नाती अशी आणि तशीही – २१

कोविड 19 – जगाला पडलेलं एक भयंकर कोडं. कोरोनाच्या या व्हायरसमूळे संपुर्ण जगच स्तंभीत झालं. सुरवातीला तर अनेक प्रश्न होते. आपापल्या परिनं प्रत्येकाने त्यावर उपाय शोधायला सुरवात केली होती. सुरवातीलच्या अंदाजाप्रमाणे 3 आठवडे प्रसाराची चेन तोडली की ‘व्हायरस गायब‘ असं सोप्पं गणित होतं. त्याप्रमाणे देशातील प्रत्येकानेच अगदी मनापासून संचारबंदी स्विकारली. बाहेर विनाकारण फिरणार्‍या मंडळींना पोलीसांनी दिलेले तडाखे/शिक्षाही मनापासून स्विकारल्या. एरवी पोलिसांबद्दल येणारा राग आता आदरामध्ये बदलला होता. डॉक्टर, नर्सेस, औषधदुकानदार, पोलिस आणि सफाई कर्मचारी सगळेच जनसामान्यांच्या आदराला पात्र ठरले होते.

सगळे व्यवसाय/उद्योग बंद झाले तरी आम्हाला सावली बंद करणे शक्य नव्हते. इतक्या मोठ्या संख्येने असलेले परावलंबी रुग्ण, त्यातील बर्‍याच रुग्णांचे कोणीही नाही अशांचा सांभाळ करावाच लागणार होता. आणि त्यांना सांभाळणं म्हणजे कर्मचारीही लागणार होते. बस, रिक्षा सगळं बंद. बर्‍याच गावांनी, वस्त्यांनी, कॉलनीजनी आपापले रहिवाशांसाठी तीव्र संचारबंदी लागू केली होती. मग आम्ही सर्व कर्मचार्‍यांना सावलीमध्येच रहायला येण्याचं आवाहन केलं. पुरुष मंडळींना काही प्रॉब्लेम नव्हता ते लगेच तयार झाले. पण महिलावर्ग….. त्यांना घर, मुलं, आजारी सासु-सासरे सगळेच प्रश्न होते. आणि मग समस्त महिला कर्मचारी वर्ग आपल्या मुलाबाळांसह सावलीत रहायला आला.

आयुष्यात कधीही न अनुभवलेला 3 आठवड्यांचा मुक्त श्वास अनेकींनी घेतला. नवर्‍याची कटकट नाही. घरी गेल्यावर करायची धुणी-भांडी, स्वयंपाक नाही. फक्त ड्युटी करायची आणि मजेत रहायचे. सुरवातीला चार दिवस मज्जेत गेले. काहींनी भरपूर झोपून घेतलं, शिळोप्याच्या गप्पा मारल्या. येथेच्छ टि.व्ही. बघितला. ग्रामिण भागातील महिलांच्या स्वातंत्र्याच्या कल्पना इथे संपल्या. मग चार दिवसांनी कंटाळा यायला लागला. कारण एक नेहमीची ड्युटी संपल्यानंतर काही कामच नाही. काहीजणींनी मग स्वयंपाकघरात, वॉर्डमध्ये इतर जणींना मदत करायला सुरवात केली. त्यामूळे सगळ्यांची कामे लवकर आटपू लागली. आणि मग सगळ्याच मोकळ्या. उरलेल्या वेळात करायचे काय? आरामाची पण सवय असावी लागते ना.

इथे आमचा कस लागला. स्टाफ जर बोअर होवू लागला तर मोठाच प्रश्न निर्माण होणार होता. मग गाण्यांच्या भेंड्या, कॅरम असे उद्योग सुरु झाले. पण सगळ्यांना खिळवून ठेवता येईल असं काहीतरी करणं भाग होत. विचार करता करता क्रिकेटच्या मॅच घेतल्या तर असा विचार आला. आता क्रिकेट हा असा खेळ आहे की यात सोशल डिस्टंसींग पुर्णपणे पाळलं जात. दुसरं म्हणजे प्रत्येकाने क्रिकेट कधीतरी पाहिललं असतं त्यामूळे न खेळणार्‍या माणसालाही थोडया प्रयत्नाने शिकवता येण शक्य होतं.

क्रिकेटची कल्पना मांडल्यावर नेहमीप्रमाणे पुरुष कर्मचारी आनंदाने तयार झाले. परंतु अनेक महिलांनी क्रिकेट निटसं पाहिलंही नव्हतं. तरीसुद्धा सर्व महिला कर्मचार्‍यांना टीममध्ये सहभाग घ्यायला लावला. नियमच तसा केला होता. प्रत्येक टीममध्ये किमान 4 महिला कंपलसरी होत्या. बघता बघता 8-8 प्लेअर्सच्या 8 टीम तयार झाल्या. अंडरआर्म क्रिकेटची मिनी आय.पी.एल. सावलीत खेळली जाणार होती. ड्युटी संपल्यावर रेग्यूलर प्रॅक्टीस सुरु झाली. बॅटींगमधली मजा, बॉलिंग करतानाचा जोश, विकेटकिपरची अचुकता आणि फिल्डींगमधली चपळता याचा सर्वजणी अनुभव घेऊ लागल्या. सुरवातीला अनुत्सुक असणार्‍या, वारंवार बोलावून आणाव्या लागणार्‍या महिला आता स्वत:हून दिड-दोन तास प्रॅक्टिस करु लागल्या. सगळी तरुण मुलं या महिलांना त्यांच्या परीने क्रिकेटमधले बारकावे समजावून सांगू लागले. डुज आणि डोन्टस् घोटवून घेऊ लागले.

आणि बघता बघता टुर्नामेंटचा पहिला दिवस उजाडला. रोज तीन मॅच याप्रमाणे सहा दिवस हंगाम चालणार होता. सावलीच्या मेडिकल ऑफिसर डॉ. कुराडे आणि फिजिओथेरपीस्ट डॉ. राजकुमारी यांनी अंपायरपद सांभाळले. अमीर, सचीन कॉमेंट्रेटर तर मानसीने रेकॉर्डकिपरची जबाबदारी उचलली. गौतम, तातू यांनी चीअर-अप करण्यासाठी खास पिपाणी आणली होती. पहिलीच मॅच प्रचंड फरकाने जिंकली गेली. यामूळे सगळ्याच टीम्समध्ये जोश आला. प्रत्येक टीमचे कॅप्टन्स आपापली रणनिती, दुसर्‍या टीमचे प्लस पॉईंटस्, कमतरता यावर काम करु लागले. कॉमेंट्रेटर त्यांच्या त्यांच्या परीने प्रत्येक खेळीवर विनोदी भाष्य करत होते. त्या त्या खेळाडूबद्दल बोलताना त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीला अनुसरूनही कॉमेंटस् रंगत आणत होत्या.

या सगळ्याचा एकत्रीत परिणाम सगळ्याच टीमच्या वाढत्या जोशात झाला. प्रत्येक टीम जिंकण्यासाठी कसोशिने प्रयत्न करत होती. स्पर्धेतील चुरस वाढत होती. सुरवातीला नवख्या असणार्‍या सर्व महिला कर्मचारी आता पक्क्या खेळाडू झाल्या होत्या. होता होता अंतिम सामना झाला. आठ टीममधील संग्रामदादांची टीम जिंकली. आणि एक सोहळा संपला.

स्पर्धेबद्दल बोलताना एक मावशी म्हणाली, “जेंव्हा माझा नवरा आणि मुलगा तासन्तास टि.व्ही.समोर बसुन क्रिकेट बघायचे मला जाम राग यायचा. वाटायचं, काय रिकामपणाचे धंदे आहेत. पण आता कळलं, क्रिकेट काय चीज आहे ते !!!

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments