नाती अशी आणि तशीही – १४

“ मी अनुसुया” समोर बसलेली साधारण 55-60 ची महिला तिची ओळख करुन देत होती. नवरा पंधरा वर्षांपुर्वी वारलेला. पदरी दोन मुलं. चार घरची धुणीभांडी आणि संध्याकाळी हॉटेलमध्ये पोळ्या लाटायची कामं करुन संसार हाकला. मुलं शिकली. नोकरीधंद्याला लागली. एक गोकुळ शिरगांवला कारखान्यात सुपरवायझर तर दुसरा गावातच पतसंस्थेत कॅशियर म्हणून लागला. दोघांचीही लग्न झाली. मी म्हणलं चला मुलं मार्गी लागली. आता आपण निवांत रहायचं अस म्हणत मी हळूहळू एकएक काम कमी केलं.

मोठ्याला कारखान्यात जायला-यायला लांब पडू लागलं म्हणून तो कारखान्याजवळ शिफ्ट झाला. मला आपलं गावात इतके वर्ष राहील्यामूळे गावातच बरं वाटायचं म्हणून मी धाकट्याकडेच राहायचे. असंही थोरला खाऊनपिऊन सुखी असला तरी पगार बेताचाच होता. तशी अधूनमधून सणासमारंभाला मी त्याच्याकडे जायचे पण मुख्य बस्तान धाकट्याकडेच. एकंदरीत बरं चाललं होतं. मी पण सुनेला भाजी चिरणं, धान्य निवडणं अशी वरकामं करु लागे. देवपूजा-पोथीवाचनात वेळ जायचा.

मधेच मी उलट्या जुलाबांनी हैराण झाले. खुपच वीकनेस आला. हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमिट करावं लागल. मुलांनी-सुनांनी सगळी धावपळ केली. आठ हजार बील झालं. ते भरलं धाकट्याने पण नंतर मला सुनेच्या वागण्यात एक तुटकपणा जाणवू लागला. मला उगीचंच वाटतय अशी समजूत काढत मी माझा जास्तीतजास्त वेळ देवळात, शेजारीपाजारी घालवू लागले.

अशीच एकदा देवळातून घरी आले तर आतल्या खोलीतून सुनेच आणि मुलाचं बोलण कानावर पडलं. “किती दिवस सासूबाई आपल्याकडेच राहणार? दिरांनी काही दिवस न्यायला काय हरकत आहे? आपला पण संसार आहे. असा यांच्यामागे खर्च होऊ लागला तर आपलं सेव्हींग कधी होणार?” मुलगा म्हणाला “मला पटतयं पण मी कसा सांगणार दादाला? त्याला कळायला हवं ना.”सुन म्हणाली, “तुम्हाला जमत नसेल तर मी सांगू का?” मुलगा म्हणाला, “नको नको, मी बघतो कसं जमतयं ते.” त्याची बहूतेक द्विधा अवस्था झाली होती.

अनपेक्षीतपणे ऐकलेला हा संवाद माझं भावविश्व विस्कटून गेला. दोन दिवस मी विचार करत होते. मोठ्याची परिस्थिती मला माहित होती. तो त्याचा संसार कसाबसा हाकत होता. त्यावर मला बोजा बनायचे नव्हते. आणि जा म्हणेपर्यंत मला आता धाकट्याकडेही थांबायचे नव्हते. देवाच्या दयेने अजून माझे हातपाय हलत होते. पुर्वीसारखी मेहनत जमत नसली तरी पोटापाण्यापूरते काम मी नक्कीच करु शकणार होते. परत धुण्याभांड्याची कामं सुरु केली तर मुलांना मान खाली घालावी लागली असती कदाचित. त्यामूळे मुलांना कमीपणा न येता, आपला स्वाभिमानही सांभाळला जाईल असा काहीतरी मार्ग काढावा लागणार होता.

मी विचार केला सरळ पंढरपूरला जाऊ. पांडूरंगाच्या सेवेत आयुष्य घालवू. तिथे धर्मशाळेत राहता येईल कामही करता येईल. अन्नछत्रामध्ये जेवणाचीही सोय होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्याची अखेर पांडूरंगाच्या चरणी होईल. कधी वाटलंच तर वर्षातून एखादी फेरी मुलाबाळांकडे मारता येईल. सगळाच प्रश्न सुटणार होता. जन्मभराचं गाव सोडावं लागणार होत हेच काय ते दु:ख. पण ठीक आहे. गाठीला थोडे पैसे होते. मी मुलांना चिठ्ठी लिहीली आणि घराबाहेर पडले. भरल्या डोळ्यांनी थेट रेल्वेस्टेशन गाठले. धाकधूक होतीच. तिथे कोणी ओळखीचं नाही. धर्मशाळेत ठेवून घेतील का? अन्नछत्रात किती दिवस जेवू घालतील. सगळे प्रश्न होते. पण देवाचे नाव घेऊन पंढरपूरचे तिकिट काढले आणि गाडी येण्याची वाट बघत बसले. नेमकी गाडी तीन तास लेट होती. काय करणार? तीथेच बसले. माझ्याशेजारी एक बाई येऊन बसल्या. त्याही बहूतेक पंढरपूरलाच निघाल्या होत्या. बसल्याबसल्या गप्पा सुरु झाल्या. बाई चांगल्या वाटल्या. गप्पांच्या ओघात त्यांना सगळं सांगून टाकलं.

त्यांनी सगळं ऐकून घेतलं म्हणाल्या, “अगं मग एवढ्यासाठी गाव सोडायची काय गरज आहे? माझं ऐकशील तर सरळ ‘सावली’मध्ये जा. तिथे तूझी राहण्या-जेवण्याची सगळी सोय होईल. तिथे जमेल ते काम कर आणि रहा. तुझी ते नक्की सोय करतील.” मला आशेचा एक किरण दिसला. इथे सगळी सोय होण्याची ग्वाही त्या बाई देत होत्या. मी विचारले, “तुम्ही संबंधीत आहात का ‘सावली’शी?” त्या म्      हणाल्या, “नाही हो, पण एकदा मैत्रीणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणं झालं होत. तिथलं वातावरण बघून खात्री वाटते की तुला ते नक्की आधार देतील.” कदाचित देवचं त्यांच्या मुखातून मला दिशा दाखवत होता. तिकिट फाडलं आणि तूमच्यासमोर येऊन बसले. “मला सामावून घ्याल का तूमच्या संस्थेत? मी जमतील ती सगळी कामं करीन. पण शेवटपर्यंत सांभाळावे लागेल.” नकार देण्याचा प्रश्नच नव्हता.

कोल्हापूरच्या अज्ञात बाईंनी सावलीबद्दल दाखवलेला तो ठाम विश्वास ‘सावली’ला श्रीमंत करुन गेला.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments