तशी १० एक वर्षे झाली असतील मी गाव सोडून…आता गाव कसा असेल याबद्दल मनात अनेक शंका कुशंका,कुतूहल वगैरे भावना दाटून आल्या होत्या..अखेर आम्ही गावाच्या वेशीपाशी पोहोचलो..जाधव काका गाडी चालवून थकले होते बहुतेक…

“काका कंटाळा आला असेल ना तुम्हाला’

”छ्ह्य्या ! कंटाळा कशाला येईल…गावाला आलो की मला भी मस्त वाटतंय…कोन्त भी गाव म्हंजे शेवटी आपलंच गाव…हाहाहा….’

मला ऐकून बारा वाटलं…रस्त्यात शेजारी राहणारे सावंत काका भेटले त्यांच्या बरोबर मी घर पर्यंत आलो….

गावात आल्यापासून माझी नजर भिर भिरत होती…लहानपणीचे ते न विसरता येणारे दिवस…तो सुवर्णकाळ…ती मज्जा..परत कधी अनुभवायला मिळाली नाही..आणि अगदी जास्त आठवणारे म्हणजे सोनिया सोबतचे ते क्षण…शाळेत एकत्र जायचे, खेळायला बरोबर जायचे, उन्हाळ्याच्या सुट्टीत रोज सीता टेकडी,रंकाळा,पन्हाळा, ज्योतिबा वगैरे ला फिरायला जायचे..दिवसभर नुसते हुंदडायचे…रामदारेंची आशु,जोशींचा श्रीराम,मोहिते काकांची कोण बर..?…आता नाव आठवत नाही…पण तरी आम्ही ४-५ जण असू….आता त्यातले कोण कोण भेटणार याची धाक धुक मनाला लागली होती…काकांना मी पत्रात मला सोनिया आवडते हे बिनधास्त लिहिले होते..त्यांनी पण मला..’वा! तुज्या काकू ला भी आवडते,..’..असे कळवले होते…

घरापाशी पोहोचताच काका जोरात ओरडले..

“शिरपती…शिरपती…”

काही मुले ओट्यावर खेळत होती..त्यातली १-२ आत निरोप द्यायला गेली..आणि बरोबर काकू वगैरे सगळ्यांना गेऊन आली…

“कसा हायेस पोरा…”

काकूने मला हृदयाला कवटाळले..

“पोरा काय ?… मोट्टा अफिसर झालाय त्यो…….”

काकांची छाती फुगून जणू सह्याद्री चा पर्वत झाली होती…त्यांनी ही मला मिठी मारली…

मागून दीदी आली तिने मला ओवाळले, मग काकूने आणि आम्ही सगळे आत आलो…

………………………………………………………………………………………………

“पुण्यात कसा हाय सगळं”

“आत्ताच, पुणे विद्यापीठ परिसरात जागा दिली आहे मला, मस्त आहे जागा, एक गाडी- नोकर पण आहे”…

“आई अम्बाबाई…”

काकूने हात जोडून डोळे मिटले…

“भुका लागल्यात जेवायला वाढता का काकी..?”

काकांनी गोड चिमटा काढला..

“व्हय काका वाढते बर का..”

सगळे जण जोर जोरात हसू लागले…जेवणं झाल्यावर सावंत अण्णानी अडकित्ता हातात घेतला.

‘काका , आहो मला पोस्टात जावं लागेल मी पुण्यातून पाठवलेल रजिस्टर तिथेच आहे अजून’…

मला वेळचे काम वेळेवर करायची सवय काकांनीच लावली होती,…

“जाशील नंतर पोष्ट कुठ पळून चाललाय..वाइज थोडा आराम कर….’

..मी आणि सुधीर जरा अंगणात गप्पा मारत बसलो इतक्यात दारावर कोणीतरी आले…

“जेवायला नाय व्हय यायचं”…

“उन केवढा हाय”

“हिला भी म्हनला चाल तू, गाडी हाय कि आनी, चालत जायाचंय व्हय..”….

वगैरे संवाद ऐकु यायला लागले..नक्की कोण आलं काळात न्हव्त..

“इक्रम..इक्रम..”

काकू ने हाक मारली…माने पाटील – गावाचे सरपंच त्यांच्या बायको आणि मुलगी ‘सोनिया’ सोबत आले होते … ‘सोनिया’…मी तिला नाही म्हटलं तरी १० एक वर्षांनी पाहत होतो…म्हणजेच गाव सोडल्यावर तिची माझे काहीच बोलणे झाले न्हव्ते..फक्त ती इंग्लंड ला शिकायला गेली होती हे काकू कडून ऐकला होत…तिचा गोरा रंग अधिक खुलून दिसत होता..पण केस कापल्या सारखे दिसत होते…नवीन हेअर स्टाईल वगैरे काहीतरी…मी पुण्यात इतका काळ राहूनही मला कोणी पटकन पुणेकर म्हणणार नाही…मोठ्या M N C मध्ये काम करून, अनेक वेगवेगळ्या लोकांना भेटून किंवा त्यांच्या ‘न पटणाऱ्या’ सवयी पाहून मी कसा काय बिघडलो नाही..याचे आश्चर्य वाटते…मी कितीही मोठा झालो तरी..मला अजूनही गावातले संस्कार,इथले वातावरण,राहणीमान आवडते,…हा तसा modern मी पण आहे…पण ‘तसा’…

“आमाला तसा उशीरच झाला…”

“आवो चालतंय कि ..”

‘बसा’…

‘इक्रम..इक्रम…’

आता काकांनी हाक मारायला सुरवात केली…एक तर मी पत्रात लिहिलेलं काकांनी मनावर घेतले असणार नाहीतर

..सोनिया ला माझी आठवण आली असणार…

‘या या..कधी आलात..’

‘हे काय आत्ताच येतोय..आवो तुम्ही जरा’

काकांनी सुरुवात केली..काकूंना नुसती हाताने खूण केली

‘नगो नगो अवो…’

‘अस कसं..?..’

काकू थोड्या लाडाने म्हणल्या…आणि आत गेल्या….

‘तर कुठे असता पुन्यात..?’

‘मी एका इंजीनेरिंग फर्म मध्ये मनेजर आहे..’

‘वा…आमची सोनिया भी इग्लंड ला गेल्ती ….आत्ताच आली परत..’

‘हो बोलल्या मला काकू…’

‘हा..तवा…’

ते आपल्या बायकोकडे बघू लागले…आणि मला ते इथे का आले आहेत ते समजलं…आपण पैसे कमवायला…नाही…’चांगले’ पैसे कमवायला लागलो कि लोक किती सरळ वागू लागतात याचे हे सर्वात मोठे उदाहरण होते…पूर्वी आमच्या कडे कधीहि न येणारे हे पाटील आज चक्क मुलीचे स्थळ घेऊन आले हे पाहून मला मजा वाटली…  ‘ सोनिया बायको म्हणून ?…कधी विचार नाही केला….पण चालेल…लहानपणी आम्ही घर-घर खेळताना नेहेमी  नवरा- बायको असायचो…आणि ती मुलगी…मोहितायंची..काय तिचे नाव…असो…तर ती भांडायची आमच्याशी कि मला याची बायको व्हायचं पण मी मात्र अजिबात ऐकायचो नाही…ती मुलगी मात्र मात्र रड-रड रडायची आणि मग कट्टी घेऊन कोपर्यात बसायची…तिच्याशी कोणीच जास्त बोलायचं नाही.. मग तिची आई नाहीतर माझ्या काकू मग तिची समजूत काढून…पण दुसर्या दिवशी हट्टाने ती परत माझ्याशी खेळायला यायची..

‘काय विचार कराय्लास रे’

शेजारच्या मामांनी खोड काढली..सगळे जण हसू लागले….

‘सोनिया, , काय बोलत नाही ग..’….

काकू हातात सरबत, फरसाण, ड्रायफ्रूट…घेऊन आल्या…

‘तस काही नाय’

सोनिया ची आई सोनिया वर थोडी चिडली,किती वेळ झाला सगळे जण बोलतायत पण हि मुलगी काही बोलायला तयार नाही…स्वाभाविक आहे लाजत असणार ती इतके लोक आजूबाजूला आहेत आणि माझ्यासमोर कशी काय ती एकदम बिनधास्त बोलणार…

‘काय बोलायचं तुम्ही सगळे बोलताय त्यात मी कशाला उगाच…”

आई शप्पथ !..सोनिया बोलली ते बोलली पण काय बोलली…एवढी बेधडक..व्वा!…पण मी सोडून इतर कोणी यावर व्वा नक्की म्हणणार नाही हे मला दिसत होत…

‘अरे इक्रम ते तुला पारसल का रजिस्टर आणायचं होता न्हव..

काकांनी खुबीने विषय टाळला…

‘हो,…’

‘अरे मग स्वोनिया भी गेऊन जा कि सोबत..काय पाटील…?’

‘हो,..चालल कि, म्हंजी जरा तुमच्या गप्पा व्होतील…उगाच आमच्या ‘आमची माती आमची मानसं’ कार्यक्रमात तुमचा ‘यम टीवी’ अडकाय नको…’

काका-काकी आणि सगळे जण पोट धरून हसू लाल्गले, मला पण हासु आवरेना…पण सोनिया नुसती सगळ्यांकडे रागाने पाहत होती…तिने भिरभिरत्या नजरेने माझ्याकडे पहिला आणि मी हसायचे थांबलो…!..

‘आता जातंय का…बामणाला बोलावू मुहूर्त काढाय…’

‘काका तुम्ही पण…’

मी जरा उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून बोललो…

………………………………………………………………………………………………

..दोघेही काहीच न बोलता बाहेर आलो…गाडी पाशी आलो मी बसणार इतक्यात सहज मी तिच्याकडे तिची प्रतिक्रिया पाहायला म्हणून नजर वळवली..तर ती फार खुश नाही असा दिसत होता..

‘काय झाला’

मी ओपनिंग ला जायचा ठरवलं

‘नथिंग..हि फोर्ड फ़िएस्ता २०११ ?”

“हो..का ग..?..”

“नाही, कारण २०१२ मार्केट मध्ये येउन , ६ महिने उलटून झालेत ..’

‘ओह्ह..अग मी एवढा विचार नाही करत..कारच ती..’

‘ओ रिअली…

अस काय करतीय ही..नक्की हि सोनियाच आहे ना…हि अशी न्हवती..अस काय झाल की ही इतकी बदलली..फोरेन ला जाउन आले कि लोक बदलतात हे मी ऐकला होत आणि थोडा फार अनुभवल हि होता पण हे जर जास्त होत..असो…!..

“लेट्स गो देन…’

ती काही बोललीच नाही..माझा काही चुकला का मी विचार करायला लागलो…पण सगळ ओके होत….

आम्ही तसेच निघालो…

‘सो हाउ वोज लंडन..’

‘ग्लासगो..आय वोज इन ग्लासगो’

‘गुड..इन आयर्लंड !’

‘स्कॉटलंड’

‘उप्स..’

मला इतकं पण माहित नाही!…मी यु के मधल्या आमच्या ऑफिसर्सशी किती वेळा डील केल पण हे मला कधी कोणी विचारलं किंवा सांगितल पण न्हवत…’so strange…!’

…आणिक एक १५ मिनिटे आम्ही नुसते रस्त्यातून येणाऱ्या जाणार्या लोकांकडे पाहत होतो…पण बोलत काहीच न्हव्तो…हिला मला भेटून आनंद नाही झाला का ?…हिला कुतूहल वगैरे काही प्रकार माहित आहे की नाही…?…असे बरेच प्रश्न माझ्या मनात पटकन येउन गेले…

‘i am hungry’..

‘ओके,काय खायचं..?’

ती माझ्याकडे मी परग्रहावरून आल्यासारखी पाहत बसली…

‘काय म्हणजे..इथे पिझ्झा हट्ट किंवा के एफ सी थोडीच असणार आहे ?’

ही बरी आहे ना..हिला नक्की दुसरा कोणी तरी आवडत असणार म्हणूनच ती मला काही-बाही सांगून किंवा उगाच उलट उत्तर देउन टाळतीय..

‘मी असा कुठे म्हणालो…जवळ कुठल हॉटेल किंवा…’

‘हा हा हा हा ‘

ती हसायला लागली…’जाऊ देत’ असे मनात म्हणून मी माझ्या मित्राला मेसेज केला…डीटेलस मिळाली आणि आम्ही हॉटेलपाशी पोहोचलो… तू काय खाणार आहेस ?….वगैरे विचारण्याच्या मी भानगडीतच पडलो नाही मला काय उत्तर मिळणार हे न समजण्या इतका मी ‘हा’ न्हव्तो..!…

‘फंटा फोर मी आणि …

‘स्पनिश लोलो संडवइच विथ सोय सोस,प्लीज एक्स्ट्रा चीज ..एंड..फ्लोट कोक…’

वेरी गुड…काय बोलणार अजून…

ऑर्डर आली..इतक्यात तिचा सेलफोन वाजला…

‘aye hi rudolf, what a surprise..!’

आणि ती जे बाहेर निघून गेली ते निदान अर्धा तरी बोलत होती..मला जाम कंटाळा आला…वेटर २-३ वेळा येउन गेला..शेवटी बाई आल्या…

‘ok shall we run..’

‘हो, पण संडवइच..’

‘let it be, I have to meet someone RIGHT NOW..’

माझा मूड तर कधीच निघून गेला होता..त्यामुळे आता चिडण्याच काही कारण न्हवत….मी तिला ड्राप केल आणि तडक घरी निघून आलो….

……………………………………………………………………………

संध्याकाळ झाली होती…मला तर कुठून आपण सोनिया सोबत गेलो असा मनपासून वाटत होत,पण बोलतो कुणाला काकांना तर आधीच ती आवडते असा सांगून बसलेलो आणि काकूला जर सांगितला तर तिला उगाच टेन्शन..

‘तू गेलास आनी रोहिनी आली, लई वेळ वाट पायली अन ग्येली..’

काकू चिकन मेरीनेट करताना बोलत होती..

‘मामी ती त्यला कशापाई आठवेन आता..धा वर्ष झाली..धा च न रा इकरम..’..

आनी शेजारच्या सोनावणे काकी बोटं मोजू लागल्या…

‘अकरा’

काकू ने मोठा शोध लागल्या सारखा उत्तर दिले..

‘ताय , ती पिलेट कर शिद्धी जरा..’

…जेवन झाली..बायका कामात गुंतल्या…आनी मी रानातल्या घरी निघालो….सगळ बदललं पण हे अजून आहे तस आहे…मोट,विहीर,गुरे,वडाच झाड,पेरणी साठी चा घोडा,ट्रकटर,बुजगावणं आनी माझी आवडती जागा ‘मचाण’…मी मचाणावर चढलो..पाठ टेकवली..बर वाटल..वर निळेशार आकाश..धुधाळ चंद्र…चमचमत्या चांदण्या…कित्ती दिवस झाले असे सुंदर दृश्य पाहून…मधून मधून बोचरा वारा स्वतच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता…कुठल्या कुठे पोहोचलो..एका गरीब शेतकरी घरात जन्मून एका M N क च्या मेनेजर पदापर्यंत…लहानपणी वडिलांना पाहिल्याचे आठवत नाही कारण ते पहिलीतच गेले पण आई चांगली लक्षात आहे…त्या नंतर काका-काकू म्हणजेच आई -वडील..पण अजून एक व्यक्ती मनाच्या कोपर्यात घर करून होती…ती म्हणजे ‘सोनिया’..पण आज जे तिचे रूप पहिले ते पाहून आजूनही ती त्या जागेवर कायम असे वाटत नाही..पण काय फरक पडतो..’जे होत ते चांगल्यासाठी होत’..आकाशवाणी रेदिओ खूप दिवसात ऐकला न्हवता…इथे काका विसरलेले दिसतात…मी रदिओ चालू केला…

‘वोह कागज की कश्ती वो बारिश का पानी..’

मला झोप कधी लागली कळलच नाही..

‘मियाओ..मियाओ…’ मोराचा आवाज येत होता

..मी डोळे उघडले..सकाळ झाली होती…डोळे चोळत चोळत मी उभ राहिलो..नारायण कापणी करत होते…लक्ष्मी पिकांना पाणी देत होत्या…या पेक्षा अधिक सुंदर कोणते दृश्य असेल…मी आवरून रस्त्याने चालू लागलो…आधी महादेवाच्या मंदिरात गेलो..प्रसन्न वाटले..मग चालत चालत घरी येणार इतक्यात..काही तरी विसरल्या सारखे वाटले..काही तरी राहून गेले असे वाटू लागले..पण काय ते समजेना…इतक्यात..सीता टेकडी ची आठवण झाली,..लहान पाणी आम्ही सगळी मुले मुले तिथे खेळायला जायचो तीच ती सीता टेकडी..पुन्हा मागे वळलो आणि सीता टेकडीच्या दिशेने निघालो…

टेकडी च्या आसपास लोकवस्ती न्हवती…दूरवर फक्त पुर्णाई नदी चे खोरे आणि उजव्या बाजूला कोल्हापूर शहरला जाणारा गगनबावडा घाट….मी टेकडी वर पोहोचलो..मोकळ्या हवेने माझे हसत स्वागत केले..असे म्हणतात कि रामायणात सीता आणि श्रीराम यांचे काही कारणाने न पटल्याने सीता चिडून या टेकडीवर येउन राहिली होती शेवटी श्रीराम स्वतः येथे आले व त्यांनी सीतामाईची समजूत काढली…

‘हळू दुखतंय ना ग…’

‘शू..थोडा कर सहन…’

एक तरुण मुलगी दुसर्या तरुण मुलीचा तळव्याला काही दुखापत झाली म्हणून औषध लावत होती बहुधा ती हळद लावत असावी अस वाटल..मी त्यांना पाहतो आहे हे समजताच ती हळद लावणारी मुलगी जरा बिथरली..आणि दुसरी मला ना पाहून…

‘आता काय झाल..रोह्नी…’…

अच्छा म्हणजे हि ‘रोहिणी..काल येउन गेली काकांकडे…मला भेटायला आली होती…पण हिच चेहेरा तर…करेक्ट…त्या मुलीसारखा दिसतोय जी सारखी रुसायची..आणि तिला माझ्याशी खेळायला आवडायचा…पण हीच ती ‘रोहिणी’ कशी,…?….इतक्यात त्या दुसर्या मुलीने ही मला पाहिले…

‘हाय विक्रम दादा..’

दादा ही मला दादा का बोलली ?..

‘मी, मला ओळखलस का..मी सोनावणे काकू त्यांची मुलगी…रसिका’..

‘हो ,…कशी आहेस..’

‘मस्त लास्ट एअर ला आहे…सायन्स..तू S P C ल मध्ये आहेस ना…’

‘हो..’

मुलीनी माझा सगळा बायो डेटा वाचला वाटतं

‘ऐक ना मला पण I T मध्येच करिअर करायचं आहे..’

‘गुड..’

‘गुड्डी..काकांना हा हळदीचा डबा नेउन दे तर’… रोहिणी

‘आत्ता..?’…बर..’

गुड्डी उर्फ रसिका बहुदा रोहिणी पेक्षा लहान असणार…रसिका डबा घेउन गेली…

थोडा वेळ आम्ही काहीच बोललो नाही,..

‘काल कधी आलास घरी…?’

‘मी..’

‘नाही मी …’

मी जोर जोरात हसू लागलो…ती ने काही विनोद केला नाही पण ती ज्या पद्धतीने बोलली ते पाहून मला हसू आवरेना..माझे पाहून ती पण हसू लागली…

‘तू कडेपठार पहिला आहेस का ?…’

‘कडेपठार’…

‘नाही ना..चल..’

उत्तर ना ऐकता तिने उत्तर दिले,…

‘पण रसिका…’

ती काहीच बोलली नाही…फ़क़्त तळहात हलवला..आणि हसून माझ्याकडे पाहिलं…

‘तू काल आली होतीस ना..?’

फ़क़्त मानेने ‘हो’..

‘मग थांबली का नाहीस..?..’

‘किती वेळ थांबायचं धा वर्ष थांबले…’

बोलता बोलता ती बरच काही सांगून गेली होती हे तिला ही समजल..ती शांत बसली…दहा वर्षात बरच काही बदललं तिला पण..पण हा बदल चांगला होता…ती खूप समजूतदार वाटत होती…तिला भेटून मला काही क्षण झाले असतील पण ते खूप काही सांगून जाणारे आणि जवळचा कोणतेतरी नाते सांगणारे होते…

‘वाट पहात होतीस माझी..’

‘हो..’

‘मला कधी बोलली का नाहीस..?’

‘काय बोलणार..’…

‘ए तूच ना ती सारखी रुसणारी…आणि चिडकी…हा हा हा ‘

ती पण हसायला लागली..

‘हो मीच…पण आता नाही मी रुसत, किंवा फुगत वगैरे…’

‘वा..छान..’

‘छान काय…तू पुण्यात राहतोस ना…’

‘हो का ग ?..’

‘नाही म्हणजे..’

‘म्हणजे मला adjust करता येईल नाही हे विचार करत होते..’

मी तिची नक्कल केली…

‘ए.. गप्प’….

आम्ही हसत राहिलो….!

——- ओमकार उपाध्ये

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments