नाती अशी आणि तशीही – १६

अरुणच्या आईच्या रडणं थांबत नव्हत. प्रचंड आनंद, सोसलेल्या वेदना, लोकांचे ‘बिच्चारा’ म्हणून झेललेले दृष्टीक्षेप या सगळ्यांच मिश्रण त्या अश्रुंमधून येत होतं. अरुणच्या आईचं माहेर कोल्हापूर. सासर मुंबईला. नवरा मस्त बँकेत नोकरीला. आर्थिक स्थिती उत्तम. एकूलता एक मुलगा आता सहावीत शिकत होता. एकंदरीतच सगळं छान चाललं होत.

दिवाळीच्या सुट्टीत कोल्हापूरला आले. आणि अरुणला ताप आला. आता ताप येणं सामान्य गोष्ट आहे. नेहमीच्या डॉक्टरांना दाखवून औषधे घेतली. दोन दिवस आराम केला की बरा होईल असा सर्वमान्य विचार केला गेला. पण ताप बरे होण्याचे नाव घेईना. म्हणून चार दिवसांनी हॉस्पीटलला अ‍ॅडमिट केले. तरी ताप कमी होईना. अंगातील त्राणही कमी होऊ लागले. बर्‍याच तपासण्या झाल्यानंतर अरुणला ‘जी.बी. सिंड्रॉम’ हा दुर्धर आजार झाल्याचे निष्पन्न झाले. या आजारात विषाणू शरीराच्या मज्जासंस्था निकामी करण्याचा प्रयत्न करतो. परिणामी हातापायातील ताकद कमी होते. शरीराचा तोल सांभाळणे कठिण होते. काहीवेळा लघवी-संडासचा कंट्रोल नाहीसा होतो. एकट्याने फिरणे दुरापास्त होते. पेशंट बेडरीडन होतो.

अरुण बघताबघता बेडरीडन झाला. चालणं-फिरणं सोडा पण उठून बसणं, जेवणं सगळच परावलंबी झालं. ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’ अशी परिस्थिती अरुणच्या घरात निर्माण झाली. वैद्यकिय उपचारांबरोबरच आता नवस-सायास, व्रतं सुरु झाली होती. जो जे उपाय सुचवेल ते सुरु झाले. आणि अचानक आमच्या एका फिजिओथेरपीस्ट मित्राने अरुणच्या कुटुंबियांना ‘सावली’मधील हायड्रोथेरपीबद्दल सुचवले. मुंबईतील डॉक्टरांनी त्यांना पाण्याच्या टँकमध्ये चालण्याबद्दल सुचवले होते. अनेक उपायांपैकी एक म्हणून आधी थोडसं दुर्लक्ष केलं गेलं. पण आता अरुणच्या वडिलांना हायड्रोथेरपीबद्दल गुगल / यू ट्युबवर माहिती घेतली. आणि त्यांच्यात एक आशा जागली. बघूया करुन म्हणत अरुणला सावलीत आणलं गेलं. सावलीत आल्यानंतर त्यांना हायड्रोथेरपीची इत्यंभूत माहिती देण्यात आली. सध्यातरी गरम पाण्याचा हा महाराष्ट्रातील एकमेव टँक आहे असं त्यांना समजलं.

गरम पाण्याच्या टँकमध्ये पाण्याचेच गुणधर्म वापरुन आधूनिक फिजिओथेरपी दिली जातात. पाण्यात आपलं वजन हलकं होत त्याचप्रमाणे पाण्यामध्ये हालचाल करण्यास हवेमध्ये हालचाल करण्यापेक्षा जास्त शक्ती लागते. म्हणजेच पाण्यामध्ये रुग्णाच्या पायांना शरीराचा भार कमी उचलावा लागतो मात्र हालचालीस जास्त शक्ती लागल्याने व्यायाम जास्त होतो. याचा वापर करुन रुग्णाचे अनेक व्यायामप्रकार घेतले जातात. 32 ते 360 तापमानाचे पाणी असल्याने स्नायूंची ताठरता कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण उत्तम होते. असे अनेक फायदे होतात. सर्व प्रकारच्या स्नायु/मणके/सांधेदुखी तसेच संधीवात,   स्पोर्टस् इंज्युरीमध्ये हायड्रोथेरपी हा रामबाण उपाय ठरतो. त्याचप्रमाणे गुडघेबदल/सांधेबदल/मणक्यांच्या शस्त्रक्रिया हायड्रोथेरपीमूळे टाळता येऊ शकतात.

अरुणला हायड्रोथेरपी सुरु केली. एक दिवसाआड साधारण 45 मिनिटं असे सेशन असायचे. त्याचबरोबर रोज सकाळ-संध्याकाळ असे दोनवेळा फिजिओथेरपीचे सेशन व्हायचे. आश्चर्य म्हणजे हातपायही हलवू न शकणारा अरुण तिसर्‍या सेशनलाच पाण्यामध्ये पोहू लागला. पाण्यातून बाहेर आल्यानंतर मात्र हालचालीला त्याला त्रास होतच होता. पण आता आशेचा मोठ्ठा किरण दिसू लागला होता. अरुणची आई अगदी वेळेवर अरुणला हायड्रोसेशनला आणू लागली. अरुणमध्ये हळूहळू का होइना पण प्रगती दिसू लागली होती. साधारण सव्वा महिन्यानंतर अरुण पायाची मांडी घालून बसू लागला.  आता अरुणला स्वत:लाही उत्साह वाटू लागला होता. आपण पूर्वीसारखे हिंडणार-फिरणार ही खात्री आता त्यालाही वाटू लागली. तोही जोमाने व्यायामांना प्रतिसाद देऊ लागला.

अरुणच्या मनाने उचल खाल्ल्याने प्रगती आणखी वेगाने होऊ लागली. आता अरुणचे नातेवाईकही सेशन चालू असताना अधूनमधून येऊ लागले. हायड्रोथेरपी हा अधूनिक विज्ञानाचा चमत्कारी अविष्कार आहे हे त्यांनाही पटू लागलं. तीन महिन्यांच्या प्रयत्नांनी अरुण आता समाधानकारक हालचाल करु लागला होता. वॉकरच्या सहाय्याने हिंडायला लागला. दोन-दोन तास एका जागी बसू लागला होता. जेवणं, टि.व्ही बघणं, वाचन आता पहिल्यासारखं जमू लागलं होत.

आणि आज अरुण कुठलाही आधार न घेता जवळजवळ वीस पावलं चालला. अगदी पहिल्यासारखा आणि आईचा बांध फूटला. आमची हायड्रोची टीम, फिजिओ टीम हा क्षण डोळ्यात साठवत होती… आयुष्यभरासाठी.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments