नाती अशी आणि तशीही – १७

एखाद्याच्या त्रासाचीही सवय होते ना? इतकी की, तो त्रास संपल्यावर त्याचीही एक पोकळी तयार होते. तस झालं.

                विजूभाई साधारण तीस वर्षांपूर्वी कोल्हापूरमधील एक आघाडीचे गुळ व्यापारी. मार्केट यार्ड परिसरात त्यांच्या नावाचा प्रचंड दबदबा. राजस्थान-गुजरातपर्यंत गुळाचा व्यापार पसरलेला. पैसा प्रचंड. आणि पैशाबरोबर येणारी मग्रूरीही. तीस वर्षांपूर्वी सिझनला येणारा पहिला हापूस दोन हजार रुपये पेटी या दराने घेणारा माणूस म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. मग्रुरीमूळे ऑफिसमधील कर्मचार्‍यांबरोबर तिरसटपणे बोलणे, यार्डातील मजूरांना तूच्छतेने वागवणे याबरोबरच घरातही ‘हम करे सो कायदा’ अशी वागणूक असायची. घरात मोठा भाऊ असल्याने धाकटा भाऊ-त्याचे कुटूंबही हे सहन करायचे. बायकोला सहन करण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. एकूलती एक मुलगी लहान होती. घरात आर्थिक संपन्नता होती पण कोंडलेपण होतं.

याचा व्हायचा तो परिणाम झाला. संधी मिळताच भाऊ वेगळा झाला. त्याने त्याचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. घरात आता विजूभाई, पत्नी आणि मुलगी असे तिघंच उरले. विजूभाई दिवसभर व्यवसायात बिझी असायचे. घरी उशीरा येणे, सकाळी लवकर जाणे यामूळे त्यांचा संबंध मुलीशी फार कमी यायचा. सुट्टीच्या दिवशीही त्यांच्या स्वभावामूळे ते फारसे कोणाशी प्रेमाने बोलायचे नाहीत. त्यामूळे मुलीशी त्यांचे भावनिक बंध म्हणावे तसे जुळलेच नाहीत. बायकोही बर्‍यापैकी अबोल झाली. एकंदर काय तर घरात घरपण असं काही राहीलं नाही.

वर्ष सरली. मुलीला चांगलं स्थळ आलं आणि विजूभाईने मुलीचं लग्न बडोद्याच्या एका व्यापारी कुटुंबात करुन दिलं. केवळ मोठेपणा आणि पैसा बघून दिलेल हे स्थळ नको तितकं परंपरावादी होतं. मुलगी संसाराच्या रहाटगाडग्यात अडकली. तिच्या आईने भोगलेले भोग थोड्याफार फरकाने आता तिच्याही वाट्याला आले. विजूभाईंच्या बायकोला हे जाणवल्यानंतर ती मुलीच्या काळजीने झुरु लागली. त्यातच लहानशा आजाराचे निमित्त होवून देवाघरी गेली.

विजूभाई आता एकटे राहू लागले. काळाची चक्र फिरली. कच्छच्या भुकंपात विजूभाईंचं होत्याचं नव्हतं झालं. जे काही थोडफार वाचलं ते शेअरमार्केटच्या पडझडीत गमावलं आणि विजूभाई आर्थिक आरिष्टात अडकले. फाटक्या तोंडामूळे कोणी मित्र म्हणून नव्हतेच. कुठल्याही नातेवाईकांशी सलगी नव्हती. त्यामूळ आर्थिक संकटाचा सामना करताना विजूभाईंबरोबर कोणीही नव्हते. ते अगदी एकटे पडले. इतकं होऊनही विजूभाईंची मनोवृत्ती काही बदलली नाही. राहतं घर आणि गोडावून विकून त्यांनी डोक्यावरचं कर्ज फेडलं. आणि एकेकाळचा हा राजा अक्षरश: रस्त्यावर आला. भावाला ही परिस्थिती समजल्यावर त्याने विजूभाईंना घरी येण्याची विनंती केली. पण परत ईगो आडवा आला. तडजोड म्हणून भावाने विजूभाईंची सोय एका वृद्धाश्रमात केली.

दुर्दैवाचा फेरा एवढ्यावर संपला नव्हता. विजूभाईंना माईल्ड पॅरालेसीसचा अ‍ॅटॅक आला. आणि त्यानंतर सावलीत दाखल केले गेले. लवकरच विजूभाई त्यांचे रोजचे व्यवहार कमीतकमी मदतीने करु लागले. पण त्यांची मग्रूरी काही कमी झाली नव्हती. त्यांच्या वॉर्डमध्ये प्रत्येक गोष्टीत त्यांना अग्रक्रम द्यावा लागे. अंघोळीला त्यांना आधी न्यायचे, नाष्टा, चहा, जेवणाचे ताट सगळ्यात आधी त्यांना द्यायचे. नाही दिले तर त्यांना प्रचंड राग यायचा. त्यांच्या आधी कुणाला अंघोळीला घेतले तर त्या दिवशी ते अंघोळच करायचे नाहीत. चहा-नाष्टा आधी नाही दिला तर त्या दिवशी उपाशी रहायचे. ‘मी म्हणजे कोणीतरी ग्रेट आणि बाकीचे पेशंट म्हणजे दयनीय’ अशी काहीतरी त्यांची भावना असायची. त्यांच्या वागणूकीतून, देहबोलीतून ती कायम दिसायची.

कर्मचार्‍यांना त्यांची ही सवय माहित असल्याने ते काळजीने प्रत्येक गोष्टीत त्यांना अग्रक्रम द्यायचे.  भावाशी या बाबतीत चर्चा व्हायची. तो हात जोडून विनंती करायचा. “कृपा करा. त्याला आहे तसा सांभाळा. आम्ही आयुष्यभर त्याला असाच सहन करत आलोय.” आम्हीही ‘जाऊदे, असतो एखाद्याचा स्वभाव. आता या वयात स्वभाव कसा बदलणार?’ असा विचार करून गप्प बसायचो. बाकी इतर कोणाला त्यांचा काही त्रास नसायचा. ते त्यांच्याच मस्तीत असायचे. सावलीला भेट देणारे काही जूने व्यापारी, उद्योजक विजूभाईंना सावलीत बघून हळहळायचे. पण कोणी फारशी ओळख दाखवायला जायचे नाहीत. त्यांचा दराराच तसा होता.

एकदा नेमका त्यांच्या वॉर्डला नविन कर्मचार्‍याची नेमणूक झाली. त्याला काही हे रसायन माहित नव्हतं. त्याने चुकून दुसर्‍या पेशंटला जेवणाचं ताट यांच्याआधी दिलं. झालं. विजूभाई तडकले. त्यांनी त्यांच्यापूढे आलेलं ताट ताडकन् भिरकावून दिलं. इतकं की समोरच्या पेशंटच्या अंगावर गरम आमटी भात पडला आणि तो भाजला. हे कुठेतरी अती झालं होतं. मी ताबडतोब विजूभाईंच्या भावाला बोलावून त्यांला समजावून सांगायला सांगितलं. तोही जरासा चिडला. त्यांने विजूभाईंना जरा कडक शब्दातच सुनावलं. कदाचित आयुष्यभर भोगलेल्या दडपशाहीचा स्फोट झाला होता. विजूभाईंना हे अपेक्षित नव्हतं.

त्या दिवसापासून विजूभाईंनी अन्नपाणी सोडलं. वागण्यात मवाळपणा आला. पण अन्नग्रहण बंद. सगळ्यांनाच हा चटका होता. त्यांना सगळ्यांनी अगदी भावानेही जेवणासाठी विनवण्या केल्या. पण नाही. त्यांनी मला बोलवून सांगीतलं, ”मी भरपूर जगून घेतलं. अगदी मस्तीत जगलो. कुणाचं वाईट केलं नाही पण बहूतेक कुणाचं चांगलही केलं नाही. आता एकच इच्छा जसा मस्तीत जगलो तसा मस्तीतच मरु द्या.”

जवळपास दहा दिवसांच्या अन्नत्यागानंतर विजूभाईंनी यात्रा संपवली. एका वादळाचा अस्त झाला.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments