नाती अशी आणि तशीही – ०१

“खुप छान संसार चालला होता हो. वयाच्या 26व्या वर्षी लग्न झालं. ही घरात आली. माझे आई-वडील बहीणी सगळ्यांना लळा लावला. कालांतराने बहीणी लग्न होवून आपापल्या घरी गेल्या. दरम्यानच्या काळात दोन मुलं झाली. आई-बाबांनंतरही बहीणींना माहेरपण कायम उपभोगता आलं. मुलं छान शिकली, आपापल्या उद्योगव्यवसायात स्थिरावली. नंतर वाद नको म्हणून दोघांना वेगळी घरं करुन दिली. आणि आम्ही दोघही परत राजाराणीसारखे मस्त जगू लागलो. पण आमच्या सोन्यासारख्या संसाराला दृष्ट लागलीच.” नामदेवमामा सांगत होते.

“हळूहळू हीला विस्मरण होऊ लागले. सुरवातीला वाटलं असेल वयोमानामूळे. पण नंतरनंतर त्याचं स्वरुप गंभीर होऊ लागलं. गॅस पेटवून विसरणं, इलेक्ट्रिक गीझर चालूच ठेवणं ह्या गोष्टी वारंवार होऊ लागल्या. एकदा ती अचानक घरातून निघून गेली आणि लांब चौकात भांबावल्यासारखी उभी राहीली. तीला तीचं नाव आठवेना की पत्ता. नशीबाने एका ओळखीच्या गृहस्थाने तीला घरी आणून सोडली. मग माझा धीर खचला. तीला एकट सोडणं आता शक्यच नव्हतं. मी कायम तीच्या बरोबर राहू लागलो. पण कधीतरी बाहेरची बँक, बाजारहाट अशी कामंं असतातच की. त्यावेळी हीला घरात कोंडून जावू लागलो. पण कायम भिती असायची घरी काही अपघात तर होणार नाही ना… म्हणून मग सावलीत ठेवण्याचा निर्णय घेतला.” सगळं एका दमात सांगून नामदेवमामांनी श्वास घेतला.

मामींना पुढच्या स्टेजचा अल्जायमर्स होता. त्यांना घरी सांभाळणं खूप कठीण होतं. पण तरीही मामांच्या मनात एक अपराधीपणाची भावना होती. आपण हे करतोय ते बरोबर की चुक? आपण आपली जबाबदारी टाळत तर नाही आहोत ना? सारखे प्रश्न त्यांना सतावत होते. मग त्यांना समजावलं. संपुर्ण संस्था हिंडून दाखवली. इथे मामींची काळजी कशा सक्षमरीतीने घेतली जाऊ शकते ते दाखवलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, मामांनी त्यांची तब्येत जपली तरच तर ते मामींची काळजी घेऊ शकणार होते. त्यांनाही ते पटलं. मुलांनाही एकदा सेंटर दाखवून मामींना सावलीत दाखल केल.

मामींना गोड खायला खूप आवडायचं. सावलीत दाखल झाल्यापासून रोज दुपारी 4.30 च्या सुमारास मामा मामींसाठी काहीतरी गोड पदार्थ घेऊन यायचे. कधी गुलाबजाम, कधी शिरा, तर कधी लाडू. स्वत: तीला भरवायचे. मामीही गोड खायला मिळतय म्हणून त्यांच्या शेजारी येऊन बसायची. भरवताना मामा तीच्याशी खूप गप्पा मारायचे. जून्या काळातील आठवणी, नातेवाईक / मित्रांबद्दल काही बोलायचे. त्यांनी दोघांनीच एकत्र जगलेले क्षण तीलाही आता आठवतायत का पहायचे. बोलताना प्रचंड आशेने तीच्याकडे बघायचे तीला काही आठवतय का? न जाणो कोणत्यातरी संदर्भाने तीला काही आठवू लागेल. मला पुन्हा ओळखेल. पण उपयोग शुन्य. मामी त्यांच्याकडे त्रयस्थासारखे बघायची. ‘कोण हा आजोबा मला गोड खाऊ देतोय आणि काहीबाही गोष्टी सांगतोय’, अशा आविर्भावात बघायची आणि खाऊ संपला की निघून जायची.

मामांना ह्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा. म्हणजे त्यांना अल्जायमर्सबद्दल माहिती नव्हते असे नाही. पण एक वेडी आशा असायची. कधी काही चमत्कार होईल आणि सगळं पुर्वीसारखं होईल असं त्यांना वाटायचं. बर्‍याचवेळा जाताना त्यांचे डोळे अश्रुंनी भरलेले असायचे. त्याच अवस्थेत ते स्कुटरवरून निघून जायचे. मला भिती वाटायची की भरलेले डोळे असताना वाटेत काही आडवं आलं, अपघात झाला तर ते कितीत पडायचं.

एकदा न राहवून मी त्यांना विचारलं, ‘मामा, खरं सांगू का? तूम्ही कितीही प्रयत्न केलेत ना तरीही मामी तूम्हाला ओळखणार नाहीयेत. मग का करताय तूम्ही हे सगळं?’ यावर मामा म्हणाले, ‘अरे, मला माहीतीय, ती मला नाही ओळखणार पण मी ओळखतोय ना तीला’.

वयाच्या 82 व्या वर्षी आपल्या 78 वर्षांच्या सहचारीणीवर इतकं निस्सिम प्रेम करणारा प्रेमवीर माझ्यासमोर उभा होता.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments