नाती अशी आणि तशीही – १३

डिसिल्वा आजी गेल्या. तशा बरेच दिवस अंथरुणाला खिळून होत्या. तरी मनाने शेवटपर्यंत शांत प्रसन्न वाटत होत्या. समईतील ज्योतीसारख्या. मुलगा-सुन दोघेही सरकारी नोकरीत. मनापासून सेवा करायचे. पण सुनबाईंची सातार्‍याला बदली झाली आणि नाईलाज झाला. बदली थांबवण्याचे बरेच प्रयत्न निष्फळ झाले. आणि मग सावलीत दाखल करण्याचा निर्णय झाला. आजी अंथरुणाला खिळून असल्या तरी समजूतदार होत्या. कायम प्रसन्न चेहरा. स्वत:चा त्रास समोरच्याला जाणवून न देण्याचा कायम प्रयत्न असायचा.

त्या गेल्याचे कळवल्यावर सुनबाई तातडीने आल्या. मुलाला यायला काही तास लागणार होते. पण सुनबाई आजींजवळ बसून ढसाढसा रडल्या. आजूबाजूला त्यांच्या नात्यातलं कोणीही नव्हतं तरीही. थोडसं नवल वाटलं. कारण एखाद्या सुनबाईंनी सासूसाठी असं रडणं अभावानंच दिसत. हे रडणं प्रामाणिक होतं. बर्‍याच वेळानं त्या शांत झाल्या. मला त्यांच्या रडण्याचं खरंच अप्रुप वाटलं. कारण सासू-सुनेचं नात तसं शापीतच. त्यांच सख्य असणं हा अपवादच. खुप किंतु-परंतु, रुसवे-फुगवे, मानसिक ओरखडे या नात्यांमध्ये सर्रास आढळून येतात. म्हणून सुनबाईंशी बोलावसं वाटलं.

“तुमची खुप अ‍ॅटॅचमेंट दिसते आहे.” मी म्हणालो. “अहो, यांनीच मला खुप समजावून घेतलं. स्विकारलं.” त्या हुंदका गिळत आठवण सांगू लागल्या. जेम्स आणि सुनिता यांची कॉलेजमध्ये मैत्री झाली. सुर जुळले आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं त्यांनाच कळलं नाही. सुनिता ब्राह्मण आणि जेम्स क्रिश्चन. सुमारे तीस वर्षांपुर्वी कोल्हापूरमध्ये हे आंतरधर्मिय प्रकरण कसं स्विकारलं जाणार होत? आजही जातीय कंगोरे जास्त धारदार होताना दिसत आहेत. पुर्वी आपली जात लपवणारे आज उच्चारवाने आपली जात सांगताना दिसत आहेत. आणि दुर्दैवाने सर्व जातीबांधव आपापली जात विसरुन एक होण्याऐवजी कसोशिने ती जपण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत. आज हा प्रकार तर तीस वर्षांपुर्वी काय स्थिती असेल हा विचार केलेलाच बरा.

तसा जेम्स एका कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीत होता. स्वत:चे घर होते. मित्रपरिवार मोठा होता.  एकच वैगुण्य म्हणजे जेम्स चेनस्मोकर होता. त्यांचे व्यसन सोडवण्याचा त्याच्या आईने बराच प्रयत्न केला पण सिगरेट काही सुटत नव्हती. हे एक सिगरेटचे व्यसन सोडले तर त्याच्यात उणिव काढावी असे काही नव्हते.

दोघांच्या लग्नात जात आडवी येत होती. अपेक्षेप्रमाणे दोन्ही घरांतून प्रचंड विरोध झाला. हे लग्न काही सहजासहजी होणार नाही हे दोघांनाही माहित होत. जेम्स एकुलता एक होता तर सुनिताला अजून दोन बहिणी होत्या. बहिणींची लग्न हा एक मोठा प्रश्न होता. काही झालं तरी दोघही जीवनसाथी म्हणून इतर कोणाचा विचार करुच शकत नव्हते. त्यांना एकमेकांबरोबर आयुष्य कंठायच होत. त्यामूळे आत्महत्या वगैरे काही ते करणार नव्हते.  पण त्याचबरोबर आईवडिलांनाही दुखवायचं नव्हतं.

लग्नासाठी स्थळं येऊ लागली. सुनिताने घरात स्पष्ट सांगीतल, “बाबा, तुमचा आमच्या लग्नाला विरोध आहे. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. जोपर्यंत तुम्ही मंजूरी देत नाही तोपर्यंत मी जेम्सबरोबर लग्न करणार नाही. मात्र माझाही एक हट्ट आहे. मी लग्न करेन तर जेम्सबरोबरच नाहीतर मला लग्नच करायचं नाही.” या बोलण्याने बाबा चिडले. मारहाण केली नाही तरी अबोला धरला. सुनिता शांत राहीली. जेम्सच्या घरी वडिलांचा विरोध असला तरी आईचा सुप्त पाठिंबा होता. जेम्सनेही वडिलांसमोर हीच भुमिका घेतली. दरम्यानच्या काळात सुनिताच्या दोन्ही बहिणींची लग्न झाली. शेवटी आईबाप हे आईबापच असतात. हो नाही करता करता त्यांनी लग्नाला होकार दिला. इकडे जेम्सच्या आईनेही वडिलांची समजूत काढली होती. तब्बल आठ वर्षांच्या प्रेम लग्नात परिवर्तीत होत होते.

लग्न ठरल्यावर जेम्सच्या आईने सुनिताला घराच्या चालीरीती, पद्धती, आवडीनिवडी सांगण्याच्या निमित्ताने घरी बोलावून घेतलं होत. त्याचवेळी तिने सुनिताला काही कानगोष्टी सांगीतल्या. सुनितानेही इंटरेस्ट घेतला. सुनिता आणि सासूबाई यांच्यांत गट्टी जमली.

धार्मिक बाबींवर परत काही गोंधळ उडू नये म्हणून सरळ रजिस्टर्ड लग्नच करायचे ठरले. लग्नाची तारीख नक्की झाली. दोन्हीकडची तयारी पुर्ण झाली आणि लग्नाच्या आदल्या दिवशी सुनिताने जेम्सला अर्जंट भेटायला बोलावलं. आता जेम्स टेन्शनमध्ये आला. नवसाने जुळलेल्या लग्नात आता अजून काय विघ्न या विचारानेच तो ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. तीथे सुनिता आलेलीच होती. वेळ वाया न घालवता तिने सुरवातच केली. “जेम्स, आपल्या लग्नात एक मोठी अडचण आहे.” “आता नविन काय?” त्याने काळजीने विचारलं. “आपल्या संसारात तुझ्याबरोबर एकतर मी राहू शकेन नाहीतर सिगरेट. कोणाबरोबर रहायचं तुझं तू ठरवं.” हातातली सिगारेट जेम्सने त्वरीत खाली टाकली. आज बत्तीस वर्ष झाली. जेम्सनी सिगरेटकडे बघितलं सुद्धा नाही.

सासूबाईंची युक्ती लागू पडली होती.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments