*मोरपंख..*
(कविता)
अरे मानवा असा कसा रे तू?
जरा काही झालं की करी तणतण..
उघडून पान वाचावे रामायण,
वनवासात राम ही हिंडले वणवण..
ऐन दुपारी लागली होती तहान,
दिवस आला माथ्यावर जसा जसा..
कासावीस झाला जीव रामाचा,
कोरडा पडू लागला तयांचा घसा..
हळू हळू पाऊल टाकू लागले,
सुरू झाला जलाशयाचा शोध..
झाडाच्या सावलीत होता मोर,
पक्षाकडून घ्यावा लागतो बोध..
रामाने केली तेव्हा विनवणी,
मी तृष्णेने व्याकुळ मार्ग दाव..
घेऊन जा आम्हा जलाशया,
समीप असेल जे तुलाच ठाव..
मी उडत उडत जाईन पुढे,
वाटेत एक एक पंख टाकीन..
पंखाचे दिशेने तुम्ही यावे,
मी पुढे जाऊन वाट पाहीन..
राम लक्ष्मण चालु लागले,
दृष्टीस पडला एक जलाशय..
लक्ष्मणा मोर कुठे दिसेना,
येथेच आहे कवितेचा आशय..
मी येथे आहे आला आवाज,
आकांताने मोर कळवळला..
पंखहीन मोर रक्तबंबाळ तो,
पाहून लक्ष्मणही हळहळला..
नत मस्तक मोर तो वदला,
प्रभू रामा अंत समय तो आला..
मुक्ती द्यावी प्रभू आता मला,
वार्धक्याने देह हा क्षीण झाला..
त्याग बघुन रामाने दिले वचन,
वाया जाणार नाही तुझे प्राण..
द्वापार युगात तुझी आठवण,
मोरपंखा देईल मुगुटात स्थान..
🙏🌹🙏
(येणे प्रकारे कृष्णाने मोरपंख आपले केसात माळले होते.)
*स्वरचित काव्य..*
कवी………..🖋️
©® – सुभाष कासार.
नवी मुंबई..💦
शेअर करा..