सहजसुंदर अभिनयाच्या कलावंताच्या जीवन प्रवासाचा दस्तावेज ‘स्वत:ला रचित गेलो ‘

सहजसुंदर अभिनयाच्या

कलावंताच्या जीवन प्रवासाचा दस्तावेज

‘स्वत:ला रचित गेलो ‘

 

अभिनयाच आव्हान सहजगत्या पेलणार्‍या,कलेवर निस्सीम श्रद्धा असणार्‍या कलावंत माणसाच्या कलाप्रवासाचा,अनेक

खाचखळग्यातून तावूनसुलाखून यशस्वी ठरलेल्या नटवर्य सुहास भालेकर यांच्या अभिनय क्षेत्रातील वाटचालीचा लेखाजोखा रविंद्रनाथ पारकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कथनात्मक  स्वरुपात शब्दांकीत केला आहे.

कामगार रंगभूमीपासून सुरवात करून व्यावसायिक नाटक तसेच अगदी आजच्या चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार्‍या अभिनेते सुहास भालेकर यांचं नाव प्रामुख्यानं घ्यावच लागेल.

साधारणपणे १९४०नंतरच्या कालखंडात भालेकरांच्या कारकिर्दीला सुरुवात झाल्यानंतर त्यांच्या त्या काळातील खडतर प्रवासापासून,जीवनातील अनेक चढउतार सहन करीत ते अगदी त्यांच्या अभिनयाच्या उंच शिखरापर्यंतच्या तारीखवार घडामोडींची सचित्र दखल पारकर यांनी आपल्या या दस्तावेजवजा पुस्तकात घेतल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने त्यांचे समकालीन शाहीर साबळे,नटवर्य राजा मयेकर तसेच त्यांच्या चित्रपट कारकीर्दीतील दिग्दर्शक राजदत्त,व्ही. शांताराम,संगीतकार वसंत देसाई,दाजी भाटवडेकर आदि पतिथयश निर्माता दिग्दर्शकांच्या तसेच समकालीन कलावंतांच्या कडू गोड आठवणी संग्रहीत किंबहुना एखाद्या चित्रपटाप्रमाणे चित्रित झाल्या आहेत.यातून त्यांच्या कला जीवनाचा प्रवास ‘स्वत:ला रचित गेलो ‘ या समर्पक शीर्षकाने अधोरेखित झाला आहे. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेच्या शीर्षक रूपाने आलेल्या या ओळीतून तसेच कथनात्मक स्वरुपातील रविंद्रनाथ पारकर यांच्या लेखन शैलीतून अभिनेते सुहास भालेकर यांच्या जीवन संघर्षाचे यथार्थ दर्शन घडते व त्याची तीव्रताही जाणवते हे नक्की..

 

—प्रसाद सावंत  

 

स्वत:ला रचित गेलो

शब्दांकन :रविंद्रनाथ पारकर

संवेदना प्रकाशन,पुणे

पृष्ठे :२०८

किमत :३००/-

 

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments