नाती अशी आणि तशीही – ०९

सकाळी सकाळी सावलीत गोंधळ चालला होता. कालच साळोखे आजी सावलीत अ‍ॅडमिट झाल्या होत्या. साळोखे आजींना पाच वर्षांपूर्वी पॅरालेसीस झाला होता. डावी बाजू पुर्ण निकामी झाली. एकूलता एक मुलगा, सुन आणि नात असा छोटासा परिवार. मुलाचे छोटेसे किराणा दुकान होते. तसं घर खाऊनपिऊन सुखी होतं. सुनबाई आजींचं सगळं करायच्या. त्यांची स्वच्छता, अंघोळ, जेवणखाण सगळं स्वत: व्यवस्थित करायच्या. घरातली सगळी कामही त्याच स्वत: करायच्या.

तीन वर्षांपूर्वी नातीचं लग्न झालं. आता घरात तीघचं राहीले. अशात सुनबाईंना व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास सुरु झाला. चालणं, उठणं-बसणंही त्रासाचं होऊ लागलं. घरातल्या कामाला मोलकरीण ठेवली. तरीसूद्धा सासूबांईचं करावचं लागे. या परिस्थितीतही सुनबाई नेटाने सासूबांईंची सुश्रुषा विनातक्रार करतच होत्या. पण साळोखे आजींनाच सुनेचे हाल बघवेनात. त्यांनी मूलाला सावलीत मला दाखल कर म्हणून गळ घातली. खुप विचार करुन त्याने आईला सावलीत अ‍ॅडमिट केले. सावलीत दाखल करायला सुनबाई तशा फारशा तयार नव्हत्या. ‘लोक काय म्हणतील?’ याचाच दहावेळा विचार करत होत्या. त्यांना समजावलं. म्हणालो, “तूमची घालमेल मी समजू शकतो. इतके दिवस तूम्ही केलचं ना. पण आज तूमचीच प्रकृती ठीक नसताना तूम्ही त्यांची काळजी कशी घेऊ शकणार आहात?” त्यांना संस्था पुर्णपणे दाखवली. “सावलीमध्ये परावलंबित्व आलेल्या रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आहेत. मेडिकल इमर्जन्सीमध्येे लागणारी सर्व यंत्रणा उपलब्ध आहे. जेवणाची उत्तम सोय आहे. घरच्यासारखीच काळजी इथे घेतली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, जेंव्हा तूम्ही ठीक व्हाल तेंव्हा कधीही तूम्ही डिसचार्ज घेऊ शकता.” कशाबशा त्या तयार झाल्या.

आणि दूसर्‍या दिवशी मोठ्ठ्याने भोकाड पसरत आजींची नात सावलीत आली. आजीला सावलीत का ठेवली? लोक काय म्हणतील? माझे सासरचे काय म्हणतील? तोंडात शेण घालतील. बाबांना वाट्टेल ते बोलू लागली. तूम्हाला आजी जड झाली का? वगैरे विचारु लागली. तिच्या वडिलांच तोंड केवीलवाणं झालं. हे सगळं नाटक बघितल्यावर मी नातीला ऑफिसमध्ये बोलावल.

तिला विचारल, “इतक रडायला काय झाल?” म्हणाली, “आजीला असं आश्रमात टाकलेलं मी सहन करु शकत नाही.” मी म्हणलं, “मुळामध्ये हा वृद्धाश्रम नाही. इथे फक्त आणि फक्त आजारी व्यक्तींनाच दाखल करुन घेतले जाते. आणि घरच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने काळजी घेण्याचा पुर्ण प्रयत्न केला जातो.” त्यावर म्हणाली, “पण आपलं घर असताना असं संस्थेत टाकणं कसं वाटत?” म्हणलं, “अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं. पण आईच्या तब्येतीविषयी तुला माहित नाही का? इतके दिवस तिने केलचं ना. त्यापेक्षा तू स्वत:च्या घरी का घेऊन जात नाहीस आजीला? तू सेवा कर तिची.” त्यावर एकदम “नाही नाही. मी कशी नेणार? मी सासूरवाशीण. शोभेल का ते?” म्हणलं, “शोभण्याचा विषयच कुठे येतो? आजीची सेवा ही तुझीही तितकीच जबाबदारी आहे.  आणि तुला आजीविषयी एवढं वाटत तर तूच तिची सुश्रुषा करणं योग्य.” यावर आता ती बॅकफूटवर आली. विविध प्रकारे समजावल्यानंतरही ती आजीला स्वत:च्या घरी घेऊन जायला तयार होईना.

मग मी स्पष्ट म्हणलं, “तुला लाज वाटायला पाहिजे. तू स्वत: काहीच करणार नाहीस. एवढे दिवस आईने आजीची सेवा केली त्याची कुठलीच पोहोच तुझ्या नजरेत नाही. आता ती स्वत: आजारी पडली म्हणल्यावर तिनेही मनावर दगड ठेवून आजीला संस्थेत ठेवली आणि तेही आजीच्याच आग्रहामूळे. ते सगळं समजून घ्यायचं सोडून गळे काय काढतेस? आणि जे कोणी नातेवाईक नावं ठेवणार आहेत ना त्यांना म्हणावं तुम्ही करताय का सेवा? तुमची पण नातलगच लागते ना आजी? मग बघ एकेकाचे आवाज कसे बंद होतील ते. आणि तुलाही आईच्या तब्येतीपेक्षा लोक काय बोलतील याची काळजी? हे ’आयजीच्या जीवावर बायजी’ वागणं आधी बंद कर.”

मी वडिलांकडे बघून म्हणालो, “नातेवाईक अगदी जवळचे का होईना, कोणाचाच विचार करु नका. आपण फक्त आपल्या मनाला विचारावे. मन आपल्याला कधीच फसवत नाही. मनाने ग्वाही दिली ना की आपण बरोबर आहोत, मग कोणालाच घाबरायचे कारण नाही. कारण आपली दुखणी आपल्यालाच निस्तरावी लागतात. कोणीही त्यात वाटेकरी होत नाही.”

काही न बोलता नात गपगूमान गेली. संतापाची बाब म्हणजे साळोखे आजी जाईपर्यंत ती साध्या चौकशीसाठीही कधी आली नाही.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments