पाऊस

पाऊस रात्रीचा घरी परतेना

म्हणून आभाळ खूप गरजलं

वाट दाखवावी हेतूने

खूपदा सौदामिनीने वरजलं ॥

 

तो इकडे धरतीच्या कुशीत

मस्तवार खेळत होता

झरे ,ओढे , नद्यांसोबत

रानोमाळ पळत होता ॥

 

पावसाला फारच आवडलं

वाऱ्याशी दोस्ती करून

डोंगरावरून स्वैर उतरत

धुक्याच्या दरीत वस्ती करून ॥

 

तरु-वेली,  वृक्षवल्ली

ओल्या चिंब निथळत होत्या

दऱ्या किनारी लाटांवर लाटा

बेभान नुसत्या उधळत होत्या ॥

 

भूगर्भातून एक अंकुर

हळूच वर डोकावले

पाहून देखणं सृष्टी -रूप

अंतरंगी सुखावले  ॥

 

कोण नवजात शिशु इवला ?

पाऊस वाऱ्यास पुसे ;

काळी माती प्रसवली आता

सर्वत्र हिरवाई दिसे ॥

 

पाऊस परते लगोलग घरा

गोड वार्ता वरती सांगे

दिनकर देई अगणित आशिष

आपल्या सहस्त्र किरणांसंगे ॥

 

            शुभदा अमृतकर

शुभदा उमेश अमृतकर

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments