कोवळ वय होत त्यांच. पहिलं प्रेम होत. तो स्वप्नाळू, मनस्वी. ती शिस्तप्रिय, काटेकोर!!! पण तरीही जुळल दोघांच, प्रेमाला वयाची, देशाची, जातीची, धर्माची बंधन नसतात तशीच स्वभावाचीही बंधने नसतात हे त्यांना पाहून कळत होत.
तिला पाहिल्यावर नेहमी त्याला तो क्षण आठवायचा ज्या वेळी त्याने तिला पहिल्यांदा पाहिलं होत. रस्त्याच्या कडेला गाडीवरची पाणीपुरी खाताना. एका हातात पाणीपुरीची कटोरी आणि दुसर्या हाताने हळदीच्या रंगाची ओढणी सांभाळत पाणीपुरी खाणारी ती! थोडी जास्त तिखट झाली म्हणून हलकी रागावलेली आणि म्हणून जास्तीची पुरी हक्काने घेऊन खाल्लेली. त्यालाही कळल नाही तो कधी तिचा झाला ते आणि तेव्हाच त्याने ठरवलं कि आता पाणीपुरी खायची ते तिच्यासोबतच!!! दर शनिवारी ती त्या पाणीपुरीच्या गाडीवर यायची तिच्या बाबांसोबत – पाणीपुरी खायला. आणि तो न चुकता तिला पाहायला हजर राहायचा. वार आणि वेळ ठरलेली असायची. दिवसभर तिची स्वप्न पहायचा. ती नसताना तिच्यासोबत बोलायचा. लाडाने तिला पाणीपुरी म्हणायचा. शनिवार-पाणीपुरी-तिची अन त्याची नजरानजर ठरलेली!
सहा महिने चालू होता हा खेळ आणि अचानक सगळ काही बदललं.
तीच येण बंद झाल. याला तिचं नावही माहित नव्हत. एक शनिवार, दोन शनिवार असा पूर्ण महिना गेला. याच्या मनात शंकाच काहूर! काय झाल असेल? लग्न झाल असेल? गावी गेली असेल? कायमची गावी गेली असेल? याला राहवेना. तिला खूप शोधायचा प्रयत्न केला पण नाही सगळ शुन्य. शेवटी मित्रांना गाठल, त्यांना कामाला लावल मग समजल त्याच्या मित्राच्या कॉलेज मध्येच होती ती. शेवटच्या वर्षाला. हिम्मत करून तिला गाठल. स्वतःच नाव सांगितलं. भेटण्याचं कारणही सांगितलं. त्यालाच कळल नाही त्याच्यात एवढी हिम्मत आली कुठून? पण त्याची हिम्मत तिला आवडली पण तरीही गप्प राहिली. नजरेनेच होकार दिला. हसून निघून गेली. आभाळा एवढा आनंद! मग ठरली पहिली भेट. होकारानंतरची पहिली भेट, अनोळखी म्हणून नाही तर प्रियकर आणि प्रेयसी म्हणून.
भेटीचा क्षण आला. दोघेही एकमेकांसमोर. शांतता!!! शब्दांच असही काही खास काम नव्हत. नजरा गुंतल्या होत्या एकमेकांत. सगळ नवीन जग मिठीत घ्यायला. माहित नाही का पण तिचे डोळे थोडे किलकिले झाले होते. त्याला वाटल एकदा विचाराव पण हिम्मत नाही झाली. कुणीतरी सुरुवात करावी म्हणून तोच बोलू लागला. काय झाल, कस्स झाल. पूर्ण सहा महिने शब्दात मांडले. हळदीच्या रंगाच्या ओढणीपासून ते होकारापर्यंतचा सगळा प्रवास शब्दात मांडला, अगदी उत्साहाने. ती सोबत होती तर आज सगळ्यात नशीबवान समजत होता तो स्वतःला. ती मात्र कुठेतरी हरवली होति. काहीतरी कमी वाटत होत तिला. काय बोलू अन काय नाही अस झाल होत. थोडा वेळ गेल्यावर त्याने विचारल, ” आपण पाणीपुरी खाऊयात?”, ती चपापली – तिला नको म्हणायचं होत पण तो ऐकायच्या मनःस्थितीत होता कुठे? तिला न विचारताच तो तिला पाणीपुरीच्या गाडीपाशी घेऊन गेला, हातात हात घेऊन. खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण होणार होती. त्याच्या स्वप्नातली पाणीपुरी आज त्याच्या सोबत होती. खूप आनंदाने त्याने २ पाणीपुरी लावायला सांगितल्या. तिची नजर सैरभैर झाली होती. तो बोलतच चालला होता आणि ती काहीही ऐकून घ्यायच्या तयारीत नव्हती. पाणीपुरीवाल्याने पहिली पाणीपुरी त्याच्या हातात दिली, त्याने ती घेतली अन तिला भरवण्यासाठी हात पुढे केला. तिला काहीच कळत नव्हत. तिने त्याच्या हाताला जोराचा हिसका दिला आणि तिथेच तिला रडू कोसळले. त्याला काहीच सुचत नव्हते. काय झालय, कुठे काय चुकल- काहीच कळायला मार्ग नव्हता. त्याने प्लेट बाजूला ठेवली तिला बाकावर बसवलं, शांत केल, आता ती बर्यापैकी सावराल्यागत वाटत होती,
तो: काय झालय? काही सांगशील का? (ती बाकावर स्तब्ध बसली होती) ती: आठवतोय तुला तो शेवटचा शनिवार जेव्हा तू मला शेवटच पाहिलं होतस? (तिचा आवाज अजूनच कातर होऊ लागला होता) त्याच शनिवारी रात्री बाबा गेले (हुंदके देऊन ती मोठ्याने रडू लागली) त्यांना माहित होत, मला पाणीपुरी खूप आवडते म्हणून जस मला कळतंय तस दर शनिवारी अगदी न चुकता ते मला पाणीपुरी खायला आणायचे. पण आता बाबा गेले…… (तिच्या हुंदक्यांचा जोर वाढतच होता. त्याचे हात थरथरत होते. काहीतरी ठरवून पुढे गेला.) तो: बाबा गेले म्हणून बाबांच्या परीने पाणीपुरी न खाल्लेली बाब्बांना आवडेल? आपली माणसं नेहमी आपल्या सोबत असतात अगदी मरणा नंतरसुद्धा!!! स्वतःसाठी नाही तरी बाबांसाठी तरी खावीच लागेल त्याशिवाय त्यांना बर वाटेल? त्याने अलगद एक पाणीपुरी घेतली अन तिला भरवली. दोघांच्या नजरा अजूनही एकमेकांत गुंतल्या होत्या. आयुष्यभर विश्वास होता दोघांच्याही नजरेत. तिने नकळतच ती पाणीपुरी खाल्ली. त्याला हायस वाटल. ती अजूनही त्याच्या डोळ्यात पाहत होती. कुठेतरी त्याच्या डोळ्यात तिला तिचे बाबा दिसत होते. आणि कानात त्याचे शब्द घुमत होते – आपली माणसं नेहमी आपल्या सोबत असतात अगदी मरणा नंतरसुद्धा!!! आपसूकच तिने त्याच्या खांद्यावर डोक ठेवल, आणि दोघानाही आयुष्यभराचा आधार मिळाला.

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments