नाती अशी आणि तशीही – २३

सावलीला आता चार वर्ष पुर्ण झाली होती. सावलीतीलच एक रुग्ण ज.गो. कुलकर्णी ह्यांच्या माध्यमातून सावलीमध्ये करवीर पीठाच्या शंकराचार्यांची पाद्यपुजा आयोजित करण्यात आली. सावलीतील कारकिर्दीतील हा तसा पहिलाच मोठा कार्यक्रम. त्यामूळे आत्तापर्यंतच्या सर्व रुग्णांच्या परिवारांना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना आमंत्रण देण्यात आली. कार्यक्रम एकंदरीतच छान झाला. लोकही मोठ्या प्रमाणावर आले होते.

सावलीचे एक नातेवाईक श्री अरुण कुलकर्णी यांच्या बरोबर पापा या कार्यक्रमाला आले होते. शुभ्र पांढरा सुती कुडता आणि पायजमा साधा वेश. पुजा झाल्यावर त्यांना संपुर्ण संस्था फिरुन बघितली. रुग्णांशी गप्पा मारल्या. सेवा कशी आहे, जेवणाची प्रत, कर्मचारी/व्यवस्थापन यांचे वर्तन याबद्दल जरा खोलवर चर्चा केली. मला हे कळल्यानंतर जरा वेगळंच वाटलं. असतो एकेकाचा स्वभाव असं म्हणून मी विषय सोडून दिला.

दोन दिवसांनी मला पापांचा फोन आला. जरा बोलायचय वेळ काढून या असं म्हणाले. पापांना संस्थेला काहीतरी देणगी द्यायची असेल असा विचार मी केला. मी दोन दिवसांनी त्यांच्या ऑफिसला गेलो. ऑफिसची इमारत प्रशस्त जागेत दोन मजली होती. स्वच्छ, सुंदर, अधुनिक सुखसोयिंनी युक्त असूनही भपकेपणाचा कुठेही लवलेश नव्हता. तळमजल्यावरील ऑफिसमध्येच प्रशस्त दालनात पापा बसले होते. ऑफिसमध्येही तोच साधा वेश. समोरच गीता आणि ज्ञानेश्वरीचे ग्रंथ.

“देशपांडे, परवा मी तुमच्या संस्थेत आलो होतो. जरा जास्तच खोलात जाऊन चौकशी केली. रुग्णांशी, कर्मचार्‍यांशी बोललो. पण खरं सांगू? खुप समाधानी झालो. याप्रकारची संस्था आपल्या भागात नाहीच. ज्या आपुलकीने तूम्ही सगळ्या रुग्णांची सेवा करताय ना ती खरोखरीच वाखाणण्याजोगी आहे. काही रुग्णांना मी विचारलं तूम्ही बरे झाल्यावर घरी जाणार ना. तर दोघा आजींनी मला निक्षून आम्ही मरेपर्यंत इथेच राहणार असं सांगीतलं. हा तूमचा विजय आहे. एखाद्या व्यक्तीला संस्था घरापेक्षा प्रिय वाटणं यातंच सगळं आल. मी तुमच्या कामाने खूप प्रभावित झालो आहे.” एवढं बोलून ते थांबले. माझ्या डोनेशन मिळण्याच्या आकांक्षा एकदम पल्लवीत झाल्या.

“पण मी तूम्हाला डोनेशन वगैरे काही देणार नाहीये. तूमचं काम काही रक्कम देऊन मी लहान करणार नाहीये.” झालं. पुढच्याच क्षणी माझा विरस झाला. “मला तूमच्या बरोबर काम करण्याची इच्छा आहे. पण तूम्ही जे काम करता ते मला प्रत्यक्षात करणं शक्य नाही. अहो, साधा स्वत:चा शेंबूड काढला तर मी दोनवेळा हात धूतो आणि इथे तर तूम्ही रुग्णांच्या शी-शू पासून ओकारीपर्यंत सगळं करता. मला माहित आहे तूम्ही जे काही करत आहात त्यात मी प्रत्यक्ष काहीच मदत करु शकणार नाही. पण मला हेही माहित आहे की, तूमच्या कामाची समाजाला मोठया प्रमाणावर गरज आहे. हे काम वाढायला हवं. पण तूम्हाला कदाचित हे काम वाढवण्यासाठी मर्यादा येतील. कारण तूमचा पींड सेवेचा आहे. मी उत्तम व्यापारी आहे. मला नफा कसा कमवायचा हे माहित आहे. आपण दोघं एकत्र आलो तर एक मोठ समाजसेवेचं काम उभ राहील. तूम्ही आत्ता जो तूमचा वेळ पैसे उभारण्यात, देणग्या गोळा करण्यात घालवता आहात तो न घालवता सेवेच्या कामात कॉन्सट्रेट करा. आणि या कामासाठी लागणारी आर्थिक ताकद मी लावतो. व्यापारातून मला मिळालेला माझा नफा मी तूमच्या कामासाठी देऊ शकतो. शेवटी कसं आहे ना, गाडीची चाकं वेगात पळू शकतात मात्र त्याला पळण्यासाठीची ताकद इंजिनाकडून घ्यावी लागते आणि इंजिनाकडे ताकद असते पण ते पळू शकत नाही. दोघ एकत्र आले तर गाडी मस्त पळते.”

“आणि शेवटी समाजसेवा-समाजसेवा म्हणजे काय? तर आपल्या वाट्याला आलेले काम आपण नेटकेपणे, प्रामाणिकपणे करणे. बस ड्रायव्हरने बस वेळेवर, सुखरुपपणे चालवणे ही समाजसेवाच आहे. किराणा व्यापार्‍याने त्याचा माल योग्य मोबदला घेऊन योग्य वजन करुन वेळेवर देणे ही समाजसेवाच आहे. एखाद्या सरकारी कारकूनाने नागरीकाचे काम नीट वेळेवर कुठलीही लाच न घेता करणे ही समाजसेवाच आहे. शेतमजूराने कुठलाही टाईमपास न करता शेतात राबणे ही समाजसेवाच आहे. गायकाने उत्तम गाणे गाऊन ऐकणार्‍याचे मन प्रफुल्लीत करणे ही समाजसेवाच आहे. कारण त्यांनी तसे केले नाही तर समाजातील काही घटकांचे नुकसान होऊ शकते.” शरीरातील प्रत्येक अवयवाचे स्वत:चे असे काम असते. साधी पायाची करंगळी दुखावली तरी चालताना त्रास होतो. म्हणजेच समाजातील प्रत्येक घटकाने आपले काम व्यवस्थित केले तरच समाज नीट चालेल.

समाजसेवेची नविन व्याख्या मला समजून येत होती. एक नवा आयाम मिळत होता. माझं वैचारीक विश्व प्रगल्भ करत होता. मी पापांना मनापासून स्विकारले. पापा त्या मिटींगनंतर सावलीचा अविभाज्य भाग झाले. त्यांच्याशी वारंवार गप्पा होत राहिल्या आणि मी वैचारिकदृष्ट्या समृद्ध होत गेलो. पूढे पापांनीच सावलीचा पीराच्या वाडीचा प्लॉट दिला आणि सावलीची सध्याची इमारत उभी राहू शकली.

‘देव आपल्याला पाहिजे असेल तेच देईल असं नाही. पण तो तुम्हाला योग्य ते नक्कीच देतो.’ या उक्तीचा प्रत्यय आला.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments