हैद्राबाद मुक्तिसंग्रामात नाईचाकूर चे योगदान

हैद्राबाद मुक्तिसंग्रामात नाईचाकूर चे योगदान
१५ ऑगस्ट १९४७ ! भारताला स्वातंत्र्य मिळाले,पण हैदराबाद संस्थान मात्र अजूनही पारतंत्र्याच्या अंधकारात होते. परवशतेचा पाश अधिक घट्ट होऊ पाहत होता,पण मराठवाड्यातील जनतेने निजामाची जुलमी राजवट उखडून टाकली,त्यासाठी मोठा संघर्ष केला “रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?” या न्यायाने संघर्षामुळेच हैदराबादेवर तिरंगा फडकला,यात स्वातंत्र्यलढ्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील नाईचाकुर गावाचा सहभागही मोलाचा होता.

भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी हैद्राबाद संस्थानात निजामी जुलमी राजवट होती. त्यांनी हिंदूवर अनंत अत्याचार केले जात होते. निजामाने आपल्या अत्याचारांसाठी वापर केला. तो ‘इत्तेहादुल मुसलमीन’ संघटनेचा कासिम रझवी याने या अंतर्गत ‘रझाकार’ नावाची संघटना काढली. ही निमलष्करी संघटना होती. सैनिकी वेश परिधान करून धारदार फावडे हातात घेऊन रझाकार फिरायचे. मुलींची अब्रु असुरक्षित झाली होती. बलात्कार करणे, एकटयास गाठून हत्या इत्यादी कृत्य रझाकार करत होते. अशा या जुलमी रझाकार संघटेनेचा प्रमुख कासिम रझवी होता. एकार्थाने तो हिंदूंचा कर्दनकाळच म्हणावा लागेल. धर्माच्या नावाखाली चालणारी संघटना असलेल्या मुळे बहूसंख्य मुस्लिम समाज रझाकारांना पाठिंबा देत होता.

अत्याचारी शासनास पायदळी तुडविण्याचे सामर्थ्य हे जनतेत असते. परंतु त्यासाठी आवश्यक असते संघटन, खंबीर नेतृत्व व सर्वस्वी समर्पणाची तयारी. संघटनात्मक बांधणी संघर्षासाठी विविध संघटनेच्या माध्यमातून केले जात होते. यामध्ये आर्य समाज, किसान दल, हैद्राबाद स्टेट कॉग्रेस, हिंदू महासभा, आदि संघटनांचे कार्य सुरू होते.

रझाकारांचे अत्याचार वाढतच होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हैद्राबाद मुक्तीसंग्रामात नाईचाकूर गावचे मोलाचे योगदान राहिले आहे. या आंदोलनाची सुरूवात १९२५ साली निजामाने गावातील १२ व्या शतकातील प्राचीन हेमाडपंती शिव मंदिर पाडले तेव्हा झाली होती. या मंदिर परिसरात अनेक देवी – देवतांच्या मुर्त्या होत्या. त्यापैकी एका देवीची मूर्ती गावातील काही मंडळीने मुर्तीची विटंबना होऊ नये म्हणून एका शेतकऱ्यांच्या शेतात ‘खोकला माता’ म्हणून प्रस्थापित केली. तसेच या मंदिराचे कोरीव – रेखीव दगड आजही विविध ठिकाणी उत्खननात मिळतात. या शिव मंदिराच्या ठिकाणी ‘निजाम पोलिस ठाणे’ तयार करून त्यांनी अत्याचारास अधिक तिव्रतेने सुरूवात केली होती. याचा प्रतिकार करण्यासाठी गावातील दोन पिढ्यांचे योगदान राहिले आहे.

हैद्राबाद संस्थानात स्वांतत्र्य आंदोलनाची उभारणी करण्याचे कार्य आर्य समाजाने केले. सामाजिक, राजकिय, आर्थिक, धार्मिक सुधारणा घडवून आणणे हे आर्य समाजाचा मूळ हेतू होताच म्हणून १९३५ मध्ये नाईचाकूर गावातील युवकांच्या आग्रहाने मंदिराची स्थापना झाली. युवकांना शारिरीक, बौद्धिक तसेच राष्ट्रभक्तीचे धडे दिले जावू लागले.

प.पू. शंभोगिरी जी महाराज यांच्या नेतृत्वाखाली उमरगा येथे आंदोलन केले होते. या आंदोलनात ५०० ते ६०० क्रांतिकारक सहभागी झाले होते. यामध्ये उमरगा परिसरातील तसेच नाईचाकूर पंचक्रोशीतील क्रांतीकारक सहभागी झाले होते. यामध्ये नाईचाकूर च्या क्रांतीकारकांना पकडण्यासाठी आलेल्या ५ रझाकार पठाणास ठार मारून ते भूमिगत झाले होते.

राष्ट्रीय शाळा :

राष्ट्रीय विचारांच्या शाळांची अनेक ठिकाणी सुरूवात करण्यात आली. यांचे अनुकरण करून गोविंद पवार व अन्य गावातील क्रांतीकारकांनी गावात शाळा सुरू केली होती. याची बातमी निजाम ठाणेदार अमीन साहेबाला समजले. त्याने ‘सरकार द्रोहाचा’ आरोप ठेवून शाळेतील विद्यार्थी, पालक यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शाळा बंद करावी लागली.

किसान दल संघटन :

४ जुलै १९४९ उमरगा येथील हंद्राळ या गावी रझाकार व पठाण कर वसुलीसाठी गावात आले होते. यांच गावात बिराजदाराच्या वाड्यात किसान दलाचे वीर माणिकराव पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक सुरू होती. यावेळी रझाकारांनी वाड्याला वेढा दिला. येथील क्रांतीकारकांनी प्रतिकार करून डोंगरावर पलायन केले व ते या गावातून बाहेर पडले. यानंतर भूमिगत राहून कार्य करणारा कुमार व युवकांचा मोठा गट तयार झाला. या दलाच्या माध्यमातून गावात युवकांना हत्यारे तयार करणे, तलवार चालवायला शिकवणे, भालाफेक, बंदुका चालविण्यासाठी प्रशिक्षण दिले जावू लागले. आदिचे प्रशिक्षण गावात दिले जावू लागले. यांचे नेतृत्व कॅप्टन नामदेव पवार, गोविंद पवार, शाहूराज जाधव यांचे सहकारी हे काम करत होते.

वंदे मातरम् आंदोलन :

हैदराबाद संस्थानात वंदे मातरम् गीत म्हणण्यास बंदी होती. या विरोधात आंदोलन चालू होते. या कालावधीत १९३८ मध्ये समर्थन म्हणून क्रांतीकारकांनी झेंड्याचा ओटा येथे सामूहिक वंदे मातरम् गीत गायन केले. यावेळी पोलिसांनी तुफान लाठीमार केला.

जंगल सत्याग्रह :

संस्थानात शिंदीच्या झाडांपासून मद्य तयार केले जात होते. हे सरकारी उत्पन्नाचे मोठे साधन होते. शेतकऱ्यांच्या खाजगी शेतात असलेली झाडे सुध्दा सरकारचे लोक घेत होते. १९४७ साली हैदराबाद संस्थानात सर्वत्र जंगल सत्याग्रह करण्यात आले. मोठ्या संख्येने विविध ठिकाणी सत्याग्रह झाले. याच कालावधी साताऱ्याचे क्रांतिसिंह नाना पाटील यांची नाईचाकूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा नाईचाकूर- सरवडी च्या मध्यभागी काही एकर शिंदीचे बन होते. याच बनात सभा झाली. पुढिल आंदोलनाची दिशा तिथे निश्चित ठरवण्यात आली. काही दिवसात गावातील युवकांनी हे शिंदीचे बन तोडून फेकून दिले. हजारो रूपयाचे उत्पन्न रातोरात नष्ट केले. या सोबत शिंदी जमा करणारी केंद्रे नष्ट केले, दारूच्या भटट्या पाडून टाकण्यात आल्या.पैसा लुटून स्वातंत्र्याच्या कामासाठी वापर केला.

महिलांचे योगदान:

भूमिगत असणाऱ्या क्रांतीकारकास भोजन पुरवणे, निरोप, विविध पत्रके पोहचवणे, आंदोलकांना आश्रय देवून सांभाळ करणे, या बरोबर भूमिगत क्रांतीकारकांच्या परिवाराची काळजी घेणे. निजाम साहेबाच्या बायकांसोबत चर्चेतून महत्त्वाची माहिती क्रांतीकारकास पुरवणे असे अनेक महत्त्वाची कामे महिलांनी केले.

इस्माईल मेहबूब मुल्ला हा रझाकाराचा विश्वासू व्यक्ति होता. गावातील महिला, क्रांतीकारकांच्या घरातील लोकांना त्रास देवू लागला. महिलांची अब्रु लुटू लागला. यामुळे क्रांतीकारक प्रचंड चिडले १० जून १९४८ रोजी मध्य रात्री त्याला ठार करण्यात आले. या मध्ये रामचंद्र जहागिरदार, तुळशीराम सांळुके, तुळशीराम धनगर सहभागी होते.

पोलिस ठाण्यावर हल्ला :

नाईचाकूर गावात मोठे पुलिस ठाणे होते. निजाम सरकारने आपल्या संस्थानातील नागरिकांना हत्यार वापरण्यास बंदी घालण्यात आली. यावेळी नाईचाकूर पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक घरातील झडती घेऊन हत्यारे जप्त करण्यात येवू लागले. तीच हत्यारे रझाकार संघटनेला पुरविली जाणार होती. नाईचाकूर ठाण्यात गोळा केलेल्या हत्यारात ३०० बंदुका. एक गाडी तलवारी होत्या. हे सर्व साहित्य रझाकारांना दिले जाणार होती. म्हणून १४ जानेवारी १९४८ रोजी रात्री १ वा पंचक्रोशीतील ३० ते ४० क्रांतीकारकांनी हल्ला केला. भयाण अंधारात पोलिस ठाण्याकडे निघाले. ठाण्यात १५ ते २० पोलिस होते. क्रांतिकारकांनी बंदुकीचा आवाज केल्या बरोबर पोलिस ही जागे झाले. त्याच वेळी एक पेटता कापडाचा बोळा पोलिस ठाण्यात टाकण्यात आला आणि “भारत माता कि जय” च्या घोषणांनी परिसरात आवाज घुमू लागला. यावेळी पोलिस मात्र जमावाच्या समोर न येता जीव वाचवण्यासाठी फरार झाले. यांचे नेतृत्व हाडोळीचे मोहन पाटिल, नाईचाकूर येथील गोविंद पवार, शाहूराज जाधव, राम पवार, नाभिराज जमालपुरे व्यंकट माने यांनी केले.

या सोबतच झेंडा सत्याग्रह, हात बॉब तयार करणे, आलुरच्या निजामी मिलिटरी ठाण्यावर हल्ला, घोळसगाव जेल मधील पोलिसांवर हल्ला, व्यापारी लुट, घोरवडी रझाकार केंद्रावर हल्ला, अशा अनेक आंदोलनात नाईचाकूर गावातील व्यंकट जयवंता पवार, माणिक (कारभारी) देवराव पवार, तुळशीराम साळुंके (व्हगाडी) , सुग्रीव (दादा) हणमंत पवार आदी सहभागी होते.

जयपाल आदप्पा कांक्रबे, सदानंद सनातन, माणिक पवार, शंकर लंकडे, काॅ. हिरा पवार, नामदेव पवार, सोपान माने, महादा सनातन, शाहुराज जाधव, गोविंद पवार, किसन तुकाराम पवार, नागनाथ पवार, नाभीराज जमालपुरे, माणिकराव पवार, बाबुसिंह पवार, शंकर सनातन, तुळशीराम काळे, बाबाराव भोसले, किसन महादेव पवार, व्यंकट भाई माने, किसन तात्याराव पवार, व्यंकट गोपाळ पवार, राम बापु पवार, मनोहरसिंह पवार, माणिक सगर, बाबु पांडुरंग इटुबोने, तुकाराम इटुबोने ,रंगराव कदम ,डिगबंर कुलकर्णी, पांडूरंग बाबळसुरे, तुळशीराम साळुंके आदिने क्रांतीकारकांनी या लढ्यात नेतृत्व करून मोलाचे योगदान दिले.

अशा गावोगावी चाललेल्या आंदोलनाचा लढ्याचा परिणाम म्हणजे १३ ते १७ सप्टेंबर १९४८ या कालावधीत १०९ तासाचे ऑपरेशन कबड्डी, पोलो, टक्कर ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर हैद्राबाद संस्थानच्या निजामाने शरणागती पत्करली आणि भारतात विलिन करून घेतले. मराठवाडा स्वंतत्र झाला.

या मुक्ती संग्रामात सहभागी सर्व ज्ञात अज्ञात , क्रांतीकारकास, हुतात्म्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत. त्यांचे शौर्य, बलिदान, कार्यामुळे मराठवाड्याचे काश्मीर झाले नाही. हैद्राबाद मुक्ती संग्रामातील सर्व क्रांतीकारकास विनम्र अभिवादन !!!

✒️श्री. दत्तू केशवराव माने
[email protected]
जनकल्याण निवासी विद्यालय, हरंगुळ (बु) लातूर

संदर्भ ग्रंथ :

१) लातूर -उस्मानाबाद गॅझेट – महाराष्ट्र शासन

२) हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम – वसंत पोतदार

३) हैदराबाद मुक्ती लढा आणि हैदराबाद संस्थान – प्रा. डॉ. चंद्रशेखर लोखंडे

४) मराठवाडा मुक्तीसंग्राम एक मागोवा संपादन – सुधीर देशपांडे

५) मराठवाड्यचे क्रांतिसिंह गोविंदराव पवार – प्रा. राजेंद्र इंगळे, प्रा.शांता पवार

६) स्वातंत्र्य सैनिक राम बापू पवार मौखिक माहितीतून

श्री. दत्तू केशवराव माने

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments