कोजागिरीचा चंद्र आणि आपल्या साधक मनाची मशागत

  • *कोजागिरीचा चंद्र आणि आपल्या साधक मनाची मशागत.*

(पं. नरेश जयराम पुजारी, भागवताचार्य नाशिक. मो. ९४२२ ७५७६ ०८.)

आजच्या रूढी परंपरेप्रमाणे कोजागिरीला जागे राहायचे, पत्ते खेळायचे, विनोदी कार्यक्रम किंवा गाण्याचे कार्यक्रम श्रवण करायचे व नंतर काजू बदाम केशर घातलेले दूध प्राशन करायचे… इतका सीमित अर्थ या कोजागिरी शब्दामागे नाही, मग कोजागिरी म्हणजे काय?? एक साधक म्हणून कोजागिरीला काय केले पाहिजे? याचा विचार आज आपण करणार आहोत.

मानवाने सुख सोयीसाठी अनेक यंत्रांची निर्मिती केली आणि एक प्रकारे सर्वस्व जिंकल्याचा किंवा या विज्ञान कालात प्रगती /विकास साधल्याचा खूप प्रयत्न केलेला आपणास दिसतो.

या सुख सोयीच्या , आनंदाच्या भौतिक कल्पना म्हणजे मानवाचे व विश्वाचे खऱ्या अर्थाने कल्याण साधले गेले असे का??असाच काहीसा विचार मी करीत होतो.

कोजागिरी पौर्णिमा जवळ आलेली असल्याने निश्चितच कोजागिरी का व कशासाठी याचे चिंतन सुरू झाले.

पुराणामध्ये एक वलित नावाचा ब्राह्मण असतो, ज्याची बायको त्याचे मनाविरुद्ध वागणारी असते त्यामुळे तो दुःखी असतो आणि या दुःखातच घराच्या बाहेर पडून वनामध्ये नागकन्यांसह कोजागिरीला रात्री विष्णू लक्ष्मी यांचे सह इंद्राचे पूजन करतो, त्यामुळे त्याचे दुःख दूर होऊन त्याची बायको मनाप्रमाणे वागू लागते… अशी सर्वसाधारण कथा कोजागिरी पौर्णिमेची आहे. थोडक्यात मनाप्रमाणे सुख व आनंदाच्या प्राप्तीसाठी कोजागिरी पौर्णिमा साजरी करावी असे निष्कर्ष या कथे अंती निघतात.

को जागर्ती?? म्हणजे कोण जागे आहे, असे विचारत या पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी व स्वयं नारायण आकाश मार्गाने फिरत असतात व जे साधक व भक्त या रात्री जागे असतात, भगवंताचे स्मरण व चिंतन करतात त्यांच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात अशी थोडक्यात कथा आहे.

या कोजागिरीच्या रात्री लक्ष्मीनारायणाचे व इंद्राचे पूजन करून चंद्राच्या प्रकाशात उकळलेले व नंतर शितल केलेले दूध मध्यरात्री भगवंताला निवेद्य दाखवून प्रसाद रूपाने प्राशन करावयाचे असते.

माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले रोज सूर्यास्ताच्या पूर्वी भोजन करावयास सांगणारे आपल्या आयुर्वेद शास्त्र किंवा आहारशास्त्र रात्री काजू बदाम घातलेले शीतल दूध पिण्यासाठी का परवानगी देते? यामुळे नेमका काय फायदा होतो? तसेच रात्री जागरण करून देवाची ध्यानधारणा व पूजा केल्यास खरोखरच मनातील इच्छा परिपूर्ण होते काय ? असे नाना प्रश्न माझ्या मानवी मनात निर्माण झाले.

आश्विन महिना म्हणजे पावसाळा संपून शरद ऋतु प्रारंभ झालेला असतो. आकाशातील पावसाचे ढग दूर होऊन आता चंद्र दिसायला सुरुवात होतो अश्विनातील पोर्णिमा ज्या दिवशी चंद्राचे आकारमान इतर पौर्णिमेपेक्षा सर्वात मोठे असते. हा चंद्र 17 कलांनी युक्त असा चंद्र असतो या 17 कलांचे विविध नाव देखील सांगितलेले आहेत व ते अर्थपूर्ण आहेत (शंखिनी, पद्मिनी, लक्ष्मणी, कामिनी, पोषणी, अद्दलादिनी पुष्ठीवर्धिनी, अश्वपादीनी, व्यापिणी, प्रयोदिनी , प्रभा, मोहिनी, क्षीरवर्धिनी, वेधवर्धिनी, निकाशीणी, शौमिनी व अमृतकला) असो.

या सतरा कला असलेल्या चंद्राच्या शीतल प्रकाशात उकळलेले दूध शितल थंडगार केल्यास या दुधामध्ये चंद्राची किरणे पडतात या किरणांचा संयोग दुधाशी झाल्यानंतर तेच दूध अमृत बनते, त्यामुळे निश्चितच हा प्रसाद प्राशन करणाऱ्या जीवांना/व्यक्तींना मानसिक व शारीरिक लाभ होऊन पुंण्याची देखील प्राप्ती होत असते.

सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यात सूर्याची उष्णता वाढीस लागलेली असते त्यामुळे उष्णतेचे विकार समाजामध्ये पसरतात ऍसिडिटी /बीपी/ पित्त आदी आजार वाढीस लागलेले असतात, यावर रामबाण उपाय म्हणजे थंडगार दूध होय.

निश्चितच मध्यरात्रीच्या शीतल अशा वातावरणात हे थंड दूध उष्णतेचे विकार कमी करून शरीरातील उत्साह/आनंद याची वाढ करत असते. आयुर्वेद शास्त्र देखील याचीच पुष्टी करते.

महत्त्वाचा विषय म्हणजे कोजागिरीचा चंद्र आणि आपल्या मनाचा मोठा संबंध आहे हे आपल्या पुराण ग्रंथामधून स्पष्टपणे सांगितलेले आहे.

चंद्राच्या कला प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत ज्याप्रमाणे लहान मोठ्या होत जातात त्याचप्रमाणे मानवी मनात येणारे विचार देखील नित्य बदलत्या स्वरूपाचे असतात.

एकच विचार मनामध्ये पाच-सहा दिवस सलग राहिला, असे होत नाही, या विचारांमध्ये क्षणोक्षणी बदल होत जातात. चंद्र हा मनाचा कारक म्हणूनच सांगितला गेलेला आहे.

जन्म पत्रिकेत जर चंद्र बिघडलेला असेल तर संबंधित व्यक्तीच्या मानसिकतेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो, कदाचित अशी व्यक्ती वेडसर किंवा मूर्ख अशी देखील असू शकते.

चंद्र प्रबल असणं, हे चांगल्या मानसिक आरोग्याचे व आनंदाचे लक्षण मानले गेलेले आहे.

मन करा रे प्रसन्न! सर्व सिद्धीचे कारण!, असे म्हटलेले आहे. निश्चितच ज्याचे मन आनंदी व प्रसन्न त्याला सर्व कार्यात यश प्राप्त होते समृद्धी प्राप्त होते, त्याचे भय-बंधन नाहीसे होते.

प.पूज्य रामदास स्वामींनी म्हणूनच या मनाला योग्य दिशा देण्यासाठी 205 मनाचे श्लोक लिहिलेले आहेत.

मना सज्जना भक्ती पंथेची जावे !

तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे !!

जनी निन्द्य ते सर्व सोडून द्यावे!

जनी वंद्य ते सर्व भावे करावे !!

समाजाला या भौतिक वासना व संसार यातील दुःख दूर सारण्यासाठी समर्थ मार्गदर्शन करतात.

संसारातील दुःख हे या शरीराला मी व माझे असे मानल्यामुळे होत असते, नित्य लोभ-मोह आदी प्रवृत्तीमुळे अपेक्षा वाढत जातात व दुःख वाट्याला येत असते.

परमेश्वराची भक्ती केल्यास निश्चितच पणे हा मी पणा कमी होतो, मनाच्या मागण्या किंवा अपेक्षा कमी होतात व समाधान अंगी लाभल्याने दुःख हळूहळू कमी होत जाते.

इतर जीव जंतू किंवा पक्षांपेक्षा मानवी मनाचा वेग प्रचंड असतो त्याचप्रमाणे मनाची शक्ती देखील अगणित असते. हे मन नियंत्रित ठेवण्यासाठी, या मनाला सत्संगामध्ये किंवा चांगल्या सज्जन लोकांच्या सहवासात ठेवावे, त्यामुळे चांगले विचार प्राप्त होतात, आपले कर्म निश्चितच सत्कर्म ठरतात व आपणास यश व आनंद प्राप्त होतो.

जगामध्ये निंदनीय अशा गोष्टी किंवा इच्छा आकांक्षा मनापासून दूर ठेवाव्यात, ज्याच्यामुळे सर्वांचे कल्याण होईल कोणाचेही अहित होणार नाही अशी इच्छा किंवा कर्म आपण करावे असे समर्थ आपल्या मनाला उपदेश करत असतात.

खरोखरच मनाचे हित साधणारे हे सर्व श्लोक असून व्यक्तींचे कल्याण साधून राष्ट्राचे कल्याण या समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकात सामावलेले आहे, हे निश्चितच.

आज-काल टीव्ही सिरीयल किंवा मोबाईल मध्ये रमलेला परिवार किंवा लहान मोठे सर्वच रात्री पर्यंत जागे असतातच, त्यामुळे डोळ्याचे विकार, नैराश्यता, अनिद्रा, बीपी , डायबेटीस असे आरोग्याचे अनेक प्रश्न वाढीस लागलेले आपणास दिसतात.

साहजिकच या सर्व मुळे मानवी शरीरावर व मनावर खूप मोठा परिणाम होत असलेला आपणा सर्वांना दिसतो.

परिवारातील संवाद कमी होऊन विज्ञानाने निर्माण केलेल्या साधन सामग्रीमध्ये आनंद शोधण्याची प्रवृत्ती समाजात वाढलेली दिसते. नातेसंबंधातील प्रेम आपुलकी दिवसेंदिवस नाहीशी होऊन यामध्ये नाटकीपणा किंवा औपचारिकता वाढीस लागलेली दिसत आहे. साहजिकच यामुळे कुटुंब व्यवस्था मोडकळीस आलेली असून एक प्रकारे राष्ट्राच्या किंवा संस्कृतीच्या सुरक्षिततेचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे.

सुदृढ व आनंदी जनता ही राष्ट्राची संपत्ती आहे. जेव्हा ही संपत्ती मोडकळीस येते तेव्हा निश्चितच राष्ट्रावर देखील अवकाळा किंवा संकट आल्याचे चिन्ह समजले जाते.

भारतातील सर्व वेद-पुराणे किंवा उपनिषदे यांनी निर्माण केलेली असंख्य व्रते, सण समारंभ हे प्रत्येक जीवाच्या मानसिक व शारीरिक विकासासह राष्ट्र आणि समाजातील कुटुंब व्यवस्था सुदृढ करण्यासाठी रचना केलेले दिसून येतात.

म्हणूनच आपला हिंदू धर्म सनातन असा समजला जातो.

या सनातन धर्मात केवळ व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण सृष्टी ही विकासाची केंद्र बिंदू मानून सण व उत्सव साजरे करण्याची पद्धती-रचना निश्चित केलेली आढळते.

को-जागर्ती..?? याचा अर्थ कोण जागे आहे. म्हणजे फक्त कोण झोपलेले नाही असा अर्थ होत नाही.

या वेद पुराणांच्या रक्षणासाठी, संस्कृतीच्या रक्षणासाठी, समाजाच्या राष्ट्राच्या रक्षणासाठी कोण जागे आहे?? असा देखील अर्थ निघतो. कोण बरे पुराणातील सांगितलेल्या कथा नुसार भक्ती मार्ग आचरण करून जागरण करतो व आपल्या संस्कृतीचे रक्षण करतो??

कोजागिरीला देशी गायीचे दूध प्राशन करणे औषधी स्वरूप मानले गेले आहे, तेव्हा निश्चितच अशा गाईंचे पालन पोषण व संरक्षण ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आली. तेव्हा कोण आपल्या गायीचे/ गोवंशाचे रक्षण करतो?? असा प्रश्न देखील आपण आपल्या स्वतःला विचारला पाहिजे.

संतांनी गो-वर्धनधर गो-पालन रत असे भगवान विष्णूचे वर्णन केलेले आहे.

गो म्हणजे इंद्रियांचे वर्धन करणारा होय.

या इंद्रियाचे बाबतीत जागृत राहून त्यांना योग्य दिशा- विचार देण्याचे कार्य आपली संस्कृती करत असते.

कोजागिरीला सर्वात मोठा असलेला जसा चंद्राचा आकार असतो तसाच मनाचा आकार देखील मोठा झालेला मला बघता येईल का??

मनाचे वलय केवळ कौटुंबिक न राहता सामाजिक व राष्ट्रीय दृष्टिकोनातून विस्तृत होईल का??

यासाठी चिंतन करण्याचा हा खऱ्या अर्थाने दिवस असतो.

ज्यांनी सद्गुरूंकडून दीक्षा घेतलेली आहे किंवा जे साधना करतात त्यांना निश्चितच हा अर्थ अधिक प्रकर्षाने जाणवेल… , हे निश्चित.

जीवसृष्टीतील प्रत्येकाचे हित एकमेकांनी साधले तर निश्चितच सर्वत्र आनंदी आनंद प्रस्थापित होऊ शकतो, त्यासाठी या मनाला सत्कर्माचे व सत्संगाची दिशा देऊन नित्य जागृत ठेवले पाहिजे. मनातील मळभ , वाईट विचार किंवा नैराश्य झटकून बाहेर टाकले पाहिजे.

को- जागर म्हणजे कोण मला जागृत ठेवते आहे??अशी कल्पना करून आपल्या श्वासाकडे बारीक लक्ष देणे त्याची हालचाल अनुभवने होय. श्वास म्हणजे चैतन्य हेच आपल्याला जिवंत किंवा जागृत ठेवत असते. या श्वासाची चाहूल घेणे त्याच्याकडे लक्ष देणे याला साधन असे म्हटले गेले आहे.

अश्वमेध यज्ञ म्हणजे अ-श्व (श्वास) क्रिया म्हणजे श्वासोश्वास न चालता (श्वास रहित अवस्थेमध्ये) स्थिर राहणे, दश इंद्रियांसह मनाला नियंत्रित करणे होय.

या क्रियेलाच पहाटेच्या काळी किंवा मध्यरात्री करावयाची ध्यानधारणा किंवा साधना असे म्हणतात.

भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यात किंवा अगदी सर्व पुराणांमध्ये ध्यानधारणा करून मनाला आपण नियंत्रित करू शकतो व यश प्राप्त करू शकतो याचे अनेक पुरावे आज आपल्याकडे उपलब्ध आहेत.

प.पूज्य लोकनाथतीर्थ स्वामी महाराज, प.पूज्य नारायण काका ढेकणे महाराज, यांच्यासारख्या अनेक संत मंडळीनी या ध्यान धारणेचाच विश्वामध्ये प्रचार आणि प्रसार केलेला आपणास दिसून येतो.

को-जागर म्हणजे या मनाला कोण जागृत ठेवत आहे??.. हे बघण्यासाठी साक्षात प्रत्येक जीवामध्ये सामावलेली चैतन्य शक्ती हीच म्हणजेच साक्षात नारायण व लक्ष्मी येतात, ही कल्पना म्हणजेच अशा साधकाचे यश-आरोग्य याबरोबरच सर्व भौतिक सुखे , धनधान्य त्याच्याकडे येत असते. असेच या कोजागिरीच्या कथेमधून आपल्या ऋषीमुनींना व संत मंडळींना सांगावयाचें आहे.

चला, आज आपल्या घरातील किंवा विश्वातील प्रत्येक जीवाचे हित जपण्यासाठी आपण आपल्या मनाला नित्य जागृत ठेवूया, मनामध्ये कुठलाही संशय कुठलीही भीती किंवा नैराश्य त्रस्त विचार संचय न करता अधिक आत्मविश्वासाने सर्वांच्या कल्याणासाठी आपण सर्वजण कार्यरत होऊ या, सर्वांचे कल्याण म्हणजेच आपले कल्याण हे निश्चित आहे.

विज्ञानाने केलेली प्रगती, चंद्रावर टाकलेले पाऊल, मोबाईलची क्रांती, आदी सर्व काही प्रगती कारक घटना भासत असल्या तरी यातील काही गोष्टी चांगल्या किंवा काही वाईट अशाच आहेत.

थोडासा खोल विचार केल्यास हे विज्ञान जगाला युद्धाकडे घेऊन चाललेले व व्यक्ती व्यक्तीना एकामेका पासून दूर करणारे, असेच ठरत आहे.

भविष्यामध्ये मानसोपचार तज्ञांची गरज खूप मोठ्या प्रमाणावर भासणार आहे, कारण समाजाचा आपापसातील संवाद कमी होऊन यंत्रावर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती, आळशी प्रवृत्ती किंवा स्वतःहून काही करायचेच नाही, अल्प श्रमात जास्त मोबदला ही प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे.

या विज्ञानाला आपण परिपूर्णपणे दूर करू शकत नाही मात्र त्याचा मोजून मापून वापर करणे सहज करू शकतो. ज्यामुळे आपले स्वतःचे व संपूर्ण समाजाचे कल्याण साधले जाऊ शकते.

या कोजागिरीच्या निमित्ताने असे ठरवूया की, आपण टीव्ही मोबाईल इत्यादी यंत्रसामुग्रीचा कमीत कमी वापर करून प्रत्येक जीवाशी किंवा नातेवाईकांची आपण स्वतः संवाद साधूया… बघा बरे यामुळे आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाची निर्मिती होईल किंवा नाही.

समाजात किंवा कुटुंबात झालेली आनंदाची किंवा सुखाची निर्मिती ही निश्चितच चंद्राच्या शीतल प्रकाशाप्रमाणे आल्हाददायक व सुखकारक असेल हे निश्चितच आपण सर्वजण अनुभवाल.

आपणाला ही निश्चितच कळेल की पौर्णिमेच्या चंद्राचा आणि माझा किंवा माझ्या मनाचा अत्यंत जवळचा संबंध आहे.

आनंदी जीवनासाठी या मनाला चांगले विचारांची व चांगल्या कर्माची जोड आपण दिली पाहिजे. आपले कोणतेही अज्ञान दूर होऊन ज्ञानाची लालसा आपल्या जीवनात निर्माण झाली पाहिजे.

मी आणि माझे कुटुंब असे संकुचित मनाचे रिंगण व्यापक करून मी आणि माझे राष्ट्र/ माझा समाज असे सुदृढ करून आपण कोजागिरीच्या चंद्राप्रमाणे आपले मन शुद्ध-निर्मळ व शितल केले पाहिजे. निश्चितच यश आणि समृद्धी आपल्या पाठीमागे स्वतःहून आल्याशिवाय राहणार नाही.

ही कोजागिरी पौर्णिमा ज्ञानाची शितलता आपणा सर्वांना प्रदान करो, मानवी जीवनाची विचार करण्याची प्रवृत्ती आपल्या साधनेमध्ये अंतर्भूत होवो, याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये मानसिक, शारीरिक आनंदासह सर्व सुख समृद्धीची वृद्धी होवो, ही प्रार्थना भगवंत कडे व्यक्त करतो, आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

नरेश जयराम पुजारी

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments