नाती अशी आणि तशीही – ०२

आजवर अनेक वेळा तो मामाकडे गेला होता. शाळेच्या सुट्टीत तर हमखास सगळी भावंड एकत्र जमायची. दिवसभर हुंदडणं. कैर्‍या चोरुन खाणे. लगोरी, गोट्या, विटीदांडू याबरोबरच नदीत येथेच्छ पोहोणं. मामीही सगळ्या भाचरांना प्रमानं करुन घालायची. मामांना पाचही मुलीच. पण मामांनी मुलं-मुली असा कधी भेद केला नाही. खाजगी नोकरी असुनही घरात सगळे सुखी होते. मानसिक सुबत्ता मोठी होती. वय वाढलं नोकरीला लागला.  नोकरीमूळे साहजीकच मामाकडे जाण्याचं प्रमाण जरा कमी झालं पण तरी मामाच्या घराची ओढ तशीच होती. मनाच्या गाभार्‍यातील सुगंधी कप्पा होता जणू.

पण आज काही वेगळं वातावरण होतं. मामांची मधली मुलगी वीणा हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट होती. अंघोळीचं पाणी पातेल्यातून बाथरुममध्ये नेताना कशावरुन तरी पाय घसरला आणि अघटीत घडलं. गरम पाणी तीच्या अंगावर पडलं. तीची पाठ – पोट कमरेखालील भाग भाजला. अगदी जीवावर बेतलं नसल तरी जखमा खोलवर होत्या. वीणा प्रचंड तळमळत होती. संपूर्ण कुटुंब हादरलं. असं अनपेक्षीत काही घडेल असं कुणाच्या स्वप्नातही आलं नव्हतं.

हॉस्पीटलमध्ये मामाचे सगळे नातेवाईक-मित्र आस्थेने येत-जात होते. काय हवं नको बघत होते. याने तर तळच ठोकला होता. दिवसभर नोकरीला – मुक्कामाला हॉस्पीटलमध्ये. रात्रभर बसून असायचा. वीणा रात्री-बेरात्री जागी व्हायची, विव्हळायची. तीला धीर देत बसायचा रात्रभर. मधेच झोप लागली तरी चुकल्याचुकल्यासारखं वाटायच त्याला. काही दिवसांनी वीणाला डिसचार्ज मिळाला.

जरी डिसचार्ज दिला असला तरी शरीरभर जखमा होत्याच. त्यांच नियमित ड्रेसिंग करावं लागायच. हॉस्पीटलमधील स्टाफकडून त्याने ड्रेसिंग शिकून घेतलं होत. तो अगदी सफाईदारपणे ड्रेसिंग करु लागला होता. पण जखमा अजून भरत नव्हत्या. मधूनच एखाद्या जखमेत पू भरायचा. कधी स्कीन निघायची. जखमांमूळे आणि कातडी ताणली जात असल्याने वीणा पलंगावरून उठूही शकत नव्हती. तीचं सगळं पलंगावरच आवरायला लागायचं. घरातले सगळे मनापासून तीची सुश्रुषा करायचे. नुसतं सुश्रुषाच नाही तर तीला कायम हसतं ठेवण्याचाही प्रयत्न करायचे.

त्याची नोकरी आणि सुश्रुषा अस शेड्युल ठरून गेलं होत. एकदा नोकरीवर असताना मामाचा रडवेल्या आवाजात फोन आला. वीणाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. झोपेच्या 15-20 गोळ्या घेतल्या होत्या. त्याला काहीच कळेना. इतकं टोकाच पाऊल उचलण्याएवढं काय झालं होत? मामा तर सारखा रडत होता. मामाला असं रडताना त्याने कधीच पाहील नव्हतं. त्याला खूप गलबलून आलं. आणि वीणाचा प्रचंड रागही.

वीणा जरा शुद्धीत आल्यावर त्याने तीला चिडूनच जाब विचारला. “आता वेदना नाही सहन होत रे. तूझ्यासकट घरातील सगळेच करतात मनापासून पण मी किती दिवस सगळ्यांना त्रास देऊ? आणि इतकं करुनही मी समजा पूर्ण बरी झालेच तरी माझं भविष्य ते काय? अशा अवस्थेत माझ्याशी कोण लग्न करणार? म्हणजे आयुष्यभर मी बाबांच्या डोक्यावर ओझंच की. त्यापेक्षा संपवून टाकू सगळं असा विचार केला. काय चुकलं?” वीणानी तीची बाजू सांगीतली. मामा तर सुन्न झाला होता हे ऐकून.

पुर्णांशाने चुकीच नव्हत तीच म्हणणं. आत्तापर्यंत कोणीही ह्या दृष्टीने विचारच केला नव्हता. दोन दिवस तो शांत राहीला. आणि नंतर आई-बाबा, मामा-मामींना समोर बसवलं आणि म्हणाला, “बाबा मला लग्न करायचय वीणाबरोबर.” बाबांना काय उत्तर द्यावे सुचेना. म्हणाले, “आत्ता भावनेच्या आहारी जाऊन बोलतोयस. जरा नीट विचार कर.”तो म्हणाला, “लहानपणापासून केवळ माझ्या खुषीसाठी मामा आपल्या हातातील आईस्क्रीम कायम मला देत राहीला आता त्यांचा रडवेला चेहरा मी कसा बघु शकतो?” मामा म्हणाला, “अरे, असे उपकार नकोत रे. त्याच्यासकट आयुष्यभर जगणं कठीण होईल मला.” तो म्हणाला, “ढग समुद्रावर पाऊस बरसवतो तो काय उपकार करतो का समुद्रावर? असे समुद्राकडूनच तर घेतलेलं असतं न त्याने सर्वकाही?”

एक वर्तुळ पुर्ण होत होतं. सावली उभी राहताना ‘त्याच्या’सारखे खांब सावलीला लाभले हे सावलीचे भाग्यच.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments