नाती अशी आणि तशीही – १८

“किशोर, सि.पी.आर. मध्ये एक महिला अ‍ॅडमिट झाली आहे. गेल्या आठवड्यातील पूराने तीचं घरदार सगळं वाहून गेलं. गुरंढोरं डोळ्यासमोर वाहून गेली. पाण्याचा प्रलय बघून तीला जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. ती पुर्णपणे ‘शुन्यात’ गेली आहे. तिच्या हातापायातले त्राणचं काय पण वाचाही गेली आहे. कुठल्याही भावना व्यक्त करण्याच्या पलिकडे गेली आहे. सि.पी.आर. मध्ये तीच्यावर उपचार केले आहेत. पण आता गरज आहे सर्वांगिण सुश्रुषेची. तुझ्या अपरोक्ष तुझ्या वतीने मी ही जबाबदारी स्विकारली आहे. मला माहित आहे हे आव्हान तूच पेलू शकतोस.” कोल्हापूरमधील एका ज्येष्ठ्य डॉक्टरांनी मला फोन करुन सांगितलं. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता.

दोन दिवसांनी शांता सावलीत दाखल झाली. साधारण तिशीतली. पुर्ण निर्विकार चेहरा. कुठलीही भावना नाही. चालणं-फिरणं, जेवणं, शी-शू कसलीच भावना नाही. हे एक आव्हानच होत. सावलीच्या मेडिकल ऑफिसर, क्लिनीकल सायकॉलॉजीस्ट आणि फिजिओेथेरपीस्टनी संपूर्ण केस-स्टडी, पेशंट हिस्ट्री अभ्यासली. पुरातून वाचलेला तिचा नवरा आणि भावाशी डिटेल चर्चा केली. तिचा स्वभाव, सवयी, आवडी-निवडी जाणून घेतल्या. एका संयुक्तिक प्रयोगाला सुरवात झाली.

शांताची सेवा करण्यासाठी निवडक कर्मचार्‍यांना ट्रेन तयार केलं गेलं. जरा गप्पीष्ट, समवयीन मावशा तिची काळजी घेऊ लागल्या. तिला अंघोळ घालताना, आन्हिकं आवरताना त्या इकडच्या-तिकडच्या गप्पा मारु लागल्या. सुरवातीला शांताकडून काही प्रतिसाद मिळत नसायचा. पण निराश न होता चर्चांच गुर्‍हाळ त्या चालूच ठेवायच्या आणि हे सगळं करताना वागण्या-बोलण्यात अगदी सहजपणा राहील याची दक्षता घेत होत्या. यामूळे सुरवातीला अगदी निर्विकार असणारी शांता अधूनमधून बोलण्याला प्रतिसाद देऊ लागली. समुपदेशनासाठी किंवा थेरपीजसाठी लागणारी ग्रहणक्षमता हळूहळू वाढू लागली होती.

सायकिअ‍ॅट्रीस्टनी तिची मानसिक अवस्था सुधारण्यासाठी विविध औषधांची उपाययोजना केली होतीच.  तर दुसर्‍या बाजूला फिजिओथेरपीस्टनी तिचे व्यायाम घ्यायला सुरवात केली. डॉ. राजकुमारी यांनीही आपल्या दोन असिस्टंटना ‘शांताला चालवणे’ हे आपल्यासाठी चॅलेंज आहे आणि आपण ते पुर्ण करायचेच असे ठसवून ’पुर्णपणे चार्ज’ केले होते. मसल्स स्टिम्युलेशन तसेच पॅसिव्ह एक्सरसाईजेसद्वारे उपचार सुरु झाले. यामूळे हळूहळू का होईना शांतामध्ये थोडीशी जागृतता येऊ लागली.

यानंतर क्लिनीकल सायकॉलॉस्टीनी विविध मानसशास्त्रीय थेरपीज, समुपदेशन सुरु केलं. तिच्या गत आयुष्यातील आठवणी, घडलेले चांगले-वाईट प्रसंग याची माहिती कुटुंबियांमूळे आमच्याकडे होतीच. शांताचं शिक्षण कमी असल्याने आणि ‘घर एके घर’ असंच आयुष्य गेल्याने बोलण्याच्या विषयांना मर्यादा येत होत्या. पण तरीही सायकॉलॉजीस्टनी निकराने प्रयत्न सुरु ठेवले होते. दररोज संध्याकाळी सावलीच्या लॉनवर कधी अंताक्षरी, कधी गाणी, कधी वन मिनिट गेम्स असे काहीतरी कार्यक्रम घेतले जातात. सोशलायझेशनचा तो एक उत्तम मार्ग आहे. त्याचप्रमाणे दर दहा-पंधरा दिवसातून एखादा चांगला सांस्कृतिक कार्यक्रमही घेतला जातो.

या सगळ्याचा एकत्रित परिणाम लवकरच दिसू लागला. तीन महीन्यांमध्ये शांताच्या आहारामध्ये जाणवण्याइतपत सुधारणा झाली. ती स्वत:च्या हाताने जेवू लागली. वॉकरच्या सहाय्याने हिंडू लागली. अंघोळीला नेवून बसवले की स्वत: अंघोळ करु लागली. शी-शूचे भान आले. एखादा प्रश्न विचारला तर हातवार्‍यांनी, हावभावांनी उत्तर देऊ लागली. पण अजून बोलता येत नव्हते. आमचे प्रयत्न चालूच होते. राहून राहून अजून कुठेतरी एक पोक़ळी जाणवत होती. खुप विचार केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की, तिच्या कुटुंबियांनी तिच्याकडे दुर्लक्षच केल्यासारखे होते. या तीन महिन्यांत तिचा नवरा आणि भाऊ फक्त दोनदाच येऊन गेले होते. साधी चौकशीही करत नव्हते. जरा खोलात चौकशी करता समजलं की नवर्‍याने दुसरा घरोबा केला होता. आणि भावाला आर्थिक भार पडेल अशी भिती होती. या दोन्ही गोष्टी आम्ही तिच्यापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. आज ना उद्या तिला त्या कळल्यावर तिची प्रतिक्रिया काय होईल याची कल्पना करवत नाही. पण आम्ही नियतीचा हा घाव सोसण्यासाठी तिला सक्षम बनवण्याचं ठरवलं. आमच्या हातात फक्त एवढचं तर होत.

समाजातील काही जागरुक पत्रकार, समाजसेवक मात्र आठवणीने भेट देत असत. शांताच्या आयुष्यात जाणवलेल्या या नव्या पैलूमूळे आम्हाला आता तिच्या शारीरिक आणि मानसिक उभारीबरोबरच तिच्या सबलीकरणाचीही गरज भासू लागली. तिने नूसतं पुर्ववत होणंच गरजेचं नसून आर्थिक सक्षम होणही क्रमप्राप्त होतं.

तिला बोलतं करण्यासाठी तिच्याशी कायम बोलत राहणं गरजेच होतं आणि आमच्या मावश्या हे काम कसोशिने करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून आता शांता स्वतंत्ररित्या चालू लागली आहे. ‘हो’, ‘नाही’, ‘जेवले’, ‘मस्त’ असे शब्दही उच्चारु लागली आहे. या बरोबर आता तिला भाजी निवडणं, धान्य निवडणं अशी कामंही देण सुरु केलं आहे.

लवकरच तिला कापडी पिशव्या शिवणं, मेणबत्त्या/उदबत्त्या तयार करणं, पापड तयार करणं यापैकीं काही व्यावसायिक प्रशिक्षण देणार आहोत. अजून दोन-तीन महिन्यांमध्ये शांता समर्थपणे वावरु लागेल अशी अपेक्षा आहे.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments