नाती अशी आणि तशीही – १५

सुधाताई एक संतृप्त जीव. ‘जीगरबाज’ हाच शब्द त्यांच्या जवळपास पोहोचतो. लग्नानंतर आठ वर्षातच विधवा झाल्या.  त्यांचे पती जमिनीच्या व्यवहारांची   कागदपत्रे तयार करणे, सर्च रिपोर्ट घेणे, गुंठेवारी, विनाशेती प्रमाणपत्र बनवणेसारखी महसूल खात्याशी / कोर्टाशी संबंधीत कामे करायचे. जेमतेम दहावी झालेल्या सुधाताई मराठी टायपींग शिकल्या होत्या. त्या या कामांमध्ये पतीला मदत करायच्या. पती गेल्यानंतर त्यांनी पतीचे काम पहाण्यास सुरवात केली. साधारण 40 वर्षांपूर्वी पुर्णपणे पुरुषांची मक्तेदारी असणार्‍या या क्षेत्रात त्यांचा वावर सुरु झाला.

कमी शिकल्या असल्या तरी व्यवहारज्ञान छान होतं. वाचनाची सवय त्यांनी लावून घेतली. कायद्याची पुस्तकं, नवनवीन येणारे जी.आर./नियम यांचा अभ्यास, कायद्यातील त्रूटी यांचा बारकाईने अभ्यास करु लागल्या. दिवसभर या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये, वेगवेगळ्या गावातील तलाठ्यांच्या ऑफिसमध्ये चकरा मारणे, त्या त्या ऑफिसमधल्या कर्मचार्‍यांशी सुसंवाद साधणे, प्रसंगी गोड बोलून, कधी पैसे देऊन कामं करुन घेणे या बाबतीत त्या आता पारंगत झाल्या. कुठलीही अडिनडीची केस आली की त्यातले बारकावे अभ्यासायचे, सुसंगत कायद्यामधल्या प्रोव्हीजन्स बघायच्या, त्यातनं काही मार्ग निघतो का बघायचा या बाबतीत हीरहीरीने काम करायच्या.

हळूहळू त्यांच्या कायद्याच्या ज्ञानाची किर्ती पसरु लागली. बरेच लोक महसून, पी.डब्ल्यु.डी., पाटबंधारे, नगरविकास, जमीनमोजणी आदी खात्यातील अडचणीच्या केसेस घेऊन त्यांना संपर्क साधू लागले. नवशिके वकिलमंडळीही त्यांचा सल्ला घेऊ लागले. एका अल्पशिक्षित महिलेने या पुरुषप्रधान क्षेत्रात निर्माण केलेला दबदबा वाखाणण्याजोगा होता. या क्षेत्रातील मंडळींच्या चर्चेचा-अभिमानाचा विषय होता.

एकीकडे व्यावसायिकरित्या स्थिरावत असताना सुधाताईंचं मुलांच्या शिक्षणाकडेही बारकाईने लक्ष होतं. अर्थात मुलांनाही आईच्या मेहनतीची जाण होती. सुदैवाने मुलगा आणि दोन्ही मूली छान शिकल्या. पदवीधर झाल्यावर मुलाने आईबरोबरच काम करणं सुरू केलं. तोही स्थिरावला. यथावकाश मुलींची योग्य स्थळं बघून इतमामाने लग्न करुन दिली. मुलाचेही लग्न झालं. सगळं सुरळीत सुरु होत. आर्थिक संपन्नता आली होती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपन्नतेबरोबर घरात शांतता, सुख सगळं होत.

पण शेवटी निसर्गाला काही कारण लागतंच. सुधाताईंना संडासमधून रक्त पडायला लागलं. सुरवातीला मुळव्याध असेल म्हणून लाईटली घेतलं गेल. पण त्रास खुप वाढू लागल्यानंतर तपासण्या करुन घेतल्या. आणि त्यांना गुद्द्वाराचा कॅन्सर निष्पन्न झाला. सुधाताईंनी केमोथेरपी/रेडिओथेरपीला निक्षून नकार दिला. आहे ती परिस्थिती स्विकारणे आणि रडत न बसता त्यातून मार्ग काढणं हेच तर त्या आयुष्यभर करत आल्या होत्या. त्यांनी कॅन्सरही स्विकारला. डॉक्टरांकडून किती वेळ त्यांच्याकडे आहे हे जाणून घेतले. साधारण सहा महिने होते त्यांच्याकडे.

सगळ्यात आधी त्यांनी मृत्युपत्र तयार केले. आपले सगळे दागदागिने त्यांनी मुलींना आणि सुनेला स्वहस्ते वाटून टाकले. स्थावर मालमत्ता, बँकेतील पावत्या सगळ्यांची यथोचित वाटणी केली. एक मोठी रिटायर्ड पार्टी ठेवली. पार्टीला व्यवसायातील सगळे सबंधीतांना बोलावले. कार्यक्रमामध्येच “आता मी रिटायर्ड होते आहे. मला जशी साथ दिली तशीच साथ, तसाच आशिर्वाद मुलालाही द्या.” असे आवाहन केले. आणि निग्रहाने खरोखरच सगळा कारभार मुलाच्या सुपुर्द केला.

ऑफिस बंद झाल्यावर इतके दिवसांच्या राहिलेल्या इच्छा पुर्ण करायला लागल्या. रोज एक सिनेमा बघणे, घरच्यांना नवनविन पदार्थ स्वत:च्या हाताने करुन खाऊ घालणे, मित्र-मैत्रिणींची मैफिल जमवणे सारखे उद्योग सुरु केले. इतके दिवस कामाच्या मागे हे सगळं राहून गेलं होत. तीन महिने होऊन गेले. आता सुधाताईंचा अधूनमधून संडासवर कंट्रोल राहिला नव्हता. मग हट्टाने स्वत:हून सावलीत दाखल झाल्या.

सावलीमध्येही सगळ्यांशी मस्त जमवून घेतलं. गप्पांचा फड जमवायच्या. पण विशेष म्हणजे या गप्पांमध्ये गॉसिपींगला, टींगलटवाळीला जराही स्थान नव्हतं. त्यांच्या सहवासात सगळ्यांना थोरलेपण जाणवायचं. कुणी रडत कुधत बसलेलं त्यांना अजिबात आवडायचं नाही. त्याला आयुष्य एकदाच आहे ते कसं समरसून जगायचं याबद्दल सातत्याने समजवायच्या. आणि हे समजावताना त्यांच्या आजारपणाचा जराही उल्लेख नसायचा. सगळ्या पेंशटबरोबर अंताक्षरी, हाऊजी, कॅरम, बुद्धीबळ, पत्ते खेळायच्या आणि खेळायलाही लावायच्या. वावरणं इतकं सहज असायचं की मला राजेश खन्नाच्या ‘आनंद’ची आठवण यायची. जगणं इतकं बहाद्दुरीनं आणि मरणही बहारदार.

आणि तो क्षण आला. त्यांच त्यांना जाणवलं की आता काही तासच आहेत. मला जवळ बोलावलं म्हणल्या “एक शेवटची इच्छा राहीली आहे. जरा विचित्र आहे पण मनापासून आहे.” म्हणलं “सांगा तर.” “मला फेशियल करायचं आहे. आयुष्यात कधी केलं नाही. म्हणलं स्वर्गात जाताना सुंदर बनून जावं.”

मला काव्यपंक्ती आठवल्या ”जाता जाता गाईन मी… गाता गाता जाईन मी”

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments