नाती अशी आणि तशीही – २५

सावलीचे ज्येष्ठ विश्वस्त पापांशी माझी वारंवार विविध विषयांवर चर्चा होतच असे. पापांनी सावलीसाठी पीराच्या वाडीचा प्लॉट दिला होता. नविन इमारतीसाठी निधी संकलनाचे काम सुरु होतं. आम्हाला हवा तितका प्रतिसाद येत नव्हता. त्यामूळे चिंता वाढत होती. त्यासंदर्भात चर्चा करण्याच्या निमित्ताने वारंवार भेटी होत होत्या. बोलता बोलता पापा बोलून गेले, आलेल्या कुठल्याही रुग्णाला नाही म्हणायचं नाही. मग तो पैसे देवा किंवा न देवो. मी एकदम उसळून म्हणालो मग काय सगळेच बिनपैशाचेच येतील. आणि खर्च कुठून भागवायचा?

पापा शांतपणे म्हणाले, “हीच तर चुकीची समजूत आहे. कोणालाही काहीही मोफत घ्यायला आवडत नाही. मला सांगा ऑफिसमध्ये चार-पाच कर्मचारी एकत्र डबा खातात. ते आपापल्या डब्यातले पदार्थ एकमेकांमध्ये वाटून खातात. त्यातला जर एखादा म्हणाला की, माझ्या डब्यातले पदार्थ तूम्ही घ्या पण मला तूमच्या डब्यातले काही नको तर त्याच्या डब्यातले पदार्थ कोणी घेईल का? नाही घेणार. कारण कोणालाही फूकट काही नको असते. प्रत्येकजण आपापल्या परीने त्याला परवडेल एवढा मोबदला आनंदाने द्यायला तयार असतो. फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत वाटत नाही. म्हणून तर अगदी गरीबातील गरीब माणूसही फार नाईलाज असेल तरच सरकारी हॉस्पीटलमध्ये जातो किंवा आपल्या मुलाला सरकारी शाळेत घालतो अगदी सगळं मोफत असूनही.”

“चांगली सेवा मिळत असेल तर लोक त्याचा मोबदला द्यायला तयार असतात. एखाद्याची ऐपत नसेल तर मात्र त्याचा नाईलाज होतो. मला वाटतं” ते पुढे म्हणाले, “ज्यांना कोणाला आपल्या सेवेची गरज असेल त्यांना केवळ पैशामूळे आपली सेवा आपण नाकारु नये.” “हे सगळं बरोबर आहे पण आर्थिक नियोजनाचं काय? पुर्णपणे मोफत किंवा कमी पैशात आपण रुग्ण घेऊही पण ती आपली समाजसेवा झाली. आपल्याकडे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना आपल्याला पगार द्यावाच लागणार आहे. तोही पुर्ण. आपल्याला किराणा माल, भाजी, दुध पुरवठा करणार्‍यांनाही आपल्याला पुर्ण पैसे द्यावे लागणार आहेत. आम्ही समाजसेवा करतो म्हणून तूम्ही पैसे घेऊ नका किंवा कमी पैसे घ्या असं काही त्यांना सांगता येणार नाही.” मी म्हणालो.

”इथेच तुमचं चुकतय. तुम्ही मी मी करु नका. तुम्ही फक्त माध्यम असता. तुम्ही त्यांना मनापासून सेवा द्या. आर्थिक नियोजन आपोआप होईल. कारण ’जो चोच देतो तो दाणाही देतो.‘ नाहीतर पैसा पैसा करणारे अनेक व्यावसायिक उत्तम आर्थिक घडी असतानाही देशोधडीला लागलेले बघितले आहेत जगाने. तूम्ही काम करत रहा. समाज ठामपणे तूमच्या मागे उभा राहील.” मला अजूनही पटत नव्हते. अशा जर-तरच्या शक्यतांवर संस्था कशी चालणार? म्हणजे परत सगळीकडे देणग्या मागत फिरा. वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे सॉफिस्टीकेटेड भिकारी बना. हे मला मंजूर नव्हतं.

पापा म्हणाले, “जगात फुकट असं काही नसतं. तुमच्या घरी समजा एखादा छान पदार्थ केला तर आपण शेजार्‍यांना वाटीभर देतो की नाही? ती वाटी कधी रिकामी परत येते का? नाही ना. त्या वाटीतून एखाद्या छान पदार्थाबरोबर शेजार्‍यांचा स्नेहही येतो.” “तुम्ही मित्राला भेटायला त्याच्या घरी गेलात आणि तो नेमका बाहेर गेलेल्या असल्याने तूम्ही त्याच्या आजीशी थोडावेळ अवांतर गप्पा मारत बसलात तर व्यवहारी विचार करता तूमचा वेळ वाया गेला पण उठताना ती आजी ज्या मायेने तूमचा चेहरा कुरवाळेल त्याची तूम्ही काय किंमत करणार आहात?”

“दुसरं म्हणजे आपल्याकडे येणार्‍या रुग्णांपैकी जे रुग्ण पैसे देऊ शकणार आहेत त्यांच्याकडून आपण थोडेसे पैसे वाढवून घेऊ. त्यांना समजावू की, त्यांच्याकडून ज्यादा घेण्यात येणार्‍या पैशांमधून आर्थिक कमकूवत स्तरातील रुग्णांची सेवा केली जाते आहे. ते नक्की तयार होतील. कारण समाजसेवा प्रत्येकाला करायची सुप्त ईच्छा असते. पण नेमकी काय करावी? कशी करावी हे सुचत नसते. काहीवेळा मोठ्ठी देणगी देण्यासाठी ताकदही नसते. पण अशी जाता जाता समाजसेवेला हातभार लागत असेल तर 90% लोक आनंदाने तयार होतील.” आता पुर्णांशाने नाही तरी कुठेतर पटायला लागलं होतं.

“आणि देणगी मागत फिरायचं म्हणाल, तर ते तर अजिबात करायचं नाही.” पापा पूढे म्हणाले. “तुम्ही माझ्याकडे जेवायला मागणं आणि मी तूम्हाला जेवायला बोलावणं यात जमिन-अस्मानाचं अंतर आहे. तुम्हाला देणगी देणार्‍याला, तूम्ही त्यांची देणगी स्विकारली म्हणून कृत्यकृत्य वाटलं पाहिजे. कारण त्यामूळे त्यांना अल्पसा का होईना तूमच्या कामात सहभाग घेता येतो. तूम्ही देणगी स्विकारताना याचकाच्या भुमिकेत कधीच असता कामा नये. एखाद्याकडे जेवायला गेल्यानंतर जेवण झाल्यावर बडिशेप देतात ना. तेव्हां बडिशेप देणार्‍याचा हात खाली आणि घेणारा वरुन त्याला पाहिजे तेवढी ती उचलून घेतो. तुमची देणगी घेतानाची पोझिशन कायम ती पहिजे. कारण इतरवेळी देणारा वरुन देतो आणि घेणार्‍याचा हात खाली असतो.”

हे काहीतरी नविन समजत होते. पापा मला ‘कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेशु कदाचनं’चा अर्थ समजावत होते.

मी भारावल्यासारखा तिथून निघालो. मनामध्ये ‘भिकारीमुक्त कोल्हापूर‘ आणि ‘चॅरिटी वुईथ डिग्निटी’ सारखे प्रकल्प आकार घेऊ लागले. आणि अभिमानाने सांगू शकतो की दोन्ही प्रकल्प गीतेतील हे वचन पुर्णपणे खरे करत चालू आहेत. आज अखेर सावलीमध्ये कोल्हापूरच्या रस्त्यांवरील 82 विकलांग, परावलंबित्व आलेले निराश्रीत दाखल करुन घेण्यात आले आहेत. त्यांची संपुर्ण सुश्रुषा, औषधोपचार सावलीतर्फे करण्यात येतो. जे काही त्यांचे दिवस शिल्लक आहेत ते आनंदात जावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. त्यांच्या निधनानंतर अंतिम विधीही संस्थेतर्फेच केले जातात. आज या प्रकल्पाअंतर्गत 82 पैकी 40 व्यक्ती हयात आहेत.

’चॅरिटी वुईथ डिग्निटी’मध्ये रुग्णाला परवडेल अशा दरामध्ये दाखल करुन घेतले जाते. अगदी 500 रुपये महिना या दरातही सावलीत रुग्ण दाखल करुन घेतलेले आहेत. थोडेसे का होईना पैसे देत असल्याने ‘आम्ही पैसे भरतो. फुकट नाही’ या आविर्भावात दाखल होतात आणि सेवा घेतात. त्यांचा हा मान सावली पुरेपूर सांभाळण्याचा प्रयत्न करते. असंही सावलीमध्ये कोण किती पैसे देतं हे फक्त व्यवस्थापनालाच माहित असतं. त्यामूळे सर्व रुग्णांना एकसारखीच सेवा मिळते. पैशावरुन सेवेमध्ये कधीही तफावत केली जात नाही.

अभिमानानं सांगतो की, देवाच्या दयेने आजपर्यंत सावलीला दैनंदिन खर्चासाठी कधीही अडचण आली नाही. काही इक्विपमेंटस् घ्यायची असतील, काही मोठा खर्च असेल तर एका आवाहनावर समाज ठामपणे संस्थेच्या मागे उभा राहतो हा नेहमीचा अनुभव आहे.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments