आजचं जयसिंगपूर … बालपणीच्या आठवणी जागवणारं…!!

सन १९७३ मध्ये आम्ही इचलकरंजी सोडून जयसिंगपुरात रहायला आलो. चौथ्या गल्लीत श्री रतिलाल शहा यांच्या घरातील बोळ भागातील दोन खोल्यांच्या घरात आम्ही रहात होतो. मी तेव्हा पाच ते सहा वर्षांचा असेन. जयसिंगपूर तेव्हा शांतता आणि शुध्द हवेसाठी प्रसिध्द होते. स्टेशन रस्त्यावर प्रत्येक चौकात दोन्ही बाजूला डेरेदार मोठी झाडं होती. जयसिंगपूर रेल्वे स्टेशन ते माधवनगर (सांगली) अशी दर तासाला धावणारी सिटीबस वगळली तर रस्त्यावर वाहनं अगदीच तुरळक होती.
यामुळे आम्ही बच्चे कंपनी मुक्तपणे खेळायचो. खेळता खेळता आम्ही चौथ्या गल्लीतून नवव्या गल्लीपर्यंत बिनधास्त जायचो. ना आम्हाला कधी भीती वाटली, ना कधी आमच्या आई बाबांना टेन्शन आलं.
गल्लीत, घराच्या अंगणात आणि मोकळ्या जागेत चिमण्या, कावळे, कोकिळा यांच्यासह वेगवेगळे पक्षी असायचे. त्यांच्या आवाजानं कसं छान वाटायचं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा आवाज मन मोहून टाकायचा.
आता जयसिंगपूर बदललय. सगळ्याच रस्त्यांवर प्रचंड वाहनं धावत असतात. त्यामुळे मुलं गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत गेली तरी आईबाप लगेच कासावीस होतात. कालाय तस्मैन महा ।
गेले दोन तीन दिवस कोरोनामुळे सर्वत्र जमावबंदी आणि संचारबंदी आहे. जयसिंगपुरात यामुळे रस्त्यावर वाहने तुरळक आहेत. लोक रस्त्यावर कमी आणि घरात अधिक असल्याने सर्वत्र दुर्मिळ शांतता आहे. साहजिकच रस्ते मोकळा श्वास घेत आहेत आणि पक्षांचे सुंदर आवाज मला चक्क १९७३ च्या जयसिंगपुरात घेवून जात आहेत…!!
क्षणभर मोह होतोय, ती जुनी मित्रमंडळी जमवावीत आणि चौथ्या गल्लीत जाऊन तेव्हासारखं मनमुराद खेळावं… खेळता खेळता अगदी नवव्या गल्लीपर्यंत यावं…!!
मनाचं फुलपाखरू असं भूतकाळात भ्रमण करत असतानाच कर्कश्य आवाजाचा सायरन वाजवत दारातून पोलिस व्हँन गेली, पाठोपाठ आवाज आला, संचारबंदी आहे, घरातून बाहेर पडू नका…!!
मी शरीरानं घरात थांबलो अगदी नाईलाज म्हणून पण, भूतकाळात रमलेलं मनाचं फुलपाखरु संचारबंदी मोडतच राहिलं…
ते काही चौथ्या गल्लीतून शाहूनगरला घरात येईचना….!!

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments