ऋतुराज

अवनी वरती वसंत येतो
सर्वांवर तो जादू करतो
तना मनाला,सुखवुन जातो
मना मनाला प्रसन्न करतो

असा हा वसंत ऋतू सर्व महिन्यांचा राजा. चैत्र महिना सुरू होताच या ऋतुराजाची चाहूल लागते. निसर्ग आपलं जुनं रूप टाकून कात टाकल्या प्रमाणे नवं रूप धारण करतो.यातून तो मानवालाही एक संदेश देत असतो. सारं जुनं,वाईट विसरून परत आनंदी,उत्साही व्हा,निरोगी व्हा. बघा निसर्गही आपल्याला त्याच्या कृतीतून हेच शिकवत असतो,पण आपलं मात्र तिकडे लक्ष हवं.

झाडांना छान नवीन पालवी फुटते. झाडांच्या फांद्या आपल्या आत्ताच जन्मलेल्या तुकतुकीत पोपटी रंगाच्या आपल्या इवल्या इवल्या बाळांचा हात घट्ट धरून मंद वाऱ्यावर मजेत हिंदोळ्यान सारख्या डोलत असतात.
वसुंधरेच्या हिरव्या गर्द साडीवर निरनिराळ्या रंगीबेरंगी फुलांची नक्षी अगदी उठून दिसते. बहावा झाडाला तर आपल्या पिवळ्या धमक फुलांचे गुच्छ सांभाळताना खूप कसरत करावी लागते. मंद,संथ,शीतल वाहणारा वारा आपल्या बरोबर मोगऱ्याचा सुगंधी गंध भरभरून वातावरण अगदी सुगंधी करत असतो. हिरव्या,पोपटी रंगात सारी अवनी प्रसन्न हसताना पाहून आपल्यातही एक चैतन्य येते, हुरूप येतो. नवीन नवीन कल्पना फेर धरून नाचू लागतात.

पावनातून शीतलता
दाटुनिया आली
दोन मने प्रीतीच्या
गंगेतच न्हाली
आसमंत आनंदी
धुंद धुंद झाला

अशी स्थिती झाल्याने निसर्गात आणि मनामनात आनंदाच्या उर्मी उठत असतात. रात्री झाडावर झोपलेली व उद्याची स्वप्ने पहात माणसांप्रमाणे पक्षीही दमून,थकून झोपी जातात झुंजू मुंजू होण्याची वाट पाहतच.
आता सूर्यनारायण येण्याची चाहूल लागताच झाडावरच्या कोकीळ पक्षाला कंठ फुटून तो पंचमात गायला लागतो. आशा पक्षांच्या किलबिलाटाने सर्व आसमंतात जाग यायला सुरुवात होते. मार्गळलेली पृथ्वी नवे रूप घेऊन सर्व येणाऱ्या सणा, समारंभाचं स्वागत करायला नटून,थटून सज्ज होते.

रस रंगाची करीत उधळण
मधूगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफीत माला
रसिकराज पातला
आला वसंत ऋतू आला.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
2 Comments
Inline Feedbacks
View all comments
makrand

Khup chan varnan kele aahe

मनीषा प्रभुदेसाई

निसर्ग आणि मन वसंत रुतु चांगले लिहिले आहे