नाती अशी आणि तशीही – २४

“किशोर आमच्या संस्थेत सेरेब्रल पाल्सीचा मुलगा दाखल झाला आहे. 9 वर्षांचा. काही हालचाल नाही. भुक लागली किंवा शी-शू झाली की रडतो फक्त मोठ्ठ्याने. बाजीराव नाव ठेवलं आहे त्याचं. संस्थेत त्याचं करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळही नाही. तूला काही करता येईल का?” आमची फॅमिली फ्रेंड शारदानी फोन करुन विचारलं.

सावली सुरु होऊन जेमतेम दोन वर्ष होत होती. आर्थिकदृष्ट्या सावली आता कुठे सावरु लागली होती. अनाथ मुलगा म्हणजे त्याचे पैसे कोण देणार? माझ्यातला व्यवस्थापक मला विचारत होता. विनामुल्य पेशंट घ्यावा इतकीही सावलीची आर्थिक स्थिती मजबूत नव्हती. पण शारदानी जरा गळ घातली, “एकदा बच्चूला बघून तर घे पैशाच्या बाबतीत काही करता आलं तर बघू.” हो-ना करता करता मी तयार झालो. संस्थेत गेल्यावर मला बाजीरावच्या खोलीत नेण्यात आलं. आणि बाजीराव पहिल्याच भेटीत माझ्याकडे बघून का कोणास ठावूक इतका गोड हसला की, जसाकाही माझीच वाट बघत होता. मलाच भरुन आलं. मागचा पुढचा काही विचार न करता मी होकार दिला.

जिल्हा बाल कल्याण समितीची बैठक झाली. त्यांनी सावलीला बाजीरावला सांभाळण्यासाठी फिट संस्था असा दर्जा देऊन उर्वरीत कायदेशीर बाबी पुर्ण केल्या गेल्या. बाजीरावला आमच्या ताब्यात देताना आम्हाला उपचारासाठी राज्य बाल निधीमधून दर महिना 1000 रुपये देण्यात येतील अशी कमिटमेंट देण्यात आली. त्यासाठी आम्हाला दर सहा महिन्यांनी त्याच्या तब्येतीचा अहवाल पाठवण्याची अट होती.

बाजीराव संस्थेतला पहिला लहान मुलगा असल्याने सर्वच कर्मचार्‍यांचा लाडका बनला. तो बोलू शकत नसला तरी हुंकार छान द्यायचा. सगळ्यात आधी त्याचा आहार निश्चित केला. सकस आहारामूळे बाजीरावच्या प्रकृतीमध्ये जाणवण्याइतपत फरक पडला. बाजीरावला आता फिजिओथेरपीचे व्यायाम सुरु करण्यात आले. पुण्याच्या प्रसिद्ध डॉ. श्रीधर चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाजीरावला वॉटर थेरपी ट्रीटमेंट चालू करण्यात आली. विशेष म्हणजे चिपळूणकर सर महिन्यातून दोन वेळा खास बाजीरावसाठी कोल्हापूरला यायचे. त्यांनी आमच्या दोन स्टाफला ट्रीटमेंट देण्यासाठी तयार केले. सर पिलाजीराव घाटगे ट्रस्टच्या भवानी टँकने आम्हाला त्यांचा टँक मोफत उपलब्ध करुन दिला.

वॉटर थेरपी मुळे बाजीरावमध्ये अमुलाग्र फरक पडू लागला. त्याच्या बोटांना चांगली ग्रीप आली. पोळीचा रोल करुन दिला तर स्वत: खाऊ लागला. पलंगाच्या/खिडकीच्या रेलींगला पकडून उठून बसू लागला. दोन-दोन तास टि.व्ही. वर कार्टून बघू लागला. कोणी टि.व्ही. मधेच बंद केला तर ओरडून गोंधळ घालू लागला. एकंदरीत सगळं आनंददायी चाललं होतं.

दरम्यानच्या काळात ठरल्याप्रमाणे आम्ही दर सहा महिन्यांनी बाजीरावच्या तब्येतीसंदर्भातील रिपोर्ट पाठवत होतो. त्याचबरोबर दर सहा महिन्यांचे दरमहा एक हजार याप्रमाणे बीलही पाठवत होतो. पण समितीकडून काहीही हालचाल नव्हती. एक हजार रुपयासाठी आम्ही किती फॉलॉअप घ्यायचा यालाही मर्यादा होती. आम्ही रिपोर्ट पाठवत राहीलो आणि फॉलॉअप घेणे बंद केले. येतील तेंव्हा येतील असा विचार करुन त्या पैशाचा नाद सोडला. असेही बाजीरावचा खर्च त्यापेक्षा कितीतरी जास्त होत होता. पण त्याने सर्वांना जो लळा लावला होता त्यामूळे त्या खर्चाचे काही वाटेनासे झाले होते. बाजीराव सावलीत येऊन आता 52 महिने झाले होते.

सकाळचे मुख्य वार्ताहर श्री सुधाकर काशिद भागात आल्यावर आवर्जुन सावलीला भेट द्यायचे. रुग्णांची संवाद साधायचे. इतका मोठा माणूस आपल्याशी इतक्या आपूलकीने बोलतो आहे हे समजल्यावर रुग्णही हरखून जायचे. असेच एक दिवस काशिद साहेब आले असताना अगदी बोलता बोलता सहज बाल निधीतून मिळणार्‍या पैशाचा विषय निघाला. 52 महिने झाले तरी एकही रुपया मिळाला नव्हता. सरकारी पातळीवर असणारी इतकी मोठी अनास्था काशिद साहेबांना नविन नव्हती पण तरीही अस्वस्थ करुन गेली.

दोनच दिवसांनी सकाळच्या सर्व आवृत्त्यांच्या फ्रंट पेजवर अगदी ईसकाळ सकट ‘बाजीरावच्या डोळ्यांची भाषा कळेल कोणाला?’ या नावाने मोठी बातमी प्रसिद्ध झाली. आणि सावली पहिल्यांदा घराघरात पोहोचली. सावलीच्या कामाची दखल संपुर्ण जगाने घेतली. अमेरिका, न्युझीलंड, दुबई, इंग्लंड बरोबरच भारतातील सर्व प्रमुख शहरांतून सावलीच्या खात्यात बाजीरावसाठी 1,72,000 रुपये जमा झाले. अपेक्षीत रकमेपेक्षा ही रक्कम तिपटीपेक्षा जास्त होती. प्रश्न नुसत्या पैशाचा नव्हता तर जगभरातील लोक सावलीशी जोडले गेले जे आजतागायत संपर्कात आहेत. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर बाल निधीमधून येणारे पैसेही महिन्याभरात न सांगता आले.

मी जर बाजीरावला दाखल करुन घेतेवेळी जर फक्त पैशांचा विचार करत बसलो असतो तर एवढी मोठी प्रसिद्धी मिळणं तेही स्थापनेपासून अवघ्या 6-7 वर्षांत शक्य होते का? जगात कोणतीच गोष्ट फुकट नसते. देव प्रत्येक गोष्टीचा मोबदला आपल्याला देतोच. त्या बातमीनंतर सावलीला मिळालेली आपूलकी, समाजातील सद्भावना आजही मी अनुभवतो आहे.

‘कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेशु कदाचन’ या वचनावर माझा त्यानंतर दृढ विश्वास बसला. पुढे सावलीच्या ‘भिकारीमुक्त कोल्हापूर’ किंवा ‘जन्मत: अपंग असणार्‍या अनाथ मुलांचे पालकत्व’ अशा प्रकल्पाचे बीज त्यात रोवले गेले.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments