नाती अशी आणि तशीही – ०४

“सुधीर, वहिनी गेल्या.” डॉ. सप्रेंनी माटेकाकांना जड अंत:करणाने सांगीतले. आणि माटेकाका जागच्याजागी थिजले. काही रिअ‍ॅक्शन नाही. रडणं नाही. मुर्तीवत पडून राहीले आणि 24 तासांमध्ये तेही माटेकाकूंची साथ द्यायला स्वर्गस्थ झाले.

माटेकाका पुण्याच्या सि.ई.पी. या अग्रगण्य संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअर झाले. नोकरीनिमित्ताने संपुर्ण जग फिरलेले. रिडायर्ड झाल्यानंतर कराडमध्ये स्थिरावले. एक मुलगा पण एकदम नतद्रष्ट जणू सोन्यासारख्या आयुष्याला लागलेली दृष्ट. शिक्षणाने यथातथा, व्यसनी. व्यवसाय करण्यासाठी काकांकडून भांडवल म्हणून रक्कम घेतली. बंगल्यावर कर्ज काढलं आणि सगळं मातीत घातलं. काका भाड्याच्या घरात राहू लागले. त्यात त्याने मित्राच्याच बायकोला पळवून आणली. तीही दोन मुलं नवर्‍याकडे सोडून याच्याबरोबर आलेली. या नात्याला काकांनी नकार दिला आणि मुलाला घराबाहेर काढलं.

दुदैव असं की, काकांना ‘मस्कुलर डिस्ट्रॉपी’ हा दुर्धर विकार झाला. यामध्ये मेंदुच्या सेन्सरी (पंचेद्रियांद्वारे ज्ञानार्जन) आणि मोटार फंक्शन (हालचालींवर नियंत्रण) या दोन कार्यांपैकी मोटार फंक्शन टप्प्याटप्प्याने बंद होत जाते. याची सुरवात आधी बोटं मग पाऊलं/हाताचा पंजा, पोटर्‍या/मनगटं, असं करत करत एकेका स्नायुवरील मेंदूचे नियंत्रण कमी होत जाते. म्हणजे ह्या स्नायुंची हालचाल मेंदूला करवून घेता येत नाही मात्र त्यांचे सेन्सशन शाबूत असते. म्हणजे समजा पायावर मुंगळा चढू लागला तर ते कळेल पण पाय हलवता येणार नाही. आधी ऐच्छिक स्नायू आणि नंतर अनैच्छिक स्नायू यात मुत्रमार्ग, गुदाशय, आतडी, किडनी, फुफ्फुस, हृदय सगळं येत त्यावरील नियंत्रण सुटत. या विकाराचा सगळ्यात दुदैवी भाग म्हणजे मेंदू तल्लख असतो. सगळ कळत असतं पण काही करता येत नाही अशी भयानक मुस्कटदाबी सहन करावी लागते.

विकार झाल्यानंतर रुग्ण पुर्ण परावलंबी होतो. काकू सेवा करायच्या पण काकांचं वजन बर्‍यापैकी असल्याने त्यांनाही आवरणं जमेना. पण पैसाही नव्हता. इथे काकांची आयुष्यभराची कमाई कामाला आली. काकांच्या मित्रांनी पूढाकार घेतला. सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट केले आणि काकांना सावलीमध्ये दाखल केले. काकांच्या सुश्रुषेसाठी लागणारा सगळा खर्च मित्र विनासायास उभा करत होते. आणि त्यांच आयुष्य जास्तीतजास्त सुखावह कसे जाईल याची काळजी घेत होते. नुसते पैसे देऊन नव्हे तर रोज कोणीना कोणी मित्र गप्पा मारायला यायचा, कधी ग्रुपच यायचा आणि कॉलेजचा कट्टा खिदळायचा.

काका मानी असल्याने त्यांना सेवा करुन घ्यायला आवडायची नाही. पण ईलाजच नव्हता. सावलीत आले तेंव्हा काकांचे मलमुत्र नियंत्रण गेलेले होते. त्यांना शौचाची भावना व्हायची, ते हाकही मारायचे. पण बर्‍याचवेळा पॉट देईपर्यंत शौच झालेले असायचे. मग काकांची स्वत:वरच चीडचीड व्हायची. लघवीसाठी कॅथेटर लावले होते पण शौचाचा प्रॉब्लेम व्हायचा. सावलीत आम्ही शक्यतो डायपर लावत नाही. डायपरमूळे बेडसोअर्स वगैरे होण्याची शक्यता बळावते आणि रुग्णाच्या त्रासात वाढ होते. आर्थिकदृष्याही ते महाग पडते. पर्यावरणाच्या दृष्टीनेही डायपर टाळणे चांगलेच.

काकांना आम्ही समजावायचो. तूम्ही संकोच करु नका. आम्हाला आजाराचं स्वरुप माहित आहे. तुम्ही मुद्दाम काही करत नाही. याची आम्हाला पुर्ण कल्पना आहे. आणि आम्ही तुम्हाला तुमच्या आजारासह स्विकारले आहे. तूम्ही अज्जिबात वाईट वाटून घेऊ नका. आमचं काम सुश्रुषेचच आहे. तरीसुद्धा त्यांना आपल्यामूळे इतरांना त्रास होतो ही बोच असायचीच.

अशात काकूंना किडनीचा त्रास सुरु झाला. डॉक्टरांनी डायलेसीसचा सल्ला दिला. काकांच्या मित्रांनी काकूंच्या उपचाराचीही जबाबदारी उचलण्याची तयारी केली. पण काकूंनी कुठलेही उपचार करुन घ्यायला ठाम नकार दिला. डायलेसीस करुन आयुष्य वाढवण्यापेक्षा आहे ती परिस्थिती त्यांनी मनानी स्विकारली. अशाही त्या मुलामूळे, काकांच्या आजारपणामूळे आणि आर्थिक हालाखीच्या परिस्थितीमूळे मनानी खचल्या होत्या.

वाईट हे होतं की, काकू ज्या काकांना भेटायला यायच्या ते बंद झाले. काकांना काकूंच्या आजारपणात त्यांची काहीच सेवा करता येत नसल्याचा सल खूप जास्त होता. आपल्या हतबलतेचा त्यांना प्रचंड त्रास व्हायचा. क्रित्येकवेळा ते जेवण काय पाण्याचाही त्याग करायचे. मग सगळे मित्र जमून समजूत काढून काहीतरी खायला द्यायचे. ही भावनिक गुंतागूंत, काका-काकूंची काय आणि त्यांच्या मित्रांची काय, हेवा वाटावी अशी होती.

तीन महिन्यांच्या संघर्षामध्ये नियती जिंकली आणि काकू गेल्या. आणि त्यांच्या मागून एका बाजूला अवसानघातकी मूलगा आणि दुसर्‍या बाजूला टोकाची मैत्री अशी आयुष्याची दोन्ही टोकं सोडून काकाही मार्गस्थ झाले.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments