जीवन रहाटी बदलण्यासाठी व्यक्त होणारी कविता : ‘व्यक्त होतोय मी ‘ —–

कवि विलास गावडे यांच्या ‘ व्यक्त होतोय मी ‘या नुकत्याच प्रकाशित झालेल्या

काव्य संग्रहातील कविता वाचनात आल्या. त्यांच्या या कवितेतून व्यक्त  होते ती एक लोकशाहीत जगत असूनही स्वातंत्र्य हिरावलेली ,केवळ एका मेंढराप्रमाणे जीवन रहाटी असलेल्या लोकांच्या पारतंत्रीय व त्यातही जोखडबंद झालेल्या देशाची व्यथा. त्यातही निर्भीडता ही उपजत प्रवृत्ती असलेल्या पण चिकित्सकाच्या वृत्तीने निर्माण झालेला संशय जाहीर करताना तो म्हणतोय–

संविधांनाचा भंग होऊ नये म्हणून

लेखनावर अन वाचनावर

बंदी आणण्याऐवजी

सरकारने हा सुलभ मार्ग

शोधला असावा का ?

मला आता दाट संशय येतोय!

          (मला आता दाट संशय येतोय )

यात कवी व्यक्त होतानाच सभोवतालच्या वास्तवाचे भान सतत बाळगताना दिसतो.या काव्य संग्रहात कवि सध्याच्या वास्तव जीवनाचे अनुभव अधोरेखित करताना जितका आक्रमक होताना दिसतो तितकाच तो प्रसंगी भावुक व

अध्यात्मिकही असतो. पण असे असले तरी अध्यात्मिकतेने येणारा अंधश्रद्धाळूपणा तो जाणीवपूर्वक नाकारताना दिसतो. कारण समाज वास्तवाचे भान राखण्यासोबतच

कवि सभोवतालच्या सामाजिक परिस्थितिनुसार येणारे व बदलत जाणारे समाजकारणही कवि जाणून आहे.त्यामुळेच तो प्रसंगी त्यावरही आपले आसूड ओढायला विसरत नाही.

जमुरे !

तू दगडाला शेंदूर फासून

त्याला देवत्व देऊन

पुजा करत होतास

हे समजलं नाही का रे ?

          (नाच जमुरे नाच !)

जमूर्‍याची एक संकल्पना किंवा प्रतीक वापरुन कवी व्यवस्थेवरचे ताशेरे ओढताना आजची आपली संपूर्ण पिढीच सत्ताधार्‍यांच्या तालावर नाचतेय आपणही तिला आपल्याला वापरू देतोय ही भावना तसेच वास्तव जळजळीतपणे कवी लोकांसमोर ठेवू पहातोय.थोडक्या शब्दात मोठी आशयघनता निर्माण करणारी रचनेची शैली कवि सहजतेने उपयोगात आणताना दिसतो व तीलाच आपला ‘ठसा’ म्हणून रसिकांच्या मनावर कोरू पाहतो. गावडेंच्या आजवरच्या रचनांवर एक ओझरती दृष्टी टाकली तरी हा फरक नक्की जाणवेल.निर्भीडता आणि रोखठोकपणा हा या कवीचा उपजत स्थायीभाव आहे,तो त्याच्या वृत्तीतला एक भाग आहे.तशीच ही गुलामी वृत्ती नाकारतानाच या नाकारलेपणातच त्याची हळवी भाववृत्तीही  सहज डोकावते.

अगोदरचं वृद्ध जोडपं

व्याकुळतेन माझ्याकडे बघत होतं

मी क्षणभर त्यांच्याकडे बघितलं

आणि समोरच्या हॉटेलात जाऊन

भाजी-भाकरी घेऊन आलो

अन त्यांना देऊन नमस्कार केला

                    (दर्शन)

याच कवितेच्या अंतरंगाकडे आणखी डोकावून पहिले तर कविच्या मनात असलेली श्रद्धा ही केवळ मूर्तिपूजकाची नसून त्यात आपल्या मानसिकतेलाही तो भाबड्या आवरणाचे कोंदण न देता ती मानसिकता अंगी बानवण्याचा प्रामाणिक तसेच सच्चा

व्यावहारीक मूर्त स्वरुपात आणण्याचा प्रयत्न करताना दिसतो. यासोबतच कवि लोकांनी निर्माण केलेल्या व लोकमान्यतेतून प्रस्थापित झालेल्या व श्रद्धास्थानी बसलेल्या बाबा आदि कल्पनांना ती अगदी लोकमान्यता आहे म्हणून स्वीकारायला तयार होत नाही. पण त्याबाबतीत आपला संभ्रम प्रामाणिकपणे विना तक्रार कबुल न करता निर्भीडपणे,निर्भयपणे  नमूद करतो व व्यक्त होतो.

प्रतिकं निवडतानाही कवी अगदी साध्या व्यवहारातील प्रतिकांचीच निवड करून वेड्या धर्मभावनेच्या वृत्तीला हलकेच हात घालतो व त्यावर प्रहार करतो आणि  त्यामागच्या लपलेल्या वा लपवलेल्या सत्याची उकल करून जातो.

लोकं चित्रपट गृहातून बाहेर आली

समोर येणार्‍या लोकांना पेटवू लागली

त्यांच्या धर्माची खातरजमा न करता

दंगल पेटली

पेटलेल्या दंगलीच्या चुलीवर

राजकारण्यानी भाकर्‍या भाजल्या

आपआपल्या

धर्माच्या गोळ्या लोकं

चघळत राहिली

           (धर्माच्या गोळ्या लोकं )

कवीची आरपार भेदणारी भेदक नजर चौफेर फिरताना ती सर्व समावेशक बनून आपल्या सभोवती घडणार्‍या प्रत्येक घटनेकडे चिकित्सक दृष्टीने आकलन करीत त्यावर भाष्य करू पहाते. मग ती घटना सामाजिक असो व राजकीय. तिचे पडसाद हे मनाच्या संवेदनशीलतेला बोलण्याचे धाडस देतातच. त्याच धाडसातून कवीचे देशप्रेम मोकळेपणाने व्यक्त होतेच. पण ते व्यक्त होताना वास्तवता न नाकारता येते हे विशेष.

….अंथरूण म्हणून त्याने

एक वर्तमानपत्र अंथरल होतं

वर्तमान पत्राच नाव होतं

‘आपला देश ! ‘

त्याने पांघरायला

दुसरं वर्तमानपत्र घेतलं होत

कुतुहलाने मी त्यावरच नाव वाचल

तेही नेमकं

‘आपला देशच होत ‘

            (आपला देश )

या देशप्रेमात कवीचा सैनिकांप्रती असलेला एक हळवा कोपरा हृदय भावना पिळवटून जातो.  

वर्षातून एकदाच येत असतो आमचा

स्वातंत्र्य दिन

आणि प्रजासत्ताक दिन

त्या दिवशी तरी तू निदान

जाऊन बसू नकोस

फडकत फडकत

शवपेट्यांवर सैनिकांच्या

हीच विनम्र प्रार्थना तुला !

(हीच विनम्र प्रार्थना तुला !)

तितकीच प्रखर आत्मीयता कवि आपल्या आदर्शवत असलेल्या राष्ट्रीय नेत्यांप्रतीही

बाळगतो. व ते आदर्श आजच्या या बेगडी समाजव्यवस्थेत समाजासमोर ठेवू पाहतो व नव्या दृष्टींकोनातून नव्या समाजाची कल्पना करतो. तसेच तो आपल्याला त्याची आठवणही करून देतो.   

काही वर्षापूर्वी एक म्हातारा

असाच चालत गेला होता

सत्याच्या मार्गावरून

तर,त्याला मरणघाटावर

पाठवण्यात आलं होतं

तेवढं फक्त लक्षात ठेवा !

                 (तेवढं फक्त लक्षात ठेवा !)

ही आठवण करीत असतानाच महात्माजींच्या विचारधारेवरही सूक्ष्म इशारावजा तसेच सूचक भाष्य करून जातो त्यांच्या ‘ काल पुन्हा ‘ या कवितेतून ह्याच अनुभूतीची प्रचिती किंवा प्रत्यय येतो.थोडक्यात विलास गावडेंचा हा संग्रह म्हणजे कवीच्या सर्वांगीण अनुभूतीचे निर्भीडपणे व्यक्त होणे ही काळाची गरज आहे हेच सुचवू पाहतो.

प्रसाद सावंत

                                      व्यक्त होतोय मी

                                      (काव्यसंग्रह )

                                      कवि : विलास गावडे

                                      संवेदना प्रकाशन,पुणे

                                      मूल्य :१६० /-

                                      पृष्ठे :९६    

 

 

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments