अशी ही दिवाळी

नमस्कार मित्रांनो… कसे आहात? आता दिवाळी चालू होतीये, आज थोडासा वेळ होता म्हणून वाटले तुमच्या बरोबर थोड्या गप्पा माराव्यात.. तुम्हाला वेळ असेल तर हं.. बघता बघता हे वर्ष कसं गेलं कळालचं नाही आणि दिवाळी अगदी तोंडावर ठेऊन ठेपली. माझ्यामते वर्ष किती पटकन गेलं असं फक्त दोनच कारणांमुळे वाटते, पहिले म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या कामात पूर्ण बुडालेले असता म्हणजेच भरपूर कामामुळे आणि दुसरे कारण म्हणजे तुम्ही खूप खुश असता, आनंदी असता तेव्हा, बरोबर ना? असो, तुमची दिवाळीची तयारी काय म्हणतीये? झालीये ना? आणि अगदी नसेलच झाली किंवा थोडी राहिली असेल तरी हरकत नाही अजून 2-3 दिवस आहेत पट्कन करून घ्या. त्यानंतर मग आपण मनसोक्त गप्पा मारू.

दिवाळी म्हणजे दारासमोर मस्त रांगोळी काढून त्यावर मंदपणे तेवत राहणारी पणती ठेवणे, लहानग्यांना आवडणारा आकाशकंदील – लाईटच्या माळा लावणे, रोषणाई करून सगळीकडे झगमगाट करणे, नवीन कपडे घालणे, अभ्यंगस्नान करणे, दिवाळी पहाट कार्यक्रमाला जाणे, मनसोक्त फराळ करणे आणि ह्या सगळ्याचे अवचित्य साधून घरात एखादी नवीन वस्तू आणणे हे जणूकाही समीकरणच बनले आहे. आता तुम्ही म्हणाल की, फटाक्यांचा उल्लेख का नाही केला? कारण मोठ्ठा आवाज, प्रचंड धुरामुळे होणारे श्वसनाचे त्रास हे नक्कीच आनंददायी नाहीये. फटाके वाजवून पैशाचा धुर करण्यापेक्षा त्याच पैशांची तुम्ही घरासाठी छान वस्तू आणू शकता, नंतर बाहेर फिरायला जाऊ शकता आणि सगळ्यात छान उपक्रम म्हणजे तुम्ही त्याच पैशांचा उपयोग करून दुसरयांच्या आयुष्यात आनंद आणू शकता.

ह्यावेळी पाऊस चांगला चार महिने टिकला आहे. त्यामुळे येणारी थंडी सुद्धा तेवढीच बोचरी असणार ह्यात शंका नाही. यावेळी दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला भारी मजा येणार अगदी तशी जशी पूर्वी यायची. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अभ्यंगस्नानाचे महत्व त्याची मजा आपण हरवून बसलोय. आहो जिथे रात्री झोपायला दोन वाजतात तिथे अभ्यंगस्नानाची कल्पनाच करवत नाही, म्हणजे जे काही चालले आहे ते बरोबर आहे असे मुळीच नाही. पहाटेच्या वेळी म्हणजे सूर्योदयापूर्वी उठायचे, आईकडून किंवा बायकोकडून अंगाला सुगंधी तेल लावून घ्यायचे. आता तुम्ही रोज अभ्यंगस्नान करायचे म्हणालात तर हे काही शक्य होईल असे मला तरी वाटत नाही. हीच तर दिवाळीची गंम्मत आहे. स्नान करताना सुगंधी उटणे शरीराला लावले की दिवासभर त्याचा सुवास आपल्याभोवती दरवळत राहतो. संपूर्ण दिवस प्रसन्न वाटतो. जाहिराती बघून नेहमी स्वतःच्या अंगावर कोणकोणते सुगंधित फवारे उडवून घेणाऱ्या लोकांना ह्याची मजा किती येईल हे सांगता येत नाही. पण अश्या लोकांनी हा उटण्याचा प्रयोग नक्की करुन पहावा.

पुण्यासारख्या शहरामध्ये दिवाळी पहाटेचे कार्यक्रम भरभरून असतात. चांगल्या कसलेल्या गायकांना ऐकण्याची ही फार सुवर्ण संधी असती. हवेत मस्त गारवा, उटण्याचा सुगंध आणि ह्या बरोबर मस्त गाणी ऐकण्याची मजा काही निराळीच. ह्या अशा कार्यक्रमात गणपतीत डीजे वर थिरकणारी कॉलेजातली मुले पण अगदी नचूकता हजेरी लावतात. काहींना गाणी, मराठी संगीताची मनापासून आवड असते तर काहींना फक्त “संगीता” ची. बाकी तुम्ही समजून घ्या.. अश्या वातावरणात मस्त पैकी सेल्फी घेऊन सोशल मीडियावर अपलोड करायला काहीच हरकत नाही. कार्यक्रमात ऐकलेली गाणी गुणगुणत, गाणी किती मस्त झाली असे म्हणत आपण घरी येतो.

ह्या नंतर आपले लक्ष पोटाकडे जायला लागते. वेळ होते त्याची, ज्याची तुम्ही आम्ही संपूर्ण वर्ष वाट बघत असतो ते म्हणजे दिवाळी फराळाची.. सुटले ना तोंडाला पाणी? मस्त कुरकुरीत चटकदार चिवडा, काटेरी खमंग चकली, गोड आणि गोल लाडू, चहा बरोबर खायला शंकरपाळे.. व्वा क्या बात है। पण एक महत्वाची आठवण करून देतो की, प्रत्येक पदार्थाचा पहिला घास घेतल्यानंतर “मस्त झाले आहे सगळे” अशी कौतुकाची थाप पदार्थ करणाऱ्या व्यक्तीला द्या म्हणजे झाले.. नाहीतर तुमचे अवघड आहे. पुढे काय होईल ह्याची कल्पना न केलेलीच बरी.. गंमतीचा भाग सोडा, पण तुमची चांगली दाद ही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद आणणार असेल तर काय हरकत आहे.. प्रत्येक पदार्थ कसा आवडीनं खायला हवा. आता हे सगळे पदार्थ बाराही महिने बाहेर विकत मिळतात म्हणा, पण ह्या आपल्या घरी केलेल्या पदार्थांची चव आणि गोडी काही वेगळीच खुप सरस ठरते.

फराळ झाला की, हातात फोन घेऊन आलेल्या शुभेच्छा वाचायच्या आणि आपण शुभेच्छा देयच्या ह्या कार्यक्रमाला सुरवात होते. बरींच लोक आलेल्या शुभेच्छा अगदी जश्या आल्या तशा फॉरवर्ड करतात तर काहींना काहीतरी वेगळे करण्याची आणि स्वतःचे कौशल्य दाखवण्याची इछा असते. ह्या मेसेज मधल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहचविण्याचे काम करतात त्या ईमोजी. एखादी व्यक्ती आवडत नसेल तरी त्याला स्माईली पाठवताना किती वेदना होतात हे पाठवणाऱ्या व्यक्तीला चांगलेच कळते.

खरेतर दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे असे वर्णन आपण करतो. पण मग हा अंधार म्हणजे नक्की काय? खरेतर हा अंधार म्हणजे एखाद्याच्या आणि आपल्या आयुष्यात असलेले दुःख असे आपण म्हणू शकतो. आणि प्रकाश म्हणजे त्या अंधारावर सकारात्मक पद्धतीने केलेली मात आणि आयुष्याला मिळालेली नवीन दिशा आहे असे मला वाटते. अश्या खोट्या खोट्या ईमोजी पाठविण्यापेक्षा जर आपण आपल्यातले गैरसमज दूर केले, एकमेकांना आधार दिला तर समोरच्याच्या चेहऱ्यावर येणारी स्माईली आपल्या काळजाला भिडेल आपल्याला जास्त आनंद देईल. पूर्वी दिवाळीत सर्व परिवार एकत्र येत असत त्यामागे हेच करण असावे असे मला वाटते. असे झाले तर आपली दिवाळी खरोखरच गोड होईल ह्यात शंका नाही.

चला तर मग आज इतकेच. पुन्हा भेटूच गप्पा मारायला.. आपणांसर्वांना आणि आपल्या परिवारास दीपावलीच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांना भरपूर सुखाची, समृद्धीची, आनंददायी आणि आरोग्य संपन्न जावो.

शेअर करा..

guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Sandhya

Mast likhan aahe Akshay.. Keep it up