श्री रामाची शेजारती

बाळा मुग्धा यौवना प्रौढा सुंदरी । रामा प्रौढा सुंदरी ।
आरत्या घेवूनि करी आल्या त्या नारी ।
श्यामसुंदर रामा चरणकमलीं । रामा चरणकमलीं ।
ओवाळूं आरती कनकगंगाजळी ।।

चौघी म्हणती सुमनशेजे चला मंदिरा । रामा चला मंदिरा ।
नव त्या इच्छिती सेवा श्यामसुंदरा ।
दास म्हणे सुमनशेजे चला श्रीहरी । रामा चला श्रीहरी ।
क्षण एक विश्रांति घ्या हो अंतरी ।।

सकळांसि तांबुल सकळां पुष्पमाळा ।
भक्तांचा सोहळा पुरविला ।।
स्वामी चला हो निजमंदिरा । सुखशेजेसी रघुवीरा ।
भक्तांसि पालक ब्रह्मांडनायेक ।
जय रघुकुळटिळकस्तविती दासा ।।

येवूनि जनकात्मजा अहो जी रघुराजा ।
तिष्ठतसे तुझा मार्ग लक्षी ।।
जाली वाढ राती अहो रघुपती ।
मार्ग सोडविती बंदीजन ।।

उठले जगजीवन सिंहासनावरुन ।
वेणीनें लिंबलोण उतरिलें ।।

यानंतर विडा म्हणतात आणि नंतर पुढील पदं म्हटली जातात

आरति आरत ऐक्यभावें ओवाळूं । ऐक्यभावें ओवाळूं ।
प्रकाश स्वयंज्योती निज तेज भंबाळू ।।धृ।।

परमात्मा श्रीराम महामाया जानकी । महामाया जानकी ।
विश्रांति पावलि गजर न कीजे सेवकी ।।१।।

स्नेह ना भाजन नाहीं वाती पावक । नाही वाती पावक ।
सबाह्य अब्यंतरी अवघा निघोट दीपक ।।२।।

ऐक्याचे सुमनशेजे आत्माराम रघुपती । राजाराम रघुपती ।
वाचा पारुषली शब्द न बोलवे पुढती ।।३।।

राम आणि दास दोघे पहुडले रामीं । दोघे पहुडले रामी ।
हेंही बोलावया । हेंही बोलावया । दुजा नुरेच तें धामी ।।४।।

श्रीराम पहुडले निज मंचकावरी ।
उभी ती जनकबाळा घेउनि आरत्या करी ।।
समया पाजळती, रत्नज्योती प्रकाशती ।
हनुमंत जांबुवंत, पुढें उभे राहाती ।।१।।

नैवेद्य पंचखाद्य, खर्जुर शर्करा ।
नारळादि फळें द्राश्रें, रामराया अर्पियेली ।।२।।

राघवे निद्रा केली, मौन्य वाचा राहिली
रामीं हो रामदासीं, समाधी लागली ।।३।।

सर्वोत्तमा कैं मज भेटि देसि ।

दुःखानळे मी संतप्त देहीं । तुजवीण रामा विश्रांती नाहीं ।
आधार तुझा मज मी विदेसीं । सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी ।।१।।

प्रारब्ध खोटें अभिमान आला । स्वामी समर्थासी वियोग जाला ।
तेणें बहु क्षीति वाटें मनासी । सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी ।।२।।

तुझिया वियोगे बहु वेदना रे । विवेक नाहीं आम्हा दिना रे
पडिला समंधु या दुर्जनासी । सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी ।।३।।

संसारचिंता मज वाटते रे । रामा प्रपंची मन जातसे रे ।
संसर्ग आहे इतरा जनासी । सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी ।।४।।

श्रीरामाचे उपकार
हिणाहून मी हीण जैसा भिकारी । दिनाहून मी दीन नाना विकारी
पतितांसि रे आणि हातीं धरावें । समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे ।।१।।

जनीं भक्ति नाहीं मनीं भाव नाही । मला युक्ति ना बुध्दि कांहींच नाहीं ।
कृपाळूपणें राज्य रंकासि द्यावें । समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे ।।२।।

बहुसाल अन्याय कोट्यानकोटी । रघूनायकें घातले सर्व पोटीं ।
किती काय गूणांसि म्यां आठवावें । समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे ।।३।।

समर्थे दिलें सौख्य नाना परींचे । सदा सर्वदा जाणसी अंतरीचे ।
लळे पाळिले तू कृपाळू स्वभावे । समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे ।।४।।

दिनानाथ हें ब्रीद त्वां साच केलें । म्हणे दास भक्तांसि रे उध्दरीलें ।
सुखें सांडणें या देह्याचें करावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ।।५।।

अनाथ मी हीन दीन दरिद्री भजन नेणें कांही ।
तुजविण मज या जगीं पाहाता कोणीच नाही ।
ज्ञान कळेना ध्यान कळेना मन वळेना देवा ।
विद्या नाही वैभव नाहीं ऐसा पूर्वील ठेवा ।
युक्ति असेना बुध्दि असेना शांति वसेना अंगी
रामदास म्हणे दयाळा ऐसा मी भवरोगी ।।१।।

रामा रामा रामा रामा रघुनंदना । रामा रघुनंदना ।।
रामा रामा रामा रामा कुळभूषणा ।।१।।

रामा रामा रामा रामा जानकीपते । रामा जानकीपते ।
रामा रामा रामा रामा विमलपते ।।२।।

रामा रामा रामा रामा दीनवत्सला । रामा भक्तवत्सला ।
रामदास म्हणे तुझी अगम्य लीला ।।३।।

रामा रामा रामा रामा रामा हो । जय रामा हो ।
तारी तारी तारी तारी आम्हां हो ।।४।।

तोडी तोडी तोडी तोडी भवपाश । रामा भवपाश ।
अनन्यशरण रामीं रामदास ।।५।।

राम राम राम जप सीताभिराम । जप सीताभिराम ।
राम राम राम जप सीताभिराम । राजा …. ।।६।।

सज्ज्नगडनिवास माझे रामदासमाये । माझे रामदासमाये ।।
रामदास माये । माझे रामदास माये ।।धृ।।

श्रमहरणीनिवास माझे कल्याणमाये । माझे कल्याणमाये ।।
कल्याणमाये । माझे कल्याणमाये ।।

शरयूतीरनिवास माझे रामचंद्रमाये । माझे रामचंद्रमाये ।।
रामचंद्रमाये । माझे रामचंद्रमाये ।।

सीताकांतस्मरण जय जय राम ।
सदगुरु समर्थ रामदास स्वामीमहाराज की जय ।
महारुद्र हनुमान की जय ।
श्रेष्ठ गंगाधर स्वामीमहाराज की जय ।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments