नाती अशी आणि तशीही – ०५

आज सावली सुन्न होती. पीनड्रॉप सायलेन्सचा शब्दश: अर्थ काय ते समजत होते. सावलीतील चिवचिवणारं पाखरु आज शांत झालं होत.

साधारण 11 वर्षांपूर्वी कोमल सावलीत दाखल झाली. वयवर्ष 51. जन्मत: मतीमंद. शाळेत घातली की होईल हुशार या समजूतीतून शाळेतही घातली. मतीमंद असली तरी स्मरणशक्ती छान होती. पाढे, कविता, स्तोत्र छान म्हणायची.

हळूहळू भावंड मोठी होत गेली. शाळेतील प्रगतीच्या मर्यादा कळल्याने हिची शाळा बंद झाली. तरी आईच्या हाताखाली घरातील वरकामं करु लागली. कोमलचं शारीरिक वय वाढत असलं तरी मानसिक वय 5 वर्षांच्या मुलीएवढच होत. कोमलला एक सख्खा भाऊ आणि एक बहीण. दोघांचीही लग्न झाली. भावजय प्रेमळ होती. तिने कोमलला मुलीप्रमाणे सांभाळले. भाच्चीही लहान असताना कोमलबरोबर खेळायची. पण कालांतराने तीचही लग्न झालं. कोमलचा तसा त्रास काही नव्हता तरीही लक्ष द्यावं लागायचच. एक प्रयोग म्हणून तीला सावलीत दाखल केली.

कोमलनी सावलीत सगळ्यांना आपलसं केलं. मला ती मामा म्हणायची नव्हे तसा तिचा ठाम समजच होता. आणि मामाचंच सगळं असल्याने तो तोरा ती मिरवायची. सगळ्या रुग्णांकडे जायची. त्यांना पाणी दे, पांघरुण नीट कर, वर्तमानपत्र नेऊन दे अशी वरकामं हसतमुखानं करायची. कर्मचार्‍यांनाही कपडयांच्या घड्या घालू लाग, जेवणं झाल्यावर भांडी घासायला नेऊन दे अशी कामं करु लागायची. रोज संध्याकाळी स्त्रोत्र, पाढे न चुकता मोठ्याने म्हणायची. थोडक्यात काय तर सगळ्या सावलीकरांमध्ये कोमल पॉप्युलर होती.

तशा काही कळा तिच्याही अंगात होत्या. कोमल 8 वाजेपर्यंत झोपून रहायची. तेंव्हा सावलीमध्ये अंघोळीचे नंबर लागलेले असायचे. म्हणजे आधी उठणार्‍याचा आधी नंबर या तर्‍हेने. पण कोमल उठली की सरळ बाथरुममध्ये. तिला नंबर वगैरे काही नाही. इथे तिची दादागीरी असायची. कोणी आजीने “माझा नंबर आहे”, असं म्हणलं की म्हणायची, “तू कुठे अंघोळ करुन लगेच ऑफिसला जाणार आहेस? थांब जरा.” तिची सांगण्याची लकबच अशी असायची ना की, सगळ्या आज्यांनी तीची ही दादागीरी मान्य केली होती. तीला जर कुणा स्टाफचा राग आला तर स्टाफला दमच भरायची. “मामाला सांगू? लगेच तुमचा हिशोबच करुन टाकते. येऊ नका उद्यापासून.” मग स्टाफनी गयावया करायची. परत चूक होणार नाही अशी माफी मागायची. मग उदार मनानं ती “आत्ता सोडते. परत असं चालणार नाही.” असा दम मारुन त्यांना माफ करायची.

भाऊ-बहीण वरचेवर तिला भेटायला यायचे. पण कोमल आता मामाच्या घरी रुळली होती. इथे तिला वावरायला भरपूर जागा होती. गप्पा मारायला अनेक लोक होते. महिन्यातून दोनदातरी गाण्यांचे, भजनाचे कार्यक्रम व्हायचे. खाण्याची चंगळ होती. त्यामूळे भावा-बहिणीची आठवण आली, तरी तिला आता त्यांच्याघरी जायचे नसायचं. नाही म्हणलं तरी आता दहा वर्ष होत आली होती. स्टाफच्या घरचेही तिला छान ओळखू लागले होते. अधूनमधून ती स्टाफच्या घरीही मुक्कामाला जायची. जाताना जेवणाचा मेनू काय पाहिजे ते ठरवायची. स्टाफही आनंदाने तिचं सगळं करायचा. सगळ्यांना तिचा लळा लागला होता. कोमल म्हणजे जणू ‘निर्व्याज आपूलकी’.

कोमलने आता साठी ओलांडली होती. डायबेटीस तिला होताच. ती पथ्यपाणी अनिच्छेने का होईना करायची. पण आता दात पडू लागले. पोळी चावता येईना. असाही भात तिला आधीपासूनच आवडायचा. आता निमित्त मिळालं. गोड तर प्रियच होतं. हळूहळू पथ्यपाणी गुंडाळून सगळ खाणंपीणं सुरू झालं. शुगर सातत्याने वाढती राहू लागली. कितीही समजावलं तरी कोमलं हवं तेच खायची नाहीतर उपाशी रहायची. डॉक्टरांनी आणि नातेवाईकांनी बसून ‘तीला काय हवं ते खाऊदे. जे काही तीचे दिवस आहेत ते मनाप्रमाणे जगूदे’ असा निर्णय घेतला. डायबेटीसच्या गोळ्या वाढवल्या. पण शेवटी निसर्गाला काही कारणं लागतातच.

कोमलची तब्येत ढासळू लागली. सावलीतला स्टाफ काम सांभाळत कोमलपाशी रेंगाळू लागला. सगळ्यांनी पाळीपाळीनं तिच्यासाठी काही खाऊ आणायला सुरवात केली. एकुणात काय, आजारपणातही कोमलची चंगळ सुरू झाली. संध्याकाळच्या स्तोत्र आणि पाढ्यांमध्ये खंड नव्हता. आणि शेवटी तो दिवस उजाडला. कोमल निपचीत पडून होती. दोन दिवस फक्त लिक्विड घेत होती. सगळ्यांना समजून चुकले होते. स्टाफ तिला सोडत नव्हता आणि तिही स्टाफला सोडत नव्हती.

दुपारी एकच्या सुमारास कोमल स्टाफच्या मांडीवरच शांतपणे गेली. स्टाफ सुन्न होता. रडण्याच्या पलीकडे गेला होता. सावलीतील सगळी काम यंत्रवत होतच होती. कारण आयुष्याचं रहाटगाडगं कोणाला थांबवता येत नाही. पण एक आठवतयं, त्या दिवशी स्टाफच काय पण रुग्णसुद्धा जेवले नाहीत. इतका सुन्नपणा सावली प्रथमच अनुभवत होती.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments