परत एकदा

“दुपार पासन गम गुमान पडून ए, काय पन बोलत नाही”
कॉन्स्टेबल रागात आपल्या सोबतच्या कॉन्स्टेबल शी बोलत आहे..पोलीस चौकी दिसते..अंधाऱ्या खोल्या आणि मरणासक्त वातावरण…, कॉन्स्टेबल परत बोलू लागतो..
“कपड्यावरण तर चांगल्या घरातली वाटते”
दुसरा कॉन्स्टेबल पण “रि” ओढत
“ए पोरी, खाली काय बघती..चव्हान, साधी नाय ही, एका आडदांड पोराला आडवा केला हिन..लय डेरिंगबाज ए”
इतक्यात “पाटीलSs” मोठ्याने आवाज येतो
“आलो सर, चल”
दोघे जण जातात..ज्या मुलीबद्दल ते बोलत आहेत, ती एका कोपऱ्यात शांतपणे, तोंड लपवून बसली आहे, वय साधारण वीसच्या आसपास, मध्यम बांधा, गव्हाळ वर्ण..चेहरा काळवंडून गेला आहे, हातावर मुका-मार आणि कपाळावर थोडी जखम झाली आहे, केस विस्कटलेले आणि टी-शर्ट आणि जीन्स थोडी फाटलेली आहे, तिच्यावर थोडे रक्ताचे डाग ही पडलेले आहेत..इथूनच साधारण ५० एक मिटर च्या अंतरावर पोलीस इन्स्पेक्टर साहेबांची खुर्ची आणि टेबल आहे

” साहेब, किती सांगितलं हिला, पोरा-सोरांसारख नको वागू”

एक साठीतले व्यक्ती पोलीस इन्स्पेक्टर साहेबांसमोर आपली बाजू मांडत आहेत, त्यांच्या शेजारी एक चाळिशीतली व्यक्ती आणि पाठीमागे २-४ तरुण मुले उभे आहेत..तरुण मुले त्या तरुणी कडे रागाने पहात आहेत, वयोवृद्ध व्यक्ती गर्भगळीत तर त्यांच्या शेजारची व्यक्ती संतापाने लालबुंद झालेली आहे.

“कदम साहेब, हाफ मर्डर झाला असता, थोडक्यात वाचलंय पोरगं, राखत काढलं तुमच्या नातीनं, आता त्या पोराचा..(मध्येच थांबतात) आजूबाजूला पाहतात..

“त्या पोराचा बाप म्हणजे आमच्या साहेबांचा जाणी दोस्त ए, मी असतो ना तर प्रकरन दाबलं असत, पन आता हे म्हनजे..कॉलेज मध्ये रॅगिंग, छेडाछेडी होतेच..म्हनून मारायचा पोराला”

“हिच्या आईला, हाच सापडला का, तू बाहेर ये तुझी..” चाळीशीतली व्यक्ती चांगलीच संतापते..

“अवि, जरा शांत हो..पोलीस स्टेशन आहे ह्ये, आदीच या पोरींन नाक कापलं, ते कमी हाय का, .. तीच काय करायचं ते नंतर बगू..आदी..”

“अन्ना तुम्ही मधी पडू नका मी हिला,..”

उभा असलेला तरुण, आवेशात पुढे पाऊल टाकू लागतो

“ए शक्तिमान, आमी हाय हित..थंड घे..कदम साहेब…तुम्ही बोला कस काय ते आता..”

पोलीस इन्स्पेक्टर साहेब चाहाचा कप खाली ठेवताना

“साहेब, तुम्ही बोला..आमची चार लोकात जायची ती ग्येलीचे..तेव्हा..” त्या तरुण मुलीचे आजोबा – अण्णा

“माझी पोरगी म्हणून न्हाही तर, खानदानाची इज्जत म्हनून तरी..” मुलीचे वडील – अविनाश

“बर समजलं, ..तुम्ही ठरवा काय त्ये, तीन जनांना ठोकलंय – एक फ्रॅक्चर अन दोगांना किरकोळ खरचटलं आहे,.. आम्हाला पायजे ते मिळालं की बेल मिळल आनी मग सही करावी लागल..”

“सही??” अविनाश – मुलीचे वडील

“मंग कुनाच्या जीवावर सोडायच तिला, परत अस काय केलं तुमच्या पोरीन तर जबाबदारी कोन घेनार?” इन्स्पेक्टर शिंदे नी मुद्दा पुढे केला

आत्ता पर्यंत चाललेला आवाज आपोआप शांत झाला, सर्वजण एकमेकांच्या नजरा चुकवू लागले कारण आता स्वतःचे नाव द्यायची कुणाचीच टाप होईना..

अण्णा आपल्याला काहीच समजले नाही असा भाव आणून शेजारच्या अविनाश ला नक्की काय करायचे अशा भावात बघू, विचारू लागले..मागे उभे असलेली मुले ” पप्पा, अन्ना मी जर आलो बाहेरण जाऊण” पण लांब गेले..

काही वेळ काहीच होईना, इन्स्पेक्टर शिंदेनी कॉन्स्टेबलशी चर्चा करु लागले..

इतक्यात…अगदी साधी घरातली सहावारी साडी नेसलेली एक साठीतली एक महिला, स्टेशनात आवेशात प्रवेश करते..

“बोला..” कॉन्स्टेबल..

त्या महिलेस बघताच अण्णा आणि अविनाश धावत टेबल पाशी – जिथे ती महिला आहे तिथे पोहचतात..

“तू इथे कशाला आलीस” अण्णा

“आई? काय झालं?” अविनाश

त्या दोघांकडे जराही न पाहता

“इनसपेकटर साहेब..माझी पोरगी..माझी नात..तेजू..तेजश्री..कदम..” साठीतील महिला

“तुम्ही तिजी आजी का?”

“हां..”

“बेल वर सुडता येईल पन डिपॉझिट लागल आनी..” इन्स्पेक्टर शिंदे

“चालत्य, तुमि सांगा”

त्या साठीतल्या महिलेने एक कटाक्ष जेल मध्ये बंद असलेल्या आपल्या नातीकडे टाकला..आणि हा प्रसंग तिला अचानक काही वर्षे मागे घेऊन गेला..जेव्हा ती फक्त १९ वर्षांची होती..

कोल्हापुरातल्या डोंगरवाडीत राहणाऱ्या सुली ला, साताऱ्यातल्या माण तालुक्यात पाठवण्यात आले..लग्न जमवून देताना घरचे सगळे चांगले आहे – शेती वाडी, जमीन-जुमला, दूध-दुभते हे पाहिले गेले..मुलीच्या मामांनी ही जोडी लावली होती. एका वर्षात पोटी मुलगी आणि पाठोपाठ घरचा दिवा कसा जन्माला येईल याची लगबग, घाई आणि जबरदस्ती सुरू झाली..
या गडबडीत “सुलोचना रावसाहेब कदम” अर्थात सुली चे यजमान रावसाहेबांची पुण्याला बदली झाली, सरकारी नोकरीत असल्याने कोणताच प्रश्न नव्हता..

पुण्यात ज्या घरी रहायचे त्याच्या शेजारीच घरमालक राहत असे, हा घरमालक म्हणजे रावसाहेबांच्या आत्याच्या सासरकडून भाऊ लागे, त्याचा मुलगा जो नुकताच ग्रॅज्युएट झाला होता, दर शनिवार-रविवार संध्याकाळी रावसाहेब व मालकाचा मुलगा चंद्रकांत यांची जँगी पार्टी चाले, तिथे चंदू उर्फ चंद्रकांत त्यांच्या कॉलेज मधल्या मित्र-मैत्रिणींना बोलावून रात्रभर नाच, धिंगाणा घाले..आधी याची सवय किंबहुना अप्रूप वाटणाऱ्या रावसाहेबांना नंतर हळूहळू याची सवय लागू लागली..रावसाहेब आपल्या कुटुंबास यापासून आधी लांब ठेवत होते पण नंतर – सुली ला कधीही मध्येच जेवण बनवायला लावत तर कधी ऑम्लेट बनवायला सांगत..सुली ला मात्र या सगळ्याचा कंटाळा आला होता,

त्यातून – चंदूची पहिल्या दिवसा पासून सुली वर वाईट नजर होती..तिला ते पदोपदी जाणवत असे..कधीही बाहेर पडल्यावर ती कुठे जाते, कधी काय करते यावर त्याची बारीक नजर असे..

“ऐका णा, मला जरा एक बोलायचं व्हतं” सुली

“पैसे संपले का, इतक्या लवकर..अजून महिणा जायला धा दिस आहेती” रावसाहेब

“नाही, तस णाही, तो चंदू..चंद्रकांत..माझ्याकडं..वाईट बघतो..”

“मंग, त्याला काय झालं?”

“अवो पन..उद्या..”

“आय तो माझ्या भावाचा पोरगा हाये, बारीके तेला काय समजतं..”

“पर, तुमाला काय हाय का नाय..”

रावसाहेब जवळ येऊन सुलीच्या कानाखाली मारतात..

“गप बस..जास बोलू नग..माजा डबा बांद..पोर सांबाळ लय उपटा-उपटी करू नाय बाय-मानसानी” अन बाहेर निघून जातात, आईचा रडवेला चेहरा पाहून छोटी भोकाड पसरते..आणि तिला शांत करता करता सुलोचना सगळं विसरून जाते.

असेच काही दिवस जातात..त्यानंतर साधारण महिन्याभरात रावसाहेबांना आठवड्यातून दर दोन दिवस सासवड ला व्हिजिट साठी काम निघू लागले..एका अर्थी ते बाहेर आहेत हे जरी सुली साठी सुसह्य असले तरी चंदू पासून कसे वाचावे हा यक्षप्रश्न होताच..

भाजी-दूध आणताना तो मुद्दाम बाहेर पडत आणि सहज धक्का देऊन जात असे अनेकदा होत असे..आजूबाजूचे काही लोक हा प्रकार नेहमी पाहे पण, “मोठ्या बापाचा लेक” त्याच्या कोण नादी लागणार म्हणून टाळत असे, तर कधी लांबून याची मजा घेत..जोरात हसत तर कधी शिट्या मारत..सुली या सगळ्याला मनोमन कंटाळली होती!

एकदा असेच भाजी घ्यायला जात असताना, चंदू ने तिची वाट अडवली

“अरे वहिनी, कुठे भाजीला का?”

“हम्म..”

“मला थोडं काम होत, मला ना चपाती येत नाही, भाजी झाली पण चपाती..”

“मी पाठवून देईन पोरीसोबत..”

“णको त्यापेक्षा तुमीच जर आले तर..फक्त 2 चपात्या..”

सुली ला काय करावे सुचेना, पण नंतर तीला वाटलं की २ चपात्या करायला कितीसा वेळ लागणार..जाऊन येऊ..
सुली भीत-भीतच चंदूच्या खोलीत शिरली..

“वहिनी तुमि करा बिनधास्त मी जरा एक काम करून आलो”

सुली ला बरे वाटले, ती ने होकारार्थी मान हलवली..सुली आत शिरताच चंदूने फक्त बाहेर जायचे नाटक केले आणि आतून दरवाजा लावून घेतला..

“चंदू भाऊ..काय करताय..”

“शूSsss..शान..एकदम शान..काही होत नसत तुला..”
चंदू सुलीचे तोंड दाबून तिच्याकडे हावऱ्या नजरेने बघू लागला. सुली च्या हाताला काही लागेना ज्याने ती चंदू चा प्रतिकार करेल, त्याच्या तावडीतून कसेबसे स्वतःला सोडवून, सुली अखेर दारापर्यंत आली, कडी उघडणार इतक्यात तिच्या केसाला जोरात झटका बसला आणि चंदू रागारागात सुली ला आपल्या जवळ ओढत होता..तो तिचे कपडे फाडू लागला..सुली मध्ये मध्ये जोरात ओरडत होती पण चंदू ने आपला एक मित्र बाहेर उभा केला होता जो कुणाला आत येऊ देत नव्हता, कोणी आलेच तर धमकावून पाठवत असे..ही झटापट खूप वेळ चालली..सुली ची सगळी धडपड पूर्णपणे निष्फल ठरली..

आता दुपार झाली होती..दाराला लाथ मारून चंदू बाहेर आला,..सुली आता बाहेर यायला लागली होती, फाटलेले कपडे, विस्कटलेले केस, कपाळ, ओठ, हात यांवर ओरखाडे उठलेले..लंगडत-लंगडत ती दारातून बाहेर आली..चंदू मात्र समोरच्या कट्ट्यावर जाऊन सिगारेट चे झुरके घेत जणू मस्तवालपणे सुलीकडे पाहून हसू लागला..
सुलीला नक्की काय चालले आहे, ती नक्की कुठे आहे? काहीच समजत नव्हते..तिला आता चक्कर येऊ लागली..दहा पावलांवर असलेल्या घरापर्यंत जाणे सुली ला मुश्कील वाटू लागले..ती धाडकन खाली पडली..!!

डोईवर तळपता सूर्य, तापलेली जमीन..तहानेने व्याकुळ आणि अनेक जखमांनी जळजळणारे पूर्ण शरीर..कशीबशी अखेर सुली घरी पोहचली..सुली ची लेक घरात एकटी बसून आपली भातुकली खेळत होती..तिला बघून ती हसत तिच्याजवळ आली, पण नेहमी पेक्षा तिचे वेगळे रूप ती पहात होती..

“आय तुला बाऊ-बाऊ जाला का”

सुलीला रडू आवरेना, ती प्रियांकाला काळजाला लावून धाय मोकलून रडू लागली..

काम उरकून संध्याकाळी रावसाहेब घरी आले, त्यांना पाहून सुली जोरात पळत पळत त्यांच्या गळ्यात पडली आणि डोळ्यात पाणी तरळणार इतक्यात..

“ए भवाने, बाजूला हो..आमची पार्टी ए आज..” म्हणून तिला झटकून रावसाहेब मोकळे झाले..ती का रडत आहे, तिच्या मिठीचा खरा अर्थ काय, त्यातली आर्तता त्यांना समजली नाही..पिशवीतून दारूची बाटली काढत,

“ए सुले, चकना आन आनी त्या चंदू ला बोलव”

इतक्यात झिंगत चंदू घरात शिरला, रावसाहेब खुश झाले..काही वेळाने जेव्हा रावसाहेब दारूच्या नशेत गेले आहेत हे पाहिल्यावर चंदू स्टोव्ह जवळ स्वयंपाक करणाऱ्या सुली जवळ गेला..

“तुझ्या नवऱ्याला काय बोलली तर तुझ्या तर…मजा नाय आली च्यायला..फूडच्या टायमाला अपुन आपल्या वावरात जाऊ..”

सुलीला मेल्याहून मेल्यासारखं झालं होत, तिचं ऐकून घेणार घरात कुणीच नव्हतं, ..दुसऱ्या दिवशी तिने पीसीओ बूथ वरून तिच्या सख्या भावाला कॉल केला पण
“आता तुझं तेच घर, आम्ही काय करनार?” म्हणून हात झटकून टाकले…त्यानंतर अनेक वेळा सुली ने रावसाहेबांना हा प्रकार सांगायचं प्रयत्न केला पण नेहमीच तिला उडवून लावण्यात आले..तिचे ल ऐकून घेणारी व्यक्ती म्हणजे फक्त तिची लेक!

आज अनेक वर्षांनंतर परत एकदा आपण त्या प्रसंगास आपण सामोरे जात आहोत असे सुलोचनेस वाटत होते…तिच्यासमोर तोच नवरा जो तिच्या शिलाचे रक्षण तर सोडाच पण खांबीतपणे सोबत उभा ही राहिला नाही, तिच्या माहेरच्या लोकांनी तर तिला वाऱ्यावरच सोडले होते त्यातले तर कोणीच आज सोबत नव्हते..ही नातवंडे ज्यांच्या खांद्यावर उद्याच्या उज्ज्वल भविष्याचे ओझे आहे, जी काही वेळापूर्वी तेजश्री म्हणजेच सुलोचनाच्या नातीस तिने आपल्या खानदानाचे नाक कापले म्हणून दूषणे देत होते, तेच मित्रांसोबत घोळका करून सिगरेट चे झुरके मारत आहेत काही मावा खात आहेत आणि तोंडी लावायला येत्या-जात्या मुलींकडे अधाशी नजरेने पाहून “कमेंट्स” पास करत आहेत..

आपल्यालाच यातून मार्ग काढावा लागेल, आपल्या मागे तेव्हा कुणीच नव्हते पण आपल्याला आपल्या नाती मागे आज खंबीर पणे उभे रहावे लागेल..कारण बुडत्याला काडीचाही आधार पुरेसा असतो..आणि आज तर तेजश्री ला याची सर्वात जास्त गरज होती, ती आज २० वर्षांची आहे, या टप्प्यावर जर ती खचली तर तिला पुढे आयुष्यात उभारी घेता येणार नाही..तिने दाखवलेले धैर्य हे खरंच मोठे आहे, जे त्या काळात सुली ने करायला हवे होते ते आज तेजू ने करून दाखवले होते!

“माझं नाव लिहा, मी तिची आजी – सौ. सुलोचना रावसाहेब कदम”

“सुले, काय चाललंय..साहेब हीच ऐकू नका..आणि बेल चे पैसे कोण तुझा बा दिल का?” रावसाहेब तिच्यावर चवताळून उठतात तर अविनाश त्यांना थांबवतो, त्यांचा आवाज ऐकून बाहेरची मुले ही येतात..त्यांच्या आपापसात “आईला, आज्जी..कशी आली हित” वगैरे चर्चा चालू रहाते..

“साहेब हे पैसे घ्या, आनलेत मी” सुलोचना फक्त इन्स्पेक्टर साहेबांशी बोलत आहे..

“माने, सोडा पोरीला”..

तेजश्री बाहेर येते, सुलोचनेस तिच्या जागी चांदूच्या घरातून बाहेर पडणारी सुली दिसते..तेजश्री सुलोचनेस गच्च मिठी मारते..सुलोचना तिचे डोळे पुसते आणि तिचा मुका घेते. तिचा हात घट्ट धरते आणि दोघी चालू लागतात..

“आई कुठं चाललीस,..” अविनाश

“..जिथं मला सवताला कोंडाव लागनार न्हाई..”

सुलोचना तेजश्रीस डोळ्याने “तिकडे पहा” असे सांगते..ती सहज बाहेर पाहते तर – महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा आणि काही सहकारी त्यांना गाडीने घ्यायला आले आहेत..ते या दोहींची वाट पहात आहेत..

अविनाश निःशब्द होतो, रावसाहेब तर खुर्चीवर खिळून बसले आहेत..बाकी पोरे पुन्हा नाक्यावर रस्ते रंगवण्यात व्यस्त झाली आहेत..

..आणि तेजश्री एका नव्या दिवसाची सुरुवात करत आहे

– ओमकार उपाध्ये | २७/०७/२०२० | ऑकलंड

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
3 Comments
Inline Feedbacks
View all comments
Girish Watve

Excellent Omkar. Keep writing.

ओंकार खेंगरे

उत्तम लघुकथा आणि मांडलेला मुद्दाही

Harsha Pradip Jadhav

Khup sunder ahe… Ani khup realistic pan ahe….