे भाष्य केले आहे.
‘अपरा विद्या गोचरं संसारं व्याकृतविषयं साध्य साधन लक्षणं अनित्यम्।’
हि विद्या जीवनमरणाच्या चक्रातून मुक्ति देत नाही.

ह्या सर्वांच्या पलिकडे असणारी परा विद्या, पारलौकिक.
परा यया तदक्षरमधिगम्यते।’ (1/1/5)
मुण्डकोपनिषद्
ज्याच्या द्वारे अविनाशी ब्रह्म चे ज्ञान होते तीच परा विद्या.
श्रीभगवानकृष्ण 2र्या श्लोकात असे म्हणत आहेत की
ही अत्यंत गोपनीय अशी सर्वोच्च, अतिशय पवित्र, उत्तम, स्वतःच्या अनुभवातून समजून घेण्यासारखी, नैतिक (धर्मयुक्त) शिकण्यास सुलभ आणि कधीही वाया न जाणारी अशी विद्या आहे.
अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि।।9.3।।
हे परन्तप! अस्य धर्मस्य अश्रद्दधानाः पुरुषाः माम्‌ अप्राप्य मृत्यु-संसार-वर्त्मनि निवर्तन्ते।

हे परन्तप!
अस्य ह्या
धर्मस्य धर्माची
धर्म कर्तव्य
अश्रद्दधानाः आस्था नसलेले
पुरुषाः पुरुष
माम्‌ मला
अप्राप्य. प्राप्त होत नाही
अ +प्राप्य
प्र +आप प्राप्त करणे
अप धातू मिळवणे
मृत्यु-संसार- जीवन मृत्यु
वर्त्मनि वर्त्मन् मार्ग
निवर्तन्ते परत येणे
नि +वृत् धातू अस्तित्वात असणे
आधीच्या श्लोकात आपण राजविद्येची विविध लक्षणे पाहिली.
त्यामधील प्रत्यक्ष-अवगमम् ह्या लक्षणांचा जास्त खोलात जाऊन विचार केला की ह्या श्लोकाचा अर्थ मनाला जास्त पटेल.
कोणतीही गोष्ट करताना आपले मन त्याच्यात नसेल तर ती नीट जमत नाही.
आपली ज्ञानेंद्रिये, कर्मेन्द्रिये सर्व काही मनाच्या ताब्यात असतात. शेजारच्या माणसाचे बोलणे आपल्याला ऐकू सुद्धा येत नाही जर आपले लक्ष नसेल तर. आपण म्हणतो, परत सांग माझे लक्ष नव्हते.
ईथे तर अत्यंत गोपनीय अशी राजविद्या शिकायची आहे.
राजविद्या आणि ती प्राप्त करून घेणाऱ्याची पात्रता ह्यालाच धर्म असा उल्लेख केला आहे.
आयुष्यात बर्‍याच गोष्टी आपण केवळ विश्वास ठेवून करतो, प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वतः च्या डोळ्यांनी बघणे शक्य नसते. बायबल मध्ये सुद्धा असे म्हटले आहे.
We walk by faith, and not by sight.” (2 Corinthians 5:7)
“आदौ श्रद्धा ततः साधुसङ्गो भजनक्रिया”भक्ति रसामृत सिंधु (1.4.15)

श्रीभगवानकृष्ण ह्या श्लोकात असे म्हणतात की
हे परन्तप
ज्या लोकांचा आपल्या धर्मावर श्रद्धा नसते, विश्वास नसतो, ते मला प्राप्त करू शकत नाहीत. आणि जन्म मृत्यू च्या मार्गावर ते परत परत चालत राहतात.
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः।।9.4।।
अव्यक्त-मूर्तिना मया इदम्‌ सर्वम्‌ जगत्‌ ततम्‌ । सर्व-भूतानि च मत्‌-स्थानि अहम्‌ तेषु न अवस्थितः ।

अव्यक्त-मूर्तिना
व्यक्त न झालेले मूर्त स्वरूप
मया माझ्या कडून
इदम्‌ हे
सर्वम्‌ जगत्‌ संपूर्ण जग
ततम्‌ विस्तारलेले
तन् धातू पसरणे
सर्व-भूतानि च
मत्‌-स्थानि माझ्यात स्थिरावलेला
अहम्‌ मी
तेषु त्यांच्यामध्ये

अवस्थितः स्थित
अव +स्था
परमेश्वर सर्वव्यापी आहे ही कल्पना बर्‍याच ठिकाणी सांगितलेली दिसते.

एको देवः सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी
श्वेताश्वरोपनिषद्-6.11

ईशावास्यमिदंसर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्।
ईशोपनिषद्-1
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
माझे अव्यक्त असे रूप सर्व जगात व्यापलेले आहे. सर्व जीवात्मा माझ्यात वसलेले आहेत, पण ही भूते म्हणजे माझी रुपे नाहीत (अवस्था).
न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम्।
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः।।9.5।।
न च भूतानि मत्‌-स्थानि मे ऐश्वरम्‌ योगम्‌ पश्य । भूत-भृत्‌ भूत-भावनः मम आत्मा च भूत-स्थः न।

न च सुद्धा नाही
भूतानि प्राणीमात्र, जीवित
मत्‌-स्थानि माझ्यात स्थिरावलेले
मे मला
ऐश्वरम्‌ ईश्वर +अण प्रत्यय
(जसे इन्द्र +अण =ऐन्द्र)
योगम्‌ योग
पश्य । पहा
भूत-भृत्‌ विष्णू चे नाव, सर्वांचे पोषण करणारा
भृ धातू पोषण करणे
भूत-भावनः भाव निर्माण करणारा
मम माझा
आत्मा

भूत-स्थः भूतांमधे स्थित
न।

परमेश्वराचे रुप बघणे आणि समजून घेणे ह्या बद्दल खालील श्लोकात भाष्य केले आहे
न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा। दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्।।11.8।।
ह्या श्लोकात श्रीभगवान सांगत आहेत की साध्या डोळ्यांनी तुला मला पाहता येणार नाही म्हणून मी तुला दिव्य दृष्टि देतो.

उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः।यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः।।15.17।।
तो उत्तम पुरूष कोणीतरी दुसराच आहे ज्याला परमात्मा म्हणतात जो ईश्वर तिन्ही लोकांचे पालनपोषण करतो.

ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
(अर्जुना) मी जरी ह्या जगाचे पालनपोषण करणारा असलो,
हा भूत भाव (जगाची निर्मिती) निर्माण करणारा असलो तरी सर्व काही माझ्यात स्थिरावलेले नाही, तू माझे हे योगसामर्थ्य बघ. माझा आत्मा सुद्धा ह्या जीवितांमधे स्थिरावलेला नाही.
यथाऽऽकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान्।
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय।।9.6।।
यथा सर्वत्रगः महान्‌ वायुः नित्यम्‌ आकाश-स्थितः, तथा सर्वाणि भूतानि मत्‌-स्थानि इति उपधारय।
यथा जसे
सर्वत्रगः सर्व व्यापि
महान्‌ वायुः श्रेष्ठ वायू
नित्यम्‌ नेहमी
आकाश-स्थितः, आकाशात असतो
(इथे आसमंतात असा अर्थ घ्यायला हरकत नाही)
तथा तसे
सर्वाणि भूतानि सर्व जीव मात्र
मत्‌-स्थानि माझ्यात
इति
उपधारय। समजून घे
उप +धृ धातू धारण करणे
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी स्वतः च्या अस्तित्वाला वायू ची उपमा दिली आहे.
मत्स्थानि (माझ्यात स्थिरावलेले) ह्या शब्दाचा सुद्धा पुनरुच्चार केला आहे.
सर्व जीवांसाठी प्राणवायू, पाणी अन्न हे जगण्यासाठी अती महत्वपूर्ण.
शास्त्रिय सत्य असे कि माणूस काही दिवस अन्नाशिवाय नुसत्या पाण्यावर जगू शकतो.
साधारण 24 तास पूर्ण पाण्याशिवाय तग धरू शकतो पण श्वास हा घ्यावाच लागतो.
आपली जीवसृष्टी कशी निर्माण झाली? एक पेशिय वनस्पति आणि छोटे जीव (algae and cyanobacteria) आधी निर्माण झाले. त्यांनी ऑक्सिजन ची निर्मिती केली आणि त्यामुळेच इतर जीव निर्माण होऊ शकले.
बाळाचा जन्म होतो म्हणजेच त्या वेळी तो पहिला श्वास घेतो.
फुलातील परागकण वायू च्या साह्याने वाहतात.
पाण्यात जर ठराविक ऑक्सिजन चे प्रमाण नसेल तर त्याला मृतपाणी मानतात.
झाडे सुद्धा वायू शिवाय जगू शकत नाहीत कारण ते आपले अन्न तयार करू शकत नाहीत.
असा एक विचार मनात येतो की आपला आत्मा वायू रुप असावा का? कारण तो दिसत नाही पण वायू प्रमाणेच त्याचे अस्तित्व असते.
वायूला अध्यात्मिक अर्थ सुद्धा प्राप्त झाला आहे.
जसे ऋग्वेदातील “पुरुष सूक्तात असे वर्णन आहे
“चन्द्रमा मनसो जाताश्चक्षो सूर्यो अजायत। श्रोत्रांवायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत।”
परमात्मा रुपी पुरुषाच्या मना पासून चंद्र, डोळ्यापासून सूर्य, श्रवणेंद्रिय पासून वायू आणि प्राण, मुखापासून अग्नी निर्माण झाला.

वायुर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूपो बभूव।
एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च ॥ कठोपनिषद्
ज्या प्रकारे वायूचा ह्या जगात प्रवेश झाला आणि त्याने निरनिराळी रुपे धारण केली त्याप्रमाणेच समस्त प्राणीमात्रातील अंतरात्मा एकच आहे.
ऋग्वेदात वायूला मुख्य देव मानले आहे.
म्हणून श्रीभगवान असे म्हणतात की
ज्याप्रमाणे शक्तिशाली वायू हा सदैव आसमंतात स्थित आहे त्याप्रमाणे सर्व जीव माझ्यात स्थिरावलेले आहेत.
सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्।
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्।।9.7।।
हे कौन्तेय! कल्प-क्षये सर्व-भूतानि मामिकाम्‌ प्रकृतिम्‌ यान्ति । कल्प-आदौ अहम्‌ तानि पुनः विसृजामि।

हे कौन्तेय!
कल्प-क्षये कल्पाच अन्त
सर्व-भूतानि सर्व जीव
मामिकाम्‌ माझे
प्रकृतिम्‌
यान्ति ।
या धातू जाणे
कल्प-आदौ कल्पाची सुरवात
अहम्‌ मी
तानि ते
पुनः
विसृजामि। विसर्जित करतो
वि +सृज धातू रचना करणे उत्पन्न करणे
8व्या अध्यायातील 17 व्या श्लोकात कल्प ह्या संकल्पनेत बद्दल विस्ताराने लिहिले आहे.
ब्रह्मा चा एक दिवस म्हणजे कल्प आणि एक रात्र म्हणजे कल्प.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
हे कौन्तेय
कल्पाच्या शेवटी सर्व जीव माझ्याकडे परत येतात आणि कल्पाच्या सुरुवातीला मी त्यांना परत ह्या जगात आणून सोडतो.

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः।
भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्।।9.8।।
स्वाम्‌ प्रकृतिम्‌ अवष्टभ्य प्रकृतेः वशात्‌ अवशम्‌ इमम्‌ कृत्स्नम्‌ भूत-ग्रामम्‌ पुनः पुनः विसृजामि।

स्वाम्‌ माझी
प्रकृतिम्‌ प्रकृति
अवष्टभ्य झुकुन
अव +ष्टभ् स्तब्ध असणे
प्रकृतेः प्रकृति च्या
वशात्‌ स्वाधीनता
अवशम्‌ ताब्यात न ठेवण्यासारखे
इमम्‌ ह्या
कृत्स्नम्‌ सर्व
भूत-ग्रामम्‌ जीवांचा गाव (समूह)
पुनः पुनः
विसृजामि। विसर्जन करतो
वि +सृज धातू रचना करणे
ह्या श्लोकात ईश्वर निसर्ग (प्रकृति) आणि जीवसृष्टी ह्यांचा परस्पर संबंध दर्शविला आहे.
प्रकृतिला माया जगत असे आधीच्या श्लोकात म्हटले आहे. ह्या जगात तीन गुणांचे वर्णन केले आहे. सत्त्व रज आणि तम.
प्रकृतिला निर्माण करणारा तो ईश्वर. ज्याचा ह्या प्रकृति वर पुर्ण ताबा आहे.
पण प्रकृतिला सुद्धा काही अधिकार दिले आहेत, स्वायत्तता दिली आहे. प्रकृति जीवसृष्टी निर्माण करते तीनगुणांचा वापर करून. कोणत्या जीवांमधे कोणते गुण प्राबल्याने दिसून येतील हे प्रकृति ठरवणार. त्याप्रमाणे तो जीवात्मा पुन्हा पुन्हा जन्म घेत राहणार.
म्हणून श्रीभगवान असे म्हणतात की माझ्या अधिपत्याखाली असणार्‍या प्रकृति मधे मी पुन्हा पुन्हा सर्व जीवात्म्यांचे अस्तित्व निर्माण करतो जे प्रकृती पुढे असहाय आहेत, नियंत्रित आहेत.
न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु।।9.9।।
हे धनञ्जय! तेषु कर्मसु असक्तम्‌ उदासीनवत्‌ च आसीनम्‌ माम्‌ तानि कर्माणि न निबध्नन्ति।

हे धनञ्जय!
तेषु ती
कर्मसु कर्मे
असक्तम्‌ न जोडलेला
अ +सक्त
सञ्ज् धातू जवळीक असणे
उदासीनवत्‌ आहे त्या पेक्षा वर (अंतर राखून)
उत् +आसीन आस धातू बसणे
च आणि
आसीनम्‌ बसलेला
माम्‌ मला
तानि कर्माणि ती कर्मे
न निबध्नन्ति। बांधून घेत नाही
बन्ध धातू बांधणे

आधीच्या दोन श्लोकात जीवसृष्टी च्या निर्मिती बददल कथन करून त्याच्या प्रक्रियेत श्रीभगवानतांचा असणारा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग सांगून झाला.
कोणत्या आत्म्याला कोणते शरीर मिळणार हे त्या त्या व्यक्तीच्या कर्मानुसार ठरते असे आपण मानतो. ब्रह्मा विष्णू महेश ह्यांचे एकत्रित प्रयास त्यांना लक्ष्मी सरस्वती सारख्या देवतांनी दिलेली साथ, ह्या सर्वांमुळे निर्मिती चे जणू चक्र चालू आहे. पण ह्या सगळ्या मधे श्रीभगवानतांचा वैयक्तिक स्वार्थ कोणताच नसतो. म्हणूनच
श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
हे धनञ्जय
ह्या सर्व कर्मांपासून मी अगदीच अनासक्त, उदासीन असतो आणि मी त्या कर्मांपासून अलिप्त सुद्धा असतो.
मयाऽध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम्।
हेतुनाऽनेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते।।9.10।।
हे कौन्तेय! अध्यक्षेण मया प्रकृतिः सचर-अचरम्‌ सूयते, अनेन हेतुना जगत्‌ विपरिवर्तते।

हे कौन्तेय!
अध्यक्षेण देखरेखीखाली
अधि +अक्ष सर्वत्र नजर असणारा
मया माझ्या
प्रकृतिः
सचर-अचरम्‌ व्यक्त अव्यक्त दोन्ही
स (ह) चर अचर
सूयते, प्रकट होतात
सू धातू उत्पन्न करणे
अनेन हेतुना ह्या कारणाने
जगत्‌ जग
विपरिवर्तते परिवर्तन होत राहते
वि +परि +वृत धातू होणे

कर्मविपाक सिद्धांत ह्या सिद्धांताला पुरस्कृत करणारा हा श्लोक. आधीच्या श्लोकात श्रीभगवानकृष्णांनी सांगून टाकले की प्रकृति च्या आणि जीवसृष्टी च्या निर्मिती मध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नसतो आता पुढे जाऊन ते असे स्पष्ट करताना दिसतात कि
जरी त्यांना वैयक्तिक स्वारस्य नसले तरी सर्व ठिकाणी त्यांची देखरेख मात्र आहे. सर्व गोष्टींकडे त्यांचे पूर्ण लक्ष आहे.
विपरिवर्तन हा शब्द या श्लोकात महत्वपूर्ण. आधीच्या अध्यायांमधे निर्मिती आणि प्रलय ह्या गोष्टी आपण समजावून घेतल्या. 84 लक्ष जीवांचे वैविध्य माहिती करून घेतले. म्हणूनच ह्या श्लोकात ते असे म्हणतात की
हे कौन्तेय
हि सर्व चर अचर सृष्टि माझ्याच अधिपत्याखाली परिवर्तित (प्रकट, प्रलय) असते.
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्।।9.11।।
मम परम्‌ भावम्‌ अजानन्तः मूढाः मानुषीम्‌ तनुम्‌ आश्रितम्‌ माम्‌ भूत-महेश्वरम्‌ अवजानन्ति।

मम माझे
परम्‌ श्रेष्ठ
भावम्‌ भाव
अजानन्तः माहित नसलेला
मूढाः मूर्ख अल्प बुध्दी
मानुषीम्‌ माणसाच्या
तनुम्‌ देह
आश्रितम्‌ आश्रयाला आलेला
माम्‌ मला
भूत जीव
महेश्वरम्‌ महान ईश्वर
अवजानन्ति।
अव +ज्ञा धातू समजून घेणे

जळी, स्थळी काष्ठी, पाषाणी। देव वसला चराचरी।तुकाराम महाराज
हे जरी खरे असले तरी देव काही वेळा मनुष्य, प्राणी रुपात अवतार घेताना दिसतात.
भगवान विष्णुंचे 23 अवतार सर्वमान्य आहेत.
बरेचदा संकटकाळी असा अनुभव येतो कि आपल्या जवळच्या व्यक्ती कोणीच आजूबाजूला नसतात आणि कोणीतरी अनोळखी व्यक्ती आपल्याला मदत करते. नकळत आपण बोलून जातो, अगदी देवासारखा भेटलास. अशी अनुभूती बरेचदा होते.
असे ईश्वराचे अस्तित्व प्रत्येकाला प्रत्येक वेळी समजेलच असे नाही.
महाभारतात ह्याचे उदाहरण द्यायचे झाले तर जेव्हा श्रीकृष्ण दुर्योधनाकडे पांडवांतर्फे शिष्टाई करण्यासाठी गेला असता, दुर्योधनाने श्रीकृष्णाला धुडकावून लावले. तेच जर ईश्वराचे रूप दुर्योधन समजू शकला असता तर इतका मोठा संहार टळला असता.
तीच गोष्ट शिशुपाल आणि कंसाची.
शूर्पणखेला राम दिसले पण अजिबात समजून घेता आले नाहीत.
म्हणून श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
माझा भूतांचा महेश्वर हा परम भाव न समजू शकणारे अल्प बुध्दी, मला मानवी रुपातच पाहतात आणि माझी अवज्ञा करतात.
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः।
राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः।।9.12।।
मोघ-आशाः मोघ-कर्माणः मोघ-ज्ञानाः विचेतसः राक्षसीम्‌ आसुरीम्‌ च मोहिनीम्‌ प्रकृतिम्‌ एव श्रिताः।

मोघ-आशाः व्यर्थ आशा
मोघ-कर्माणः व्यर्थ कर्म
मोघ-ज्ञानाः व्यर्थ ज्ञान
विचेतसः विपरित मन, बुद्धि
वि +चेतस्
राक्षसीम्‌ राक्षसी
आसुरीम्‌ च आसुरी सुद्धा
मोहिनीम्‌ भुरळ
प्रकृतिम्‌ प्रकृती
एव सुद्धा
श्रिताः. आश्रयाला येणे
श्रि धातू सेवा करणे

आधीच्या श्लोकात मूढ असा उल्लेख केला होता त्यासंदर्भात विस्तृत वर्णन ह्या श्लोकात दिले आहे.
सहज म्हणून परिक्षण करायचे ठरवले तर देवळात येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात नक्की काय भाव असतात बरे? काही अगदी मनापासून आलेले असतात. तर काही नुसते देऊळ बघायला. तर काही नुसता प्रसाद घेतात तर काही आलेल्या लोकांना बघत असतात. प्रत्येकाचे काय हेतू असू शकतात ते कळणे अवघड असते. देवाचे दर्शन घेणे आणि देवाची भेट होणे ह्यामध्ये कितीतरी फरक. देवाचे अस्तित्व जर समजणारच नसेल, तशी अनुभूती होण्याची काही पात्रताच नसेल तर देवदर्शनाचा फायदा तरी काय?
आता ही पात्रता कशामुळे निर्माण होते? जे सन्मार्गाने चालतात जे व्यक्तिगत सुखाचा विचार न करता पुण्यकर्म करत राहतात त्याचे आयुष्य खरेच सुफळ झाले म्हणायचे.
पण जे स्वार्थी आहेत, ज्यांची अल्पबुद्धि आहे किंवा बुद्धि भ्रष्ट झाली आहे आजूबाजूच्या मोहमयी जगामुळे, त्यांनी केलेले कोणतेही कार्य अर्थहीन आहे. व्यर्थ आहे.
ह्या सर्वाचा उल्लेख 7व्या अध्यायातील 24,25 श्लोकात येऊन गेला आहे.
म्हणूनच श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जे ह्या मोहमयी जगात, राक्षसी आणि आसुरी शक्तिंमधे गुरफटून गेले आहेत, ज्यांची बुद्धि अशी भ्रष्ट झाली आहे, त्यांची आयुष्यातील लक्ष्य, त्यांची कार्ये, त्यांचे ज्ञान सर्व काही व्यर्थ आहे.
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्।।9.13।।
हे पार्थ! दैवीम्‌ प्रकृतिम्‌ आश्रिताः महात्मानः तु माम्‌ भूतादिम्‌ अव्ययम्‌ ज्ञात्वा, अनन्य-मनसः भजन्ति।

हे पार्थ!
दैवीम्‌ दैवी
प्रकृतिम्‌. प्रकृति
आश्रिताः आश्रय घेतलेला
आ +श्रि धातू सेवा करणे
महात्मानः महात्मन् महान आत्मा
तु परन्तु
माम्‌ मला
भूतादिम्‌ भूतांचा प्रवर्तक
भूत +आदीम
अव्ययम्‌ व्यय न होणारे
ज्ञात्वा माहीती असलेला
ज्ञा धातू समजून घेणे
अनन्य-मनसः अविचलित मन
न अन्य मनसः
भजन्ति। भजन करतात
भज् धातू भजणे.
हे पार्थ
परन्तु ईश्वराला शरण गेलेले, दैवी गुण बाळगून असणारे महान लोक मला शाश्वत असा जीवसृष्टी चा प्रवर्तक मानून मला भजतात.
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः।
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते।।9.14।।
यतन्तः दृढ-व्रताः सततम्‌ कीर्तयन्तः च माम्‌ नमस्यन्तः च नित्य-युक्ताः भक्त्या माम्‌ उपासते।

यतन्तः प्रयास करताना
यत् धातू प्रयत्न करणे
दृढ-व्रताः दृढ संकल्प
सततम्‌ सतत
कीर्तयन्तः च
कृत (दीर्घ ऋ) धातू कीर्त प्रसिद्ध करणे.
माम्‌ मला
नमस्यन्तः वंदन करून
नमस्यत्

नित्य-युक्ताः निरंतर भक्ती
युज् धातू जोडून घेणे
भक्त्या मनोभावे
भक्ती
माम्‌ मला
उपासते। देवाच्या जवळ जाणे
उप +आस् धातू बसणे
आपले मन हे वायू सारखे चंचल आहे. ईश्वराच्या गुणांचे श्रवण आणि गायन करून मन स्थिर करता येईल. भागवतात खाली दिलेल्या श्लोकात कली युगात कीर्तन करणे श्रेयस्कर असे म्हटले आहे.
कृते यद् ध्यायतो विष्णुं त्रेतायां यजतो मखैः।
द्वापरे परिचर्यायां कलौ तद्धरिकीर्तनात् ।।
(श्रीमद्भागवतम्-12.3.52)
नाम-लीला-गुणदीनां उच्चैर भाषा तु कीर्तनम्।
(भक्तिरसामृतसिंधु-1.2.145)
देवाचे नाव, रूप, गुण, लीला यांचे गुणगान म्हणजेच कीर्तन.
आधीच्या श्लोकात महात्मा असा उल्लेख केला आहे त्या महान आत्म्याचे वर्णन ह्या श्लोकात केलेले दिसते.
(असे महान लोक) निरंतर माझे किर्तन करत, दृढ संकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करत, मला नमस्कार करून भक्तिभावाने माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात.
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम्।।9.15।।
अन्ये अपि ज्ञान-यज्ञेन यजन्तः एकत्वेन, पृथक्त्वेन च, विश्वतोमुखम्‌ माम्‌ बहुधा उपासते।

अन्ये इतर
अपि सुद्धा
ज्ञान-यज्ञेन ज्ञानाचा यज्ञ करून
यजन्तः
यज् धातू म्हणजे यज्ञ करणे
एकत्वेन,
एकत्व एक तत्व
पृथक्त्वेन च, विश्लेषण करून
पृथकत्व
विश्वतोमुखम्‌ विश्वस्वरूप
माम्‌ मला
बहुधा विविध
उपासते। उपासना करतात
7व्या अध्यायातील 16 व्या श्लोकात चार प्रकार च्या भक्तांचे सविस्तर वर्णन दिले आहे.
आपल्या समाजात सर्वच व्यक्ति काही महात्मा असू शकत नाहीत म्हणजे ते श्रीकृष्ण भक्त नाहीत असे काही नाही. त्यांचेच वर्णन ह्या श्लोकात सांगितले आहे.
ह्या इतर प्रकारच्या भक्तांच्या उपासनांच्या वेगवेगळ्या तीन पद्धती सांगितल्या आहेत.
पहिला प्रकारचे वर्णन म्हणजे एकतत्व जे आदि शंकराचार्यजींच्या आत्म षटकम् प्रमाणे आहे. मी कोण? अशी स्वतःची ओळख करून देत असताना मी कोण नाही हे सांगता सांगता मी फक्त निर्विकल्प, निराकार, सर्वत्र व्याप्त असा सत्‌ चित्‌ आनंद स्वरूप आहे.
पहिल्या प्रकारातील लोक अद्वैतवाद मानणारे.
दुसर्या प्रकारचे लोक आहेत जे निरनिराळ्या देवतांची उपासना करतात. जसे बुद्धि ची देवता श्रीगणेश, शक्ति ची देवता श्रीहनुमान, संपत्ति ची देवता श्रीलक्ष्मी वगैरे.
तिसर्‍या प्रकारचे लोक संपूर्ण विश्वामधे श्रीभगवानांचे रुप बघतात.
अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाऽहमहमौषधम्।
मंत्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्।।9.16।।
अहम्‌ क्रतुः, अहम्‌ यज्ञः, अहम्‌ स्वधा, अहम्‌ औषधम्‌, अहम्‌ मन्त्रः, अहम्‌ आज्यम्‌, अहम्‌ अग्निः, अहम्‌ एव हुतम्‌

अहम्‌ क्रतुः, मी वैदिक संकल्प
अहम्‌ यज्ञः, मी यज्ञ
अहम्‌ स्वधा, मी नैवेद्य
अहम्‌ औषधम्‌, मी औषधी
अहम्‌ मन्त्रः,मी मन्त्र
अहम्‌ आज्यम्‌, मी हावी
अहम्‌ अग्निः, मी अग्नि
अहम्‌ एव हुतम्‌ मीच आहुती

आधीच्या अध्यायात आपण यज्ञ ह्या संकल्पनेवर विस्तृत चर्चा केली आहे. यज्ञ कर्मकांड हे केवळ फक्त प्रतिकात्मक असून त्यामागे एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरवात आणि तो संकल्प तडीस नेणे असा विचार आहे.
म्हणून अन्न हे पूर्णब्रह्म कारण त्यामागे जीवसृष्टीचा विकास हा विचार आहे.
ह्या श्लोकातील क्रतु आणि यज्ञ हे दोन शब्द मला महत्वाचे वाटते ते अशा अर्थाने कि क्रतु चा अर्थ आपण वैदिक संकल्प असा घेतला तर यज्ञ चा अर्थ स्मार्त संप्रदायाशी निगडित. स्मार्त म्हणजे जे श्रुतींवर विश्वास ठेवतात. शंकराचार्यांनी गीता, महाभारत, विष्णुसहस्त्रनाम ह्या सर्वांना स्मृती च म्हटले आहे.
तर ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की
वेद आणि स्मृती
स्मृतींमधे सांगितलेली यज्ञकर्म, त्यासाठी लागणारी आहुती, औषधी वनस्पती आणि इतर सामुग्री पण मीच आहे.
पिताऽहमस्य जगतो माता धाता पितामहः।
वेद्यं पवित्रमोंकार ऋक् साम यजुरेव च।।9.17।।
अहम् एव अस्य जगतः पिता, माता, धाता, पितामहः, वेद्यम्‌, पवित्रम्‌, ओङ्कारः, ऋक्, साम, यजुः च।

अहम् एव मी च
अस्य जगतः ह्या जगाचा
पिता, माता,
धाता, धारण करणारा
धा धातू धारण करणे
पितामहः, आजोबा
वेद्यम्‌, ज्ञानाचे लक्ष्य
पवित्रम्‌,
ओङ्कारः, ओंकार
ऋक्, ऋग्वेद
साम, सामवेद
यजुः च। यजुर्वेद
स्वतः बद्दल पुढे सांगताना श्रीभगवान कृष्ण असे म्हणतात की
मीच पिता, माता, पितामह, ह्या जगाला धारण करणारा, ज्ञानाचे लक्ष्य असणारा, पवित्र ओंकार, ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेद आहे.
गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत्।
प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम्।।9.18।।
गतिः, भर्ता, प्रभुः, साक्षी, निवासः, शरणम्‌, सुहृत्‌, प्रभवः, प्रलयः, अव्ययम्‌, बीजम्‌, स्थानम्‌, निधानम्‌ च अहम्‌ एव।

गतिः, ध्येय गंतव्यस्थान
भर्ता, भरण पोषण करणारा
भर्तृ पु प्र एव
प्रभुः, स्वामी
साक्षी, साक्षीदार
निवासः, निवास स्थान
शरणम्‌, आश्रय
सुहृत्‌, सुहृद
प्रभवः, प्रवर्तक
प्रलयः, अस्त
अव्ययम्‌, व्यय न होणारे
बीजम्‌, बीज
स्थानम्‌, स्थान
निधानम्‌ च निधान विश्रांती चे ठिकाण
नि +धा धातू सुरक्षित ठेवणे
अहम्‌ एव. मीच
प्रत्येकाच्या आयुष्यात असतात प्रेरणा आणि त्यांन साध्य करायची असणारी ध्येय. अंतिम ध्येय मात्र कृष्ण. म्हणून श्रीभगवानकृष्ण असे सांगत आहेत की
मीच ते गंतव्यस्थान, सृष्टीचा पालनकर्ता, ह्या जगाचा स्वामी, सर्वांना जाणणारा साक्षीदार, माझ्यापासूनच सर्वांची उत्पत्ती, माझ्यातच निवास आणि माझ्यातच विलीनीकरण, मीच आश्रयदाता मीच हितचिंतक. आणि इतके सर्व सांगून झाल्यावर ते पुढे म्हणतात मी उत्पत्ती करणारे बीज. ह्या पुढील शब्द अव्यय आणि निधान काय सुचवायचे असेल बरे. ते जीवाष्म बद्दल तर बोलत नसतील? अव्यय म्हणजे कधीही नष्ट न होणारे. जीवाष्म्या च्या रुपात करोडो वर्षे पूर्वी चे जीव आणि बीज अस्तित्व टिकवून आहेत. ज्याचा अभ्यास करून आपल्या व्युत्पत्ती ची साखळी जोडता येते. ते निधान सुद्धा मीच.
तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन।।9.19।।
हे अर्जुन! अहम्‌ तपामि, वर्षम्‌, निगृह्णामि उत्सृजामि च, अहम्‌ अमृतम्‌ मृत्युः च, सत्‌ च असत्‌ च अहं एव ।

हे अर्जुन!
अहम्‌ मी
तपामि,
तप् धातू तप्त होणे
वर्षम्‌, पाऊस
निगृह्णामि शोषून घेतो
गृह धातू स्वीकार करणे
उत्सृजामि च, सोडून देतो
सृज् धातू सोडून देणे
अहम्‌
अमृतम्‌
मृत्युः च,
सत्‌ च
अस् धातू असणे
असत्‌ च
नसणे
अहं एव ।मीच
सातव्या अध्यायातील 8,9,10 श्लोकात श्रीभगवानांनी त्यांचे परमेश्वरी अस्तित्व विषद करून सांगितले होते. त्या 3 श्लोकांना जोडून हा श्लोक वाचता येईल.
सूर्यप्रकाशाचे आपल्या आरोग्याला होणारे फायदे आपल्याला माहीत आहेतच, शिवाय वनस्पती सुद्धा आपले अन्न तयार करतात सूर्यकिरणांमुळे. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते आणि आपल्याला ऊब सुद्धा मिळते. तिसर्‍या अध्यायातील 14 व्या श्लोकात पर्जन्य चक्राचा उल्लेख आढळतो. थोडक्यात आपले आयुष्यच सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे.
म्हणूनच श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
हे अर्जुना
मी सूर्यातील ऊष्णता आहे. मीच पाणी शोषून घेतो (वाफ करतो) आणि पाऊस पाडतो. मीच अमृत आणि मीच मृत्यू. मीच अस्तित्व आहे आणि मीच अस्तित्वहीन आहे.

अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सदसत् परम्।पश्चादहं यदेच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम्।।
(श्रीमद्भागवतम्-2.9.32)
येथे श्रीभगवानकृष्ण ब्रह्मा ला सांगतात. मीच सृष्टी निर्माण केली त्या आधी मीच होतो. सृष्टीचा विनाश झाल्यावरही मीच असेन.
त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा
यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोक
मश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान्।।9.20।।
त्रै-विद्याः सोमपाः पूत-पापाः माम्‌ यज्ञैः इष्ट्वा स्वर्गतिम्‌ प्रार्थयन्ते । ते पुण्यम्‌ सुरेन्द्र-लोकम् आसाद्य, दिवि दिव्यान्‌ देव-भोगान्‌ अश्नन्ति।

त्रै-विद्याः तिन्ही वेद जाणणारा
सोमपाः सोमरस पिणारा
पा धातू पिणे
पूत-पापाः पापाचे निवारण करणे
पू धातू पवित्र करणे
माम्‌ मला
यज्ञैः
यज् यज्ञ
इष्ट्वा
इष् धातू इच्छा करणे
स्वर्गतिम्‌ स्वर गतिम्
स्वर् आनंदी अवस्था
प्रार्थयन्ते ।
प्र +अर्थ धातू मागणे
ते ते
पुण्यम्‌ पवित्र
सुरेन्द्र-लोकम् इन्द्र लोक
आसाद्य, उन्नति
सद् धातू चढणे
दिवि
दिव्यान्‌
दिव धातू चमकणे
देव-भोगान्‌
देवभोग भुज् धातू भोक्ता
अश्नन्ति।
अश् धातू खाणे, उपभोग घेणे
ह्या अध्यायातील 11 आणि 12 व्या श्लोकात मंदबुद्धी व्यक्ती, राक्षसी आसुरी शक्तिंच्या प्रभावाखाली असणार्या व्यक्तिंबददल सांगितले. त्यानंतर ईश्वराला शरण गेलेले महात्मा आणि इतर भक्तांच्या उपासनेच्या तीन वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या. त्यानंतर आता त्रै- विद्या म्हणजे तीन वेद जाणणार्‍या व्यक्तिंबददल विवेचन केले आहे.
आपल्याला द्विवेदी त्रिवेदी चतुर्वेदी अशी नावे माहित आहेत.
दुसरा उल्लेख आहे सोमरसाचा.
सोम वनस्पतीपासून तयार केलेला रस. आज सोम वनस्पती नक्की कोणती हे माहीत नसले तरी सोमलता किंवा सोमवल्ली नावाच्या वनस्पती उपलब्ध आहेत ज्यांचे गुणधर्म सुश्रुतसंहितेत सांगितलेल्या सोम वनस्पतीशी मिळतेजुळते आहेत.
सुश्रुतसंहितेनुसार जी व्यक्ती सोम वनस्पतीपासून बनविलेल्या रसाचे प्राशन करते त्याला नवीन तरुण शरीर प्राप्त होते. त्याला अग्नी, जल, विष किंवा आयुधाद्वारे हानी पोहोचत नाही. कुठल्याही अवघड अडचणीच्या जागेवर तो चालू शकतो आणि कंदर्पचे सौंदर्य व पौर्णिमेच्या चंद्रासारखी चमक त्याला प्राप्त होते. सर्व वेद त्यांच्या शाखांसह त्या व्यक्तीस मुखोद्गत होतात. सोम पिणाऱ्या व्यक्तीस आयुष्यात कधीही अपयश येत नाही व तो सर्वत्र दैवी आत्म्यासह हिंडतो. तो सर्व जीवमात्रांच्या मनाला शांती देतो. अशा अर्थाचे उल्लेख त्यात आहेत.
आता ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की जे तीन वेद जाणतात, वैदिक कर्मकांड करतात, सोमरस प्राशन करतात, पापरहित होतात, यज्ञ करून मला स्वर्ग प्राप्तिसाठी साकडे घालतात ते पुरूष आपापल्या पुण्यकर्मानुसार स्वर्ग प्राप्ती करून दिव्य अशा देवभोगाचा उपभोग घेतात.
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं
क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति।
एव त्रयीधर्ममनुप्रपन्ना
गतागतं कामकामा लभन्ते।।9.21।।
ते तम्‌ विशालम्‌ स्वर्ग-लोकम्‌ भुक्त्वा, पुण्ये क्षीणे मर्त्य-लोकम्‌ विशन्ति। एवम्‌ त्रयी-धर्मम्‌ अनुप्रपन्नाः काम-कामाः गत-आगतम्‌ लभन्ते।

ते तम्‌. तो त्याचे
विशालम्‌ विशाल
स्वर्ग-लोकम्‌. स्वर्ग लोक
भुक्त्वा, भोगून झाल्यावर
भुज धातू उपभोग घेणे
पुण्ये पुण्य
क्षीणे कमी होणे
मर्त्य-लोकम्‌ मृत्यू लोक
विशन्ति।
विश् धातू प्रवेश करणे
एवम्‌ अशाप्रकारे
त्रयी-धर्मम्‌ धार्मिक सत्प्रवृत्ती
अनुप्रपन्नाः होत राहतात
अनु +प्र +पद्
पद् धातू जाणे
काम-कामाः इच्छाआकांक्षा
गत-आगतम्‌ जाणेयेणे
लभन्ते।. मिळतात
लभ् धातू लाभ होणे
आपल्या सर्वांनाच स्वर्ग प्राप्ती बद्दल कुतुहल आहे. पाप आणि पुण्य्याच्या आपल्या कल्पना स्वर्ग आणि नरक ह्याच्याशी जोडलेल्या असतात. वेगवेगळ्या श्लोकात ह्या बद्दल विवेचन सापडते..
मागील श्लोकात वेद जाणणारे लोक स्वर्गात जाऊन पोहोचतात असे आपण वाचले, त्यापुढे काय घडते त्या बद्दल श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
आपापल्या पुण्यसंचितानुसार स्वर्गसुखाचा आनंद उपभोगून झाल्यावर ते परत या भूतलावर परत येतात. अशाप्रकारे स्वर्गप्राप्ती साठी जे तीनही वेदांत सांगितलेल्या उक्तीचे अवलंबन करतात आणि परत परत ह्या जगात येत जात राहतात.

अशाच अर्थाचा श्लोक
तावत् प्रमोदते स्वर्गे यावत् पुण्यं समाप्यते।
क्षीणपुण्यः पतत्यगिनिच्छन् कालचालितः।।
(श्रीमद्भागवतम्-11.10.26)
पुण्यकर्म समाप्त होइपर्यंत लोक स्वर्गसुखाचा उपभोग घेत असतात. त्यानंतर मात्र त्यांना परत पाठवले जाते.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।9.22।।
ये जनाः अनन्याः माम्‌ चिन्तयन्तः पर्युपासते, तेषाम्‌ नित्य-अभियुक्तानाम्‌ योग-क्षेमम्‌ अहम्‌ वहामि।

ये जनाः जे लोक
अनन्याः (ज्यांच्या साठी) इतर काहीही नाही ते
न अन्याः
माम्‌ मला
चिन्तयन्तः विचार करून
चिन्त धातू चिंतन करणे, स्मरण करणे
पर्युपासते, जवळ जाणे (परमेश्वराच्या)
परि +उप +आस् धातू बसणे
तेषाम्‌ त्यांचे
तद्
नित्य-अभियुक्तानाम्‌ कायम योगाशी जोडला गेलेला
नित्य +अभि +युज् धातू जोडणे
योग-क्षेमम्‌
योगं च क्षेमं च क्षि धातू टिकून राहणे
अहम्‌ मी
वहामि।
वह् धातू चालू राहणे, वाहणे
योग म्हणजे अध्यात्मिक शक्ति. क्षेम म्हणजे परमानंदाची प्राप्ती.
जे लोक फक्त माझेच चिंतन करतात, फक्त माझीच भक्ती करतात अशा लोकांना मी परमात्म्याला जोडून घेण्यासाठी मदत करतो आणि त्यांचा सांभाळही करतो.
येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयाऽन्विताः।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्।।9.23।।
हे कौन्तेय! ये अन्य-देवता-भक्ताः अपि यजन्ते श्रद्धया अन्विताः, ते अपि माम्‌ एव अविधि-पूर्वकम्‌ यजन्ति।

हे कौन्तेय!
ये जो
अन्य इतर
देवता-भक्ताः
अपि
यजन्ते
यज् धातू म्हणजे यज्ञ करणे, पूजणे
श्रद्धया
अन्विताः,
ते अपि
माम्‌ एव
अविधिपूर्वकम्‌ अयोग्य पद्धतीने
अ +विधिपूर्वक
यजन्ति।
यज् धातू म्हणजे यज्ञ करणे, पूजणे

आधीच्या श्लोकाचा संदर्भ घेऊन हा श्लोक वाचला तर श्रीभगवानकृष्णांना काय म्हणायचे आहे ते नीट लक्षात येइल.
बुद्धि ची देवता सरस्वती, धनाची देवता लक्ष्मी, शक्ति चे प्रतिक श्रीहनुमान असे आपण मानतो व त्याप्रमाणे त्या त्या देवतेची उपासना करतो. असे करण्यात आपल्याला त्या उपासनेपासून लाभ मिळावा अशी अपेक्षा असते.
परमेश्वराचे मनोभावे चिंतन करणे, परमेश्वराला शरण जाणे हेच अपेक्षित आहे.
म्हणून श्रीभगवान असे म्हणतात की जे इतर देवतांची पूर्ण श्रद्धेने उपासना करतात ते अप्रत्यक्षपणे माझीच उपासना करत असतात पण त्यांची पद्धत चुकीची असते.
जसे झाडाच्या मुळाशी पाणी न घालता तुम्ही झाडाच्या फांदीला आणि पानांना पाणी देत असाल तर काय उपयोग?
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च।
न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते।।9.24।।
अहम्‌ एव हि सर्व-यज्ञानाम्‌ भोक्ता च प्रभुः च, ते तु माम्‌ तत्त्वेन न अभिजानन्ति, अतः च्यवन्ति।

अहम्‌ एव हि मीच
सर्व-यज्ञानाम्‌ सर्व यज्ञांना
भोक्ता च भोगणार
प्रभुः च, प्रभू सुद्धा
ते तु
माम्‌ मला
तत्त्वेन तत्व
न अभिजानन्ति, समजून घेत नाही
अभि +ज्ञा
ज्ञा धातू समजून घेणे जाणणे
अतः म्हणून
च्यवन्ति र्‍हास होतो
च्युत धातू पडणे.
आधीच्या दोन श्लोकाचा अर्थ मनात ठेऊन हा श्लोक वाचला कि अर्थ लगेचच समजतो. च्यवन्ति म्हणजे जातात. च्युत म्हणजे पाय उतार होणे. म्हणजेच इथे ह्याचा अर्थ पुन्हा मायावी जगात अडकणे.
यज्ञाचा अर्थ आहे विष्णू.
तिसर्‍या अध्यायात यज्ञकर्माचे महत्त्व विशद केले आहे. आता ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की मी समस्त यज्ञाचा भोक्ता आहे, प्रभू सुद्धा मीच आहे. म्हणून जे लोक माझे हे दिव्य स्वरूप जाणून घेत नाहीत त्यांचा र्‍हास होतो.
यान्ति देवव्रता देवान् पितृ़न्यान्ति पितृव्रताः।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्।।9.25।।
देव-व्रताः देवान्‌ यान्ति, पितृ-व्रताः पितॄन्‌ यान्ति, भूत-इज्याः भूतानि यान्ति, मत्‌ याजिनः अपि माम्‌ यान्ति।

देव-व्रताः
व्रत धार्मिक कार्य
देवान्‌ यान्ति,
या धातू जाणे
पितृ-व्रताः
पितॄन्‌ यान्ति,
भूत-इज्याः
यज् इज्यते यज्ञ करणे, पूजा करणे
भूतानि यान्ति,
मत्‌ याजिनः
याजिन् पूजा करणे
अपि माम्‌ यान्ति।
ह्या श्लोका मध्ये आपापल्या प्रवृत्ती, आवडीनिवडी नुसार लोक ज्यांची उपासना करतात, त्यांचे वर्णन केले आहे.
व्यक्ति म्हणजेच वृत्ती.
आपल्या समाजात सर्वच जण सात्विक वृत्ती चे असतिल अशी अपेक्षा इथे दर्शविलेली नाही. तर सर्व प्रकारच्या स्वभावाचे, निरनिराळ्या वृत्ती चे लोक ज्यांना आपापल्या इच्छेनुसार भक्तीचा समान हक्क आहे. आणि तुमच्या इच्छा सुद्धा तशाच पूर्ण होतील. जसे ज्ञानेश्वरांनी म्हणून ठेवले आहे
जो जे वांछील तो ते लाभो.
अशाच अर्थाचा हा श्लोक
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जे ईष्टदेवतांना पूजतात ते देवतांना प्राप्त होतात. जे आपल्या पितरांना पूजतात ते पितरांकडे जातात. जे भूत-प्रेत, काळी शक्तिंचे पूजन करतात त्यांना ते प्राप्त होते. पण जे मला पूजतात ते मला प्राप्त होतात..
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः।।9.26।।
यः मे भक्त्या पत्रम्‌ पुष्पम्‌ फलम्‌ तोयम्‌ प्रयच्छति, प्रयत-आत्मनः भक्ति-उपहृतम्‌ तत्‌ अहम्‌ अश्नामि।

यः जो
मे मला
भक्त्या भक्तिभावाने
पत्रम्‌ पाने
पुष्पम्‌ फुले
फलम्‌. फळे
तोयम्‌. पाणी
प्रयच्छति, देतो
प्र +यम् यच्छति दा धातू देणे
प्रयत-आत्मनः विशुद्ध आत्मा
भक्ति-उपहृतम्‌
उप +हृ हरति भेट देणे
तत्‌ अहम्‌ ते मी
अश्नामि।खातो उपभोगतो
अश् धातू खाणे
आपल्याला शबरीची उष्ट्या बोरांची गोष्ट माहीत आहेच. शिवाय विदुराच्या पत्नीने अनावधानाने कृष्णाला दिलेल्या केळ्याच्या सालीची सुद्धा गोष्ट माहीत आहे.
परमेश्वराला साधीसुधी अगदी कोणतीही गोष्ट दिलेली चालते. (त्यानेच तर सर्व निर्माण केले आहे ना) फक्त मनात सच्चा भाव असावा.
जो कोणी मला भक्तिभावाने पान फुल फळ पाणी अर्पण करतो. अशा शुद्ध मनाने भक्तीपूर्वक दिलेल्या उपहारांचा मी स्वीकार करतो.
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्।।9.27।।
हे कौन्तेय! यत्‌ करोषि, यत्‌ अश्नासि, यत्‌ जुहोषि, यत्‌ ददासि, यत्‌ तपस्यसि, तत्‌ मत्‌ अर्पणम्‌ कुरुष्व।

हे कौन्तेय!
यत्‌ जे काही
करोषि, करशील
कृ धातू करणे
यत्‌ अश्नासि,
अश् धातू खाणे
यत्‌ जुहोषि,
हु धातू देणे यज्ञ करणे
यत्‌ ददासि,
दा धातू देणे
यत्‌ तपस्यसि,
तपस् नामधातू तप्त होणे तपस्या करणे
तत्‌ मत्‌ ते मला
अर्पणम्‌ अर्पण
कुरुष्व। कर
कृ धातू करणे
25 व्या श्लोकात निरनिराळ्या लोकांच्या उपासना करण्याच्या पद्धती सांगून झाल्यावर श्रीभगवानकृष्ण सात्विक पद्धतीने उपासना करण्याचा सल्ला अर्जुनाला देत आहेत.
17 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकात फल इच्छारहित कायिक वाचिक मानसिक तपाला सात्विक तप असे म्हटले आहे.

नारदमुनींनी अतिशय चपखल असे भक्ताचे वर्णन केले आहे
नारदस्तु तदर्पिताखिलाचारता तद्विस्मरणे परमव्याकुलतेति ।।
(नारद भक्तिदर्शन, सूत्र-19)
भक्तीचा अर्थ आपली सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण करणे आणि एक क्षण जरी त्याचे विस्मरण झाले तरी अतिशय व्याकुळ होणे
संत कबीर आपल्या दोह्या मध्ये असेच म्हणतात
जहँ जहँ चलुं करूँ परिक्रमा, जो जो करूँ सो सेवा।
जब सोवू करूँ दंडवत, जानें देव न दूजा।।
‘श्रीकृष्ण समर्पण अस्तु’ असे मन्त्रोच्चार आपण करतोच.
ह्या श्लोकाचा अर्थ अगदीच थोडक्यात सांगता येइल कारण त्याची प्रस्तावना आधीच्या बर्‍याच श्लोकात करून झाली आहे.
हे कौन्तेय
तू जे काही कार्य करशील
जे काही खातोस
जे काही यज्ञकर्म करतोस
जे काही दानधर्म करतोस
जी काही तपस्या करतोस
ते सर्व मला अर्पण कर.
शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि।।9.28।।
एवम्‌ संन्यास-योग-युक्त-आत्मा शुभ-अशुभ-फलैः कर्म-बन्धनैः मोक्ष्यसे विमुक्तः माम्‌ उप-एष्यसि।

एवम्‌ म्हणून
संन्यास-योग-युक्त-आत्मा संपूर्ण समर्पित आत्मा
शुभ-
अशुभ-
फलैः
कर्म-बन्धनैः कर्माची बन्धने
मोक्ष्यसे
मुच् धातू मुक्त करणे, त्याग करणे
विमुक्तः मुक्त
माम्‌ मला
उप-एष्यसि। प्राप्त होईल
इ धातू जाणे
तुझी सर्व कर्मे मला अर्पण कर असे आधीच्या श्लोकात सांगून झाल्यावर त्या पासून मिळणारे लाभही सांगणे आलेच.
कोणतेही कर्म हे दोषरहित नसते. जसे अग्नि पेटवल्यावर धूरामूळे प्रदूषण तर होणारच. अगदी आपण श्वास सोडला तरी हवेचे प्रदूषण होतेच. म्हणजेच आपली सर्व कर्मे आपण तारतम्य ठेवून केली पाहिजेत. पर्यावरणाचे संरक्षण करताना हाच तर मुद्दा कळीचा ठरतो. अध्यात्माच्या अंगाने विचार केला तरी हेच उत्तर येते, कोणतीही गोष्ट स्वतः च्या स्वार्थासाठी करू नका. कारण कोणतेही कर्म केले की त्याचे शुभ, अशुभ फळ मिळणार आहे.
अनासक्तस्य विषयी
यथारं उपयुंजता:
निर्बंध: कृष्ण-संबंध:
युक्त: वैराग्यं उच्यते:
(भक्ति-रसामृत-सिंधु 1.2.255)
ह्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ असा की आपल्याला कर्म करणे तर अनिवार्य आहे. पण कर्म केल्यावर त्याचे फळ कृष्णालाच दिले तर त्याला युक्त वैराग्य असे म्हणतात.
इथे भक्तिचा अर्थ थोडा वेगळ्या पद्धतीने सांगितला आहे.
भक्ती म्हणजेच निष्काम कर्म.
भक्तिर अस्य भजन: तद इहमुत्रोपाधि-नैरास्येनामुṣमिन मनः-कल्पनम्, एतद एव नैष्कर्म्यं। गोपाल-तपनि उपनिषद 1.15.
म्हणून श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
अशा प्रकारे, मला अर्पण करून कर्मबन्धनातून निर्माण झालेल्या शुभ-अशुभ फळांतून तुला मुक्ती मिळेल. असा सर्व समर्पित मुक्त आत्मा माझ्या जवळ येऊन पोहोचेल.
समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्।।9.29।।
अहम्‌ सर्व-भूतेषु समः, न मे द्वेष्यः अस्ति न प्रियः, ये तु माम्‌ भक्त्या भजन्ति, ते मयि, अहम्‌ च अपि तेषु ।

अहम्‌ मी
सर्व-भूतेषु सर्व जीवमात्रांवर
समः, सारखे

मे मला
द्वेष्यः द्वेष
अस्ति
अस् धातू असणे
न प्रियः,
ये जो
तु नक्कीच
माम्‌ मला
भक्त्या भक्तीपूर्वक
भजन्ति, भजतात
भज् धातू भजणे
ते ते
मयि, माझ्यात
अहम्‌ च मी पण
अपि तेषु । सुद्धा त्यांचा
जाती आणि धर्म निर्माण करून माणसांनी माणसांमध्ये भेदभाव निर्माण केले. स्वतःच्या बुद्धि च्या जोरावर इतर प्राण्यांना आपल्या ताब्यात ठेवले. पण निसर्ग मात्र असा भेदभाव करताना दिसत नाही. सूर्य एका वेळी सर्वांना सारखाच प्रकाश देतो. नदी सर्वांसाठी वहात असते. झाडे सर्वांना सावली देतात.
असेच काहीसे श्रीभगवानकृष्ण सुद्धा म्हणत आहेत.
मी सर्व प्राणिमात्रांसाठी समान आहे. कोणाबद्दल द्वेष नाही आणि कोणी मला प्रिय नाही. पण जे भक्ती भावाने मला पूजतात, ते माझ्यामध्ये सामावलेले असतात आणि मी त्यांच्या मध्ये असतो.
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः।।9.30।।
चेत् सुदुराचाराः भजते माम अनन्य भाकः अपि सः साधुः एव मन्तव्यः सम्यक व्यवसितः ही।

चेत् जरी
सुदुराचाराः पापी
भजते पूजतात
माम मला
अनन्य भाकः न अन्य भाकः
न अन्य भजति
भक्ती शिवाय काहीही नाही
अपि तरी
सः तो
साधुः सज्जन
एव. ही
मन्तव्यः मानावा
सम्यक चांगले
व्यवसितः दृढनिश्चयी
वि +अव +सि धातू बांधून घेणे
ही। नक्की
ह्या श्लोकातील सुदुराचारी हा शब्द महत्त्वाचा. काही ठिकाणी महापापी असा अर्थ दिला आहे तर काही ठिकाणी दुर्जनातील सज्जन म्हणजे थोडीफार माणूसकी शिल्लक असलेला असे म्हटले आहे.
आपल्याला वाल्मीकि ऋषींची गोष्ट माहीत आहेच. वल्मीक म्हणजे वारूळ जे तपश्चर्या करताना ऋषींच्या भोवती निर्माण झाले, आणि म्हणून नाव पडले वाल्मिकी. त्यांचे खरे नाव रत्नाकर.
उलटा नाम जपत जग जाना।
बाल्मीकि भए ब्रह्म समाना।।
(रामचरितमानस).

भगवती च हरव अनन्य चेता:
भू-मालिनो ‘पि विराजते मनुश्य:
न हि वर्ष-कलुष-चबिं कदाचित्त
तिमिरा-परभाववतम् उपैति चंद्रा:। नरसिंह पुराण
जर एखादा पूर्णपणे परमेश्वराला शरण गेला आहे पण ज्याच्या कडून काही दुष्कर्मे घडली आहेत. त्यांना चंद्रावरच्या काळ्या डागाप्रमाणे मानले पाहिजे.
थोडक्यात जर कोणी दुराचारी अनन्य भावाने माझी भक्ती करत असेल तर त्याला साधू मानायला हरकत नाही कारण आता त्याने तसा निश्चयच केला आहे.
(म्हणजेच दुर्जनांना सुद्धा सुधारणा करण्याची संधी आहे. मात्र एकदा सन्मार्गाने चालायला सुरुवात केली की पाप करण्याची मुभा नाही.)
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति।
कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति।।9.31।।
(सः) क्षिप्रम्‌ धर्म-आत्मा भवति, शश्वत्‌ शान्तिम्‌ निगच्छति, हे कौन्तेय! प्रतिजानीहि मे भक्तः न प्रणश्यति।

(सः) क्षिप्रम्‌ ताबडतोब
धर्म-आत्मा पवित्र आत्मा
भवति होतो
भू धातू होणे
शश्वत्‌ अनंतकाळ
श्र्व श्र्व इति
शान्तिम्‌ शांती
निगच्छति, मिळते
नि +गच्छति गम् धातू जाणे
हे कौन्तेय!
प्रतिजानीहि नक्की माहीत असणे
प्रति +ज्ञा धातू जाणणे
मे माझे
भक्तः
न प्रणश्यति। नाश होत नाही
प्र +नश् धातू नाश होणे
ह्या श्लोकात क्षिप्रं ह्या शब्दाचा अर्थ ताबडतोब असा आहे, शिवाय ते एका नदीचे नाव सुद्धा आहे.
आपल्या शरीरात असणार्‍या 108 मर्म स्थळांपैकी एकाचे नाव क्षिप्रा.
आधीच्या श्लोकातील अर्थाचा संदर्भ घेऊन (दुर्जन सुद्धा साधू होऊ शकतो) श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
तो (दृढनिश्चयाने भक्ती करणारा) लगेचच धर्माचे आचरण करणारा असा आत्मा होतो आणि त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होते. (आधीच्या दुष्कृत्यांमुळे, पश्चाताप होऊन योग्य अशा भक्ती मार्गावर वाटचाल सुरू आहे. ) हे कौन्तेय, माझ्या अशा भक्तांचे कधीही अधःपतन होत नाही हे नीट समजून घे.
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्।।9.32।।
हे पार्थ! स्त्रियः वैश्याः शूद्राः तथा पाप-योनयः ये अपि स्युः ते अपि माम्‌ व्यपाश्रित्य, पराम्‌ गतिम्‌ हि यान्ति।

हे पार्थ!
स्त्रियः
वैश्याः
शूद्राः
तथा
पाप-योनयः
ये अपि ते सुद्धा
स्युः असू शकते
अस् धातू असणे
ते अपि ते सुद्धा
माम्‌ मला
व्यपाश्रित्य, शरण जाऊन
वि +अप +आ +श्रि धातू सेवा करणे
पराम्‌ गतिम्‌ श्रेष्ठ स्थिति
हि सुद्धा
यान्ति। प्राप्त होतात
या धातू जाणे

आजच्या काळानुरूप ह्या श्लोकाचा शब्दशः अर्थ सांगणे कठीण आहे.

विवेकिनो विरक्तस्य शमादिगुण शालिनः।
मुकुक्षोरैव हि ब्रह्मजिज्ञासायोग्यता मताः।। जगद्गुरु शंकराचार्यजीं नी म्हटल्याप्रमाणे ज्ञानयोगाचा मार्ग अनुसरणारी व्यक्ति हि विवेकी, विरक्त, संयमित मन आणि इन्द्रिय असणारी आणि मुमुक्षु म्हणजे मुक्तीची इच्छा असणारी अशी असली पाहिजे.
अष्टांगयोग, हठयोग यांच्या मार्गाने जाणार्‍यांसाठी पण काही विशिष्ट पात्रता सांगितल्या आहेत.
मात्र भक्ती पथावर चालण्यासाठी असे कोणतेही नियम नाहीत.

आनिन्द्ययोन्यधिक्रियते पारम्पर्यात् सामान्यवत्। (शाण्डिल्यभक्तिसूत्र 78)
शास्त्राप्रमाणे सर्व माणसांना भक्ती चा अधिकार आहे जसे इतर गोष्टींचा त्यांना अधिकार आहे.
ह्या श्लोकातील पाप-योनयः ह्या शब्दाचा अर्थ पूर्वजन्मीचा पापी असा घेतला आहे.
श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
जे मला शरण येतात, मग ते समाजाच्या कोणत्याही स्तरावर असोत, अगदी समाजाने बहिष्कृत केलेले असोत, ते (त्यांच्या भक्तीने) सर्वोच्च स्थान प्राप्त करू शकतात.

किरात-हंधरा-पुलिंद-पुलकणा:
अबीर-शुंभ यवनं खासदयानि:
ये ‘ने च पापा याद-अपाशर्याश्राय:’
शुध्यांति तस्माई प्रभाविवःवे नमः ।। श्रीमद्भागवतम् 2.4. 18
किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्।।9.33।।
किम्‌ पुनः पुण्याः ब्राह्मणाः तथा भक्ताः राजर्षयः? असुखम्‌ अनित्यम्‌ इमम्‌ लोकम्‌ प्राप्य, माम्‌ भजस्व।।

किम्‌ काय
पुनः
पुण्याः पुण्य
ब्राह्मणाः ब्राह्मण्य जाणणारा
तथा आणि
भक्ताः
राजर्षयः राजाचा आश्रय असलेला राजर्षि
असुखम्‌. दुःखी
अनित्यम्‌. क्षणिक
इमम्‌ हे
लोकम्‌ जग
प्राप्य, प्राप्त झालेले
प्र +आप धातू
माम्‌ मला
भजस्व पूजतात
भज् धातू भजणे
आपण ज्या जगात राहतो आहोत ते कसे आहे? ह्याचे संक्षिप्त वर्णन अचानक वाचायला मिळते. असुखम् अनित्यम्. असे ते शब्द म्हणजे दुःखमय आणि क्षणिक. येथे मिथ्या हा शब्द वापरलेला नाही. मागील अध्यायात मायावी जग असा उल्लेख आला आहे.
म्हणजेच दुसरे असे जग सुद्धा अस्तित्वात आहे जे शाश्वत आहे, सुखदायक आहे. ह्याचा उल्लेख आधीच्या अध्यायांमधे आलेला आहे.
ह्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
(आधीच्या श्लोकांचा संदर्भ घेऊन) मग पुण्यवान, धर्म जाणणारे, भक्त, राजर्षी (ह्यांच्या बद्दल काय बोलायचे?)
म्हणून ह्या क्षणिक दुःखमय जग प्राप्त झालेल्या (तू) माझी भक्ती कर.
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु।
मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायणः।।9.34।।
मत्‌-मनाः मत्‌-भक्तः मत्‌-याजी भव, माम्‌ नमस्कुरु एवम्‌ आत्मानम्‌ युक्त्वा मत्‌-परायणः माम्‌ एव एष्यसि ।।

मत्‌-मनाः
मत अस्मद् पंचमी एकवचन येथे मत ह्या शब्दाचा अर्थ माझ्यासारखे असा घेता येईल.
मत्‌-भक्तः माझा भक्त
मत्‌-याजी भव,
यज् धातू म्हणजे यज्ञ करणे
माम्‌ मला
नमस्कुरु
नमस् +कृ धातू
नम् धातू वाकणे
एवम्‌ म्हणून
आत्मानम्‌ आत्मन्
युक्त्वा
युज् धातू संयम ठेवणे, स्थिर असणे
मत्‌-परायणः मी हेच अंतिम लक्ष्य
माम्‌ एव माझ्याच कडे
एष्यसि जाशील
इ धातू जाणे
ह्या अध्यायातील पहिल्या श्लोकाची सुरवात मी (श्रीभगवानकृष्ण) तुला राजविद्या सांगतो अशी करून ते विशेष ज्ञान जाणून घेतल्यानंतर तुला ह्या अशुभ संसारातून मुक्ती मिळेल असे म्हटले. त्यानंतर ह्या जगाची निर्मिती आणि परमेश्वराचे सर्वत्र असलेले अस्तित्व सांगून झाल्यावर, ह्या लोकांत राहणाऱ्या विविध प्रवृत्ती च्या व्यक्ती आणि त्यांना असणारा भक्तीचा समान अधिकार ह्या बद्दल विवेचन सापडते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे जग अनित्य आणि दुःखमय असून, दुसरे जग जे शाश्वत आणि सुखदायक आहे, ते प्राप्त करण्यासाठी परमेश्वराला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही असे म्हटले.
त्यासाठी कृष्णाची अखंड भक्ती करत रहावे. कृष्णा सतत आपल्या मनात असायला हवा म्हणजे कसे?
भगवंतांनी त्यांच्या स्वतःच्या कर्तव्यांबददल सुद्धा भाष्य केले आहेच.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।4.8।।
आपल्याला भगवंतांच्या कार्यात सहभागी होता येईल.
नवविधा भक्ती च्या शेवटच्या तीन प्रकारात दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती असे प्रकार सांगितले आहेत.
भगवंताचे दास व्हायचे म्हणजेच भगवंताच्या कामाची जबाबदारी आपण घ्यायची.
सख्य भक्ती हि पुढची पायरी.
आपण जे भगवंताच्या कार्यात हातभार लावणार आहोत ते सर्व त्यालाच अर्पण करायचे म्हणजे आत्मनिवेदन भक्ती.
म्हणून शेवटच्या श्लोकात श्रीभगवानकृष्ण असे म्हणतात की
तुझे मन माझ्यासारखे होऊदे. तू माझा भक्त हो. माझाच यज्ञ तू कर. मला नमस्कार कर. सतत माझेच चिंतन करून ‘मी ‘ हेच अंतिम लक्ष्य असू दे. असे सर्व करून तू मला प्राप्त होशील.
——————————-🙏🙏🙏🙏——————————————-

वरील साहित्याचे लेखक/लेखिका: Anagha A

आरोग्य कायदा पर्यावरण अर्थशास्त्र संस्कृत साहित्य आणि इतर बर्‍याच गोष्टींचे ज्ञान घेऊन गीतेचा अर्थ माझ्यापरीने लावण्याचा प्रयत्न केला आहे.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments