नाती अशी आणि तशीही – १२

घटना आमच्या औरंगाबाद शाखेची. जगताप आमच्याकडे आले तेंव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. पंधरा हजार पेन्शन मिळत होती. आमचे महिन्याचे पैसे, औषधे जाऊनही महिन्याकाठी दिड हजार रुपये शिलकीत रहात होते. त्यांच्या मागे पूढे कोणीही नव्हते. पत्नी वर्षापूर्वीच निवर्तली होती. मुलबाळ नव्हते. आयुष्य छान उपभोगत होते. सकाळचे जपजाप्य, मग रेडिओवर गाणी ऐकणे, वाचन, टि.व्ही., आल्यागेल्याशी गप्पा असा दिनक्रम होता. काका ऑफिसचे काम आहे म्हणून तर कधी मित्राच्या मुलाचे लग्न आहे म्हणून तर कधी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे गेटटूगेदर आहे म्हणून ते दोन-तीन दिवस बाहेर जात असत. बाहेरुन आल्यावर ते दारु पिऊन आले असावेत असा संशय यायचा. त्यांना तसे विचारलेही पण त्यांनी स्पष्ट अमान्य केले.  असे दोनदा-तिनदा घडले. एकदा त्यांच्या गादीखाली बाटली सापडलीच. त्यांनी लगेच माफी मागून विषय संपवण्याचा प्रयत्न केला. आम्हीही त्यांना स्ट्रीक्ट वॉर्निंग देवून विषय वाढवला नाही.

दरम्यानच्या काळात त्यांना ज्या कंपनीकडून पेन्शन मिळायची ती बंद पडली आणि त्यांनी यापूढे पेन्शन देता येणार नाही असे स्पष्ट कळवले. जगतापांवर हे अस्मानी संकट होते. दोन दिवस ते डिप्रेशनमध्ये होते. आमच्या मॅनेजमेंटनी त्यांना धीर दिला. नाहीतरी या वयामध्ये ते कुठे जाणार होते? आपापसात चर्चा करुन जगतापांंसाठी देणगीदार शोधायचा आणि तोपर्यंत त्यांच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत असे ठरवले. होता होता चार महिने झाले. जगतापकाकांचा दिनक्रम पहिल्यासारखाच चालू होता. त्यांना दिलेल्या या आर्थिक सवलतीबद्दल फक्त मॅनेजमेंटलाच माहित होते. आणि त्यांना कोणासमोर न्युन वाटणार नाही याची पुर्ण दक्षता घेतली गेली होती. तरीसुद्धा काकांना जरा अस्वस्थता आहे असे आम्हाला जाणवायचे.

नशिबाने चार महिन्यांनी संस्थेला काकांसाठी स्पॉन्सर मिळवण्यात यश आले. ते त्यांचे महिन्याचे आणि औषधांचे पैसे द्यायला तयार झाले. एक प्रश्न सुटला होता. जगतापांंना आता जरा हायसे वाटले होते. स्पॉन्सरने पैसे देण्यास सुरवात केली. पण याचा परिणाम म्हणजे जगतापांंचे बाहेर फिरणे बंद झाले कारण आता हातात पैसे येत नव्हते. आता याही गोष्टीला पाच महिने झाले होते. सगळं सुरळीत चालू होते.

एक दिवस जगतापांंचा फोन आला. म्हणाले,“तुम्ही माझ्यासाठी इतके केले आता मला तूमच्यासाठी काहीतरी करायचे आहे. माझ्या पुण्यात अनेक ओळखी आहेत. मी संस्थेसाठी चांगले डोनेशन उभे करु शकतो. पण त्यासाठी मला फिरावे लागेल. आणि फिरण्यासाठी पैसे लागतील. तर तूम्ही असं करा, तुमच्या मासिक शुल्कामध्ये मला दोन हजार रुपयांची सुट द्या आणि ते पैसे मला द्या. म्हणजे ते वापरुन मी तुमच्यासाठी डोनेशन उभे करण्याचा प्रयत्न करतो.” मी म्हणले, “अशी सूट देण्याचे अधिकार मला नाहीत. आम्ही सगळे मिळून त्यावर निर्णय घेऊ. तोपर्यंत मी आत्ता ठोस काही सांगू शकणार नाही.” यावर “असं कस? तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. भिकार्‍यांना फुकट घेता मी तर फक्त दोन हजार रुपये मागतो आहे. तेही तुमच्याच साठी.”  हे सगळं दारुसाठी आहे हे जाणवत होतं. मागे त्यांना येत असलेली अस्वस्थता यासाठी होती तर. मी म्हणलं, ”भिकार्‍यांचा विषय वेगळा आहे. त्यांचे पैसे कोण देणार? आणि भिकारीमुक्त शहर हा संस्थेचा प्रकल्प आहे. तुम्ही भिकारी नाही. तुमच्याबद्दल ट्रस्टींच्या बैठकीत निर्णय होईल. आणि राहीला सवाल आमच्यासाठी फंड रेझींगचा तर तुमच्या जाण्या-येण्याची व्यवस्था मी करतो. हवं तर मी स्वत: तुमच्याबरोबर येतो.” आता हा दावा अंगलट येऊ लागल्यावर जगतापांनी रागाने फोन ठेवला.

थोड्या वेळाने पुन्हा फोन केला म्हणाले,“मी आता प्रेसला जातो आणि सगळ्यांना सांगतो, हे मोठे दावे करतात भिकार्‍यांना सांभाळण्याचे पण हे साधे दोन हजार रुपयेपण सोडू शकत नाहीत.” आता माझे डोकं सणकले. म्हणालो, “बिंधास्त सांगा. भिकारीमुक्त शहर हा आम्ही आमच्या मर्जीने अंगिकारलेला प्रकल्प आहे. त्यासाठी आम्ही कोणती स्पॉन्सरशीप वा सरकारी मदत घेत नाही. त्यामूळे कोणाला फुकट घ्यायचे किंवा कोणाला काय सुट द्यायची हा निर्णय सर्वस्वी आमच्या मनावर आहे. कोणी त्यात आम्हाला जबरदस्ती करु शकत नाही. आणि आता राहिला प्रश्न तुमचा. तर येत्या एक तारखेपासून आम्ही तुम्हाला डिसचार्ज देत आहोत. असा कृतघ्न माणूस आम्हाला नको आणि त्याचे पैसेही नकोत. आणि हा निर्णय मी नक्कीच घेऊ शकतो.”

आता गाडी रुळावर आली. अचानक त्यांना काय मिळतय याची जाणिव झाली. रात्री फोन करुन “ म्हणलं तुमची जरा मस्करी करु. जरा गंमत हो. तुमचा काहीतरी गैरसमज झाला. मला तसं म्हणायचं नव्हतं. मी काही झालं तरी इथून जाणार नाही. ”

या गमतीवर मला हसावं की रडावं कळत नव्हतं.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments