नाती अशी आणि तशीही – ११

पुष्पा आज सुटली होती. एका अर्थाने स्वतंत्र झाली होती. कारण पंधरा दिवसाच्या आजारपणानंतर तिचा नवरा देवाघरी गेला होता आणि पुष्पाच्या नरकयातना संपल्या होत्या.

साधारण तीन वर्षांपुर्वी पुष्पा सावलीत नोकरीसाठी आली होती. याआधी तीने कुठलीच नोकरी केली नव्हती. शिक्षण जेमतेम आठवी. लग्न झालं. लग्न करताना आईबापाने फारशी कुठली चौकशी न करता जातीतला मुलगा याला महत्व देत एका बिल्डरच्या भावाला मुलगी दिली. स्वत: मुलगा काय करतो हा प्रश्न त्यांना पडलाच नाही. बिल्डरच्या बंगल्यात दाखवण्याचा कार्यक्रम झाला. तो तामझाम पाहून हे हुरळून गेले. आणि लग्न झाले.

लग्न झाल्यावर कळलं की, हीचा नवरा रिक्षा चालवतो तिही दुसर्‍याची. भावाने याला कधीच वेगळा काढला आहे. रोज दारु पिऊन येतो. लग्नानंतर काही दिवस बरे गेले. पण नंतर याचे दारुचे प्रमाण वाढू लागले. दारु प्यायल्यानंतर तो कंट्रोलच्या बाहेर जायचा. कुठल्याही गोष्टीवरुन चिडणे, शिव्या देणे नित्याचे होते. जेवणात एखादा पदार्थ आवडला नाही की ताट भिरकावून देणे, भिरकावताना ते कोणाला लागले तरी त्याला फरक पडायचा नाही. एकदा दोनदा तर तिला खोक पडली. दिराला, सासूला सांगायला गेलं की, ”आहेच तो जरा चिडका लहानपणापासून. आता काय करायचं? तुच जरा सांभाळून घे.” अशी उत्तरं यायची. आईवडिल “तुला लग्न करुन दिलय. आता तू आणि तूझा संसार. आम्हाला काय मधे घेऊ नको.” म्हणून टाळून द्यायचे.

नवरा मेहरबानी केल्यासारखा पैसे द्यायचा. त्या पैशात घर कसेबसे चालायचे. पण मुलांच्या शिक्षण, आजारपणाला पैसा लागतोच ना. नाही म्हणायला दीर अडल्यानडल्याला मदत करायचा. पण जाऊबाई मधूनच टोमणे मारायच्या. हीनं कायम त्यांच्या अंकित रहावं अशी त्यांची अपेक्षा असायची. एकंदरीत सगळीकडूनच कोंडमारा व्हायचा. शेवटी तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. नोकरीमूळे तिचे काही प्रश्न तरी निश्चित सुटणार होते.

पुष्पा आपूलकीने सगळ्या रुग्णांची सेवा करायची. त्यांना अंघोळ घालणे, वेणीफणी, कपडे बदलणे, भरवणे सगळं प्रेमाने करायची. पण तिला कायम इनसिक्युरीटी होती. आपलं काही चुकलं तर? नोकरीवरुन काढून टाकलं तर? त्यामूळे कायम भेदरलेली असायची. कायम रडवेली. जरा कोणी काय बोललं की डोळ्यातून गंगाजमूना सुरु. सुरवातीला मी पण हैराण. रडण्याएवढं मी काय बोललो? जसजशी तिची कौटूंबिक पार्श्वभूमी कळली तशी तिची मानसिकता समजली. तिला समजावणीच्या भाषेत म्हणलं, “हे बघ पुष्पा, एक मनाशी पक्क ठसवून घे. सावलीतनं तूझी नोकरी फक्त एकच व्यक्ती घालवू शकते. तू स्वत:. इतर कोणीही नाही. जोपर्यंत तू सावलीत आपलेपणाने, प्रामाणिकपणाने काम करते आहेस तोपर्यंत तूझी नोकरी पर्मनंट आहे.”

पुष्पा कमवायला लागल्यापासून नवर्‍याचे जरा जास्तीच फावलं. त्यांच कामावर जाणं कमी झालं. दारुसाठी तो पुष्पाकडेच पैसे मागायला लागला. नाही दिले तर गव्हाच्या/ज्वारीच्या पीठाचे डबे उपडे करायचा आणि त्यावर पाणी ओतायचा. सगळा चिख्खल करायचा. विरोध केला की मारहाण ठरलेली. मग पुष्पा एका वेळेला पूरेल एकढाच किराणा आणायला लागली. मग तो तिला रात्रभर घराबाहेर काढू लागला. रात्रभर ती पावसापाण्यात, थंडीवार्‍यात घराबाहेर बसून राहू लागली. पण जीद्दीने सहन करत राहीली. काही दिवसांनी दीरांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी नवर्‍याला दम दिला. मग हा छळ कमी झाला. मग त्यांनंतर घरातली भांडीकुंडी विकून दारु प्यायला लागला. एकूण काय पुष्पा त्रासाचेे अनेकवीध प्रकार अनुभवत होती. इतकं सहन करण्याची ताकद तिला कुठून मिळत होती देवजाणे.

ह्या त्रासाचा कुठलाही मागमूस चेहर्‍यावर दिसू न देता सावलीमध्ये पुष्पा रुळू लागली. वागण्याबोलण्यात आत्मविश्वास आला. एकदा काही कारणाने सावलीत स्टाफची उपस्थिती कमी असताना एका रुग्णाला देवाज्ञा झाली. नातेवाईकांना कळवले ते तासाभरात येणार होते. बॉडी पॅक करायची होती. ही जबाबदारी पुष्पावर आली. ती घाबरायला लागली. “डेडबॉडीची भिती वाटते.” ती म्हणाली. मी म्हणालो, “अगं, जीवंत माणसाला घाबरायला पाहीजे. मृत शरीर काय करणार आहे? कर बघू. मी  उभा आहे.” भीत भीतच तिने हात लावला. तिला बॉडी पॅक करायला शिकवलं. मुळातच कामसू असल्याने पुष्पा नेटकेपणाने बॉडी पॅक करु लागली. डेडबॉडीपेक्षा जीवंत माणसच त्रासदायक असतात हे तिलाही आता पटलं होत.

आणि आज तिच्या नवर्‍याचे निश्चल शरीर तिच्यासमोर होते. हॉस्पीटलमध्ये खास विनंती करुन पुष्पाने ती बॉडी स्वत: व्यवस्थित पॅक केली आणि एकदाचं हमसून हमसून रडून घेतलं. कदाचित शेवटचं. प्रत्येक गोष्टीला अंत असतो तसा तिच्याही आयुष्यातील एक भीषण अध्याय संपला होता.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments