नाती अशी आणि तशीही – २२

‘जिंदगी प्यार का गीत है ….’ गाण्याचे शब्द कानावर पडले आणि समस्त श्रोतृवर्ग मंत्रमुग्ध झाला. सावलीच्या नुतन इमारतीला तीन वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त सावलीच्याच स्टेजवर सर्व कर्मचारी आणि रुग्णांनी मिळून साकारलेला सांस्कृतिक कार्यक्रम चालू होता. आणि सावलीला कर्मचार्‍यांमध्ये एक जादुई आवाज मिळाला.

स्वप्नाली सावलीला जेमतेम तीन आठवड्यांपूर्वी जॉईन झाली होती. स्वप्नाली आणि तीचा नवरा सुनिल दोघंही एका लांबच्या रेफ्रन्सनी तीन आठवड्यांपूर्वी सावलीत सकाळी सकाळी येऊन बसले. दोघेही पार्शली अंध. भरपूर प्रकाश असला तर त्यांना दिसू शकतं. मुंबईला ते एका कारखान्यात कामाला होते. पदरी 3 वर्षांचं छोटं मुल. अगदी गोड. कोरोनामूळे कारखाना बंद पडला. सहा महिन्यात होती नव्हती ती बचत संपली. आणि काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला. कोल्हापूरला त्यांचे लांबचे नातेवाईक होते. काही दिवसांसाठी त्यांच्या घरी आश्रय घेतला. पण नातेवाईकही किती दिवस सांभाळणार? मग ओळख काढून नातेवाईकच या दोघांना सावलीत काही काम मिळेल का ते बघण्यासाठी आले.

”तूम्ही अपंगासाठी बरचं काही करता म्हणून विश्वासाने यांना घेऊन आलो.” ते म्हणाले. मी म्हणालो ते खरं आहे पण माझ्याकडे असणारे मी संगोपनासाठी स्विकारले आहेत आणि मुळात ते सगळे अनाथ होते म्हणून स्विकारले. आमच्या स्वावलंबन शिबिरांमध्ये येणारे अपंग हे काही ठराविक कालावधीकरता असतात. त्यांना त्यांच्या वैयक्तिक दैनंदिन दिनचर्येत स्वावलंबी केले की ते आपापल्या घरी जातात. अंधांसाठीही आम्ही मोबीलीटी शिकवण्याचे काही प्रयत्न केले. पण तेही काही दिवसांपूरतेच होते. बरं ही दोघंही शिक्षणाच्या बाबतीत जेमतेम होती. त्यांचे शिक्षण विचारात घेता त्यांना रुग्णांचे केअरटेकर म्हणून घेता आले असते. पण त्यांचे अंधत्व आड येत होते. त्यांच्या अंधत्वामूळे त्यांच्या कामाला बर्‍याच मर्यादा येणार होत्या. आणि रुग्णांच्या बाबतीत ही रिस्क घेता येणं शक्य नव्हतं.

मी त्यांना स्टाफ म्हणून स्विकारण्यास असमर्थता दर्शवणार होतो. पण सुनिल म्हणाला, “सर तुम्ही काम नाही दिलं तर आम्ही कुठं जाऊ? मला भीक मागावी लागेल. देवळं बंद असल्याने तीही मिळेल की नाही सांगता येत नाही. नातेवाईकांकडे मी कसा राहतोय माझं मला माहीत. सगळं छान चाललं होतं. नोकरी होती. थोडे पैस शिलकीत रहात होते. म्हणून बाळ होऊन दिलं. पण कोरोनामूळे सगळा सत्यानाश झाला. बघता बघता सगळी परिस्थिती बदलली. मला काहीही काम द्या. मला भीक मागायला लावू नका.” या बोलण्याने मला माझीच लाज वाटली. कोल्हापूर भिकारीमुक्त करण्याच्या वल्गना करणारा मी आज स्वाभिमानाने काम करु इच्छिणार्‍याला साधी साथ देऊ शकत नाही?”

मी त्यांच्याशी अजून बोलता झालो. बोलता बोलता लक्षात आलं की सुनिलने फार वर्षांपूर्वी मसाजचा कोर्स केला होता. फार दिवस प्रक्टिस नसली तरी त्याला थोडीफार अ‍ॅनाटॉमी माहित होती. झालं सुनिलची फिजिओथेरपी डिपार्टमेंटला नोकरी पक्की झाली. मग चर्चा करताना स्वप्नालीला विचारलं की घरातला स्वयंपाक कोण करतं? तर म्हणाली तीच करते. तीला सगळं येत. मग म्हणलं अगं तू स्वयंपाकघरात का काम करत नाहीस? ती लगेच तयार झाली. पण तीने एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी स्वयंपाक केला नव्हता. म्हणलं ते काय सवयीने जमून जाईल.

झालं आमच्या फिजिओथेरपीस्ट डॉ. राजकुमारी मॅडम आणि स्वयंपाकघरातील तीघींना केबीनमध्ये बोलावून घेतलं. त्यांना सांगीतलं की, उद्यापासून हे दोघं तुमच्या विभागात स्टाफ म्हणून जॉईन होणार आहेत. स्वयंपाकघरातील तीघींना कसं रिअ‍ॅक्ट करावं समजेना. अंध व्यक्ती स्वयंपाकघरात कसं काम करणार? काही अपघात झाला तर? त्यांना समजावलं की ती पुर्णत: अंध नाही. प्रकाश असला तर तीला अंधूक का होईना दिसतं. आणि सगळ्यात महत्वाचं ती दोघं स्वाभिमानानं काम मागतायत. त्यांना हात देणं आपलं काम आहे. नाहितर ‘भिकारीमुक्त कोल्हापूर’ असं काही करण्याचा आपल्याला काही अधिकारचं नाही.

त्यांना पटलं. दुसर्‍या दिवसापासून दोघंही येऊ लागली. त्यांना स्टाफ क्वार्टर्समधील एक फ्लॅट दिली. कांदा चिरणे, पीठ मळणे, पीठाचे गोळे करुन देणे, पालेभाजी निवडणे अशी कामं स्वप्नाली आरामात करु लागली. स्वयपांकघरातील तीघींनीही तीला छान सांभाळून घेतलं. आधी साशंक मनाने तीला काम सांगणार्‍या तिघींनाही स्वप्नालीने तीच्या कामं शिकण्याच्या तयारीने लवकरच जिंकून घेतलं. सुनिलचा काही प्रश्नच नव्हता. त्याला डॉ. राजकुमारी यांनी मॅन्युअली करुन घेण्याचे सगळे व्यायामप्रकार हळूहळू शिकवले. आणि तोही सराईतपणे रुग्णांचे व्यायाम घेऊ लागला.

दोघंही बोलायला लाघवी होते. त्यामूळे इतर कर्मचार्‍यांमध्ये लगेचच मिसळले. त्यामूळे ते काम करत असताना त्यांच्या छोटयाला सांभाळायला अनेक मामा आणि मावशा होत्या. आणि सावलीच्या वर्धापनदिनाची तयारी सुरु झाली. सावलीतील इव्हेन्टबद्दल अनभिज्ञ असलेल्या स्वप्नालीने भीतभीतच “मी पण एक गाणं म्हणू का? असं मानसीला विचारलं. मानसीने तील गाणं कसं म्हणतेस ते थोडसं गाऊन दाखवायला सांगीतल. तीच्या गाण्यानं मानसी पक्की भारावून गेली. मला रात्री म्हणली ”बाबा, उद्या तूला सरप्राईज आहे. उद्याच्या कार्यक्रमाला चारचांद लावणारं गाणं तूला ऐकायला मिळेल.” मी फार कॅज्युअली घेतलं.

आणि स्वप्नालीचा स्वर कानावर पडला. सावली परिवारात खरचं एक स्टार कलाकार अ‍ॅड झाला होता.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments